Monday, July 30, 2012

इस्रायलची एकांगी स्तुती, त्या राष्ट्राच्या विजिगीषु वृत्तीचा उदोउदो, यांमागे अनेकदा अहंकारी दर्पही असू शकतो. तो नसेल, तर ही दोन पुस्तकं वाचायला हवीत. इस्रायलला आदर्श मानून त्याचा अभिमान बाळगण्याचं कारण नाही,
हे सप्रमाण आणि  साधार सांगतानाच पॅलेस्टिनी विरुद्ध इस्रायली या लढाईच्या दोन्ही बाजू समतोलपणे मांडणारं ‘होली लँड, अनहोली वॉर’ हे पुस्तक आणि दुसरं- पॅलेस्टिनींचे नेते अराफात यांच्यासह काम केलेल्या एका माजी पॅलेस्टिनी राष्ट्रवादय़ानं लिहिलेलं पुस्तक! तडजोडवादी राजकारण आणि बळींनी पुन्हा छळवादी होणं म्हणजे काय, याचा पक्का अदमास ही पुस्तकं देतात..

मोहम्मद यासर अब्दुल रहमान अब्दुल राउफ अराफात अल कदा अल हुसैनी.. इतक्या अगडबंब नावानं सहसा आपल्याला काही संदर्भ लागणार नाही. पण यासर अराफात म्हटलं की बऱ्याच गोष्टी लख्खकन दिसू लागतात. या शतकातल्या रंगीबेरंगी व्यक्तींची यादी करायची म्हटलं तर या माणसाचा क्रमांक नक्कीच पहिल्या पाचांत लागेल. माणूस आयुष्यभर पॅलेस्टिनींसाठी जगला. पॅलेस्टाइन या देशाची स्वतंत्र भूमी पाहावी, हे त्याचं आयुष्यभराचं ध्येय होतं. ते साध्य करण्यासाठी त्यांनी वाटेल त्या मार्गाचा अवलंब केला. फताह ही दहशतवादी संघटना काढली. तिच्या मार्फत वाटेल ते उद्योग केले. ते करताना अमाप पैसा मिळवला. ज्यांच्यासाठी ते लढत होते.. निदान तसा आभास निर्माण करीत होते.. ते पॅलेस्टिनी भणंगासारखं, निर्वासितांचं आयुष्य जगत असताना अराफात यांची जीवनशैली एखाद्या o्रीमंत राष्ट्रप्रमुखालादेखील लाजवेल अशी होती. यांची पत्नी पॅरिसला अतिश्रीमंती आयुष्य जगत होती. तिला पैसा अराफात यांच्या संघटनेकडनं जात होता. या संघटनेकडे कुठून यायचा पैसा? अनेक इस्लामी देशांकडून. असो. मुद्दा अर्थातच त्यांच्याकडच्या पैशाचा नाही. तो काय तमिळ वाघांचा प्रमुख प्रभाकरन याच्याकडेही होता. जगात कोणीही कोणाविरुद्ध काही तरी करतंय म्हटल्यावर कोणी ना कोणी तरी मदत करणारा असतोच. त्यात एखाद्या देशाविरोधात काही होतंय म्हटल्यावर त्या देशाविरोधात असणारे त्या कथित बंडखोराच्या मागे उभे राहतातच.
पण गमतीचा भाग म्हणजे या सगळय़ाचा तपशील माहीत नसलेले जनसामान्य हा विरुद्ध तो या भूमिकेतूनच आसपासच्या घटनांकडे पाहत असतात. त्यात या ‘हा विरुद्ध तो’ला धर्माचा स्पर्श झाला की, पाहायलाच नको. मग तर समीकरण अगदीच सोपं होऊन जातं. त्यामुळे यहुदी धर्मीयांचा इस्रायल आणि अरब-पॅलेस्टिनींची संघटना यांच्यात बारा महिने चौदा काळ हाडवैर असणार, असं आपलं मत बनून जातं. वरकरणी ते बरोबरही असतं म्हणा. परंतु बऱ्याचदा हे विरुद्ध वाटणारे तसे आतून एकमेकांच्या हिताचंच काम करीत असतात, हे आपल्याला माहीत नसतं. उदाहरणार्थ इस्लामधर्मीय इराण आणि यहुदी इस्रायल हे जनसामान्यांच्या समजाप्रमाणे एकमेकांचे कट्टर वैरीच असायला हवेत. पण अगदी अलीकडेपर्यंत इस्रायल हा कडवे म्हणून ओळखले जाणाऱ्या अयातोल्ला खोमेनी यांच्या इराणचा शस्त्रास्त्र पुरवठादार होता, हे आपल्याला माहीतच नसतं. किंवा या अराफात यांनीसुद्धा अनेकदा पडद्यामागून इस्रायली नेतृत्वाशी हातमिळवणी केली असू शकेल, हे आपल्या गावीही नसतं. पॅलेस्टिनींसाठी लढणारी आणखी एक संघटना होती हमास. अहमद यासीन या गूढ गृहस्थानं ती स्थापन केली होती. हा अराफात यांच्यापेक्षा कडवा होता. इस्रायलचं अस्तित्व नकाशावरनं पुसायलाच हवं, असं म्हणायचा. त्याला एका भल्या सकाळी इस्रायली फौजांनी क्षेपणास्त्रानं टिपलं. तर अराफात यांच्या फताह या संघटनेचा वापर बऱ्याचदा इस्रायलीवादी शक्तींनी- म्हणजे अर्थातच अमेरिका वगैरेंनी- अहमद यासीन यांच्या हमासविरोधात सोयीस्करपणे केला. अराफात यांनी तो करूही दिला. त्याचमुळे तर अमाप दहशतवादी कृत्यं करूनही शांततेसाठीचं नोबेल पारितोषिक मिळवण्याची किमया अराफात यांना साधता आली. राजकारणात आजचा दहशतवादी उद्याचा शांततावादी असा ठरतो.
तर या अराफात यांचा सहकारी होता अबू शरीफ नावाचा. याचं ‘अराफात अँड द ड्रीम ऑफ पॅलेस्टाइन’ अशा नावाचं एक पुस्तक आहे. हा अबू स्वत: कडवा दहशतवादी म्हणून विख्यात- किंवा कुख्यातही- होता. फताह या अराफात यांच्या संघटनेच्या आधीही पॅलेस्टिनींच्या प्रश्नावर काम करणाऱ्या अनेक संघटना होत्या. पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ पॅलेस्टाइन या नावाची त्यातली सगळय़ात मोठी. अबू शरीफ तिच्यासाठी काम करायचा. विमान अपहरणं वगैरे दहशतवादी कृत्य त्याच्या डाव्या हाताचा मळ होती. एकेकाळी टाइम साप्ताहिकानं दहशतवादाचा चेहरा असं त्याचं वर्णन केलं होतं, इतका तो कडवा होता. तो इतका उपद्रवी होता की एकदा मोसाद या इस्रायली गुप्तहेर संघटनेनं त्याच्याकडे पुस्तक पाठवलं. ‘द मेमॉयर्स ऑफ चे गवेरा’ नावाचं. चे हा रोमँटिक बंडखोर अनेकांचा प्रेरणास्थान होता. तर अबूनं हे पुस्तक उघडलं आणि ढम्कन त्यातला बाँब फुटला. अबूचा एक डोळा, एक कान आणि चार बोटं त्यात उडाली. पुढे त्याला उपरती झाली असावी आणि तो पॅलेस्टिनी प्रश्न दहशतवादानं सुटणार नाही असं म्हणायला लागला. इजिप्तचे त्या वेळचे अध्यक्ष होस्नी मुबारक वगैरेंशी तो चर्चा करायला लागला. त्याच्या संघटनेला हे काही आवडलं नाही. बऱ्याचशा दहशतवादी संघटना वा चळवळी एकदा स्थिरस्थावर झाल्या की खंडणीखोरी करायला लागतात. त्यांचा चेहरा दहशतवादाचा असतो. पण उद्दिष्ट कधीच मागे पडलेलं असतं. नंतर नंतर अशा संघटनांचं पोट दहशतवादावरच अवलंबून असतं. याही संघटनेचं तसं होतं. त्यामुळे अबूनं जरा काही वेगळा सूर काढला म्हणून संघटनेचे पदाधिकारी त्याच्यावर चिडले. त्याला काढूनच टाकलं त्यांनी. मग हा आला यासर अराफात यांच्याकडे. अराफात यांच्या बऱ्याच उद्योगांचा हा साक्षीदार. त्यामुळे त्याच्या पुस्तकात एक मजा आहे. म्हणजे दहशतवादीही आपली कृत्यं कशी उदात्ततेच्या मुलाम्यातून सांगू शकतो. हे त्यातून समजतं. अराफात यांनी १९६७ साली गुप्तपणे जेरुसलेमला भेट दिली होती. इस्रायली नेत्यांशी चर्चा करण्यासाठी. खरं तर हे महामोठं अब्रह्मण्यम त्यांच्या हातून घडलं. तर तिकडे जाताना ते कोणत्या मार्गानं कसे चोरून गेले, वाटेत कोणत्या डोंगराच्या गुहेत राहिले.. वगैरे अनेक मनोरंजक मसालेदार चिजा या पुस्तकात जागोजागी आढळतात. पुढे लिबियाच्या वाटेवर असताना वाळूच्या वादळात यासर अराफात यांचं विमान सापडलं आणि भरकटून कोसळलं. अनेकांना वाटलं त्यांच्या जिवाचं काही बरंवाईट झालं. पण अराफात त्यातून वाचले. विमानाचे तीन तुकडे झाले होते आणि वैमानिक आणि त्याचा साथीदार जागच्या जागीच गेले होते.
पॅलेस्टिनींच्या प्रश्नाचं काय झालं हे या पुस्तकातून कळणार नाही. पण त्या प्रश्नासाठी लढणाऱ्यांचं काय झालं, अगदी २००४ सालच्या त्यांच्या निधनापर्यंत.. हे सगळं वाचायला यात नक्की मिळतं. पण मुळात हा पॅलेस्टिनींचा प्रश्न नक्की काय आहे हे तटस्थपणे समजून घ्यायचं असेल तर अंतोन ला गार्डिया यांचं ‘होली लँड, अनहोली वॉर’ हे पुस्तक वाचणं उत्तम. इस्रायलची भूमी पवित्र मानली जाते. अगदी बायबलमध्ये त्याचा संदर्भ आढळतो.. जॉर्डन नदीच्या काठावर जगातील समस्त यहुदींची स्वप्नभूमी कशी आकाराला येणार आहे. असा दृष्टान्त दिला गेलाय. या सगळय़ा नवदेशाच्या जन्माची भव्य कहाणी सांगणारी लिऑन उरिसची अजरामर ‘एक्झोडस’ खूप आधी वाचली होती. पुढे या सगळय़ा राजकारणावर, त्यातलं धर्माच्या नावाने होणाऱ्या हिंसाचाराचं ‘अधर्मयुद्ध’ लिहीत असताना एका परदेशी पत्रकार मित्रानं ‘होली लँड..’ वाचायचा सल्ला दिला. अत्यंत योग्य ठरला तो.
 याचं कारण असं की पॅलेस्टाइन आणि ज्यू प्रश्नावर लिहिलेली पुस्तकं अभिनिवेशी आहेत. या किंवा त्या बाजूची. त्या विषयावरील उत्तम तटस्थ पुस्तकाचा शोध त्यामुळे ‘होली लँड..’पाशी येऊन थांबतो. अंतोन लंडनच्या टेलिग्राफचा इस्रायलमधला वार्ताहर होता. त्या अधिकारातून अनेक ठिकाणी त्याला जाता आलं. पाश्चात्त्य देशांतल्या पत्रकारांना हा एक फायदा असतो. अन्यथा इस्रायलमधे राहून रमल्ला इथं पॅलेस्टिनींशीही संपर्क ठेवायचा.. अशी दुहेरी जगण्याची सोय अन्य देशांतल्या वार्ताहरांना नसते. पण ती अंतोनला असल्यामुळे त्याला अनेकांच्या मुलाखती घेता आल्या, अनेकांच्या कूळकथा मांडता आल्या आणि इतिहासाकडे निकोप वर्तमानाच्या नजरेतून पाहता आलं.
 त्यातून तयार झालं.. होली लँड. त्यानं त्यात काही मूलभूत प्रश्न मांडलेत. १९४८ साली हा देश जन्माला येत असताना बेन गुरियन वगैरे मंडळींनी सर्व जगातील ज्यूंना पॅलेस्टिन नदीच्या खोऱ्याकडे मार्गक्रमणा करायला सांगितलं आणि बघता बघता अरबांच्या निवासावर अतिक्रमणं सुरू झाली. या संदर्भातल्या दोन्ही बाजूंच्या कहाण्या ‘होली लँड..’मध्ये आहेत. त्या मांडताना अंतोन जसा ज्यूंना अनेक प्रश्न विचारतो तसाच पॅलेस्टिनींवर- विशेषत: त्यांच्या नेतृत्वावर- चांगलीच टीका करतो. इस्रायलचा जन्म व्हावा म्हणून वर्षांनुर्वष राहत असलेल्या अरबांना कसं हुसकावलं गेलं, याची कहाणी वाचताना अनेक प्रश्न पडतात. त्याहीपेक्षा आपल्याकडे इस्रायलविषयी असलेले अनेक गोड भ्रम दूर व्हायला मदत होते.
ते आवश्यक आहे. कारण इस्रायल आणि त्यांचा इतिहास विजिगीषु वगैरे म्हणतात ती वृत्ती यावर आपल्याकडे छाती फुगवून ‘गर्व से कहो..’ पद्धतीनं बरंच काही बोललं जातं. त्यातलं फसवेपण अधर्मयुद्धमध्ये मांडायला मिळालं. इथं ‘होली लँड..’मध्ये त्याला भरपूर जागा मिळालीय. आणि महत्त्वाचं म्हणजे अंतोन दोन्ही बाजूंविषयी तितकाच कठोर आहे. ज्यू हे दुसऱ्या महायुद्धात नाझींनी केलेल्या अत्याचारांचे बळी आहेत, हे तर तो सोदाहरण सांगतोच; पण अरब हे बळींचे बळी कसे आहेत, हेही तो उत्तमपणे समजावून सांगतो. तेव्हा पॅलेस्टिनी प्रश्न आणि त्या प्रश्नांवर जगणारे यासर अराफात हे दोन्ही विषय ठसठशीतपणे आपल्यासमोर उभे राहतात.
 विलासी जीवनशैलीत राहणाऱ्या यासर अराफात यांच्या पत्नीनं गेल्या आठवडय़ातच आरोप केलाय.. अराफात मेले नाहीत, त्यांना विषप्रयोगानं मारण्यात आलंय.. त्यामुळे, अराफात याचं दफन केलेलं कलेवर उकरून काढलं गेलंय. विषप्रयोग झाला किंवा नाही, हे तपासण्यासाठी. त्या निमित्तानं आता इतिहासाची मढीही उकरली जातील. तेव्हा हे नक्की काय प्रकरण आहे, हे आपल्याला माहीत असावं!


Holy Land, Unholy War: Israelis and Palestinians by Anton La Guardia

Arafat and the Dream of Palestine: An Insider's Account by Bassam Abu Sharif
 -गिरीश कुबेर ,लोकसत्तासाठी
girish.kuber@expressindia.com



माझ्या माहितीप्रमाणे या दोन्ही पुस्तकांचा मराठी अनुवाद अजून कोणी प्रकाशित केलेला नाही.मराठी अनुवाद प्रसिध्द झाल्यास कृपया वाचकांनी comment  form मध्ये प्रकाशक,किंमत यांची माहिती द्यावी ही नम्र विनंती.

(1)Arafat and the Dream of Palestine: An Insider's Account by Bassam Abu Sharif हे इंग्रजीतील पुस्तक मोफत घरपोच मागवण्यासाठी  कृपया येथे क्लिक करा.
Buy Arafat and the Dream of Palestine: An Insider's Account from Flipkart

(2) Holy Land, Unholy War: Israelis and Palestinians by Anton La Guardia हे इंग्रजीतील पुस्तक मोफत घरपोच मागवण्यासाठी  कृपया येथे क्लिक करा.
Buy Holy Land, Unholy War: Israelis and Palestinians from Flipkart
[This review is about the famous books-1) Holy Land, Unholy War: Israelis and Palestinians by Anton La Guardia(2)Arafat and the Dream of Palestine: An Insider's Account by Bassam Abu Sharif ]

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...