Tuesday, August 2, 2011


त्या घरातल्या पडद्याआड असलेल्या सुनांशी बोलताना मी त्यांचं लक्ष त्या गोष्टीकडे वेधलं, की ‘हा पोपट अगदी बिहारच्या स्त्रियांसारखा आहे; पिंजऱ्यात बंद असला तरीही आनंदी आहे.’
काही वेळ सगळीकडे शांतता पसरली. शांततेचा भंग करत छोटी सून म्हणाली, ‘असं अजिबात नाही, इथंही बायकांना बाहेर पडण्याची इच्छा आहे, काहीतरी करण्याची बिहारच्या स्त्रियांचीदेखील इच्छा आहे, पण समाज त्यांना रोखून ठेवतो.’
हा संवाद आहे डॉ. कल्पना शास्त्री यांच्या ‘मी अनुभवलेला बिहार’ या पुस्तकातील. ही परिस्थिती बिहारमधील स्त्रियांची आहे; पण एकूणच भारतातील स्त्रियांची परिस्थिती यापेक्षा किती वेगळी असू शकेल, असा प्रश्न पडतो. आजच्या जागतिकीकरण आणि मुक्त अर्थव्यवस्थेच्या काळातही किती स्त्रियांना मोकळा श्वास घेऊन जगता येतं?
पुस्तकाच्या सुरुवातीला बिहारमधील सामाजिक कार्याकडे कसे ओढले गेलो हे डॉ. शास्त्री सांगतात. त्यांचे वडील मध्य प्रदेशातल्या मागासलेल्या बुंदेलखंडमधील सागर या शहरातले. पेशाने डॉक्टर. आई सुधारक वृत्तीची. त्यामुळे घरातून मोकळेपणाचे वातावरण मिळाले. पुढे हे सर्व कुटुंब वध्र्याला स्थायिक झाले. महाराष्ट्रात असतानाच समाज परिवर्तनाचा ध्यास लेखिकेच्या मनात रुजला. तरुण शांती सेना या सवरेदयी विचारांच्या जे.पीं.नी सुरू केलेल्या संघटनेच्या संपर्कात त्या आल्या. पुढे त्यांचा विवाह शुभमूर्तीशी झाला. शुभमूर्ती बिहारमधील मिथिला क्षेत्रातल्या रासोडय़ाचे. ते स्वत: जे.पीं.च्या पहिल्या ‘छात्र संघर्ष वाहिनी’चे पहिले संयोजक होते. त्यांच्याशी केलेल्या चर्चेतून बिहारमध्येच सामाजिक कार्य करण्याचा निर्णय कल्पना शास्त्रींनी घेतला.
रासोडय़ाला राहू लागल्यावर तिथले मागासलेपण, वीज नसणे, स्त्रियांवर असलेली सामाजिक बंधने या सर्वाचा लेखिकेने घेतलेला अनुभव वाचण्यासारखा आहे.
२५ वर्षांपूर्वी लेखिका लालूप्रसाद यादवांच्या बिहारमध्ये गेल्या तेव्हा बिहारचे तुकडे झाले नव्हते. (झारखंड वगैरे राज्ये झाली नव्हती.) त्यांनी बिहारचा जो प्रदेश अनुभवला तो प्रांत म्हणजे मिथिला. बुढी गंडक आणि बागमती या दोन नद्यांच्या संगमावर वसलेलं रासोडा हे गाव त्यांचं कार्यक्षेत्र. नद्यांना येणारे पूर, विजेचा अभाव, सेवा-सुविधांचा अभाव याबद्दलची माहिती ‘तेव्हाचा बिहार’ या प्रकरणात आली आहे. त्या वेळच्या आणि एकूणच बिहारच्या कुटुंबप्रधान संस्कृतीची सविस्तर चर्चा केली आहे. त्याबाबत लेखिका म्हणतात, ‘सामंती मूल्यांना धरून असणाऱ्या एकत्र कुटुंबाच्या सामाजिक पायावर उभा असलेला बिहार हे बिहारचे अंतर्गत चित्र आहे. जातीवर आधारित समुदायाचा मजबूत पाया हेदेखील बिहारच्या समाजाचं अंतर्गत चित्र आहे. असं चित्र असलेल्या समाजात समतेच्या पातळीवर संवाद साधणं अशक्य करण्यात आलं आहे.’ एकत्र कुटुंबाचे सकारात्मक पैलूही लेखिकेने सांगितले आहेत, पण त्याचबरोबर त्या म्हणतात, ‘पण कुटुंबात एकोपा राखण्यासाठी स्त्रीचं स्वतंत्र अस्तित्व नाकारणं, ही कुठली संस्कृती मानायची?’
समाजात स्त्रियांविषयी काही पक्क्य़ा समजुती आहेत. पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुष स्त्रियांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत. त्या विनाकारण बोलतात, त्या कुटुंबात फूट पाडतात अशी त्यामागची कारणे सांगितली जातात. कोणत्याही पुरुषाच्या चुकीच्या वागणुकीमागे स्त्रीचंच डोकं असतं, असाही समज आहे. चांगली स्त्री म्हणजे, तिनं कितीही मतभेद, अशांती असो, काही बोलायचं नाही. पोटात आग पेटलेली असली, तरी तोंडातून धूर निघायला नको..
बिहारमधल्या स्त्री-जीवनाबद्दल सांगताना डॉ. शास्त्री म्हणतात, इथं एक काळ असा होता की, स्त्रियांच्या विद्वत्तेला मान होता. म्हणूनच विद्वान पंडितांच्या चर्चेत निर्णायक म्हणून त्यांना मान्यता होती. आज मात्र जणू काही सर्वच बदललं आहे.
बिहारमधील एकूण स्त्रिया, मग त्या उच्चमध्यमवर्गीय कुटुंबातील असल्या तरी मुलांचे पालन-पोषण आणि स्वयंपाकघरातच गुंतलेल्या असतात. सकाळ-संध्याकाळचा नाश्ता, दोन्ही वेळेस ताजं जेवण, गरम फुलके हे आवश्यकच असतं. पुरुष बाहेरच्या व्हरांडय़ात तर स्त्रिया घरातल्या अंगणात असतात. त्या घरातल्या पुरुषासमोरही पडदा ठेवतात. कधीही घराबाहेर जात नाहीत. प्रत्यक्ष अनुभवातली अनेक उदाहरणे, प्रथा सांगत लेखिका आपली मते व्यक्त करते. कौटुंबिक हिंसाचार तर सर्वत्र आढळतो. अर्थात, तो भारतात इतरत्रही आढळतो. बिहारमधील काही गावं चांगल्या किंवा वाईट वैशिष्टय़ांमुळे प्रसिद्ध किंवा कुप्रसिद्ध आहेत. जरा मुलगी बोलली, पतीला किंवा सासरच्यांना आवडलं नाही तर तिला मारून नदीत फेकून देतात. अशा गोष्टी आजही घडत असतील तर ते किती धक्कादायक आहे.
‘जाती-धर्म आणि स्त्रिया’ या प्रकरणात डॉ. शास्त्री म्हणतात- ‘जात न मानणं हे ग्रामीण समाजासाठी धर्म भ्रष्टतेचं लक्षण आहे. ही धर्मभ्रष्टता केवळ उच्च-नीच जातीतील स्त्रियांनी एकत्र जेवायला न बसण्यातूनही दिसून येते.’ याचा आणखी प्रत्यय एकूणच बिहारी समाजात येतो. १९५० मध्ये लेखिकेच्या सासऱ्यांनी दलितांसाठी शाळा सुरू केली त्याबाबतही हाच अनुभव होता. १९८० च्या दशकात आणि आजही ज्या भागात जी जात उच्च मानली जाणारी असेल त्या जातीचं त्या गावात वर्चस्व असतं.
डॉ. शास्त्री दलित स्त्रियांची शिबिरे घेत असत. त्यांचं कार्य हे समाजसेवेचं नसून समाज परिवर्तनाचं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. दलित स्त्रिया आणि भूमिहीन मुसहर जातीतील स्त्रियांवरच्या अत्याचाराचे अनेक अनुभव त्यांनी कथन केले आहेत. अशा तळागाळातल्या लोकांमध्ये काम केल्यावर त्यांना वैद्यकीय मदतीची किती गरज आहे हे डॉ. कल्पना शास्त्रींना जाणवलं. त्यातूनच त्यांचा आरोग्यविषयक प्रकल्प आकाराला आला. मुलगा-मुलगी यांच्याशी भेदभावाचं वागणं, वृद्ध आणि विधवा स्त्रियांचे प्रश्न याबद्दल उदाहरणे देऊन लेखिकेने मार्मिक चर्चा केली आहे.
लेखिका ज्या संघटनेमध्ये काम करत होती, त्या कार्यामुळे समाजात बदल घडू लागले. तरुण महिलांमध्ये आरोग्य सेविका, जागरूकता शिबीर, संघटन या सर्वामुळे वातावरण बदललं, विचारसरणी बदलली. परिवर्तनाच्या खुणा गावात घडणाऱ्या अनेक घटनांतून दिसू लागल्या.
स्त्रिया अनौपचारिकपणे भेटू शकतील या उद्देशानं डॉ. शास्त्री यांनी गावात एक महिलाघर स्थापन केलं. पुढे हे महिलाघर सार्वजनिक ठिकाण झालं. स्त्रिया दुपारच्या वेळी इथे आपली कामे करत, अत्याचार झालेल्या स्त्रीसाठी इथे पंचायत भरत असे. तसेच औषधाची पेटी, तक्ते या सर्व गोष्टींची माहिती महिलाघरातच सर्वाना समजावून सांगण्यात येऊ लागली. त्यांनी स्वत:च्या घरातच आरोग्य केंद्र सुरू केलं. शिबिरातून त्यांनी आरोग्य सेविका तयार केल्या. याच आरोग्यसेविका समाज परिवर्तनाच्या माध्यम ठरत गेल्या. अनेक अनुभवांवरून लेखिकेच्या असं लक्षात आलं की, गावातले लोक जेव्हा गावातल्या लोकांसाठी काम करतात तेव्हा ते अधिक प्रभावी होतं.
बिहारच्या समस्या एकमेकांत गुंतलेल्या होत्या. बेकारी, अत्यंत गरिबी म्हणजे गरिबीचं अमानवी स्वरूप, आजार, निरक्षरता, लोकांची कर्तव्यशून्यता अशा अनेक समस्या एकमेकांशी निगडित होत्या. त्यामुळे लोकांवर केवळ उपचार करून प्रश्न सुटणार नव्हते. त्यामुळे डॉ. शास्त्री यांच्या संस्थेनं सामाजिक कामाच्या तसेच शैक्षणिक कार्याच्या दिशेनं वाटचाल सुरू केली. आज ही संस्था ७५ गावांमध्ये कार्यरत आहे.
शेवटी डॉ. कल्पना शास्त्री म्हणतात- ज्या समाजात बहुसंख्य लोक मागासलेले असतात, तो समाज या बहुसंख्य लोकांच्या प्रगतीनेच पुढे जाऊ शकतो. त्यानंतरच संपूर्ण समाजात सुव्यवस्था निर्माण होते आणि दैनंदिन व्यवहारामध्ये संस्कृतीचं दर्शन होतं. पुढारलेले मूठभर लोक पुढे गेले तरी बाकीचा समाज मागे राहतो. हे मात्र निश्चित आहे की, आता बिहारची प्रगती करायची असेल तर तिथल्या मागासलेल्या, दलित, अशिक्षित समाजाच्या महिलांची प्रगती होणं आवश्यक आहे. महिलांची प्रगती करायची असेल, तर आता महिलांच्या भागीदारीबरोबर त्यांच्या नेतृत्वनिर्मितीचा विचार करायला पाहिजे. हे नेतृत्व संस्कृतीवर आधारित असेल. नवीन बिहारच्या निर्मितीसाठी केवळ विकासाच्या नव्हे, तर उत्थानाच्या मार्गावर चालावं लागेल. त्यानंतरच बिहारची आणि पर्यायानं देशाची नवनिर्मिती होईल.’
‘मी अनुभवलेला बिहार’ या पुस्तकातील माझा प्रवास, तेव्हाचा बिहार, बिहारमधील स्त्री-जीवन, जाती-धर्म आणि स्त्रिया, आमचं आरोग्यविषयक काम, सामाजिक कामाच्या दिशेने, शैक्षणिक कार्य या सात प्रकरणांतून बिहारमधील स्त्रियांची आणि त्या अनुषंगाने एकूणच समाजातील समस्यांची स्थिती-गती वाचून वाचक अंतर्मुख होतो. एकविसाव्या शतकात ‘महासत्ता’ होणाऱ्या भारतातील हे चित्र अत्यंत विदारक आहे. ‘शितावरून भाताची परीक्षा’ या म्हणीप्रमाणे ‘सरंजामी’ बिहारमधील २५-३० वर्षांपूर्वीची सामाजिक शोकांतिका थोडय़ाफार फरकाने भारतातील सर्वच ग्रामीण, दुर्गम भागात आजही आढळून येईल. अगदी पुरोगामी म्हणवणाऱ्या ‘सरंजामी’ महाराष्ट्रातही (आता महाराष्ट्राचा बिहार होतोय!) महासत्ता, जागतिकीकरण, जीडीपी, अण्वस्त्र निर्मिती, भ्रष्टाचार, घोटाळे, बेकारी, दारिद्रय़ वगैरे वगैरे (आणखी कितीतरी वगैरे) भूलभुलैयामुळे ‘मुकी बिचारी कुणी हाका’ या न्यायानं प्रगती होतेय ती फक्त शोषणकर्त्यांची आणि अधोगती होतेय ती ११० कोटी लोकसंख्येपैकी ८०-९० कोटी लोकांची. मग स्वातंत्र्याचा अर्थ काय?
कल्पना शास्त्री यांच्या संस्थेचे नाव व त्याविषयी थोडी अधिक माहिती पुस्तकात आली असती तर वाचकांच्या दृष्टीने अधिक उपयुक्त ठरली असती. ‘मी अनुभवलेला बिहार’ हे पुस्तक डॉ. कल्पना शास्त्री यांच्या प्रत्यक्ष कार्यावर आणि अनुभवावर आधारलेले असल्यामुळे अतिशय वाचनीय झाले आहे.

अनिल किणीकर ,लोकरंग,दै.लोकसत्ता
मी अनुभवलेला बिहार: डॉ. कल्पना शास्त्री
मनोविकास प्रकाशन
पृष्ठे-१६४, मूल्य- १६० रुपये

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...