Sunday, January 25, 2009

गूढकथा म्हणजे केवळ रहस्यकथा नव्हेत.
मानवी मनाला जे गूढ़ वाटतं ते सारं काही त्यात येतं.
मरणाची कल्पना आपल्याला गूढ़ वाटते. त्यामुळे मरणाशी
संबंधित असलेल्या , पिशाच्चयोनी , पुनर्जन्म यासारख्या गोष्टी आपल्याला गूढ़ वाटतात.
परंतु प्रत्यक्ष जीवनामधेही, द्रष्टेपणा , स्वप्ने, आभास , इच्छाशक्ती ,
अंतर्ज्ञान यांसारख्या अनेक गूढ़ गोष्टी असतातच.
आणि माणसाचं मन ? -त्याचे अनेक व्यापार.....स्पष्टीकरणाच्यापलीकडचे-
या सगळ्यांनी तयार झालेली रत्नाकर मतकरींची गूढकथा.... तिचं वैशिष्ट्य हेच आहे की ती इतकी 'फ़ँन्टॅस्टिक' असूनही आपली वास्तवाची बैठक सोडत नाही.....
त्यांच्या कथेतला आशय टोकाचा कल्पनाविलास करतानाही वास्तवाच्या पातळीवर तितकाच सच्चा ठरतो.
मतकरींच्या गाजलेल्या कथांपैकी , त्यांनीच निवडलेल्या पंधरा-वीस नितांतसुंदर कथांचा संग्रह फ़ँटॅस्टिक .
फ़ँटॅस्टिक
लेखक: रत्नाकर मतकरी
आरती प्रकाशन

Thursday, January 15, 2009

सुप्रसिध्द ब्रिटिश लेखक ऑस्कर वाइल्ड (Oscar Wild), (१८५४-१९००), यांची ' पिक्चर ऑफ़ डोरियन ग्रे' ही कादंबरी १८९१ मध्ये प्रसिध्द झाली. तेव्हा तिनं प्रचंड खळबळ उडवली होती. कला, सौंदर्यशास्त्र, समाजशास्त्र या विषयांवरील गंभीर लेखक (The critic as an artist, The Soul Of Man Under socialism), कवी आणि कथाकार ( poems, The Happy Prince & Other Stories, The House Of Pomegranates) , नाटककार (Lady Windermere's Fan, Woman of no importance, An ideal Husband, The Importance Of Being Earnest) म्हणून ते सुपरिचित असले , तरी मुख्यत: ते picture Of Dorian Gray चित्ररूप कादंबरीचे लेखक म्हणूनच त्यांची विशेष प्रसिद्धी आहे.

एक निरागस तरूणाला मिळालेला चिरतारूण्याचा वर आणि त्यानं स्वत:च्या हातानं करून घेतलेलं आत्मिक अध:पतन. त्याला पापाच्या काठावर नेऊन पोहोचवणारं मोहक तत्वज्ञान...
त्यातूनच माणसाचं बहकणारं मन आणि त्याची सदसदविवेकबुध्दी यांच्यातला संघर्ष चित्ररूप होऊन आपल्याडोळ्यांसमोर उभा राहतो.
वास्तवता आणि अद्धुतरम्यता, कोमलता आणि क्रौर्य यांच विलक्षण मिश्रण या कादंबरीत आहे.
लेखकाच्या रंगदार आणि काव्यात्म शैलीमुळे हे चित्र अधिकच देखणं आणि गहिरं होतं...
पिक्चर ऑफ़ डोरियन ग्रे
मूळ लेखक: ऑस्कर वाइल्ड
अनुवाद : वि.शं. ठकार

Monday, January 12, 2009

 लघुकथा:

मागील वर्षी १९ मार्चच्या संध्याकाळी पाच वाजता न्यूयॉर्कच्या स्टेट पार्क पोलीस स्टेशनला एक फोन आला- ‘टेरॅपिन पॉइंटवरच्या बर्फात एक माणूस अडकून पडलाय.’
आणीबाणीच्या प्रसंगी सुटकेच्या मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्या सरजट पॅट्रिक मॉरिआर्टीने लगेच आपलं सुरक्षा जॅकेट अंगात चढवलं आणि मदत करणाऱ्या ट्रकसाठी बोलावणं धाडून तो स्वत: कार घेऊन भन्नाट वेगाने घटनास्थळी निघाला.
अमेरिकेच्या बाजूने नायगरा फॉल्सवर हा टेरॅपिन पॉइंट आहे; जो अमेरिका व कॅनडा या दोन देशांच्या मधील ६७० मीटरच्या वळणदार भागात स्थित आहे. उन्हाळ्यात पर्यटकांची ही अत्यंत आवडती जागा. तर हिवाळ्यात याच जागेचं एका बर्फाच्छादित, धोकादायक बांधामध्ये रूपांतर होतं.
मॉरिआर्टीची कल्पना होती की, तो एका पर्यटकाचा जीव वाचवणार होता. पण समोर काय वाढून ठेवलं होतं, याची त्याला कणभरही कल्पना नव्हती. ‘तो माणूस पाण्यात अडकलाय,’ मॉरिआर्टीच्या आधी तिथे येऊन पोहोचलेला पार्कचा पोलीस अधिकारी ओरडून सांगत होता.
मॉरिआर्टीने श्वास रोखला. गेल्या १९ वर्षांच्या पार्क पोलीसच्या नोकरीत त्याने असा प्रकार कधीच बघितला नव्हता. किनाऱ्यापासून ७५ मीटर दूर आणि फॉल्सच्या कडय़ावर


तो माणूस अडकून पडला होता. त्याने निळ्या रंगाचं पातळसं जॅकेट घातलेलं होतं व त्याचे दोन्ही हात पँटच्या दोन खिशांत खुपसलेले दिसत होते. बाजूने प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या जोरापासून स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करून त्याचं शरीर पुढे झुकलेलं दिसत होतं. तसं पाणी फारसं खोल नव्हतं. त्याच्या मांडय़ांपर्यंत येत होतं. परंतु पाण्याचा तो जीवघेणा प्रवाह त्याला खेचण्याचा प्रयत्न करत होता.
मॉरिआर्टीच्या मनात विचार आला, ‘कोणत्याही क्षणी बिच्चारा वाहून तरी जाणार किंवा थंडीने गारठून मृत्यू तरी पावणार.’ पाण्याचं तापमान ०.५ अंश सेल्सियस इतकं होतं. खवळलेल्या नदीचं पाणी ताशी ३० किलोमीटर वेगाने वाहत होतं व स्वत:बरोबर बर्फाचे मोठमोठे तुकडे वाहून नेत होतं. अशातच बांधाचा भलामोठा हिस्सा फॉल्समध्ये दहा मीटर खाली कोसळला. वरती संपूर्ण हिमकण दिसत असले तरी बाकी खाली नुसतं घट्ट, कडक बर्फ होतं. त्यावरून कोणी घसरलं असतं तर त्याचा पत्ताच लागला नसता.
‘जरा धीर धर, तसाच थांब,’ हाताने खुणा करत मॉरिआर्टी ओरडत त्या माणसाला सांगत होता. हताश झालेल्या त्या एकाकी माणसाला ते ऐकू जाण्याची सुतराम शक्यता नव्हती.
सहा फूट चार इंच उंचीच्या ४६ वर्षांच्या मॉरिआर्टीच्या चेहऱ्यावर निग्रही निश्चय दिसत होता. नायगरा ही काय चीज आहे, याची त्याला पुरेपूर कल्पना होती. पाण्याच्या प्रवाहातून बोटीतून जाणारे, मच्छिमार तसेच आत्महत्या करू बघणारे आणि जखमी हायकर्स (पायी िहडणारे) अशा अनेकांना त्याने वाचवलं होतं. परंतु असे संकटग्रस्त लोक सहसा पुढे वाहणाऱ्या नदीच्या पात्रात असत.
मॉरिआर्टीने त्याच्याजवळचा छोटा रेडिओ बाहेर काढला व त्यावरून पोलीस दलाच्या हेलिकॉप्टरची व अग्निशमन दलाची जेवढी कुमक पाठवता येईल तेवढी पाठवावी, अशी मागणी केली. लवकरच इतर पोलीस अधिकारी सर्व सामग्रींसह हजर झाले. मॉरिआर्टीने त्याच्या भगव्या रंगाच्या खास सूटची झिप् वर खेचून घेतली, जेणेकरून त्याचा कडाक्याच्या थंडीपासून बचाव झाला असता. कोणाला तरी पाण्यात उतरावंच लागणार होतं. आणि त्याच्या गाठीशी भरपूर अनुभव होता.
अग्निशमन दलाच्या तुकडीचे प्रमुख आले. ‘देवाच्याच कृपेने तो माणूस आत्तापर्यंत एका जागी टिकून आहे म्हणायचं..’ ते म्हणाले.
‘छे छे! केवळ भीतीपोटीच तो त्या जागी खिळून गेलाय,’ मॉरिआर्टी उत्तरला.
आकाशातून घेतलेल्या फोटोंवरून नंतर लक्षात आलं होतं की, तिथल्या खडकात एक छोटीशी कपार तयार झाली होती आणि त्या माणसाने त्या कपारीत पाय खुपसून स्वत:ला वाचवण्याची युक्ती शोधली होती. तो आधारच त्याला वाहून जाण्यापासून वाचवीत होता.
संध्याछाया वाढू लागल्या होत्या. तापमान झपाटय़ाने उतरायला सुरुवात झाली होती. ११ वर्षांचा अनुभव असलेला अग्निशमन दलातला ३९ वर्षांचा गॅरी कॅरेला मॉरिआर्टीबरोबर पाण्यात उतरण्यासाठी तयार होत होता.
नदीच्या वरच्या बाजूच्या प्रवाहाजवळूनच्या एका झाडाला ७५-७५ मीटर लांबीचे चार जाडजूड दोर बांधून घेतले. प्रत्येकासाठी दोन-दोन दोर. दोराची दुसरी टोकं कॅरेला व मॉरिआर्टीच्या अंगातील खास सुरक्षाकवचाला पक्की बांधली. अडकून पडलेल्या त्या माणसापासून २० मीटरच्या अंतरावर बर्फाच्या भिंतीवर काही लोखंडी कांबी ठोकून पक्क्या केल्या.
अग्निशमन दल पथकाच्या प्रमुखांनी बर्फाच्या भिंतीवर उभ्या असलेल्या २० जणांना त्या दोरांना घट्ट पकडून ठेवायला सांगितलं. प्रत्येकाने आपली जागा घेतली. काही त्या भिंतीवर अंतरा-अंतरावर पसरलेले, तर कोणी झाडाजवळ व काही पाण्याच्या उताराशी. हे सगळं करण्यात वीस मिनिटे निघून गेली होती. तो संकटग्रस्त माणूस थंडीने गोठून गेला होता. पण तरीही खालच्या दिशेने वाकून पाण्याच्या प्रवाहाला तोंड देत अजूनही उभा होता. मॉरिआर्टी व कॅरेला यांनी नदीच्या पात्रात उडी मारली. त्यांच्या पायाला तळाची खडकाळ जमीन लागली व प्रवाहाला असलेली विलक्षण ओढ लगेचच लक्षात आली. पाण्याचा तो प्रचंड वेग जणू त्यांना त्या दोरापासून ओरबाडायला बघत होता. फॉल्सच्या प्रचंड आवाजात त्यांचा आवाज लुप्त झाला होता. त्यामुळे दोघं हाताने खुणा करत एकमेकांशी संपर्क साधू लागले. पाण्यावरच्या धुक्यापलीकडून तो माणूस त्यांच्याकडे बघून जोरजोरात ओरडत होता.
स्टेट पार्क पोलीस डिटेक्टिव्हना बांधावर एक गडद रंगाची वस्तू दिसत होती. ते होतं- एक किरमिजी रंगाचं पैशाचं पाकीट व बेसबॉलची कॅप. दोन्ही वस्तूंना मिळून पेन अडकवलं होतं. पेनला एक चिठ्ठी अडकवली होती. चिठ्ठीवर रेखीव हस्ताक्षरात एवढंच लिहिलेलं होतं, ‘प्लीज.. माझ्या आई-बाबांना मला क्षमा करायला सांगा.’
वैमानिक केव्हिन कॅफेरीची १५ वर्षांची नोकरी होऊनही दरवेळी कोणाची तरी सुटका करण्यासाठी जेव्हा त्याला फोन येतो, तेव्हा त्याच्या अंगावर काटा उभा राहतो. कारण नायगारा फॉल्स हे असं एक अजब रसायन आहे, की तिथे काहीही क्षम्य नाही. फॉल्सच्या किनारी अचानक उसळणारे पाण्याचे जोरदार फवारे एका क्षणात हेलिकॉप्टरला हवेत उलटवून टाकू शकतात.
हेलिकॉप्टर फॉल्सच्या जवळ आल्यावर कॅफेरी कॉकपिटमध्ये त्याच्या शेजारी बसलेल्या मदतनीसाला म्हणाला, ‘अरे देवा, आर्टी- अरे, बघ बघ तो कुठे अडकलाय.. बापरे!’
संध्याकाळच्या धूसर प्रकाशात ते दृश्य फारच विदारक वाटत होतं. फॉल्सच्या माथ्यावर पाण्याच्या एका भल्यामोठय़ा भोवऱ्यामध्ये एक लहानशा चणीची व्यक्ती पाण्याबरोबर हेलकावे घेत होती. ‘आपण कसं काय या मूर्ख माणसापर्यंत पोहोचणार आहोत कोण जाणे?’ आर्ट लिटझिंगर त्याच्या मायक्रोफोनमधून ओरडून म्हणाला.
बऱ्याच खाली दोरांनी बांधलेले ते दोन सुरक्षा अधिकारी पाण्यातून पोहत पोहत, त्या अडकलेल्या माणसाच्या दिशेने जाताना त्या वैमानिकांना वरून दिसत होते. किनाऱ्याच्या कडेने पाण्याच्या अजस्र प्रवाहाचा ते सामना करत होते.
कॅफेरीने हेलिकॉप्टर त्या माणसाच्या दिशेने वळवून बरंच खाली आणलं. हेलिकॉप्टरच्या खालच्या भागाला स्टीलची एक मोठी बास्केट दहा मीटर दोराने बांधून लोंबकळत ठेवली होती. अचानक उसळलेले पाण्याचे उंच फवारे हेलिकॉप्टरला हेलकावे देऊ लागले व त्याच्यावर काबू मिळवणं अत्यंत कठीण होऊन बसलं. घनदाट धुक्यात तर काहीच दिसत नव्हतं. हेलिकॉप्टर स्थिर ठेवण्याचा कॅफेरी शर्थीने प्रयत्न करत होता. पण अखेरीस त्याला हेलिकॉप्टर वळवावंच लागलं. त्या बास्केटला व दोराला हेलिकॉप्टरपासून तोडून टाकावं लागणार होतं. कारण त्या बिकट प्रसंगी त्यांचा काहीच उपयोग होऊ शकणार नव्हता. बास्केट त्या माणसापर्यंत पोहोचूच शकणार नव्हती. किनाऱ्याला वळायच्या आधी त्याने दोन वेळा हेलिकॉप्टर खाली आणायचा परत प्रयत्न करून पाहिला.
‘आम्ही तुझ्यापर्यंत पोहोचतोच आहोत काही क्षणांत,’ लिटझिंगर जोरात ओरडून सांगायचा प्रयत्न करत होता. कॉकपिटच्या खिडकीवर हाताने खुणा करत, अंगठा वरच्या दिशेने उंचावून तो त्या माणसाला धीर देत होता.
खाली पाण्यात मॉरिआर्टी व कॅरेला दोरांच्या विरुद्ध दिशेला जोर लावत होते. त्या माणसाच्या बरंच जवळ पोहोचून त्याला नीट निरखू शकत होते. काळ्याभोर केसाचा तो मिशीवाला काळासावळा माणूस चांगल्या अंगयष्टीचा वाटत होता.
नंतर त्यांना समजलं की, तो माणूस ४८ वर्षांचा होता. जुगारात हजारो डॉलर्स हरल्यामुळे निराश होऊन तो त्या नदीत इतक्या आतपर्यंत येऊन पोहोचला होता. न्यूयॉर्कमध्ये तो त्याच्या वयोवृद्ध आई-वडिलांबरोबर राहत होता.
पण आत्ता या क्षणी त्यांना एवढंच माहिती होतं की, तो एक संकटग्रस्त माणूस होता. ‘मी प्रचंड गारठून गेलोय. कुल्फी झालीय माझी..’ तो वारंवार ओरडून सांगत होता.
‘तू थोडी कळ काढ,’ मॉरिआर्टी ओरडून सांगत होता.
तो माणूस मात्र गलितगात्र झाला होता. त्याचा धीर सुटत चालला होता, हे स्पष्ट दिसत होतं.
पॉवर कंपन्यांनी पाण्याची पातळी २० सेंटिमीटरने उतरवून ते पाणी फॉल्सपासून अडीच किलोमीटरवर असलेल्या त्यांच्या पॉवर प्लांटस्कडे वळवलं होतं. इकडे त्या माणसाच्या पायावर पाण्याच्या लाटांचा सतत जबरदस्त मारा चालूच होता. मॉरिआर्टी आणि कॅरेला पाण्यात पुढे सरकले. त्या माणसापासून केवळ दहा मीटर अंतरावर आले असताना अचानक त्यांच्यासमोर किनाऱ्यापासून आत घुसलेली बर्फाची भलीमोठी भिंत येऊन ठाकली. भिंतीच्या भोवतालून जाण्याचा त्यांनी प्रयत्न करून पाहिला. पण पाण्याला इतका प्रचंड वेग होता, की त्यांना काहीच करता येईना. बर्फ फोडायची कुदळ हेलिकॉप्टरमधून दोराच्या साहाय्याने खाली सोडण्यात आली. मॉरिआर्टी तिने बर्फ फोडायचा प्रयत्न करू लागला. पण तो कठीण बर्फ तुटायचं नावच घेईना.
दुसरी पर्यायी योजना त्वरित अमलात आणायलाच हवी होती. सुटकेसाठी वापरात येणारी एक रिंग (कडं) असते. ती दोराच्या साहाय्याने खाली पाण्यात सोडण्याचा निर्णय घेतला गेला. लिटझिंगरने हेलिकॉप्टरमधून दोराचं एक टोक पकडलं व दुसरं टोक खाली पाण्यातल्या अधिकाऱ्यांनी पकडलं. वरून वैमानिक ती रिंग अशा प्रकारे खाली आणतील की त्या माणसाला ती पकडता येईल आणि मग पाण्यातले अधिकारी दुसऱ्या बाजूने दोर खेचून त्याला ओढत ओढत जवळ आणतील.
परंतु ही सर्व योजना त्या माणसाला कशी सांगणार? तो तर किंचाळतच सुटला होता- ‘मी आता अजून धीर नाही धरू शकत. मला वाचवा हो.’
काही मिनिटांतच हेलिकॉप्टर परत आलं. ती रिंग दोराच्या सहाय्याने लोंबकळत होती. लिटझिंगर कॉकपिटमधून जेवढं बाहेर वाकता येईल तितकं खाली वाकत होता. त्याच्या तोंडावर थंडगार पाण्याचा बोचरा वर्षांव होत होता.
इकडे खाली त्या माणसाने दोन्ही हाताने चेहरा झाकून घेतला होता. हेलिकॉप्टर पाण्याच्या जवळ आल्याने पाण्यात खळबळ माजली व लाटांच्या भयानक माऱ्यामुळे त्याचा तोल गेला. त्याचे पाय घसरू लागले. खरं म्हणजे ती रिंग बरोबर त्याच्या डोक्यावर लोंबकळत होती. पण सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे पुढचं सगळंच अशक्य होतं. तो तोंडावर खाली आपटला व पाण्यात दिसेनासा झाला.
‘नाही रे परमेश्वरा!’ लिटझिंगर किंचाळला.
मॉरिआर्टी पुढे सरसावला. पण मागून त्याचा दोर पकडलेल्या लोकांनी त्याला घट्ट खेचून धरलं. कॅरेलाने डोळे बंद करून घेतले. कारण त्याला समोरचं दृश्य बघायची हिंमत होत नव्हती.
वर हवेतून कॅफेरी व लिटझिंगर एक निळ्या जॅकेटचा ठिपका पाण्यात नाहीसा होताना बघत होते. आजूबाजूला जमलेल्या लोकांनी मान फिरवली. काहीजण त्या माणसासाठी प्रार्थना करू लागले. अखेरच्या क्षणीचं दृश्य होतं ते, याबद्दल तिथल्या कोणाच्याही मनात संदेह नव्हता.
तेवढय़ात अचानक बराच आरडाओरडा ऐकू यायला लागला. सुटका करायला गेलेल्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. कॅनडाच्या बाजूने नदीच्या किनारी गर्दी करून बघे उभे होते. धबधब्याच्या तोंडापाशीच तो माणूस पाण्यातून मागे फिरायचा जीवघेणा प्रयत्न करत होता. कसं शक्य होतं ते? पण तरी ती व्यक्ती म्हणजे तोच माणूस होता. भीतीपोटी त्याच्या शरीरात प्रचंड सामथ्र्य निर्माण झालं होतं आणि तो त्या पाण्याशी दोन हात करत होता. एकीकडे त्याचे दोन्ही पाय फॉल्सवरून खाली लोंबकळत होते.
‘तो बघा, मागे वळण्यात तो यशस्वी झालाय,’ लिटझिंगर अत्यानंदाने ओरडला.
ओल्या गच्च अंगाने, भीतीने थरथरत, जखमी अवस्थेत तो माणूस फॉल्सच्या वरच्या बाजूला चक्क परत उभा राहिला होता; जिथे इतका वेळ तो तग धरून होता. आता परत त्याच कपारीत त्याचे पाय अडकले गेले होते.
‘आपल्यासमोर अजून एक संधी चालून आली आहे,’ कॅफेरी ओरडला.. ‘परत एकदा त्याच्या दिशेने रिंग टाका.’
करोडोमधून तो नेम नक्कीच अचूक ठरणार, याची प्रत्येकाला मनोमनी खात्री वाटत होती. लिटझिंगर योग्य क्षण पकडून बरोबर त्याच क्षणी ती रिंग खाली सोडणार. ती सरळ त्या माणसापर्यंत पोहोचेल. आणि एकदा का त्याने ती पकडली, की पाण्यातले सुरक्षा अधिकारी त्याला थेट किनाऱ्याला खेचून नेतील.
हेलिकॉप्टरच्या कॉकपिटमधून शक्य तेवढं खाली वाकून लिटझिंगर प्रवाहाच्या वेगाचा अंदाज घेत होता. पण भन्नाट वाऱ्याचे व उसळणाऱ्या पाण्याचे असे जबरदस्त तडाखे त्याला बसू लागले, की त्याला काहीच दिसेनासे झाले. अंदाजानेच त्याने रिंग खाली टाकली. ती भगव्या रंगाची रिंग फेसाळलेल्या पाण्यात वेडीवाकडी होऊन हेलकावे घ्यायला लागली. तो माणूस जिवाच्या शर्थीने पुढे सरसावला. पण परत एकदा पाण्यात उलटला. रिंग त्याच्या डोक्याच्या अवतीभोवती फिरत होती आणि फॉल्स त्याला परत खाली खेचू लागले. त्याचा उजवा हात हवेत उंचावलेला दिसत होता. आणि काय आश्चर्य! त्या हाताने रिंग पकडली एकदाची!
‘अरे देवा, कृपा रे तुझी. रिंग लागली त्याच्या हाती,’ लिटझिंगर अत्यानंदाने ओरडला.
तिकडे पाण्यात मॉरिआर्टी व कॅरेलाही ओरडून म्हणत होते, ‘ओढा, ओढा, ओढा.’ दोराची दुसरी टोकं धरून उभी असलेली सुरक्षा दलाची माणसं पूर्ण शक्ती लावून ओढायला लागली.
संकटात सापडलेला तो माणूस परत अचानक दिसेनासा झाला व मॉरिआर्टी ओरडला, ‘थांबा, थांबा. ओढू नका.’
पाण्याच्या प्रवाहाने फॉल्सवरून जे बर्फ खाली लोंबकळत होतं, त्या दिशेने त्या माणसाला गिळंकृत करायला सुरुवात केली. एखादा सेंटिमीटर जरी तो पुढे असता तर पूर्णपणे वाहून गेला असता. त्या रिंगला घट्ट पकडून धरलेल्या अवस्थेत तो त्या बर्फाच्या भिंतीखाली अडकून पडला होता. त्याचा चेहरा अर्धवट पाण्यात बुडाला होता आणि पाण्याच्या प्रचंड वेगामुळे त्याचं शरीर हेलकावत होतं, खेचलं जात होतं.
बर्फाची भिंत व त्या धो-धो वाहणाऱ्या पाण्यामध्ये केवळ ३० सेंटिमीटरचं अंतर होतं. दर दोन-चार सेकंदांनंतर त्या माणसाचं डोकं पाण्याबाहेर येत होतं व तो श्वास घेण्यासाठी प्रयत्न करत होता. ‘जास्तीचा दोर सोडा, सैल करा दोर अजून!’ मॉरिआर्टी व कॅरेला ओरडून सांगत होते.
जास्तीचा दोर हाताशी आल्यावर मॉरिआर्टीने स्वत:ला प्रवाहातून त्या बर्फाच्या भिंतीच्या दिशेने झोकून दिले व तिथे पोहोचून तो त्या बर्फावर त्याच्या मुठीने जोरजोरात प्रहार करत तिथे एक भोक पाडण्याचा प्रयत्न करू लागला. तिथून त्याने त्या माणसाच्या हाताची चार बोटं कशीबशी पकडली. ‘आता जोर लावून स्वत:ला ढकल!’ मॉरिआर्टीने त्याला जोरात ओरडून सांगितलं, ‘अरे, तुझ्या पायांनी ढकल. तूच आता आम्हाला मदत करणं आत्यंतिक गरजेचं आहे.’
‘नाही. मी काही नाही करू शकत.’ त्याच्या डोक्यावरून, नाका-तोंडातून पाणी जात असल्याने तो आता गुदमरायला लागला होता. अधिकाऱ्यांच्या डोळ्यांदेखत तो पाण्यात बुडत चालला होता. ‘मला जाऊ द्या आता.’ तो कसंबसं पुटपुटला, ‘तुम्ही स्वत:चा जीव नका धोक्यात घालू आता.’
‘तू नाही बुडणारेस आता,’ कॅरेला जोरात ओरडला व मॉरिआर्टीला बाजूला सारून तो पुढे आला व त्या भोकातून बर्फाच्या भिंतीखाली गेला.
तुफान उसळलेल्या पाण्यातून पुढे सरसावून त्याने त्या माणसाचं जॅकेट पकडलं, त्याच्या शरीराभोवती आपले पाय करकचून आवळून घेतले व आपल्या अंगातील सुरक्षा जॅकेट त्याच्या खांद्यावर चढवायचा प्रयत्न करू लागला. रौद्ररूप धारण केलेल्या पाण्याच्या प्रवाहाने आता दोघांना आपल्याकडे खेचायला सुरुवात केली. कसंतरी करून त्या दोघांना एकत्र बांधण्यात कॅरेलाला यश मिळालं.
‘माझ्या हाती लागलाय रे हा!’ पाण्यातून त्याचं डोकं बाहेर आल्यावर तो पुटपुटला.
‘ओढायला सुरुवात करा,’ मॉरिआर्टी वरच्या सुरक्षा पथकाला उद्देशून ओरडला.
त्या बांधावर दोन व्यक्ती आता नजरेच्या टप्प्यात आल्या होत्या. तो संकटग्रस्त माणूस अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याच्या दोन्ही हातांच्या कवेत विसावला होता. सुरक्षा पथकातील बाकीचे उतारावरून भराभर खाली आले. तेवढय़ात चेहरा निळा पडलेल्या त्या माणसाच्या शरीराचं गाठोडं गरम कपडय़ात गुंडाळून त्याला स्ट्रेचरवर ठेवण्यात आलं. ‘मला क्षमा करा..’ केविलवाण्या आवाजात तो पुटपुटला व त्याच क्षणी त्याची शुद्ध हरपली.
त्या माणसाने मागे सोडलेल्या स्मृती मनात आजही ताज्या आहेत. अनेक सुरक्षा अधिकारी म्हणत असतात की, आम्हाला त्याला भेटून, त्याच्याशी हँडशेक करून त्याच्या चिकाटीचं कौतुक करायला आवडेल.
हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आल्यावर डोळ्यांत अश्रू आणून त्याने मनापासून पश्चाताप व्यक्त केला. त्याच्या आयुष्याला एक नवी, चांगली कलाटणी मिळाली, असं त्याने शपथेवर कबूल केलं.
‘मला क्षमा करा, चुकलं माझं,’ असं तो वारंवार म्हणत होता.. ‘आज माझे प्राण वाचवताना जर इतर कोणाचा जीव गेला असता तर मी काय केलं असतं या जगात राहून, हे मला कळत नाहीये.’
त्याने केलेली ही स्तुती सुरक्षा अधिकाऱ्यांना शाबासकीची, कृतज्ञतेची पाठीवर पडलेली थाप वाटली. त्याने मन:पूर्वक मानलेल्या आभारामध्ये सगळं आलं!
स्वैर अनुवाद- उषा महाजन

(मूळ कथा : Helen O'Neall- 'Man on the Brink' स्रोत : रीडर्स डायजेस्ट)

सौजन्य : लोकसत्ता (लोकरंग )


Monday, January 5, 2009

आत्मचरित्रे ही सर्वसाधारणपणे आत्मसमर्थनार्थ लिहीली जातात, असे जयवंत दळवींचे मत होते. खरेखुरेआत्मचरित्र लिहिण्याचे धैर्य नसेल तर भल्या माणसाने आत्मचरित्र लिहू नये असेही ते म्हणत असत.
प्रस्तुतच्या पुस्तकात दळवींच्या आत्मपर लेखांचे विलोभनीय दर्शन घडते. मत्स्याहार प्रिय असलेले रसिकखवय्ये म्हणून त्यांचे दर्शन ' माझे खाणेपिणे माझा मत्स्यावतार ', 'अनंताश्रम' ,'भंडारी हॉटेल' यांसारख्या लेखांतून घडते. कुटुंबातले दळवी 'माझ्या कुटुंबात मी' मधून उभे रहातात. 'दादरचे दिवस', 'आठवणीतली वास्तू' यांसारखे लेख त्यांच्यातील व्रात्य मुलाची आठवण करून देतात. 'आपुले मरण पाहिले म्या डोळा' यासारख्या लेखातून ते आपल्या मृत्युकडे ज्या खेळकरपणाने पहातात, आणि जय विनोदी ढंगात पेश करतात, ते अविस्मरणीय आहे. नाट्यक्षेत्रातल्या स्वःताच्या पडेल पदार्पणावरही ते तेवढ्याच खेळकरपणाने लिहितात. 'धी वर्ल्ड इज लाइक धिस' हा युसिसमधील नोकरीच्या काळातील अमेरिकन अधिकारयांविषयीचा लेख वैशिष्ट्यपूर्ण आहे. 'माझ्यासाहित्यातील धर्म' 'देहधर्म', 'चक्र' शी नसलेला संबंध' या लेखांतून साहित्यिक दळवींचे दर्शन घडते.
दळवींची शैली ही अत्यंत पारदर्शक आहे. दळवींच्या आयुष्यातील व्यक्ती-घटना-प्रसंग या विषयींचे हे मार्मिकलेखन गजालीच्या स्वरूपात वाचकांसमोर उलगडत जाते आणि वाचक त्यात गुंतत जातो.

आत्मचरित्राऐवजी
-जयवंत दळवी
सौजन्य: मॅजेस्टिक प्रकाशन

Related Posts Plugin for WordPress, Blogger...