Saturday, August 25, 2012

माणूस आणि त्याच्या भोवतीची नैसर्गिक संपत्ती यांच्यातील देवाण-घेवाण तसेच, ही संपत्ती कशासाठी वापरली जाते आणि त्यात अचानक बदल झाला तर नेमके काय परिणाम होतात, एखादी समाजरचनाच उन्मळून पडते की, समाजातील एखादा घटक शिरजोर बनतो की दोन्ही घडते.. या सगळ्यांचा मागोवा या पुस्तकात घेतला गेला आहे.
यात एकूण सहा लेख आहेत. प्रत्येक लेख लिहिताना मिलिंद बोकील यांनी त्या-त्या भागात जाऊन भरपूर संशोधन केलं. प्रत्येक विषयाचा अतिशय गंभीरपणे, सूक्ष्मपणे अभ्यास केला आहे. हे सर्वच लेख दीर्घ असूनही कुठेही कंटाळवाणे अजिबात वाटत नाही. उलट प्रत्येक लेख म्हणजे एक उत्तम कथानकच बनलेलं आहे.
प्रत्येक विषयाच्या अगदी मुळाशी जाऊन त्याची उकल करणं हे मिलिंद बोकील यांचं लेखन वैशिष्टय़ आपल्याला ‘एकम्’ आणि ‘समुद्र’मध्येही बघायला मिळतं.
सबंध भारतात असे एकही अभयारण्य नसेल जेथे माणसे पूर्वीपासून राहत नव्हती. अभयारण्यामध्ये जंगलातील प्राण्यांना आणि वनस्पतींना संरक्षण मिळालं आहे पण, त्यात राहणाऱ्या माणसांचा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे. ‘प्राण्यांना अभय, माणसांना वनवास’ या लेखात मिलिंद बोकील यांनी या प्रश्नावर प्रकाश टाकला आहे. त्यासाठी त्यांनी कोयना अभयारण्यातील डिचोली गावाचा अभ्यास केला.
कोयना अभयारण्य म्हणून जसं जाहीर झालं तसं, डिचोली आणि इतर गावातल्या लोकांना त्याची झळ जाणवू लागली. फॉरेस्ट खात्याच्या संरक्षणामुळे जंगल वाढायला लागले. जंगलतोड जवळपास बंदच झाली. तसेच जास्त पावसाचा प्रदेश असल्याने जंगलाची वाढ झपाटय़ाने होऊ लागली. जंगलापासून दूर असलेली गावं जंगलाजवळ आली. त्यामुळे अभय मिळालेल्या वन्यप्राण्यांचा गावकऱ्यांना त्रास होऊ लागला. कळंब नावाचे गवत गावकरी छपरासाठी वापरत. ते जंगलातील रानगव्यांनी हुंदाडून नष्ट केले. ही नासाडी इतकी जास्त की त्या गवताचे पुनरुत्पादनच बंद झाले. लोकांच्या घराचे छप्परच नाहीसे झाले. अभय मिळाल्यानं डुकरांची संख्या बेसुमार वाढू लागली. ही डुकरं संपूर्ण शेतं उध्वस्त करू लागली. इतर हिस्र प्राण्यांचा त्रास होऊ लागला तो वेगळाच.
कोयना धरणाची वीज वापरून बाकीचा महाराष्ट्र समृद्ध झाला पण, ज्यांची घरेदारे त्यामध्ये बुडाली त्या सर्वाना अजूनही पूर्णपणे न्याय मिळाला नाही.
‘भूमिकन्यांचे भालप्रदेश’ या लेखात लातूरच्या भूकंपानंतर ज्या स्त्रिया विधवा झाल्या, त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या शेतजमिनी मिळून त्या शेतकरी झाल्या. जमीन कसत असताना स्त्री म्हणून आणि त्यात विधवा म्हणून येणाऱ्या अडचणी, त्यांचे समाजातले स्थान, त्यांना मदत करणाऱ्या स्वयंसेवी संस्था याबद्दल विस्तृत माहिती सांगितली आहे.
भूकंपामुळे विधुर झालेल्या अनेक पुरुषांनी पुनर्विवाह केलेत. अनाथ मुलांना जवळचे नातेवाईक आणि स्वयंसेवी संस्था यांचा आधार मिळाला. एकटय़ा पडल्या त्या या विधवा स्त्रिया पण, न घाबरता, हिमतीनं या स्त्रिया शेतीची सर्व कामं शिकल्या आणि स्वबळावर शेती करू लागल्या. बोकील लिहितात, ‘रामायणातल्या भूमिकन्या सीतेने पुरुषप्रधान व्यवस्था असय्य झाली म्हणून भूमातेची प्रार्थना केली आणि भूमातेने तिला पोटात घेऊन मुक्त केले. विसाव्या शतकाच्या अखेरीस भूमातेने बाकी सर्व पोटात घेतले पण, भूमिकन्यांना मात्र जिवंत ठेवले, नांगरांच्या फाळाने त्यांनी मुक्तीचा नवीन मार्ग शोधावा म्हणून.’
‘किनाऱ्यावरचा कल्पवृक्ष’ या लेखात डहाणू तालुक्यातील बोर्डी गावच्या परिसरात चिक्कूच्या झाडाच्या लागवडीमुळे लहान आदिवासी शेतकऱ्यांतही कशी आर्थिक क्रांती घडून आलेली आहे याबद्दल समजते. यात चिक्कूच्या फळाचा इतिहास, त्याची लागवड, त्याचे गुणधर्म आणि या लागवडीमुळे आदिवासींचे झालेले सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक परिवर्तन तसेच या क्रांतीमागचे प्रवर्तक डॉ. जयंत पाटील यांचे कार्य, याबद्दल परिपूर्ण माहिती यात मिळते. मिलिंद बोकील लिहितात, ‘बोर्डीच्या किनाऱ्यावर जो कल्पवृक्ष उभा आहे तो म्हणजे चिक्कूचे झाड नाही. त्या झाडापेक्षा विशाल, त्यापेक्षा दणकट आणि त्यापेक्षा कनवाळू असा तो समाजसेवेचा वृक्ष आहे. त्या वृक्षाची जोपासना अनेक ज्ञात आणि अज्ञात कार्यकर्त्यांनी आपला घाम, अश्रू आणि प्रसंगी रक्त शिंपून केली आहे.’
‘भरती आणि ओहोटी’ या लेखात एका मोठय़ा औद्योगिक कारखान्यामुळे (लक्ष्मी मित्तल यांचा इस्पात इंडस्ट्रीज लि.) पर्यावरणाचा कसा विनाश घडला आणि हातावर पोट असणाऱ्या मच्छीमारांचे आयुष्य कसे उध्वस्त होत गेले ते दिले आहे.
मोठय़ा औद्योगिक कंपन्या, त्यांच्याशी हातमिळवणी करणारे भ्रष्ट राजकारणी हे एका बाजूला आणि अशिक्षित, असंघटित, उपेक्षित अल्पसंख्य लोकं दुसऱ्या बाजूला यांच्यातील संघर्ष विस्ताराने दिला आहे. एक गट कमकुवत तर एक गब्बर यांच्यातही संघर्ष होऊ शकतो. कारण या अशिक्षित लोकांना शिवकरांसारखा ध्येयनिष्ठ आणि लढाऊ नेता मिळतो.
बोकील म्हणतात, अशाप्रकारच्या संकटाला विरोध करणे हे सोपे काम नाही. कारण असे प्रकल्प हे ‘मागास भागाचा विकास’ या चंदेरी वेष्टनात गुंडाळून आणलेले असतात. यात नक्की फायदा कोणता आणि तोटा कोणता, हेच स्पष्टपणे समजत नाही. औद्योगिक क्रांती ही देशाच्या विकासासाठी नक्कीच चांगली पण, त्यामुळे याच देशातील एखादा समाज उध्वस्त होऊन कसे चालेल? विकास ज्या सृष्टीच्या आधारे करायचा, ती सृष्टी सजीव, समृद्ध आणि संवर्धनशील असणं गरजेचं आहे.
शेवटी मिलिंद बोकील म्हणतात, ‘समुद्र आणि खाडय़ांना भरती-ओहोटी रोजच येत असते. भरतीनंतर ओहोटी आणि मग पुन्हा भरती हे चक्र चालूच असते. मानवी समाजाने मात्र स्वत:ला या चक्रात बांधून घ्यायचे की नाही, ते ठरवणे गरजेचे आहे. नाही तर काही जणांना भरती येईल तेव्हा इतरांना ओहोटी लागेल. ज्यांना भरती येईल त्यांचे जगणे वैभवसंपन्न होईल पण, ओहोटी लागलेले मात्र दरिद्री होऊन जातील. भरती आणि ओहोटीच्या या चक्रात गुंतून पडायचे की कधीतरी त्याचा भेद करून स्वस्थ, समृद्ध आणि संतुलित समाजाचे स्वप्न बघायचे, हा आपल्यासमोरचा खरा प्रश्न आहे.’  


- सुहास खानझोडे,लोकसत्ता
 
  Book: जनाचे अनुभव पुसतां 

Author: मिलिंद बोकील 
Category: कथासंग्रह
Language: मराठी
Publication: मौज प्रकाशन -(पहिली आवृत्ती : २००२)
Price:  १५० रुपये

 हे पुस्तक भारतात कोठेही घरपोच मागवण्यासाठी येथे टिचकी मारा.

[enotes: Milind Bokil (1960) is one of the important and frontline Marathi writers today. He has brought in newer kinds of sensibilities to Marathi literature by introducing different subjects and enlarging the scope of human consciousness. His writing is imbued with a quest for meaning in life and presents a finer understanding of personal emotions and social relationships without sacrificing artistic dexterity. Bokil is a sociologist by profession and has also written extensively about rural and tribal communities as well as on development issues.] 

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...