Wednesday, September 11, 2013

 
Three Girls, 1935, now at the National Gallery of Modern Art in New Delhi


Amrita Sher-Gil in her studio in Shimla, photographed by father Umrao Singh Sher-Gil, 1937.
[Born:30 January 1913,Budapest,Austria-Hungary,Died: 5 December 1941 (aged 28) Lahore,British India (present day Pakistan)]


'चित्रकार अमृता शेर-गील’ हे रमेशचंद्र पाटकर यांनी लिहिलेले पुस्तक लवकरच लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित होत आहे. भारतीय चित्रपरंपरेला आधुनिक वळण देणाऱ्या अमृताविषयीच्या एका प्रकरणातील हा संपादित अंश..
विलक्षण बुद्धिमत्ता व कल्पनाशक्ती, स्वतंत्र बाणा व बंडखोर वृत्ती आणि स्वच्छंदीपणा व संवेदनशीलता असलेल्या अमृताला वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी जगाचा निरोप घ्यावा लागला. आपल्या अल्पायुष्यात तिनं जे चित्रविश्व उभं केलं आहे ते निव्वळ अप्रतिम आहे. पुन:पुन्हा पाहायला, निरखवायला लावणारं आहे.
चित्रकला आपल्या अंगी जात्याच आहे याची जाणीव तिला लहानपणीच झाली होती. पाश्चात्त्य संगीतात पारंगत असलेल्या तिच्या आईनं ते ओळखलं. चित्रकलेचं शिक्षण घ्यायला ती पॅरिसला आली. प्रथम व्हिएरे व्हॅलंट(Pierre Vaillant )यांच्या ‘ग्रा शामिए’त(Grande Chaumiere) व नंतर लुसियॅ सीमॉ( Lucien Simon ) यांच्या ‘एकॉल दे बोझार’ या स्टुडिओत युरोपीय अॅकॅडमिक कलेचं शिक्षण तिनं घेतलं. अभ्यासाचा भाग म्हणून न्यूड मॉडेल्सची चित्रं जशी तिनं काढली तशी काही वस्तुचित्रं, व्यक्तिचित्रं, आत्मव्यक्तिचित्रं, रचनाचित्रंही काढली. तैलरंगात काढलेली ती अॅकॅडमिक शैलीतील चित्रं होती.
१९३२ साली पॅरिसला भरलेल्या ग्रा सालोच्या प्रदर्शनात तिच्या ‘यंग गर्ल्स’ या चित्राला सुवर्णपदक मिळालं. एवढंच नव्हे, तर प्रदर्शन भरवणाऱ्या संस्थेचं सहसभासदही करून घेतलं गेलं. पॅरिसच्या वास्तव्यात सेझान( Paul Cézanne), गोगँ(Gauguin), मॅतीस यांसारख्या अव्वल दर्जाच्या आधुनिक चित्रकारांच्या कलेचा तिला परिचय झाला, पण पॅरिसला व्यावसायिक चित्रकार म्हणून नाव कमावण्याची इच्छा मनाआड करून भारतात जायचा तिनं निर्णय घेतला. आपल्या कलेचा विकास भारतातच होईल यावर तिचा अढळ विश्वास होता. तिच्या निर्णयाला गुरू लुसियॅ सीमॉ यांचं पाठबळ लाभलं.
ज्या वेळी ती भारतात आली त्या वेळी बंगाल कला घराण्याची चित्रकला ऐन जोमात होती. कलाशाळांतून दिल्या जाणाऱ्या अॅकॅडमिक शिक्षणाचा संस्कार झालेली चित्रकला लोकप्रिय होत होती. या दोन कलाप्रवाहांशी ‘संघर्ष’ करत आपल्याला स्वत:ची वाट शोधावी लागणार याची अमृताला जाणीव झाली. बंगालच्या पुनरुज्जीवनवाद्यांप्रमाणे गतकालातील चित्रकलेच्या अंधानुकरणातील निष्फळता तिच्या लक्षात आली होती. तसंच वस्तूचं यथातथ्य चित्रण करणं हेच कलेचं प्रयोजन आहे यावर विश्वास असणाऱ्या कलाशाळांतील सादृश्यवाद्यांच्या चित्रांतील निर्थकताही तिनं ओळखली होती. हे दोन्ही कलाप्रवाह दुर्बलतेला, ‘वांझ’पणाला शरण गेले आहेत याची तिला खात्री झाली होती. (त्या काळात पौराणिक विषय असलेली व युरोपीय अॅकॅडमिक शैलीतील राजा रविवर्माची चित्रं लोकप्रिय होती, पण अमृतानं त्याची दखल घेतली नाही, याची नोंद करायला हवी.)
भारतीय सत्त्वाचा आविष्कार करण्याच्या दिशेनं अमृतानं चित्रं काढायला सुरुवात केली. युरोपीय अॅकॅडमिक शैलीचे संस्कार झालेली अमृता आपल्यासमोरील आव्हानाला कसं तोंड देत होती हे दोन चित्रांच्या उदाहरणांवरून समजून घेऊ या. ‘यंग गर्ल्स’ व ‘ग्रुप ऑफ थ्री गर्ल्स’ ही सुवर्णपदकं मिळालेली दोन चित्रं. (‘थ्री गर्ल्स’ला बॉम्बे आर्ट सोसायटीचं सुवर्णपदक मिळालं होतं.)
‘यंग गर्ल्स’मध्ये अंतर ठेवून बसलेल्या तरुणी आहेत. त्यातील डावीकडील तरुणी दासी आहे व उजवीकडील तरुणी तिची मालकीण आहे. विचारमग्न भावावस्थेत मूकपणे त्या बसलेल्या आहेत. दासीच्या हातांत फळांची प्लेट आहे. तिचा वर्ण सावळा आहे आणि चेहऱ्यावर उदास भाव आहेत. फॅशनेबल पेहरावात दिमाखदार खुर्चीवर बसलेल्या मालकिणीचा वर्ण गौर आहे. फ्रेंच चित्रकारांनी सधन स्त्रियांच्या काढलेल्या व्यक्तिचित्रात दिसतो तसा. तिचे केस मोकळे सुटलेले आहेत आणि त्यामुळे तिचा चेहरा अर्धवट झाकला गेला आहे. तिच्या हातात पांढरा कंगवा आहे. चित्रात खाली उजव्या कोपऱ्यात वाटोळं टेबल आहे आणि फुलांची किनार असलेलं तलम वस्त्र त्यावर आहे. टेबलावर फ्लॉवर पॉट व सौंदर्य प्रसाधनाच्या तीन गोल डब्या आहेत. मालकिणीचं चित्रण उजळ रंगांत उठावदारपणं केलं आहे आणि तो चित्राचा कंेद्रबिंदू आहे. दासीचं चित्रण मध्यम रंगच्छटांत केलेलं असून पांढऱ्या रंगातील प्लेट व त्यातील रेड क्रिमझन रंगातील फळं पाहणाऱ्याचं लक्ष वेधून घेतात. दासीच्या मागील पाश्र्वभूमी काळोखाची दाट सावली पडावी तशी रंगवली आहे. दासीचा लंबगोल चेहरा व लांब नाक आमेदेओ मोदिलीआनी काढलेल्या चित्रांतील स्त्रियांच्या चित्रणाची आठवण करून देतात, तर मालकिणीच्या चित्रणावर सेझानचा पडलेला प्रभाव नजरेतून निसटत नाही.
रंग व रूपबंध यांचा पॅरिसमधील शिक्षणातून घेतलेल्या अनुभवाला ‘ग्रुप ऑफ थ्री गर्ल्स’मध्ये मुक्त वाव मिळाला आहे. पोटापाण्यासाठी काम करणाऱ्या ग्रामीण भागातील या तीन मुली आहेत. एका अनामिक व अस्थिर भविष्याला सामोरं जावं लागणार म्हणून काळजीत पडलेल्या त्या मुली आहेत. त्या एकमेकींना बिलगून बसल्या आहेत. खिन्न मुद्रेनं बसलेल्या त्या मुलींच्या ओढणी घेतलेल्या डोक्यांमागील सावल्यांतून उदासपणा अधिक गडद होतो. त्यांचे चेहरे हा चित्राचा कंेद्रबिंदू आहे. एका बाजूला वळलेल्या, समोर पाहणाऱ्या व बाजूला कटाक्ष टाकणाऱ्या अशा तीन अवस्थांचं चित्रण त्यात केलं आहे. एका बाजूनं या मुली मूकपणं आपली जीवनकहाणी सांगत आहेत, तर दुसऱ्या बाजूनं आपल्या नशिबी आलेल्या परिस्थितीबद्दल सजग आहेत. (उजव्या बाजूकडील तरुणीच्या हाताची ठेवण सहजस्वाभाविक वाटत नाही; कृत्रिम वाटते. मॉडेलवरून केलेल्या रेखांकनाचा, अमृतानं हाताचं चित्रण करण्यासाठी उपयोग केला आहे हे उघड आहे.) साध्यासरळ चित्ररचनेत रेषांपेक्षा आशयाला उठाव देणाऱ्या रंगसंगतीतून अमृतानं चित्रण केलं आहे.भारतातील समाजजीवनात अमृताला कमालीचा रस होता, त्याबद्दल कमालीचं कुतूहल होतं. ‘थ्री गर्ल्स’, ‘चाइल्ड ब्राइड’ आणि इतर चित्रं पाहिली की त्याची खात्री पटते. ‘चाइल्ड ब्राइड’(Child Bride)मध्ये स्त्रीच्या वाटय़ाला जन्मभर पुरणारी असाहाय्यता व खिन्नता अमृतानं मोजक्याच रंगांत साकार केली आहे. न विसरता येणारी गोष्ट म्हणजे पुरुषांच्या तुलनेत स्त्रीला तिच्या चित्रांत मिळालेलं महत्त्वाचं स्थान. हिमाचल प्रदेशातील ग्रामीण स्त्री जीवनाचं जसं तिनं चित्रण केलं आहे, तसं दक्षिण भारतातील स्त्रियांचंही केलं आहे. ‘साऊथ इंडियन व्हिलेजर्स गोइंग टु मार्केट’ हे त्याचं एक ठळक उदाहरण.
भारतीय समाजजीवनातील वास्तवाला दृश्यरूप देताना एका बाजूनं ती युरोपीय चित्रांतील रंगांचा व दुसऱ्या बाजूनं भारतीय पर्यावरणाचा उपयोग करत होती हे तिच्या ‘हिलमेन’, ‘हिल वुमन’ यांसारख्या चित्रांतून दिसून येतं. भारतात रंगवलेल्या चित्रांतील आशय व त्याला साकार करणारी चित्ररचना यात होत गेलेल्या स्थित्यंतराची आणि भारतीय अनुभवाला दृश्यरूप देण्यासाठी युरोपीय व भारतीय कलामूल्यांची एकात्मता साधण्याचा ती अतिशय सावधपणं व विचारपूर्वक प्रयत्न करत होती.
अजिंठय़ाला भेट दिल्यावर व तिथल्या भित्तिचित्रांचं अवलोकन व अभ्यास केल्यावर अजिंठय़ाचे चित्रकार हे मनुष्यकृतींचा साधन म्हणून नव्हे, तर सर्जनशील निर्मितीसाठी उपयोग करत होते हे अमृताच्या लक्षात आलं. तसा प्रयत्न त्यानंतर काढलेल्या तिच्या चित्रांत आपल्याला आढळतो. उदाहरणार्थ, ‘इन द लेडीज एन्क्लोझर’ हे १९३८ साली काढलेलं चित्र. एका कुटुंबातील स्त्रियांचं हे चित्र आहे. त्या डोक्यावर पदर घेऊन खाली बसल्या आहेत आणि कोणतं ना कोणतं काम करत आहेत. बसलेल्या स्त्रियांच्या एका बाजूला एक लहान मुलगी उभी आहे. अजिंठय़ाच्या भित्तिचित्रातील राजकुमारीसारखं तिनं आपल्या केसात फूल माळलं आहे. अधरेउन्मलित पापण्यांतून ती आपल्या हातातील क्रिमझन रंगाच्या फुलाकडे पाहत आहे. अजिंठय़ाच्या आडव्या चित्रपट्टय़ांतील चित्रांसारखी या चित्राची रचना आहे आणि रंगयोजनेवर त्यातील रंगांची छाप उमटली आहे. अजिंठय़ाच्या चित्रांतील लय व गती आत्मसात करण्याचा प्रयत्न अमृता कशी करत होती याची आपण कल्पना करू शकतो.
मोगल, राजस्थानी, बाशोली, कांग्रा लघुचित्रं अमृताच्या सौंदर्यास्वादाचा व अभ्यासाचा विषय बनली होती. साहजिकच आपल्या वैशिष्टय़पूर्ण चित्रशैलीची जडणघडण करताना, त्यांची वैशिष्टय़ं आपलीशी करण्याचा तिनं केलेला प्रयत्न ‘एलिफंट्स बाथिंग इन ए ग्रीन पूल’, ‘कॅमल्स’ यांसारख्या चित्रांतून स्पष्टपणं दिसतो. या दोन चित्रांना सरायातील पर्यावरण व निसर्ग यांची पृष्ठभूमी लाभली आहे. बिकानेर लघुचित्र शैलीचा प्रभाव ‘कॅमल्स’वर आहे.
भारतात सूर्य तळपत असतो, पण त्याच्या प्रकाशात दिसणारे स्त्री-पुरुष व निसर्ग यांचा अर्थ व सौंदर्यबोध भारतीय चित्रकारांना झाला आहे याचा प्रत्यय त्यांच्या चित्रांतून येत नाही; अशा अर्थाचं भाष्य अमृतानं आपल्या एका लेखात केलं आहे. स्टुडिओतील अंधारलेल्या वातावरणात चित्रं काढणाऱ्या अमृताला तळपत्या व बदलत्या सूर्यप्रकाशात स्त्री-पुरुष व निसर्गाच्या रंगांच्या आलेल्या विलक्षण दृश्यानुभवाला तिनं ‘सिएस्टा’, ‘स्टोरी टेलर’ इत्यादी चित्रांत साकार केलं आहे. रंग व रूप यांचं संयोगीकरण करण्याचा हेतू त्यामागे होता.
दृश्यकलेत ‘सौंदर्यसूचक रूपबंधा’ला महत्त्व देणाऱ्या क्लाइव्ह बेलच्या सौंदर्यसिद्धान्ताचा अमृताच्या कलाविषयक विचारसरणीवर मोठा प्रभाव होता. पॉल गूगॅ, ऑरी मतीस, मार्क शागल यांच्या चित्रांतील रंगांनी ती भारली गेली होती. श्रेष्ठ प्रतीची रंगवादी चित्रकार बनणं हे तिचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. असं सांगतात की, शेवटच्या घटका मोजत असताना बिछान्यात पडलेल्या अमृताची नजर, खिडकीला लावलेल्या पडद्याच्या फटीमधून सूर्यास्ताच्या प्रकाशानं भिंतीच्या कॅनव्हासवर उमटलेल्या रंगांच्या आकारांवर खिळली होती.
अमृता भारतात आल्यावर ग्रामीण भारतीय जनजीवन हा तिच्या निरीक्षणाचा व आकलनाचा मुख्य विषय बनला. तिनं साकार केलेलं कलाविश्व गरीब, कष्टकरी, भिकारी, स्त्रिया व त्यांच्या परिसरातील निसर्ग यांच्या चित्रणानं भरलं आहे. पॅरिसमधील सामाजिक व सांस्कृतिक वास्तवापेक्षा भारतीय ग्रामीण वास्तव वेगळं आहे याची जाणीव तिच्या मनात खोलवर रुजली. ‘थ्री गर्ल्स’, ‘पोटॅटो पिलर्स’, ‘हळदी ग्राइंडर्स’, ‘ब्राइड्स टॉयलेट’, ‘वुमन ऑन चारपॉय’, ‘रेस्टिंग मदर’, ‘व्हिलेज गर्ल्स’, ‘ड्रेसिंग द ब्राइड’ अशा किती तरी चित्रांतून आपण ते पाहू शकतो.
अमृताच्या चित्रांतील स्त्री प्रतिमा हा विवेचनाचा स्वतंत्र विषय असला तरी तत्कालीन बंगाली कला घराण्याच्या व अॅकॅडमिक युरोपीय कलाशैलीत चित्रकारांनी काढलेल्या स्त्री प्रतिमांपेक्षा त्या नि:संशय वेगळ्या आहेत. स्त्रियांच्या बाह्य़रूपापेक्षा त्यांच्या मनाचा वेध घेण्याचा ती प्रयत्न करत होती, हे चित्रांच्या दृश्यभाषेतून सूचित होतं.
पुनरुज्जीवनवादी व सादृश्यवादी अशा तत्कालीन प्रस्थापित प्रारूपांपेक्षा एक नवं प्रारूप चित्रांच्या रूपानं घडवण्याचा तिचा प्रयत्न सुरू होता, पण तिच्या अकाली निधनानं तिच्या शेवटच्या अपुऱ्या चित्राप्रमाणं तो खंडित झाला.
अमृताची चित्रं तत्कालीन बऱ्याच कलावंतांच्या व कला समीक्षकांच्या टीकेचा विषय बनली. तिच्या चित्रांतील मनुष्यकृतींचं ‘विरूपीकरण’, रेखाटनातील कमजोरपणा व भारतीय कलापरंपरेविषयी असलेलं अज्ञान हा कलासमीक्षकांचा मुख्य मुद्दा होता, पण तिच्या चित्रांचा सहानुभूतीनं व स्वागतशीलपणं विचार करणारे कलासमीक्षकही होते. कार्ल खंडालवाला हे त्यापैकी एक. अमृताचे जवळचे मित्र असणाऱ्या खंडालवालांकडून तिच्या फार मोठय़ा अपेक्षा होत्या. त्यांनी अमृताची चित्रं बंगाल कला घराण्याविरुद्धची तीव्र प्रतिक्रिया आहे असं मत व्यक्त केलं होतं. भारतीय चित्रकलेला नवी दिशा दाखवणारी अमृता ही पहिली चित्रकार आहे, असं मुल्कराज आनंद यांनी म्हटलं होतं. रूपबंध व रंग यांना तिनं दिलेला सौंदर्याकार आधुनिक भारतीय चित्रकलेत अपूर्व आहे, असं भाष्य त्यांनी केलं होतं. पी. आर. रामचंद्र राव यांच्या मते अमृताच्या चित्रात रूपाकार, सहजसुलभता व आदिमकाळातील कलेमधील जोम प्रत्ययाला येतो. दृक् इंद्रिय संवेदनेचा आनंद व दारिद्रय़ाबद्दल वाटणारा कळवळा यांचा एकाच वेळी अनुभव येतो.
काहीही असलं तरी अमृतानं आधुनिक भारतीय चित्रकलेला नवा आयाम देऊन चित्रकारांच्या भावी पिढय़ांना दिशादिग्दर्शन करण्याचं मौलिक कार्य केलं आहे याबद्दल दुमत होऊ नये. तिची चित्रं समकालीन व नंतरच्या तरुण चित्रकारांचं प्रेरणास्रोत ठरली. आशय व दृश्याविष्काराच्या दृष्टीनं आजही ती अभ्यासनीय आहेत व अप्रस्तुत ठरलेली नाहीत. आधुनिकोत्तर आंतरराष्ट्रीय चित्रकलेच्या दृक् भाषेनं प्रभावित झालेल्या नव्या पिढीतील चित्रकारांना ती निश्चितच मार्गदर्शक ठरतील.

 'चित्रकार अमृता शेर-गील’
- रमेशचंद्र पाटकर
- लोकवाङ्मय गृह(लवकरच प्रकाशित होत आहे.)
सौजन्य:लोकसत्ता 

[Brief: 
Amrita Sher-Gil (30 January 1913, – 5 December 1941), was an eminent Indian painter born to a Punjabi Sikh father and a Hungarian mother, sometimes known as India's Frida Kahlo, and today considered an important woman painter of 20th century India, whose legacy stands at par with that of the Masters of Bengal Renaissance; she is also the 'most expensive' woman painter of India.
At sixteen, Sher-Gil sailed to Europe with her mother to train as a painter at Paris, first at the Grande Chaumiere under Pierre Vaillant and later at École des Beaux-Arts (1930–34),she drew inspiration from European painters such as Paul Cézanne and Paul Gauguin,while coming under the influence of her teacher Lucien Simon and the company of artist friends and lovers like Boris Tazlitsky. Her early paintings display a significant influence of the Western modes of painting, especially as practiced in the Bohemian circles of Paris in the early 1930s. In 1932, she made her first important work, Young Girls, which led to her election as an Associate of the Grand Salon in Paris in 1933, making her the youngest ever and the only Asian to have received this recognition.

Sher-Gil's art has influenced generations of Indian artists from Sayed Haider Raza to Arpita Singh and her depiction of the plight of women has made her art a beacon for women at large both in India and abroad.The Government of India has declared her works as National Art Treasures, and most of them are housed in the National Gallery of Modern Art in New Delhi.[30] A postage stamp depicting her painting 'Hill Women' was released in 1978 by India Post, and the Amrita Shergill Marg is a road in Lutyens' Delhi named after her. In 2006, her painting Village Scene sold for INR6.9 crores at an auction in New Delhi which was at the time the highest amount ever paid for a painting in India.
Besides remaining an inspiration to many a contemporary Indian artists, in 1993, she also became the inspiration behind, the famous Urdu play, by Javed Siddiqi, Tumhari Amrita (1992), starring Shabana Azmi and Farooq Shaikh.
Her work is a key theme in the contemporary Indian novel "Faking It" by Amrita Chowdhury.]
-From wikipedia

Related Posts Plugin for WordPress, Blogger...