Sunday, August 29, 2010


‘मुक्तांगण’ व्यसनमुक्ती केंद्र आज पंचविसाव्या वर्षांत पदार्पण करतंय. त्यानिमित्त अनिल अवचट यांनी लिहिलेलं ‘मुक्तांगणची गोष्ट’ हे पुस्तक ‘समकालीन प्रकाशन’तर्फे प्रकाशित होतंय. त्यातील हा संपादित अंश-
सु नंदाने ‘मुक्तांगण’ची घडी नीट बसवली होती. त्यात आनंद (नाडकर्णी) ठाण्याहून अधूनमधून यायचा आणि सुनंदाने नांगरलेल्या जमिनीत नव्या उपक्रमांच्या बिया पेरून जायचा. अनेक उपक्रम सुनंदा आणि पेशंटच्या संवादातूनच सुचत गेलेले. सुनंदाविषयी वाटणारे माझे आश्चर्य द्विगुणित होत चालले. कॉलेजपासून आम्ही ओळखत होतो. बरोबरच वाढलेलो, पण या मुलीत हे सगळे कुठे लपलेले होते? तशी ती ‘मेंटल’मधल्या कामात, ‘हमाल पंचायती’च्या दवाखान्यात मला वेगळी जाणवली होती. एक सहृदय डॉक्टर म्हणून वेगळेपण होतेच, पण इथे त्याहून अधिक काही तरी व्यक्त होत होते. तिच्या स्वभावात एक चांगला अॅडमिनिस्ट्रेटर होता आणि दुसरा सहृदय डॉक्टर. तिथं ती मोठय़ा यंत्रणेचा एक भाग होती. तिथं तिनं चांगलं काम करून ठसा उमटवला होताच, पण तरी तो सेटअप आधी अस्तित्वात होताच. पण इथे कॅनव्हास पूर्णपणे कोरा होता. सर्व काही नव्यानंच निर्माण होत होतं.
पेशंट, उपचार, भेटायला येणारे नातेवाईक, त्यांची मुलं, वृद्ध आईवडील.. या सगळ्या बाबतीत ती ‘मृदू’ या शब्दाहून मृदू असायची. ठरलेले नियम असूनही या माणसांसाठी ते प्रसंगी बाजूला ठेवायची तिची तयारी असे. एवढी सायकियाट्रिस्ट, सुपरिंटेंडंट कधीही होऊ शकली असती, पण ते नाकारणारी वरिष्ठ अधिकारी, पंधरा वर्षांची कामाची सीनियॉरिटी.. हे सगळं बाजूला ठेवून पेशंट, नातेवाईक या सगळ्यांकडून शिकण्याची तिची तयारी. त्यामुळे तिनं घालून दिलेला ‘पेशंटकडून शिकणं’ हा परिपाठ आजही चालू आहे आणि तो आम्हाला बनचुकेपणापासून वाचवतो आहे.
‘तुझ्यासाठी काय झालं असता तुझी दारू सुटेल?’ हा प्रश्न ती पेशंटला विचारायची. आजतागायत त्याला बहुधा हा प्रश्न कोणीच विचारला नसणार. ‘या बेवडय़ाला काय कळतं?’ ‘यानं घरात इतके तमाशे केलेत, याच्यामुळं घराची अब्रू धुळीला मिळाली, याच्यामुळं बायको मुलांना घेऊन माहेरी निघून गेली..’ वगैरे उद्गार ज्याने सतत ऐकलेले आणि त्यात खोटं काही नाही, अशी परिस्थिती. त्या माणसाला सुनंदा हे विचारते? त्याला कळत असतं तर तो या परिस्थितीला येऊन पोहोचला असता का? पण सुनंदा म्हणायची, ‘त्यांचं म्हणणं कदाचित चुकीचं असेल, पण ऐकूया तरी.’ तिथून सुरुवात करणं, हे योग्य वाटेवरचं एक पाऊल असे. त्यामुळे पेशंटला तिच्याविषयी विश्वास वाटू लागायचा. तिचा कुणाहीपेक्षा पेशंटवर जास्त विश्वास असे. (ज्याने अनेकांच्या विश्वासाला तडा दिलेला!) त्या भरघोस टाकलेल्या विश्वासाने ती पेशंटचा विश्वास मिळवायची. विश्वास टाकल्याशिवाय कसा मिळणार, हा तिचा साधा-सरळ प्रश्न होता.
एक पेशंट आठवला. बंगलोरला त्याच्या वडिलांच्या काही फॅक्टरीज होत्या. सर्व माल एक्स्पोर्ट होत असे. हा आमचा पेशंट, संदीप चित्रे म्हणून या त्याला, डायरेक्टर बोर्डावरचा डायरेक्टर होता. संदीपला दारू, ड्रग्ज सगळ्याचं व्यसन होतं. त्याला भारतातल्याच काय, विदेशांतल्याही व्यसनमुक्ती केंद्रांत ट्रीटमेंट दिलेली होती, पण हा कशालाच बधला नाही. दिसायला, संस्कृतीने विदेशी. डोक्यावरचे केस असे वाढलेले, पिंजारलेले, की एखादा हिप्पीच जसा. शेवटी नाइलाजाने त्याला मुक्तांगणमध्ये आणलं. आमच्या इथे स्पेशल रूम्स नाहीत, स्पेशल जेवण नाही, सगळे एकाच हॉलमध्ये.. तरीही त्यांनी त्याला इथं आणलं. सुनंदासमोर बसवलं. त्याचे वडील यशस्वी, शून्यातून विश्व उभे केलेले उद्योजक, त्यांच्या बोलण्यात एक हुकमत असे, यशस्वी माणसाची. ते सुनंदाला सांगू लागले, ‘ही इज लाइक दॅट.. त्याला तुम्ही हे सांगा, ते सांगा..’ सुनंदा त्यांना थांबवत शांतपणे म्हणाली, ‘त्याला काय सांगायचं हे मला कळतं. तुम्हाला मी विचारेन तेव्हा तुम्ही बोला.’ त्यांना हा एखादा हजार व्होल्टचा धक्काच जसा, पण एकदम गप्प झाले आणि संदीप एकदम खूश! त्याचा सुनंदावर एकदम विश्वासच बसला. तो नंतरही इतका अढळ राहिला की बस्स. अॅडमिट झाल्यावर सगळ्यांमध्ये मिसळलाच एकदम. एवढा मोठय़ांचा मुलगा, पण सगळ्या डय़ुटय़ा करू लागला. सुनंदाचा तर तो लाडका मुलगाच झाला. पुढे तो बरा होऊन बंगलोरला गेला, पण तिथे त्याचे त्या आक्रमक वडिलांबरोबर सतत खटके उडत राहिले. त्याचा एकदा सुनंदाला फोन आला, की ‘मला काहीही काम द्या, अगदी स्वीपरचंही, पण मला तिथे आश्रय द्या. माझं-वडलांचं अजिबात पटत नाही. हे चालू राहिलं तर मी परत ड्रग्जमध्ये जाईल.’ सुनंदाने त्याला लगेच फोन करून बोलावलं आणि तो पडेल ते काम करू लागला.
एकदा सुनंदाबरोबर मी मुक्तांगणला आलो होतो. समोरून संदीप आला. एका हातात बादली आणि दुसऱ्या हातात खराटा. डोक्याला केसांना आवरणारी एक कापडी पट्टी गुंडाळलेली. त्या अवतारात सुनंदासमोर उभा राहून म्हणाला, ‘मॅडम, कसा दिसतो मी?’ सुनंदाने हसून अंगठा आणि शेजारच्या बोटात गोल करून हलवून ‘छान छान’ची खूण केली. त्याने स्वत: होऊन ते काम हातीच घेतलं जसं. ‘मेंटल’चं सगळेच बांधकाम टिपिकल, सरकारी दर्जाचं. संडासची भांडी फुटलेली, ड्रेनेजलाइनच्या लेव्हल्स खालीवर झाल्याने ते वरच्यावर तुंबत. संदीपने ही साफसफाई हाती घेतली. त्याच्या नादाने आणखी सात-आठजण त्याच्या टीममध्ये सामील झाले. डोक्याला पट्टय़ा गुंडाळून, हातात झाडू-बादल्या घेऊन उत्साहाने कामाला निघत. संदीपनं नाव दिलं होतं, ‘मेंटेनन्स टीम’. ड्रेनेजलाइन तुंबल्यावर खाली उतरून ब्लॉक काढावा लागे. संदीप स्वत: आत उतरत असे आणि ब्लॉक काढत असे. मला एकदा तो म्हणाला, ‘बाबा, मनात वेडेवाकडे विचार आले की मी झाडू-बादली घेऊन चार संडास साफ करून टाकतो, की मन एकदम शांत होतं.’ तो इंग्लिशमध्ये चांगलं लिहायचा. कविताही करायचा. पुण्यातल्या इंग्लिश पेपरांमध्ये त्या छापून येऊ लागल्या. तो कमी बोलायचा, पण त्यात मॅच्युरिटी दिसायची. त्यांची टीम इकडून तिकडे जाताना दिसली, की मला वाटायचं, हे चित्र पाहून गांधीजींनी नक्की पाठ थोपटली असती, अगदी सगळ्यांची. पण हा आनंद त्याच्या वडिलांना कळणं कठीण होतं. त्यांना जेव्हा कळलं की संदीप इथं ‘असं’ काम करतोय, तेव्हा त्यांनी त्यांच्या मॅनेजरला पाठवलं. वडिलांचा निरोप होता, हे काम ताबडतोब सोडून परत ये. येणार नसलास तर पार्टनरशिप, डायरेक्टरशिप सगळ्यांचा राजीनामा द्यावा लागेल. संदीपने क्षणाचाही उशीर न लावता मॅनेजरकडून त्या सगळ्या राजीनामापत्रांचा गठ्ठा घेतला, भराभर सह्या केल्या आणि म्हणाला, ‘नाऊ, आय अॅम ऑन माय ओन.’ आता माझा मी.
पुढे त्याचं इथेच लग्न ठरलं. त्याला आम्ही सगळे गेलो होतो. नंतर मुलगा झाला. त्याचे आई-वडील येऊ-जाऊ लागले, ही सगळी पुढची गोष्ट.
जसं संदीपच्या वडिलांबद्दल झालं, तसंच आणखी एकदा झाल्याचं आठवतं. एक खासदारबाई त्यांच्या मुलासाठी मुक्तांगणमध्ये आल्या. पूर्वी त्यांच्या जिल्ह्यात ज्यांनी कलेक्टर म्हणून काम केलं, तेच आता पुण्याचेही कलेक्टर होते. त्यांना बरोबर घेऊन आल्या. स्थूल शरीर, डोक्यावरून पदर. अशा त्या होत्या. आमच्याकडेच काम करणारे धावत आले, ते आलेत, हे सांगायला. सुनंदाने सांगितलं, ‘मला भेटायला येणारे कुठं बसतात, तिथे बसव.’ ते तिच्या खोलीबाहेरचं बाक होतं. पेशंट संपल्यावर त्यांना आत घेतलं. त्या बाई खूप बोलत सुटल्या. सुनंदा त्यांना थांबवत म्हणाली, ‘हे तुम्ही आधी सांगितलंय. नवीन सांगायचं असेल तर सांगा.’ त्या बाई (तसाच) धक्का बसल्यासारख्या गप्प बसल्या. कलेक्टरांकडे वळून म्हणाल्या, ‘आम्ही पुढारी मानसं. बोलायला लागलं की बोलतच सुटतो, पण मला अशी थांबवणारी ही बाई पहिल्यांदाच भेटली.’
तो मुलगा चांगला राहायचा, पण त्या बाईंचे राजकारणातले प्रतिस्पर्धी कधी तरी संधी पाहून त्याला पाजायचे, की गावभर, अगदी यांच्या घरासमोर त्या अवस्थेत धिंगाणा घालायचा. मग त्या बाईंचा सुनंदाला फोन यायचा. असं एक-दोनदा झाल्यावर सुनंदाने त्याला तिथून दुसरीकडे स्थलांतर करायला सांगितलं. त्या बाई संतापल्या. म्हणाल्या, ‘अहो, तो माझा राजकीय वारस आहे. असं कसं करता येईल?’ सुनंदा शांतपणे म्हणाली, ‘तुम्हाला वारस हवा की मुलगा?’ या वाक्यानं सगळं बदललंच. आता तो मुलगा मुंबईला छोटा व्यवसाय चालवतो. आधीच्या मानाने परिस्थिती बेताची असली तरी तो व्यसनांपासून दूर आहे आणि आजीबाईंना नातवंडं इतकी प्रिय, की त्या पुढारीपणातून वेळ काढून खेळायला येतात. (कदाचित बाई त्यांच्यात वारस शोधत असतील!)
सुनंदा नेहमी म्हणायची की, पेशंट्सना हँडल करणं सोपं आहे, पण अशा कटकटय़ा पालकांना हँडल करणं अवघड आहे. पेशंटचा तिच्यावर फारच लोभ असे. तिच्यात असं काही तरी होतं की, गोंधळ घालणारे पेशंटही क्षणात शांत होत. नाना पेठेतल्या दवाखान्यात अशा व्यसनींनाही तिला दाखवायला आणत. बाहेर ओटय़ावर गोंधळ चाललेला. त्या पेशंटला चार-सहाजणांनी धरून आणलं, पण त्या कोणालाही तो आवरत नव्हता. सगळी गर्दी दवाखान्यात घुसली. सुनंदा म्हणाली, ‘बाकी सगळे बाहेर जा. मी पेशंटशी बोलेन.’ कुणी बाहेर जायला तयार होईना, कारण संतापलेला पेशंट काहीही करू शकेल. शेवटी ते बाहेर गेले. पाच-सात मिनिटांनी सुनंदाने बाहेरच्या लोकांना खूण करून बोलावलं. ते आले. पेशंट शांत बसला होता. ती म्हणाली, ‘याला घेऊन जा, तो अँडमिट व्हायला तयार आहे. उद्या तिकडे घेऊन या.’ सगळे थक्कच्या पुढची काय अवस्था असेल तसे झाले.
ही काही गूढ शक्ती होती का? मला तसे वाटत नाही. हा फरक कशामुळे पडत असेल? तिच्या दृष्टिकोनामुळे, तिच्या वृत्तीमुळे? माणूस कितीही वाईट, आक्रमक, कसाही असो, तिची त्याच्याकडे पाहायची दृष्टी त्यानुसार बदलत नसे. पूर्वग्रह कधी आड आले नाहीत. त्या माणसामध्ये एक चांगला माणूस आहे, यावर तिचा दृढविश्वास होता. मग तो व्यसनी असो, वेडा असो की मतिमंद. सगळ्यांमध्ये तिला चांगली शक्यता दिसायची. तो विश्वास तिच्या नजरेतून समोरच्याला जाणवत असावा. ती कधी न्यायाधीशाच्या भूमिकेतून पाहत नसे. त्याने काय काय कृत्ये केलीत, काय घोटाळे केले, यावर त्याच्याकडे पाहायची तिची दृष्टी बदलत नसे. पेशंटविषयी वाटणारं अगत्य, वात्सल्य तिच्या डोळ्यांतून, शब्दांतून व्यक्त होत असावं. ती कधी उपदेश करीत नसे. ‘दारू सोड’ असे शब्द तिने कधी उच्चारले नसतील, कारण ते आधी घरच्यांनी, हितचिंतकांनी हजारदा उच्चारले असणारच. त्याचा परिणाम त्या अवस्थेत शून्यच असतो. मग ज्याचा उपयोग नाही ते कशाला म्हणायचं?
एकदा नुकताच aodamit झालेला पेशंट खूप रागावलेला होता. गुरुवारी त्याची आई भेटायला आली नाही म्हणून सगळीकडे आदळआपट चालली होती. म्हणाला, ‘ती कोण अवचटबाई आहे तिला येऊच दे. तिला सांगून निघूनच जातो. कोण मला अडवतो ते मी पाहतो!’
तेवढय़ात सुनंदाची गाडी आली. आमच्या घरासमोर बुचाच्या फुलांचा सडा पडतो. त्यातली थोडी ताजी फुले उचलून ती गाडीत बसायची. उतरली तेव्हा तिच्या हातात ती फुले होती. हा रागावलेला पेशंट एकदम पुढे आला. सुनंदा त्याच्याकडे बघून हसली आणि हातातली फुलं त्याला देण्यासाठी तिनं पुढं धरली. तो सर्दच झाला. सगळा राग कुठल्या कुठं पळून गेला. तो नंतर इतरांना म्हणाला, ‘माझी आई नाही आली तर नाही आली, इथं मला एक आई मिळालीय!’ त्यानंतर बदललाच तो पूर्णपणे. सगळ्या थेरपींमध्ये भाग घ्यायचा. घरचे भेटायला यायचे, तर त्यांना खरं वाटायचं नाही, की हा आपलाच माणूस आहे की दुसरा. असे प्रसंग मुक्तांगणमध्ये नेहमीच घडत. मी नेहमी म्हणायचो, चमत्कार मुक्तांगणमधली रोजची घटना आहे. कोणी विचारत असे, ‘रोज घडेल त्याला चमत्कार कसे म्हणाल?’ मी सांगायचो, ‘त्या कुटुंबाच्या जीवनात अनेक वर्षांनी अगदी अनपेक्षित घडतं, म्हणून.’
सौजन्य : दैनिक लोकसत्ता

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...