Wednesday, January 25, 2012

पॅरिसच्या मोंमार्त् या उपनगरासारख्या भागात अनेक कलावंत राहात. त्यांच्या जीवनकहाण्या समजून घेताना कलेची ओळख व्हावी, किंवा उलटपक्षी, त्यांच्या कलेकडे साकल्याने पाहताना त्यांची जीवनचरित्रे समजावीत, असे त्या कलावंतांचे जगणे. म्हणजे यापैकी एखाद्या कलाकाराचा जीवनप्रवास समजून घेतला आणि त्याचे मनोव्यापार कसे होते याचा सुगावा घेतला, तरी त्याच्या कलेकडे पाहण्याची दृष्टी तयार होणारच, याची खात्री बाळगायला हरकत नाही. या खात्रीचे थेट प्रत्यंतर वाचकाला ‘मूलाँ रूज’ ही तुलूज लोत्रेक या चित्रकाराच्या जीवनावरील कादंबरी वाचताना येते.
मराठीजनांच्या चित्रकलाप्रेमाची राजधानी कोल्हापूर असेल, तर पॅरिस ही जगातल्या चित्रकलाप्रेमींची राजधानी म्हटली पाहिजे. विशेषत: विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जागतिक चित्रकलेवर अधिराज्य असलेल्या या कलानगरीने आज मात्र त्याकाळच्या जिवंत कलेतिहासाच्या राजधानीचे स्वरूप घेतले आहे. पॅरिसच्या मोंमार्त् या उपनगरासारख्या भागात अनेक कलावंत राहात. त्यांच्या जीवनकहाण्या समजून घेताना कलेची ओळख व्हावी, किंवा उलटपक्षी, त्यांच्या कलेकडे साकल्याने पाहताना त्यांची जीवनचरित्रे समजावीत, असे त्या कलावंतांचे जगणे. म्हणजे यापैकी एखाद्या कलाकाराचा जीवनप्रवास समजून घेतला आणि त्याचे मनोव्यापार कसे होते याचा सुगावा घेतला, तरी त्याच्या कलेकडे पाहण्याची दृष्टी तयार होणारच, याची खात्री बाळगायला हरकत नाही.
या खात्रीचे थेट प्रत्यंतर वाचकाला ‘मूलाँ रूज’ ही तुलूज लोत्रेक या चित्रकाराच्या जीवनावरील कादंबरी वाचताना येते. आपल्याला तुलूज लोत्रेकची चित्रे माहीत असतीलच असे नाही. किंवा ती चित्रे पाहिली तरीही हे असेच का आहे, इतक्या भगभगीत रंगांत वा घाईने केल्यासारखे का रंगवले आहे, असे प्रश्नही आपल्याला पडू शकतात. अज्ञानाचे काही हक्क असतात, त्यातला हा. पण या अज्ञान-प्रदेशातून कुणीतरी आपल्याला तुलूज लोत्रेकच्या जन्मगावी नेते आहे, त्याला पॅरिसलाच का जावेसे वाटले याची चाहूल देऊन न थांबता पॅरिसमध्ये त्याच्या काळात नेते आहे, हे लक्षात आल्यावर आपणही- या चित्रकाराला लहानपणीचा आजार झाल्यावर त्याची वाढ कशी खुरटली आणि तो ठेंगू, कुरूप कसा राहिला, त्याचे रूप स्त्रीआसक्तीच्या आड कसे येत गेले, आणि त्याने केलेले प्रेम विफल कसे झाले, मग तो ‘अ‍ॅब्सिंथ’ नामक घातक दारूच्या व्यसनात कसा बुडाला, असायलममधून बरा होऊन परतल्यावरही दारू जवळ केल्याने अल्पायुषी कसा ठरला.. याची गोष्ट आवडीने वाचू शकतो.
मात्र, हा अल्पायुषी शोकनायक एक चित्रकार आहे. त्याचे संदर्भ आपल्या माहितीपेक्षा कदाचित निराळेही आहेत. विख्यात चित्रकार व्हॅन गॉग हा त्याचा सहप्रवासी; तर एदगर देगा, कामिय् पिसारो आणि पॉल गोगँ हे ज्येष्ठ समकालीन. त्यावेळचे अनेक बिगरविख्यात चित्रकार, कॅफेतल्या त्यांच्या चकाटय़ांचे विषय, त्यांच्या फ्रेंच आसक्तीला मिळालेली मॉडर्न कलेने दिलेल्या नव्या स्वातंत्र्यभानाची जोड.. अशा तपशिलांचा अड्डा ही कादंबरी जमवते. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनि’ अशी तुतारी फुंकून अखेर इम्प्रेशनिझमच कुरवाळत बसणारे हे बाकीचे बिगरविख्यात नवचित्रकार खंगले कसे, आणि तुलूज लोत्रेकला (पैशाची चणचण नसल्याने असेल, पण) मुद्राचित्रणासारखे नवे तंत्र शिकण्याची आणि ते काही दिवस हाताळल्यानंतर रंगचित्राइतक्याच ऐवजाचे मुद्राचित्र तयार करण्याची संधी त्याच्या आयुष्यातील घटनाक्रमाने कशी दिली,  ती त्याने कशी घेतली, आणि पुढे तो मोठा मुद्राचित्रकार कसा झाला, याचीही उत्तरे ही कादंबरी देते.
लोत्रेकची आठ चित्रे या कादंबरीत रंगीत प्लेट घालून छापली आहेत. प्रत्येक प्लेटमागे त्या चित्राचे थोडक्यात वर्णन आहे. या साऱ्या मेहनतीचे श्रेय अनुवादकाच्या प्रयत्नांना जाते! हे मराठीतले वर्णन मराठी ‘वाचकां’च्या कलाभानाला साजेल असे आहे. चित्रकार वा चित्रे माहीत असलेले ‘प्रेक्षक’देखील इतक्या सुगम भाषेत चित्रांबद्दलचे नवे तपशील मराठीत आले म्हणून सुखावतील! चरित्र वाचून चित्र कळण्याची शक्यता लोत्रेकबद्दल होतीच; पण ही चित्रे अनुभवात भर घालतात.
मूळ कादंबरीकाराने- पिएर ल मूर यांनी कादंबरीत लोत्रेकच्या ज्या-ज्या चित्रांचे उल्लेख आले आहेत, ती कुठकुठल्या संग्रहालयांत आहेत, याबद्दलच्या तळटीपा दिल्या होत्या. पण मूळ पुस्तक आहे १९५० सालचे. अनुवादकाने या तळटीप-संदर्भाचा फेरआढावा घेऊन, आज (एकविसाव्या शतकात) ती चित्रे जिथे आहेत, त्यांचे संदर्भ दिले आहेत. मराठीत हे ताजे संदर्भ तळटीपेत न ठेवता मजकुराच्या मध्येच येतात, त्यामुळे ते वाचकाच्या नजरेआड होत नाहीत.
पिएर ल मूर यांनीही ही कादंबरी केवळ चित्रकाराच्या जीवनकार्याची ओळख करून देणारी न ठेवता ती रंजक केली होती. पॅरिसला आयफेल टॉवर उभा राहत होता त्यावेळचे वर्णन, संवादांवर भर आणि हेन्री द तुलूज लोत्रेक या शोकनायकाची चित्रे तरुणपणीच लूव्र संग्रहालयाने घेतल्याच्या प्रसंगाशी दु:खद  घटनेचाही चटका- अशी तिची मूळ रचना आहे. मराठीत ती आणताना संवादभाषेत वैविध्य आणण्याचा अनुवादकाचा प्रयत्न यशस्वी म्हणावा असा आहे.
या पुस्तकातील चित्रांपैकी पहिले चित्र आहे हेन्री द तुलूज लोत्रेक यांच्या आईचे. आईच हेन्रीचा आधार होती. अख्खे बालपण तिच्यावर विसंबणे, तिनेही  उमराव घराण्यातली असूनही आजारी मुलाची शुश्रूषा स्वत: करणे, हेन्री  शिकू इच्छितो आहे, मोठा होतो आहे म्हणून तिनेच त्याची केलेली पाठराखण, पुढे एका नववर्षरात्री माय-लेकरांना आपले जीवनमार्ग निरनिराळे असल्याची जाणीव होणे.. या प्रसंगांतून कादंबरीभर आई आणि तिचा कलावंत मुलगा यांच्या नात्याचे पदर दिसतात. जीवनदर्शनाची ही एकमेव लेखकीय संधी कादंबरीकाराला होती असेही जाणवते; कारण बाकीची पात्रे इतिहासात जे घडले, त्याबाहेर फार कमी बोलतात, वागतात.
या कादंबरीतून अभ्यास आणि लालित्य यांचा जो गोफ पिएर ल मूर यांनी विणला होता, तो याच कादंबरीवर सही सही बेतलेल्या आणि त्याच नावाच्या चित्रपटामध्येही दिसला असेलच असे नाही. पण भाषांतरात मात्र हे अभ्यासू लालित्य प्रकटले आहे. कारण अनुवादकानेही अभ्यास आणि लालित्य यांच्या मार्गावर अनुगमन केले आहे!
-विबुधप्रिया दास


मूलाँ रूज

मूळ लेखक- पिएर ल मूर,
स्वैर रूपांतर- जयंत गुणे, 
लोकवाङमय गृह प्रकाशन,
पृष्ठे : ३२४, मूल्य : ३०० रुपये.

Friday, January 13, 2012


लोकरंग, लोकसत्ता 

श्री. ना. पेंडसे हे स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्यविश्वातील एक अत्यंत महत्त्वाचे नाव. प्रारंभी आपल्या कादंबऱ्यांतून कोकणातील विश्व आणि लोकजीवन चितारणाऱ्या श्री.नां.नी नंतर महानगरीय अनुभवही तितक्याच ताकदीने आपल्या कादंबऱ्यांतून व्यक्त केले. ५ जानेवारी २०१२ पासून त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले. त्यानिमित्ताने डॉ. रवींद्र शोभणे यांनी त्यांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाचा घेतलेला धांडोळा..


स्वातंत्र्योत्तर मराठी कादंबरी वाङ्मयाचा विचार करायचा झाला तर या प्रवासातील ठळक नाव म्हणून श्री. ना. पेंडसे यांचे नाव आवर्जून घ्यावे लागते.

किंबहुना मराठी कादंबरी वाङ्मयाच्या प्रवासातील महत्त्वाच्या टप्प्यांचा विचार करावयाचा झाला तर हरिभाऊ (ह. ना. आपटे), शिरूभाऊ (श्री. ना. पेंडसे) आणि भालचंद्र नेमाडे या तीन ठळक टप्प्यांचा विचार करणे आवश्यक ठरते. फडके-खांडेकरांनी मराठी कादंबरीला कलारंजन आणि स्वप्नरंजनात अडकवून ठेवल्याने ती सत्त्वहीन आणि कृतक होऊ पाहत होती. अशा वळणावर ज्या कादंबरीकारांनी मराठी कादंबरीला तिचे सत्त्व बहाल करण्याचे, वास्तवाचे अधिष्ठान देण्याचे महत्त्वाचे कार्य केले, त्यापकी श्री. ना. पेंडसे हे एक होत. पेंडसेंना यासंदर्भात झुकते माप देण्याचे कारण असे की, मराठीत प्रादेशिक कादंबरीची नवी शाखा, नवी प्रकृती त्यांच्या कादंबऱ्यांपासून रूढ झाली. म्हणूनच मराठी कादंबरीचा विचार करताना पेंडसेंचा विचार ठळकपणे करावा लागतो, तो या अर्थाने. मराठीतील ‘ट्रेंड-सेटर’ कादंबरीकार म्हणून पेंडसेंचे महत्त्व अमान्य करता येत नाही.
कादंबरी, कथा, नाटक, व्यक्तिचित्रण, आत्मचरित्र अशा विविध वाङ्मयप्रकारांत लेखन केलेल्या पेंडसेंची मराठी साहित्यात ओळख आहे ती कादंबरीकार म्हणूनच. ‘खडकावरील हिरवळ’ हे त्यांचे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक १९४१ साली प्रकाशित झाले. हे त्यांचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक. याचा अर्थ पेंडसेंच्या लेखनाची सुरुवात व्यक्तिचित्रांपासून झाली. पण हे एकमेव व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक सोडले तर त्यांनी पुढे या प्रकारचे लेखन केले नाही. तीच गोष्ट त्यांच्या कथालेखनाच्या संदर्भातही सांगता येईल. ‘जुम्मन’ (१९६६) हा एकमेव कथासंग्रह सोडला तर त्यांनी नंतर कथालेखनही केले नाही. पण या दोन्हीचा उपयोग त्यांच्या कादंबरीलेखनासाठी, त्यातील आशयद्रव्यासाठी पुरेपूर झाला. त्यातही त्यांच्या ‘खडकावरील हिरवळ’ या पुस्तकाच्या संदर्भात हे विधान अधिक ठोसपणे करता येईल. कारण त्यातील ‘आमचे मास्तर’ (हद्दपार), ‘बापूकाका सामल’ (गारंबीचा बापू), ‘काशीताई’ (रथचक्र) ही व्यक्तिचित्रे या कादंबरीलेखनाची प्रेरणास्रोत होती.
व्यक्तीचा शोध, व्यक्तिमनाचा समग्र विचार हे प्रधान सूत्र (किंवा प्रकृतीही) श्री. ना. पेंडसे यांच्या कादंबरीलेखनामागे होते. त्यांना सुचलेल्या कादंबऱ्या या बहुश: त्यांच्या आयुष्यातील त्यांनी पाहिलेल्या माणसांवरून सुचलेल्या आहेत. म्हणूनच ‘खडकावरील हिरवळ’ला त्यांच्या लेखनप्रवासातील पूर्वसामग्रीच्या दृष्टीने महत्त्व आहे.
श्री. ना. पेंडसेंना खाजगीत शिरूभाऊ म्हणत. खाजगीतील (कौटुंबिक) हे नाव त्यांच्या मित्रमंडळीत आणि पुढे लेखनाच्या क्षेत्रातही रूढ झाले. त्यांच्या नावाचा उल्लेख साहित्य प्रांतातही ‘पेंडसे’ असा होण्याऐवजी ‘शिरूभाऊ’ असाच होत होता, याची प्रचीती ‘श्री. ना. पेंडसे : लेखक आणि माणूस’ या त्यांच्या आत्मचरित्रातूनही येते.
पेंडसेंची पहिली कादंबरी ‘एल्गार’ १९४९ मध्ये प्रकाशित झाली. प्रकाशित झालेली ही त्यांची पहिली कादंबरी असली तरी ‘एल्गार’ ही लेखनदृष्टय़ा त्यांची पहिली कादंबरी नव्हे. त्यापूर्वी त्यांनी ‘संक्रमण’ नावाची कादंबरी लिहून कादंबरीलेखनाचा प्रयत्न केला होता. पण तिच्यावर फडके-खांडेकरांच्या प्रकृतीची दाट छाया होती. १९३५ ते ४५ या काळातील जे सामाजिक-राजकीय वातावरण होते, नव्या पिढीच्या उरात जो ध्येयवाद होता, जे स्वप्नाळू विश्व होते, तो प्रभाव- पर्यायाने फडके-खांडेकर- माडखोलकर या कादंबरीकार त्रयीचा प्रभाव पेंडसेंना तीत टाळता आला नव्हता. पण आपली कादंबरी कशी असावी, यापेक्षा ती कशी नसावी, ही खूणगाठ पेंडसेंच्या मनात पक्की होती आणि त्यामुळेच ‘संक्रमण’ पुस्तकरूपाने प्रकाशित न करता सरळ पाणी तापवायच्या बंबात टाकून ते मोकळे झाले.
‘एल्गार’ने पेंडसेंना जसे कादंबरीकार म्हणून नाव मिळाले, तसेच या कादंबरीच्या निमित्ताने मराठीत प्रादेशिकतेच्या संदर्भात चर्चा झडू लागल्या. तत्पूर्वी मराठीत ग्रामीण आणि नागर अशा स्वरूपाच्या कादंबऱ्या अस्तित्वात होत्या. तथापि मध्यमवर्गीय, पांढरपेशा माणसांचे मनोरंजन म्हणून एकीकडे सदाशिवपेठी गुलछबू, तर दुसरीकडे गांधीवादाचा भाबडेपणाने स्वीकारणारे, कृतक वाटावा अशा नागरी जीवनदर्शनाचा सुकाळ तत्कालीन कादंबरीत पाहायला मिळत होता. नाही म्हणायला या काळातही कादंबरीच्या क्षेत्रात काही वेगळे प्रयोग होत होते. या प्रयत्नांना पुढे सलग असा हातभार पेंडसेंनी लावला, हे नाकारता येत नाही.
‘एल्गार’ (१९४९) पाठोपाठ ‘हद्दपार’ (१९५०) आणि ‘गारंबीचा बापू’ (१९५२) या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आणि प्रादेशिक कादंबरीकार म्हणून पेंडसेंनी मराठी साहित्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले. ‘गारंबीचा बापू’ ही तर तत्कालीन वाचकांना झपाटून टाकणारी, चेटूक करणारी कादंबरी ठरली. मराठी कादंबरीने यापूर्वी पाहिली नव्हती अशी माणसे, पाहिले नव्हते असे सौंदर्य, पाहिली नव्हती अशी विकृती, पाहिली नव्हती अशी जिद्द, पाहिले नव्हते असे प्रेम आणि ऐकल्या नव्हत्या अशा शिव्या- हे सारे ‘गारंबीचा बापू’त एकवटून आले होते. त्यामुळे लोकप्रियता आणि गुणात्मक दृष्टीनेही रसिक व समीक्षकांनी या कादंबरीचे भरभरून स्वागत केले. याच तीन कादंबऱ्या समोर ठेवून गंगाधर गाडगीळांनी ‘हण्रचा दीपस्तंभ’ हा लेख लिहून पेंडसेंचे कादंबरीकार म्हणून मूल्यमापन केले होते.
आपल्या कादंबऱ्यांचा प्रादेशिक या वैशिष्टय़ाच्या संदर्भात बोलबोला होत असला तरी प्रादेशिकता ही कलाकृतीच्या संदर्भात किती आणि कशी स्वीकारायची, याचे सजग भान पेंडसेंना होते. यासंदर्भात पेंडसेंनी केलेले विवेचनच अधिक बोलके ठरावे. ते लिहितात- ‘‘एखादा प्रदेश कितीही जिवंत केला, अन्य पात्रांच्या बरोबरीने तो वावरत आहे असा प्रत्यय वाचकाला आला, तरी अखेरच्या विश्लेषणात या वैशिष्टय़ाला स्थान राहत नाही. शहरी बायांच्या मेळाव्यात घट्ट कासोटय़ाच्या कोळणीने धिटाईने प्रवेश केला तरी ती ज्याप्रमाणे सर्वाचे लक्ष आपल्याकडे खेचून घेईल, असे काहीतरी प्रादेशिक कादंबरीच्या बाबतीत होते. लक्ष वेधून घेण्यापर्यंत ठीक, पण सौंदर्याच्या स्पध्रेत तिच्याकरिता वेगळ्या कसोटय़ा असू शकत नाहीत. माझ्या कादंबऱ्यांकडे पाहताना त्या प्रादेशिक आहेत याची मी दखलही घेत नाही. मला जे जाणवते, ते सर्जनाचा विषय होण्याला पात्र आहे का? जीवनाचा किती खोलवर ठाव मी घेतो आहे? माझ्या निर्मितीत व्यापक सत्याचा अंश आहे का? मी माणसे निर्माण करतो आहे की ठोकळे? या निकषांवर माझी कादंबरी लटपटणार असेल, तर प्रादेशिकतेचं पलिस्तर तिचे संरक्षण काय करणार?’’ (प्रस्तावना-रथचक्र) श्री. ना. पेंडसेंचे हे चिंतन त्यांच्या कादंबरीकार म्हणून असणाऱ्या सजगतेचे लक्षण म्हणता येईल.
सातत्य आणि प्रयोगशीलता हे कादंबरीकार म्हणून पेंडसे यांच्या प्रकृतीचे एक वैशिष्टय़ सांगता येईल. ‘गारंबीचा बापू’ने मिळवलेला लौकिक आणि यश ओलांडून पुढे जाणे सोपे नव्हते. ती घटका यावयास पेंडसेंना तब्बल दहा वष्रे लागली. मधल्या काळात ‘हत्या’ (१९५४), ‘यशोदा’ (१९५७), ‘कलंदर’ (१९५९) या तीन कादंबऱ्या आणि ‘यशोदा’ व ‘राजेमास्तर’ ही दोन नाटके त्यांनी लिहिली. १९६२ मध्ये त्यांची ‘रथचक्र’ ही कादंबरी प्रकाशित झाली आणि कादंबरीकार म्हणून त्यांच्या यशात यानिमित्ताने मानाचा तुरा खोवला गेला. ‘रथचक्र’ला १९६३ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. (गंमत म्हणजे या कादंबरीला त्यावर्षीचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार नाकारला गेला होता.) पेंडसेंच्या या लेखनप्रवासात कुठलीही कादंबरी आधीच्या कादंबरीसारखी नाही. ‘हत्या’ आणि ‘कलंदर’ या एकाच कथानकावरील द्विखंडात्मक म्हणता येतील अशा कादंबऱ्या; पण प्रदेशाच्या आणि शैलीच्या दृष्टीने त्या सर्वस्वी वेगळ्या ठरतात. हे वेगळेपण अबाधित राखण्याचा प्रयत्न श्री. ना. पेंडसेंनी अखेपर्यंत केला.
‘रथचक्र’ला अभिजात कलाकृतीचे परिमाण प्राप्त झाले. एका सनातन, आदिम मातृप्रेरणेच्या आणि मातृधर्माच्या पाश्र्वभूमीवर ‘रथचक्र’ स्थिरावते. यातील निनावी पात्रांचा प्रयोग तर मराठी कादंबरीत अपूर्वच म्हणता येईल. ‘रथचक्र’नंतर ‘लव्हाळी’ आली आणि पेंडसेंच्या प्रतिभेचा पुन्हा नवा पलू व्यक्त झाला. आशय आणि मांडणीच्याही दृष्टीने ‘लव्हाळी’ वेगळी ठरली. ती ‘रथचक्र’पेक्षा सरस आहे, यशस्वी आहे किंवा नाही, अशाही अर्थाने ‘लव्हाळी’संबंधी विचार केला गेला. पण दुसऱ्या महायुद्धोत्तर काळातील जीवनजाणिवा, क्षुद्रत्व हा आशय घेऊन तो मांडण्यासाठी पेंडशांनी स्वीकारलेली दैनंदिनीची शैली हा अर्थपूर्ण प्रयोग होता.
‘लव्हाळी’नंतर ‘आकांत’सारखी एक सामान्य आणि पेंडसेविश्वात न शोभणारी कादंबरीही त्यांनी लिहिली. पण त्यानंतर १९८८ मध्ये १३५८ पृष्ठांची ‘तुंबाडचे खोत’ ही त्यांची द्विखंडात्मक कादंबरी प्रकाशित झाली आणि पुन्हा पेंडसेंचे नाव चच्रेत आले. पृष्ठसंख्येच्या दृष्टीने मराठीतील ही एकमेव मोठी कादंबरी होती. पण ती गुणवत्तेने मोठी होती का, हा मुद्दा मात्र उपस्थित होतो. तथापि ‘तुंबाडचे खोत’ या कादंबरीने कादंबरीचे आणि महाकाव्याचे नाते पुन्हा नव्याने प्रस्थापित करण्याचा किमान प्रयत्न केला, हेही नाकारता येत नाही.
व्यक्तीचा शोध घेणे, त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे सगळे पदर, पलू जोपर्यंत आपल्याला गवसत नाहीत, तोपर्यंत त्या व्यक्तीच्या अंतरंगात शिरण्याचा सातत्याने प्रयत्न करणे, हे पेंडसेंच्या लेखनधर्माचे एक लक्षण सांगता येईल. ‘गारंबीचा बापू’त यशोदावर अन्याय झाला म्हणून पेंडसे पुन्हा ‘यशोदे’वर लघुकादंबरी लिहितात, नाटक लिहितात. तीच गोष्ट राधेचीही. ‘गारंबीचा बापू’त भेटलेली राधा ही बरीचशी हातातून निसटून गेली, या भावनेपोटी पुन्हा ते ‘गारंबीची राधा’ ही कादंबरी लिहितात.
‘एक होती आजी’ (१९९५), ‘कामेरू’ (१९९७), ‘घागर रिकामी रे’, ‘रंगमाळी’ (२००२) आणि लोकमान्यांच्या जीवनावरील ‘हाक आभाळाची’ (२००७) या पेंडसेंनी आपल्या उत्तरायुष्यात लिहिलेल्या कादंबऱ्या. या कादंबऱ्या कलाकृती म्हणून किती यशस्वी आहेत, हा भाग अलाहिदा! पण जीवनभर कादंबरी या वाङ्मयप्रकारावर निष्ठा ठेवून केलेले सातत्यशील लेखन म्हणून त्यांच्या या लेखनाकडे पाहावे लागते.
कादंबरीलेखनासोबतच पेंडसेंनी नाटय़लेखनही भरपूर केले आहे. त्यांनी आपल्या अकरा नाटके लिहिली. त्यातील ‘राजेमास्तर’, ‘यशोदा’, ‘गारंबीचा बापू’, ‘असं झालं आणि उजाडलं’ आणि ‘रथचक्र’ ही नाटके त्यांच्याच कादंबऱ्यांवर आधारित होती. याशिवाय ‘महापूर’, ‘संभूसाच्या चाळीत’, ‘चक्रव्यूह’, ‘शोनार बांगला’, ‘पंडित! आता तरी शहाणे व्हा’, ‘डॉ. हुद्दार’ ही वेगळ्या पिढीतली नाटके. नाटककार म्हणून पेंडसेंचे यश फार मोठे नाही; तथापि ते वैशिष्टय़पूर्ण मात्र आहे.
हे एवढे सगळे लेखन करूनही पेंडसे कलावंत म्हणून आतून सतत अस्वस्थच असायचे. आपल्या लेखनप्रवासात जे आपल्याला पकडता आले नाही, मांडता आले नाही, ते पकडण्याचा, मांडण्याचा ध्यास त्यांना लागलेला होता. महानगरीय उद्योगप्रधान संस्कृतीला कवेत घेणारी एक मोठी कादंबरी त्यांना लिहायची होती. कादंबरीचे शीर्षकही त्यांनी ठरवले होते- ‘दद्दा!’ त्यांना ‘लव्हाळी’नंतर हे लेखन करायचे होते. निर्मितीप्रक्रियेच्या या प्रवासात, चिंतनात त्यांना माणसे दिसायला लागली. माणसांचे आंतरसंबंध खुणवायला लागले आणि ‘दद्दा’चा असा चिंतनाच्या पातळीवर प्रवास सुरू असताना मिनी मोडक आणि तिच्या मत्रिणीचे हॉटेलातील संवाद पेंडसेंना सुचले. त्यातून ‘ऑक्टोपस’चा जन्म झाला. पुढे दहा वर्षांनंतर ‘आकांत’चा जन्म झाला. त्याहीवेळी चिंतन ‘दद्दा’चे आणि निर्मिती ‘आकांत’ची- असा काहीसा प्रकार झाला. त्यानंतरही ‘दद्दा’चा विचार करीत असताना तो मागे पडला आणि कोकणातील चार पिढय़ांची कहाणी सांगणारी ‘तुंबाडचे खोत’ पुढे आली. थोडक्यात काय, तर पेंडसे जेव्हा जेव्हा ‘दद्दा’चा विचार करीत, तेव्हा तेव्हा हा विषय त्यांना हुलकावणी देऊन ते पुन्हा कोकणातल्या मातीत मुरलेल्या, वाढलेल्या माणसांचाच विचार करू लागत, इतकी ही नाळ घट्टपणे बांधली गेली होती. पेंडसेंच्या मनात अखेपर्यंत घर करून असलेली ‘दद्दा’ मात्र त्यांना लिहिता आली नाही. कदाचित ही कादंबरी पेंडसेविश्वातील एक महत्त्वपूर्ण कादंबरी ठरली असती.
पेंडसेंचा जन्म ५ जानेवारी १९१९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्य़ातील मुर्डी या गावी झाला. १९२४ मध्ये पेंडसे मुंबईला स्थायिक झाले ते कायमचे. वयाच्या ११ व्या वर्षांपर्यंत त्यांनी जो कोकण पाहिला होता, आपल्या मनात साठवला होता, त्यावर ते आयुष्यभर लिहीत राहिले. मग तो साकव असेल, बोंडलीची विहीर असेल, व्याघ्रेश्वराचे देऊळ असेल, किंवा नारळी-पोफळीच्या बागा असतील. त्या त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवापेक्षा त्यांच्या भावविश्वाचा अतूट भाग झालेल्या होत्या. मुंबईच्या बेस्ट कंपनीत सेवानिवृत्तीपर्यंत नोकरी करून या संस्थेच्या आत्मीयतेपोटी त्यांनी १९७२ मध्ये ‘बेस्ट उपक्रमाची कथा’ हे पुस्तकही लिहिले.
श्री. ना. पेंडसेंना त्यांच्या लेखनासाठी अनेक पुरस्कार मिळाले. त्यात महाराष्ट्र शासनाचे पाच पुरस्कार (हद्दपार, हत्या, कलंदर, संभूसाच्या चाळीत व चक्रव्यूह), साहित्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र फाऊण्डेशनचा जीवनगौरव पुरस्कार, प्रियदíशनी पुरस्कार, लाभसेटवार साहित्यसन्मान पुरस्कार, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार हे काही महत्त्वाचे पुरस्कार सांगता येतील. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या रणधुमाळीपासून मात्र ते चार हात दूरच राहिले. १९ मार्च २००७ ला त्यांची लोकमान्य टिळकांवरची ‘हाक आभाळाची’ ही कादंबरी प्रकाशित झाली आणि २२ मार्च २००७ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. हा योगायोग त्यांच्या चाहत्यांना निश्चितच अस्वस्थ करणारा असा आहे. ५ जानेवारी २०१२ पासून श्री. ना. पेंडसेंची जन्मशताब्दी सुरू झाली आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यापेक्षा त्यांनी मराठी साहित्यविश्वाला काय दिले, त्यांनी दिलेल्या कुठल्या संचिताने मराठी कादंबरी समृद्ध झाली आहे, हेच पुन्हा एकदा तपासण्याचा हा प्रयत्न!

Thursday, January 5, 2012

दहशतवाद- त्याचा उगम, वाढ आणि धर्माशी असलेली त्याची घट्ट सांगड या इतिहासाचं सखोल विश्लेषण अमेरिकन लेखिका कॅरेन आर्मस्ट्रॉंग यांनी त्यांच्या 'The Battle for God' या पुस्तकात केले आहे. धर्म, इतिहास, तत्त्वज्ञान हे अभ्यासाचे विषय असलेल्या आर्मस्ट्रॉंग यांनी इसवी सनापासून ते आजपर्यंतची इस्लाम, ख्रिश्चन आणि जुडाई (ज्यू) यातील प्रमुख धर्माची कठोर चिकित्सा अत्यंत परखड, धाडसीपणाने या पुस्तकात केली आहे. दोन हजार वर्षांच्या काळात या धर्माची पीठे असलेल्या देशांत इतर धर्मीयांना मिळालेला आश्रय वा पराकोटीचा छळ, त्यातून निर्माण झालेली द्वेषभावना, बदला घेण्याच्या वृत्तीची रुजवण, वाढ व प्रत्यक्ष कृतीची अपरिहार्यता ही प्रत्येक कालखंडातील संदर्भ देत आर्मस्ट्रॉंग यांनी विशद केली आहे.
इ.स. १४९२ हे वर्ष जगाचा इतिहास, भूगोल आणि भविष्य ठरविणारे, बदलविणारे कसे होते ही काहीजणांना माहीत नसलेली वा त्याचे महत्त्व उलगडून सांगणारी माहिती आर्मस्ट्रॉंग यांनी प्रारंभी दिली आहे. २ जानेवारी १४९२ रोजी स्पेनमधील ग्रॅनाडा शहरावर राजा फर्डिनांड आणि त्याची महाराणी इसाबेला यांनी विजय मिळविला आणि सारे शहर नवीन ख्रिश्चन धर्माच्या स्वागत कमानींनी, झेंडय़ांनी भरून गेले. लगेचच या ख्रिश्चॅनिटीच्या प्रसाराकरिता साम-दाम-दंड-भेद या साऱ्याचा अवलंब करत फर्डिनांडनी स्पेनमध्ये धुमाकूळ घातला. केवळ सात वर्षांत साऱ्या इस्लामला या देशातून हद्दपार केले आणि एकही मुसलमान रहिवासी नसलेला देश म्हणून स्पेनचे नाव इतिहासात कोरले.
त्यानंतर संपूर्ण ज्यू समाजाचे सक्तीने धर्मातर करण्याचा फर्डिनांडने सपाटा लावला. धर्मातर न केल्यास होणाऱ्या हत्येला घाबरून लाखो ज्यू देश सोडून परागंदा झाले. जे ख्रिश्चन झाले ते गुपचूप आपला मूळ धर्म पाळत नाहीत ही खात्री करण्याकरिता गुप्त पोलीस पहारा ((Inquisition) व या साऱ्यांना वेगळ्या वस्तीत बंदिस्त (GHETTO) केल्यामुळे धार्मिक असंतोषाची व त्यातून बदला घेण्याची बीजे ज्यू समाजात जास्त संघटितपणे मूळ धरू लागली. आणि तिसरी महत्त्वाची घटना म्हणजे फर्डिनांड / इसाबेलाच्या प्रोत्साहनामुळे कोलंबसाने भारताचा शोध घेण्याचा केलेला धाडसी प्रयत्न, जरी तो भारत शोधू शकला नाही तरी अमेरिकेचा शोध लावून साऱ्या युरोपात त्याने चैतन्याची, परदेशगमनाची व नवनवीन प्रदेश जिंकण्याची विजिगीषु वृत्ती फुलविली. सारा युरोप नव्या आधुनिक युगात प्रवेश करता झाला. जगाचे कानेकोपरे, नवप्रदेश आपल्या पंखाखाली घेण्याच्या त्याच्या इच्छा जास्त प्रबळ होऊ लागल्या.
त्यानंतर ब्रिटिश, फ्रेंच, डच, पोर्तुगीजांनी अनेक देशांवर आक्रमणे करून आपल्या वसाहती, अधिकार प्रस्थापित केले, धर्मातरे केली आणि पूर्वीच्या शांततेला सुरूंग लावण्याच्या वाती जगभर हळूहळू पेटू लागल्या. त्या काळी ख्रिश्चन धर्माच्या आधिपत्याखाली असलेला स्पेन हा युरोपातील प्रबळ व आधुनिक राहणीने प्रगत असलेला देश, पण त्याची दुसरी काळी बाजू म्हणजे मुस्लीम आणि ज्यू समाजाला त्याने दिलेले परागंदेपण. धर्माच्या नावाखाली अधर्माची, अमानवी आचरणे म्हणजे इतरांनाही तसं वागण्याची दिलेली मुभा, जी यापुढे या तीनही धर्मामधून एकमेकांवर कुरघोडी करत आजपर्यंत वाढतीच राहिली आहे. एक लाख तीस हजार ज्यू स्पेनमधून स्वत:ची घरेदारे, जमीनजुमला सोडून भयाने देशांतर करते झाले. त्याचा सल आज जगभराच्या ज्यूंना सलतो आहे आणि त्याच न्यायाने लाखो अरबांना पॅलेस्टाईनमधून ज्यूंच्या हल्ल्यांमुळे स्वत:च्या भूमीवर पाणी सोडून निर्वासित व्हावे लागते आहे हे साऱ्या अरब देशांना खुपते आहे.
स्पेनमधून ज्यूंबरोबरच देशोधडीला लागलेल्या धार्मिक समाज (धर्म) म्हणजे इस्लाम. युरोपात मुसलमानांचे अस्तित्व शून्य झाले असताना तोच इस्लाम तीन राजघराण्यांच्या साम्राज्य उभारणीने सोळाव्या शतकात जगाच्या इतर भागांत एक प्रभावी शक्ती म्हणून उभा राहिला. आशिया खंड अनतोलीया, इराक, सिरीया आणि उत्तर आफ्रिकेत आरोमन घराणी, इराणमधील सफावैद आणि भारत व उपखंडातील मोंगल घराणी यांनी अनेक शतके त्या देशांवर आपली अधिसत्ता संस्कृती गाजविली. इस्लामी धार्मिकतेची विविध रूपे या देशांमधून या राजकारण्यांनी रुजविली. जेव्हा इजिप्त १५१७ मध्ये आटोमन साम्राज्याचा एक भाग झाले तेव्हा विद्यापीठ महाविद्यालये सांस्कृतिक सुबत्तेने ते परिपूर्ण होत गेले. सिरीयातील दमास्कस म्हणजे अनेकांची स्वप्ननगरी होती. इतके ते संपत्ती विद्येने दुथडी भरून वाहत होते.
पण फ्रेंच, इंग्लिश यांच्या आधुनिक विचारचातुर्यापुढे मुस्लीम कमी पडले आणि पुढील काळात पुन्हा युरोपियन ख्रिश्चनांचा वरचष्मा या साम्राज्यांना ग्रासू लागला. भारतात ब्रिटिश आले आणि फ्रेंचांनीही आपल्या वसाहती वाढविण्यास सुरुवात केली.
विसाव्या शतकात या साऱ्या तीन धार्मिक सत्तांनी एकमेकांवरील कुरघोडीमुळे जगाचे स्वास्थ्य बिघडवून टाकले. प्रचंड दहशत आणि नरसंहार (नाझींनी ज्यू वंश संपविण्याकरिता केलेली साठ लाखांची हत्या) तर ज्यूंनी अरबांवर चालविलेले तेवढेच जबरी हल्ले, बोस्नियामध्ये मुसलमानांचे झालेले शिरकाण आणि अगदी अलीकडे (ख्रिश्चन) अमेरिकेचे मुसलमानांनी उद्ध्वस्त केलेले ट्विन टॉवर्स, या साऱ्यामुळे सारी आयुष्येच अर्थहीन झाली आहेत. नित्शेनी म्हटल्याप्रमाणे भयग्रस्तता, अशांती आणि जीवन व्यर्थ गेल्याची सततची जाणीव ही आधुनिकतेच्या मागेमागे धावण्याची फळे होती. आज सारे जग ती भोगते आहे. कॅरेन आर्मस्ट्रॉंग यांनी आपल्या या पुस्तकातील पहिल्या दोनशे पानांमधून या धार्मिकतेच्या देवाच्या सुंदर कल्पनेतून साकारलेल्या आणि नंतर आधुनिकतेच्या आहारी गेलेल्या या तीन प्रमुख धर्माच्या वाताहती, देवाचे दैत्यांत परिवर्तित केलेल्या त्यांच्या धर्ममरतडांचे उघडेनागडे रूप आपल्यापुढे मांडले आहे आणि त्यानंतरच्या शंभर-सव्वाशे पानांमधून त्यांनीच जन्माला घातलेल्या मूलतत्त्ववाद, अतिरेकी दहशतवाद याची गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
देवाकरिता सुरू केलेले युद्ध (The Battle for God)  यातील वरची दोन प्रकरणे म्हणजे (साऱ्यांचाच झालेला) पराभव- Defeat  आणि अगदी शेवटी पुढे काय- Afterward या समारोपानी कॅरेन आर्मस्ट्रॉंग यांनी धर्माबाबतीत जास्त संवेदनशील, आग्रही आणि त्यामुळे पराकोटीच्या असहिष्णू झालेल्या साऱ्यांना हा
इतिहास तपासा, हा धार्मिक उन्माद असला तरी समजून घ्या, असे आवाहन केले आहे. त्यांच्याच भाषेत- ११ सप्टेंबर रोजी अमेरिकेवर झालेला हल्ला हा अणुबॉम्बचा नव्हता तर जहाल आतंकवाद्यांनी साधलेली अघोरी दुष्टाव्याची प्रतिक्रिया होती. त्याचा सुगावा कुणालाच लागला नाही. आपल्या कट्टर धार्मिक श्रद्धेला कोणी तरी डिवचल्याची ती परतफेड होती. ही सारी त्या (अदृश्य) देवाकरितांची लढाई खेळताना आतंकवाद्यांना आम्ही गैर काहीच करत नाही, असेच वाटत होते व आहे. फक्त आमच्या देवाकरिता- धर्माकरिता लढतो आहोत-The Battle for God . दुसऱ्या कोणत्याही देवाची, त्याच्या तत्त्वज्ञानाची सावलीही आम्ही आमच्या देवावर पडू देणार नाही एवढीच काळजी घेतो आहोत. आम्ही जगणार आणि मरणार ते केवळ आमच्या देवाकरिता. धार्मिक सोशिकता, सामंजस्य सारे बकवास आहे, ही आमच्या धर्मगुरूंची (?) शिकवण हाच आमचा आमच्या देवाकरिता लढण्याचा मूलमंत्र आहे.
सारे पुस्तक वाचून झाल्यावर वाटते-आकंठ धर्म, धार्मिक अस्मिता आणि कर्मकांडात बुडालेला समाज अशा विचारप्रवर्तक पुस्तकांनी बदलेल? देवाधर्माचे प्रस्थ, त्याच्या नावाखाली होणाऱ्या अतिरेकी हत्या, युद्धे थांबतील? याचे उत्तर पूर्ण नकारार्थी जरी गृहीत धरले तरी समाजाला या साऱ्या गदारोळापासून सावरायला, संवेदनशील, सहिष्णु करायला अशा वाचनविचाराची निश्चित गरज आहे. कॅरेन आर्मस्ट्रॉंग या महिलेने या विषयाला तळमळीने व असीम धैर्याने हात घातला आहे.

-कुमार नवाथे ,लोकसत्ता ग्रंथविश्व
kumar.nawathe@hotmail.com 

द बॅटल फॉर गॉड :
(ए हिस्ट्री ऑफ फंडामेंटलिझम)
लेखक- कॅरेन आर्मस्ट्रॉंग
प्रकाशक- द रॅंडम हाऊस
पृष्ठे ३७१, मूल्य- १५ डॉलर.

इंग्लिश भाषेतील हे पुस्तक विकत घेण्यासाटी येथे click  करा!

The Battle For God: A History Of Fundamentalism

Blending history, sociology, and spirituality, The Battle for God is a compelling and compassionate study of a radical form of religious expression that is critically shaping the course of world history.

About The Author:
Karen Armstrong is the author of numerous books on religious affairs including A History of God, The Battle for God, Holy War, Islam, Buddha, The Great Transformation, and The Case for God and two memoirs, Through the Narrow Gate and The Spiral Staircase. Her work has been translated into forty-five languages. In February 2008 she was awarded the TED Prize and began working on the Charter for Compassion, created online by the general public and crafted by leading thinkers in Judaism, Christianity, Islam, Hinduism, and Buddhism. The charter was signed in November 2009 by a thousand religious and secular leaders. She lives in London.

The Battle For God: A History Of Fundamentalism 

Author: Karen Armstrong

Publisher: Random House Publishing Group 

For Free home delivery ,Click here to purchase this book (English Language). 

Related Posts Plugin for WordPress, Blogger...