Tuesday, December 27, 2011


-प्रशांत दीक्षित,लोकसत्ता ग्रंथविश्व


शिवाजी : हिज लाइफ अ‍ॅन्ड टाइम्स’ हा इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळेलिखित ग्रंथ परममित्र प्रकाशनातर्फे लवकरच प्रसिद्ध होत आहे. हजार पानांच्या या ग्रंथात तत्कालीन अनेक नकाशे आणि दुर्मीळ चित्रेही समाविष्ट आहेत. ‘खुतूत ए शिवाजी’ या पर्शियन पत्रसंग्रहातील काही पत्रांच्या छायाप्रतीही त्यामध्ये आहेत.  या ग्रंथाच्या निमित्ताने इतिहासकार गजानन मेहेंदळे यांच्याशी शिवराय आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वासंबंधात केलेल्या या मनमुक्त गप्पा..


सच्च्या इतिहासकाराबरोबर गप्पा मारण्याचा आनंद काही वेगळाच असतो. जातिवंत इतिहासकार हे फक्त अस्सल कागदपत्रांतूनच बोलतात. तत्कालीन मूळ नकाशे, आकडेवारी यांची साथ घेतात. अभ्यासातील अपुऱ्या जागा वास्तववादी तर्क चालवून भरून काढण्याचा प्रयत्न करतात. तर्क चालविण्यासाठी ते बखरींचा आधारही घेतात, परंतु स्वत: मात्र बखर रचित नाहीत. असे इतिहासकार भूतकाळाचे आकर्षक, भावनोत्कट चित्र रंगवीत नाहीत. मात्र, त्यांच्या अभ्यासातून भूतकाळाबद्दलची माणसाची जाण आपोआपच वाढते. बखरकारांप्रमाणे इतिहासकार भूतकाळ साक्षात् जिवंत करू शकत नसले तरी त्यांच्यामुळे भूतकाळाची आजच्या काळाशी सांगड घालता येते आणि त्यातूनच भविष्याचा वेधही घेता येतो. असे इतिहासकार लोकप्रिय होत नाहीत, परंतु मैफिली गाजविणाऱ्या बखरकारांहून त्यांची कामगिरी खूपच मोलाची असते.
गजाजन मेहेंदळे यांची जातकुळी ही अशा सच्चा इतिहासकारांची आहे. गेली ४० वर्षे या माणसाने एकच ध्यास घेतला.. शिवाजीमहाराज समजून घेण्याचा! या ४० वर्षांत दिवसातील कित्येक तास शिवकाळाच्या विविध पैलूंचा अभ्यास करण्यात त्यांनी घालविले. हजारो कागदपत्रे नजरेखालून घातली. ग्रंथालये धुंडाळली. पायपीट केली. व्यक्तिगत उन्नतीकडे पूर्ण दुर्लक्ष करून झपाटल्यासारखे ते या शिवकाळाचा शोध घेत राहिले. त्याबद्दलच्या नवनव्या गोष्टी ते उजेडात आणत राहिले. त्यांनी व्यासपीठे गाजविली नाहीत की इतिहासविषयक परिषदांनाही ते उपस्थित राहिले नाहीत. फुटकळ लिखाण करून लोकप्रिय होण्याच्या फंदातही ते पडले नाहीत. मात्र, अखंड मेहनत घेऊन शिवकाळाबद्दलचा मजबूत दस्तावेज त्यांनी दोन खंडांत दहा वर्षांपूर्वी प्रकाशित केला. अर्थातच अन्य शिवचरित्रांप्रमाणे तो रसाळ नाही, चटकदार नाही. राजकारण्यांना उपयोगी पडेल असे त्यात काही नाही. मात्र, त्यातील तळटीपा, संदर्भ नुसते चाळले तरी इतिहास संशोधन ही काय चीज असते याची कल्पना येते. महाराजांनी राज्य कसे उभे केले, याचा बारीकसारीक तपशील या दोन खंडांत मिळतो. हा तपशील जरी रूक्ष वाटला तरी अवघ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात शिवाजीमहाराज ही व्यक्ती इतिहासावर खोल ठसा उमटवून जाण्यासारखी कामगिरी कशी करते याची माहिती यातून मिळते. अशावेळी शिवाजीमहाराजांची थोरवी एखाद्या दैवतापेक्षाही मोठी भासते आणि महाराज हा गप्पांचा, मते मिळविण्याचा विषय नसून कार्यक्षमतेने कारभार कसा करावा, हे त्यांच्याकडून शिकण्याचा विषय आहे हे कळते.
गजानन मेहेंदळे यांनी लिहिलेले महाराजांचे द्विखंडात्मक चरित्र प्रसिद्ध होऊन दहा वर्षे झाली. आता इंग्रजी भाषेत लिहिलेले त्यांनी लिहिलेले चरित्र प्रसिद्ध होत आहे. सुमारे हजार पानांच्या या ग्रंथात महाराजांचा काळ व महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाची उकल मेहेंदळे यांनी केली आहे. यानिमित्ताने त्यांच्याशी गप्पा मारण्याचा योग आला आणि महाराजांचे असामान्य व्यक्तित्व समजून घेण्यात दोन-अडीच तास कसे गेले हे कळले नाही.
‘१९७२ सालापासून मी शिवाजीमहाराजांचा अभ्यास करतो आहे..’ मेहेंदळे सांगू लागले.. ‘७२ साली मार्च महिन्यात मी महाराजांविषयी गंभीरपणे वाचायला सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत असा एकही दिवस उगवलेला नाही, की ज्या दिवशी मी शिवाजीबद्दल अभ्यास केला नाही. असा एकही दिवस नाही. तरीही अजून बराच अभ्यास बाकी आहे असे वाटते..’
‘लष्करी इतिहास’ हा खरा तर मेहेंदळे यांच्या अभ्यासाचा विषय. शाळेत असल्यापासूनच त्यांना लष्करी इतिहासाचे वेड होते. याबाबत कुलकर्णी या आपल्या इंग्रजीच्या शिक्षकांचे ते आभार मानतात. त्यांनी लहान वयातच इंग्रजी इतके घटवून घेतले, की इंग्रजी ग्रंथ वाचणे मेहेंदळे यांना कधीच जड गेले नाही. महाविद्यालयात प्रवेश करतानाच त्यांनी दुसऱ्या महायुद्धावरील चर्चिलचे खंड वाचून काढले होते. लष्करी इतिहास या विषयात एम.ए.ला ते पहिले आले. ‘वर्गात तीसच विद्यार्थी होते. पण ३०० असते तरी मीच पहिला आलो असतो!,’ असे ते आत्मविश्वासाने म्हणतात.
त्यांना पदवी हाती पडत असतानाच बांगलादेशातील युद्ध-घडामोडी सुरू झाल्या होत्या. त्या पाहण्यासाठी युद्धपूर्वकाळात आणि नंतर प्रत्यक्ष युद्धकाळात पाकिस्तानच्या दोन्ही सीमांवर मेहेंदळे पोहोचले. पाकिस्तानच्या अंतर्भागातही ते जाऊन आले. मूळ विषयाचा सखोल अभ्यास आणि त्याला प्रत्यक्ष पाहणीची जोड यातून या युद्धावर त्यांचे एक पुस्तक तयार झाले. परंतु नियमानुसार परवानगीसाठी ते लष्कराकडे पाठविण्यात आले. तेव्हा लष्कराने त्यातील काही तपशील त्यांना गाळण्यास सांगितले. मेहेंदळे यांनी त्यास नकार दिला आणि ते पुस्तक निघालेच नाही. या प्रकरणामुळे आलेले वैफल्य घालविण्यासाठी त्यांनी शिवाजीवर एक छोटे पुस्तक लिहिण्याचे ठरविले. लष्कराच्या स्टाफ कॉलेजमधील अभ्यासक्रमात ‘शिवाजी’ हा दहा मार्काचा विषय होता. त्या परीक्षेला उपयुक्त होईल असे गाईडवजा पुस्तक लिहिण्याचा मेहेंदळे यांचा मानस होता. अशा फुटकळ कारणासाठी त्यांनी शिवकाळात डुबी मारली, पण त्यातून अद्यापि ते बाहेर आलेले नाहीत.
‘या विषयाने मला अक्षरश: झपाटून टाकले. इतिहास संशोधक मंडळात मी अनेक कागदपत्रे तपासू लागलो. लष्करी इतिहासाचा मी एम. ए. असलो तरीही  इतिहास संशोधनाची मला माहिती नव्हती. मार्गदर्शन करण्यासाठी कोणी गुरूही नव्हता. दत्तो वामन पोतदार, ग. ह. खरे असे दिग्गज आजूबाजूला असले तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे दडपण येत असे. मग स्वतच अभ्यास सुरू केला. शिवकालीन कागदपत्रे वाचण्यासाठी मोडी, फार्सी, उर्दू शिकलो. काही प्रमाणात पोर्तुगीज भाषाही शिकलो. विषयाची आवडच अशी लागली, की कोणतीही भाषा शिकणे जड गेले नाही. शिवाजी समजून घेण्यासाठी स्वाहिली शिकणे आवश्यक आहे असे जर मला वाटले तर मी उद्यापासून स्वाहिली भाषेचाही अभ्यास सुरू करीन..’ अभ्यासाबाबत अशी इच्छाशक्ती केवळ जातिवंत इतिहासकाराकडेच असते.
या अभ्यासातून मेहेंदळेंना महाराज कसे दिसले? महाराजांच्या कोणत्या गुणांनी त्यांना भारून टाकले?
‘महाराजांचे सतत उद्योगी, दीघरेद्योगी व्यक्तिमत्त्व..’ मेहेंदळे सांगू लागतात.. ‘पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे स्वराज निर्माण करावे याची ‘खरी’ इच्छा त्यांच्याकडे होती. इच्छा प्रत्येकालाच असतात. आपण बरेच काही करावे असे प्रत्येकाला वाटत असते. पण या इच्छा खोटय़ा असतात. खरी इच्छा बाळगली तर जगात बरेच काही शक्य आहे. स्वराज मिळते का हे जमले तर पाहू, असे शिवाजी म्हणत नव्हता. लहान वयातच त्याच्या मनात ही इच्छा आली आणि ती दिवसेंदिवस अधिकाधिक प्रज्ज्वलित होत गेली..’
‘मात्र तेवढय़ानेच भागत नाही. महाराजांमध्ये अनेक गुणांचे सुंदर मिश्रण झाले होते. असा गुणसंयोग सहस्रकात एखाद्याच्याच वाटय़ाला येतो. म्हणूनच शिवाजीच्या जवळपास जाणारा अजून जन्माला आलेला नाही असे मला प्रामाणिकपणे वाटते. शिवाजीकडे असलेल्या अनेक गुणांपैकी तीन गुण अत्यंत महत्त्वाचे. क्षमता, चारित्र्य आणि संवेदनशीलता. नीतिमत्तेचे, सदाचाराचे सतत वाढत गेलेले प्राबल्य हा महाराजांच्या आयुष्याचा एक विशेष होता. या प्राबल्यामुळे धैर्य, हिंमत या गुणांची ताकद कित्येक पट वाढली. त्यांच्या गुणांचे नैतिक दडपण शत्रूवरही पडलेले दिसते. मग स्वकीय त्यांच्यासाठी जीव देण्यास तयार झाले यात आश्चर्य ते काय! आग्रा येथील महासंकटातून महाराज बाहेर पडले ते या नैतिक गुणांमुळेच. स्वकीय व परकीय अशा दोघांवरही महाराजांनी अधिकार निर्माण केला तो या गुणांमुळेच!’
‘या गुणांना जोड होती ती संवेदनशीलतेची. दुसऱ्याच्या मनात आत्मीयता निर्माण करणे महाराजांना सहज जमत असे. हा माणूस आपली कदर करतो, आपली काळजी घेतो, असे प्रत्येकाला वाटे. प्रत्येक युद्धात कमीत कमी मनुष्यहानी होईल, याकडे ते लक्ष देत. त्यानुसारच लढाईची आखणी करीत. त्यामुळे सैन्यातही राजांबद्दल विश्वास होता. हा आपल्याला अनाठायी बळी चढवणार नाही, ही खात्री सैन्याला होती. याउलट, मोगलांच्या मोहिमांमध्ये रक्तामासांचा चिखल होई. बेदरकारपणे युद्धात सैन्याला लोटले जाई. महाराजांनी असे कधीही केले नाही.’
दुसऱ्याबद्दल संवेदनशील असल्यामुळे महाराजांचा- आजच्या भाषेत बोलायचे तर ‘ह्य़ुमन इन्शुरन्स’ बराच मोठा होता. त्यांच्या आयुष्यात वारंवार याची प्रचीती येते. आग्रा येथे औरंगजेबाचे निकटवर्तीयही महाराजांच्या बाजूने बोलताना आढळतात. हे घडण्याचे दुसरे कारण संभवत नाही. खुद्द औरंगजेबही महाराजांबाबत तितकासा दुष्टपणे वागलेला आढळत नाही. पुढे महाराज निसटले व राजगडावर पोहोचले. त्यानंतर त्यांचे दोन सहकारी उत्तरेत औरंगजेबाला सापडले. मुगल हेरखाते प्रमुखाच्या नातेवाईकाकडे ते लपून बसले होते. महाराजांचा ‘ह्य़ुमन इन्शुरन्स’ यावरून लक्षात येईल. मामुली शिक्षा करून औरंगजेबाने त्यांना सोडून दिले.’
यातून विषय निघाला तो आग्रा येथून झालेल्या महाराजांच्या सुटकेचा! आग्य््रााहून कोणत्या मार्गाने महाराज स्वराज्यात आले, याचा कोणताही ठोस पुरावा वा तपशील उपलब्ध नाही, असे मेहेंदळे सांगतात. तसा तो मिळणे आता शक्यही नाही. मात्र, साधारणपणे २५ ते ३० दिवसांत महाराज इथे आले, याबाबत इतिहासकारांत बऱ्यापैकी एकमत आहे. रोज जवळपास ६० कि. मी. दौड महाराजांनी केली असावी. असे करणे शक्य आहे. याबाबत रशियन सेनानी झुकॉव्ह याचा संदर्भ मेहेंदळे देतात. दुसऱ्या महायुद्धात नाव कमावलेला हा सेनानी पहिल्या महायुद्धात घोडदळात अधिकारी होता. त्याने सतत महिनाभर रोज ८० कि. मी. दौड मारली होती. तीही एका घोडय़ावर! यासाठी असामान्य शरीरशक्ती लागते. महाराजांनी अशीच दौड मारली असावी. कदाचित त्यांनी घोडे बदलले असतील. काही माणसे त्यांनी आग्य््रााहून पुढे पाठविली होती. त्यांनी घोडय़ांची सोय केली असेल. आग्य््रााहून परतल्यावर महाराज खूप आजारी पडले. प्रवासात झालेले अतोनात श्रम याला कारणीभूत असावेत.
सेनापती व मुत्सद्दी अशी दोन्ही अंगे महाराजांमध्ये एकवटली होती. मेहेंदळे त्याबाबत भरभरून बोलतात. महाराजांच्या आयुष्याचे तीन महत्त्वाचे टप्पे मानले जातात. यापैकी पहिल्या टप्प्यात त्यांनी सामथ्र्य जमा करीत नेले. सामथ्र्य व साहस याच्या जोडीने दुसऱ्या टप्प्यात त्यांनी अनेक संधी साधल्या आणि आपले राज्य विस्तारत नेले. हा खूप दगदगीचा काळ होता. यात काही वेळा त्यांना अपयशही आले. मात्र, याच काळात महाराजांच्या अंगचे गुण अधिकाधिक उंचावत गेलेले आढळतात. त्या बळावर तिसऱ्या टप्प्यात महाराजांनी त्यांना हव्या तशा संधी स्वतच निर्माण केल्या. परिस्थितीला आपल्याला हवे तसे वळण लावले आणि दक्षिणेपर्यंत स्वराज्य वाढवीत नेले. आलेली संधी साधणे हे सेनापतीचे काम, तर संधी निर्माण करणे हे मुत्सद्दय़ाचे काम. आपल्याला हव्या तशा संधी मुत्सद्दी कशा निर्माण करतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराजांची दक्षिणेची मोहीम! महाराजांचे त्यावेळचे डावपेच मेहेंदळे यांच्याकडून ऐकताना मन थक्क होऊन जाते. त्या एका वर्षांत महाराजांनी ४० किल्ले घेतले, तर मोगलांना फक्त दोन किल्ले घेता आले.
विस्मयकारक वाटाव्यात अशा हालचाली करणे आणि सैन्याला गतिक्षम ठेवणे हे सेनापती म्हणून महाराजांचे वैशिष्टय़ होते. ‘शत्रूला ते थक्क करीत..’ मेहेंदळे सांगतात.. ‘याला जोड होती ती गुप्ततेची. ही गुप्तता केवळ हालचालींची नव्हे, तर हेतूंची गुप्तता. शिवाजी काय करीत असावा, ही विवंचना करण्यातच शत्रूचा बराच वेळ जाई. महाराज आपल्या हेतूंचा थांग शत्रूला लागू देत नसत.’
जदुनाथ सरकार यांच्यासारख्या इतिहासकारांनी शिवाजीमहाराजांबद्दल अनेकांचे मत कलुषित करून ठेवले आहे. मराठी कागदपत्रांचा अभ्यास न करता सरकार यांनी बरेच निष्कर्ष काढले आहेत. त्यामुळे मराठय़ांची ‘लुटारू’ अशी प्रतिमा उत्तर भारतात तयार झाली. याबाबत विचारता मेहेंदळे म्हणाले की, ‘महाराजांनी सुरत लुटली. अन्य काही लुटीही केल्या. मात्र, त्याची खोलवर कारणमीमांसा कोणी केली नाही. त्यामागे आर्थिक कारणे होती. त्यावेळी मुघलांचा वार्षिक महसूल २२ कोटी रुपयांचा होता, तर महाराजांचा जेमतेम एक वा सव्वा कोटीचा होता. मुघलांकडे दोन लाख खडे सैन्य होते. त्या हिशेबाने महाराजांकडे १० हजारांचे सैन्य असणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ते ४० हजार होते. आता या ४० हजार इतक्या सैन्यासाठी पैसा उभा करणे आवश्यकच होते. स्वातंत्र्याकरता मोठय़ा सत्तेविरुद्धात युद्ध करायचे ठरविले तर लहान सत्तेला लूट करावीच लागते. तेव्हा नैतिक प्रश्नांची ऐतिहासिक प्रश्नांशी गल्लत करता कामा नये.’
..मेहेंदळेंशी गप्पांचा हा ओघ सुरूच राहतो. त्यातून अनेक अंगांनी महाराजांचे चरित्र उलगडत जाते. हा ओघ थांबणारा नसतो. शिवाजीमहाराजाचे गुण सांगावे तेवढे थोडेच. मग सर्वाधिक गुणवैशिष्टय़ कोणते, असे विचारले असता मेहेंदळे चटकन् म्हणाले की, ‘आपले राज्य स्थापन करणे हा महाराजांचा गुण होताच; पण राज्य स्थापन केल्यावर ते चालवायचे कसे, याचा स्पष्ट कार्यक्रम त्यांनी तरुणपणातच तयार केला होता. हे त्यांचे वैशिष्टय़ आगळेवेगळे आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी स्वतची मुद्रा घडविली. ती पुन्हा कधीही बदलावी लागली नाही. त्यामध्ये भर घालावी लागली नाही. फेरफार करावा लागला नाही. आयुष्यात आपल्याला काय करायचे आहे, याबद्दलची इतकी स्पष्ट कल्पना अन्य कुणा ऐतिहासिक व्यक्तीमध्ये आढळून येत नाही. अशी निसंदिग्धता व त्यानुसार वर्तन हा शिवाजीमहाराजांचा फार मोठा गुण मला वाटतो..’     

इतिहासकारांची उदार दृष्टी
पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये बसून गजाननराव मेहेंदळे यांचे सर्व संशोधन सुरू असते. सदाशिव पेठेतील या दगडी वास्तुबद्दल मेहेंदळ्यांना खूप आत्मीयता आहे. या वास्तुने थोर इतिहास संशोधक पाहिले. त्यांच्याबद्दल मेहेंदळे अतीव आदराने बोलतात. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे हे तर ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. मेहेंदळेंना त्यांचा सहवास लाभला नाही, परंतु दत्तो वामन पोतदार यांची भाषणे त्यांनी ऐकली. ग. ह. खरे यांचे काम त्यांनी जवळून पाहिले. मोडी लिपीतील तज्ज्ञ माधवराव ओंकार यांच्याबरोबर त्यांनी काम केले. ‘मोडीच्या अभ्यासामुळे देवनागरी वाचायला वेळ मिळत नाही,’ असे सांगणारे ओंकार किंवा ‘आयुष्यातील एकही क्षण मी फुकट घालवला नाही,’ असे ठामपणे सांगणारे खरे यांच्या व्यक्तिमत्त्वांचा मेहेंदळेंवर खूप परिणाम झाला. दत्तो वामन पोतदार यांनी शिवचरित्र लिहिले नाही याबद्दल त्यांच्यावर टीका केली जाते. पण इतिहास संशोधन मंडळ उभे करण्यासाठी पोतदारांनी भरीव काम केले याचा मात्र टीकाकारांना विसर पडतो. या कामाचे अनेक दाखले मेहेंदळे देतात. पण त्यांना सर्वात महत्त्वाचा वाटतो तो पोतदारांचा उदार दृष्टिकोन. यासंबंधातील एक आठवण मेहेंदळेंनी सांगितली.
जदुनाथ सरकारांची मराठय़ांच्या इतिहासाबद्दल स्वल्पदृष्टी होती. त्याबद्दल त्यांचा मराठी इतिहासकारांनी जोरदार प्रतिवादही केला. मात्र, इतिहासकार म्हणून सरकारांबद्दल सर्वाना आदरच होता. गो. स. सरदेसाई हे सरकारांच्या प्रभावाखाली असल्याने त्यांचेही मराठी इतिहास संशोधकांबद्दल फारसे चांगले मत नव्हते. तरीही भारत इतिहास संशोधक मंडळात त्यांचे छायाचित्र लावण्याचा निर्णय घेण्यात आला. हे ऐकल्यावर सरदेसाई अस्वस्थ झाले. आपल्याशी मतभेद असूनही ही संस्था आपला सत्कार कसा काय करते, असा प्रश्न त्यांना पडला. तेव्हा दत्तो वामन पोतदार त्यांना म्हणाले, ‘मतभेद असले म्हणून काय झाले? अहो, पैलवानाचा फोटो हा तालमीतच पाहिजे.’
भारत इतिहास संशोधन संस्था ही अभ्यासाची तालीम असून इतिहास संशोधनाचे सरदेसाई हे पैलवान आहेत, असे पोतदार यांनी मोठय़ा मनाने मान्य केले होते.

शिवराज्याचा कारभार
शिवाजीमहाराज कारभार कसा करीत, याचे अनेक तपशील मेहेंदळे सांगतात. महाराजांचे अष्टप्रधान मंडळ असले तरी त्यांचे काम सल्ला देण्यापुरतेच होते. निर्णय महाराज स्वतच घेत, असे मेहेंदळे यांचे ठाम म्हणणे आहे. हे मंडळ वास्तविक मंत्र्यांचे नसून सचिवांचे होते. आजचे सचिव जसे काम करतात तसे हे अष्टप्रधान मंडळ काम करी. ते महाराजांना माहिती पुरवीत, परंतु निर्णय हा शिवाजीचा स्वतचा असे.
बारीकसारीक तपशिलावर महाराजांची नजर असे. अनेक पत्रांमधून ही गोष्ट लक्षात येते. आपली मर्यादा सोडून काम केलेले महाराजांना खपत नसे. अगदी पाटीलकीच्या व्यवहारातही महाराज लक्ष घालीत. करंजा वाडीच्या पाटलांना महाराजांनी एक सणसणीत पत्र लिहिले होते. पाटलाने मागचा-पुढचा विचार न करता स्वतंत्रपणे निर्णय घेणे महाराजांना पसंत पडले नाही. ‘साहेब माणसाचे माणूस ओळखतो,’ असा इशारा त्यांनी पाटलांना दिला व सांगितल्याप्रमाणेच काम करण्याचा आदेश दिला.
व्यवस्थापनशास्त्राचा विचार करता नेत्याने इतक्या तपशिलात जाणे योग्य नाही. ‘कनिष्टांवर काम सोपवून द्या, त्यात लुडबूड करू नका,’ असे आजचे व्यवस्थापनशास्त्र शिकवते. मेहेंदळे याबाबत दुसरा विचार मांडतात. संस्था उभी राहिली की असे करणे योग्य ठरत असेल; पण पायाभरणीचे काम करणारे सर्वच नेते तपशिलाबाबत फार दक्ष असतात. आपल्या कार्याची वीट न् वीट ते स्वत रचत असतात. त्यामुळे ही लुडबूड ठरत नाही. उलट, उत्तम मार्गदर्शन होते. महाराजांसारख्यांना हे शक्य होते याचे मुख्य कारण म्हणजे एकाच वेळी अनेक पातळ्यांवर काम करण्यासाठी आवश्यक असणारी अफाट कार्यशक्ती महाराजांजवळ भरपूर होती. अशी कार्यशक्ती हीसुद्धा थोर नेतृत्वाची खूण असते.
जवळचे आणि लांबचे उद्दिष्ट
स्वराज्यप्राप्तीसारखे दूरचे उद्दिष्ट मनात घट्ट धरून ठेवायचे आणि त्याचवेळी जवळच्या उद्दिष्टांवरील नजरही हलू द्यायची नाही, हे महाराजांना सहज साधत असे. लांबच्या उद्दिष्टांकडे लक्ष ठेवून त्यांची आजची लढाई होत असे. याबाबतची फ्रेंच प्रवाशाने लिहिलेली आठवण मेहेंदळे सांगतात..
कारे नावाचा फ्रेंच प्रवासी मुंबईहून कोकण, हैदराबाद मार्गे दक्षिणेकडे गेला. तो राजापूरला पोहोचला तेव्हा महाराज हैदराबादला होते. राजापुरात त्याची गाठ अण्णाजी दत्तो या महाराजांच्या एका कारभाऱ्याशी पडली. महाराजांच्या या मोहिमेविषयी अण्णाजी दत्तो त्याला म्हणाले की, ‘कधी ना कधी औरंगजेब स्वराज्यावर चालून येणार याची महाराजांना खात्री आहे. त्याचा मुकाबला करताना हाताशी असावा म्हणून दक्षिणेतील मुलुख आम्ही काबीज करीत आहोत.’
महाराजांनी जिंजीपर्यंत मजल मारली आणि तो किल्ला हस्तगत केला. पुढे औरंगजेबाच्या स्वारीच्या वेळी रामचंद्र अमात्य यांनी याच किल्ल्यात राजाराम महाराजांना नेऊन ठेवले. महाराजांनी काबीज केलेल्या या मुलखामुळेच औरंगजेबाला प्रत्युत्तर देणे पुढच्या काळात मराठय़ांना शक्य झाले.

‘शिवाजी : हिज लाइफ अ‍ॅन्ड टाइम्स’
(लवकरच प्रसिध्द होणार)
-इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे
-परममित्र प्रकाशन 

[This article is  about the Great Maratha Warrior Shivaji.  Shivaji :His Life And Times-This book is written by famous historian  Shri.Gajanan Mehendale From Maharashtra,India.]

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...