Wednesday, January 25, 2012

पॅरिसच्या मोंमार्त् या उपनगरासारख्या भागात अनेक कलावंत राहात. त्यांच्या जीवनकहाण्या समजून घेताना कलेची ओळख व्हावी, किंवा उलटपक्षी, त्यांच्या कलेकडे साकल्याने पाहताना त्यांची जीवनचरित्रे समजावीत, असे त्या कलावंतांचे जगणे. म्हणजे यापैकी एखाद्या कलाकाराचा जीवनप्रवास समजून घेतला आणि त्याचे मनोव्यापार कसे होते याचा सुगावा घेतला, तरी त्याच्या कलेकडे पाहण्याची दृष्टी तयार होणारच, याची खात्री बाळगायला हरकत नाही. या खात्रीचे थेट प्रत्यंतर वाचकाला ‘मूलाँ रूज’ ही तुलूज लोत्रेक या चित्रकाराच्या जीवनावरील कादंबरी वाचताना येते.
मराठीजनांच्या चित्रकलाप्रेमाची राजधानी कोल्हापूर असेल, तर पॅरिस ही जगातल्या चित्रकलाप्रेमींची राजधानी म्हटली पाहिजे. विशेषत: विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जागतिक चित्रकलेवर अधिराज्य असलेल्या या कलानगरीने आज मात्र त्याकाळच्या जिवंत कलेतिहासाच्या राजधानीचे स्वरूप घेतले आहे. पॅरिसच्या मोंमार्त् या उपनगरासारख्या भागात अनेक कलावंत राहात. त्यांच्या जीवनकहाण्या समजून घेताना कलेची ओळख व्हावी, किंवा उलटपक्षी, त्यांच्या कलेकडे साकल्याने पाहताना त्यांची जीवनचरित्रे समजावीत, असे त्या कलावंतांचे जगणे. म्हणजे यापैकी एखाद्या कलाकाराचा जीवनप्रवास समजून घेतला आणि त्याचे मनोव्यापार कसे होते याचा सुगावा घेतला, तरी त्याच्या कलेकडे पाहण्याची दृष्टी तयार होणारच, याची खात्री बाळगायला हरकत नाही.
या खात्रीचे थेट प्रत्यंतर वाचकाला ‘मूलाँ रूज’ ही तुलूज लोत्रेक या चित्रकाराच्या जीवनावरील कादंबरी वाचताना येते. आपल्याला तुलूज लोत्रेकची चित्रे माहीत असतीलच असे नाही. किंवा ती चित्रे पाहिली तरीही हे असेच का आहे, इतक्या भगभगीत रंगांत वा घाईने केल्यासारखे का रंगवले आहे, असे प्रश्नही आपल्याला पडू शकतात. अज्ञानाचे काही हक्क असतात, त्यातला हा. पण या अज्ञान-प्रदेशातून कुणीतरी आपल्याला तुलूज लोत्रेकच्या जन्मगावी नेते आहे, त्याला पॅरिसलाच का जावेसे वाटले याची चाहूल देऊन न थांबता पॅरिसमध्ये त्याच्या काळात नेते आहे, हे लक्षात आल्यावर आपणही- या चित्रकाराला लहानपणीचा आजार झाल्यावर त्याची वाढ कशी खुरटली आणि तो ठेंगू, कुरूप कसा राहिला, त्याचे रूप स्त्रीआसक्तीच्या आड कसे येत गेले, आणि त्याने केलेले प्रेम विफल कसे झाले, मग तो ‘अ‍ॅब्सिंथ’ नामक घातक दारूच्या व्यसनात कसा बुडाला, असायलममधून बरा होऊन परतल्यावरही दारू जवळ केल्याने अल्पायुषी कसा ठरला.. याची गोष्ट आवडीने वाचू शकतो.
मात्र, हा अल्पायुषी शोकनायक एक चित्रकार आहे. त्याचे संदर्भ आपल्या माहितीपेक्षा कदाचित निराळेही आहेत. विख्यात चित्रकार व्हॅन गॉग हा त्याचा सहप्रवासी; तर एदगर देगा, कामिय् पिसारो आणि पॉल गोगँ हे ज्येष्ठ समकालीन. त्यावेळचे अनेक बिगरविख्यात चित्रकार, कॅफेतल्या त्यांच्या चकाटय़ांचे विषय, त्यांच्या फ्रेंच आसक्तीला मिळालेली मॉडर्न कलेने दिलेल्या नव्या स्वातंत्र्यभानाची जोड.. अशा तपशिलांचा अड्डा ही कादंबरी जमवते. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनि’ अशी तुतारी फुंकून अखेर इम्प्रेशनिझमच कुरवाळत बसणारे हे बाकीचे बिगरविख्यात नवचित्रकार खंगले कसे, आणि तुलूज लोत्रेकला (पैशाची चणचण नसल्याने असेल, पण) मुद्राचित्रणासारखे नवे तंत्र शिकण्याची आणि ते काही दिवस हाताळल्यानंतर रंगचित्राइतक्याच ऐवजाचे मुद्राचित्र तयार करण्याची संधी त्याच्या आयुष्यातील घटनाक्रमाने कशी दिली,  ती त्याने कशी घेतली, आणि पुढे तो मोठा मुद्राचित्रकार कसा झाला, याचीही उत्तरे ही कादंबरी देते.
लोत्रेकची आठ चित्रे या कादंबरीत रंगीत प्लेट घालून छापली आहेत. प्रत्येक प्लेटमागे त्या चित्राचे थोडक्यात वर्णन आहे. या साऱ्या मेहनतीचे श्रेय अनुवादकाच्या प्रयत्नांना जाते! हे मराठीतले वर्णन मराठी ‘वाचकां’च्या कलाभानाला साजेल असे आहे. चित्रकार वा चित्रे माहीत असलेले ‘प्रेक्षक’देखील इतक्या सुगम भाषेत चित्रांबद्दलचे नवे तपशील मराठीत आले म्हणून सुखावतील! चरित्र वाचून चित्र कळण्याची शक्यता लोत्रेकबद्दल होतीच; पण ही चित्रे अनुभवात भर घालतात.
मूळ कादंबरीकाराने- पिएर ल मूर यांनी कादंबरीत लोत्रेकच्या ज्या-ज्या चित्रांचे उल्लेख आले आहेत, ती कुठकुठल्या संग्रहालयांत आहेत, याबद्दलच्या तळटीपा दिल्या होत्या. पण मूळ पुस्तक आहे १९५० सालचे. अनुवादकाने या तळटीप-संदर्भाचा फेरआढावा घेऊन, आज (एकविसाव्या शतकात) ती चित्रे जिथे आहेत, त्यांचे संदर्भ दिले आहेत. मराठीत हे ताजे संदर्भ तळटीपेत न ठेवता मजकुराच्या मध्येच येतात, त्यामुळे ते वाचकाच्या नजरेआड होत नाहीत.
पिएर ल मूर यांनीही ही कादंबरी केवळ चित्रकाराच्या जीवनकार्याची ओळख करून देणारी न ठेवता ती रंजक केली होती. पॅरिसला आयफेल टॉवर उभा राहत होता त्यावेळचे वर्णन, संवादांवर भर आणि हेन्री द तुलूज लोत्रेक या शोकनायकाची चित्रे तरुणपणीच लूव्र संग्रहालयाने घेतल्याच्या प्रसंगाशी दु:खद  घटनेचाही चटका- अशी तिची मूळ रचना आहे. मराठीत ती आणताना संवादभाषेत वैविध्य आणण्याचा अनुवादकाचा प्रयत्न यशस्वी म्हणावा असा आहे.
या पुस्तकातील चित्रांपैकी पहिले चित्र आहे हेन्री द तुलूज लोत्रेक यांच्या आईचे. आईच हेन्रीचा आधार होती. अख्खे बालपण तिच्यावर विसंबणे, तिनेही  उमराव घराण्यातली असूनही आजारी मुलाची शुश्रूषा स्वत: करणे, हेन्री  शिकू इच्छितो आहे, मोठा होतो आहे म्हणून तिनेच त्याची केलेली पाठराखण, पुढे एका नववर्षरात्री माय-लेकरांना आपले जीवनमार्ग निरनिराळे असल्याची जाणीव होणे.. या प्रसंगांतून कादंबरीभर आई आणि तिचा कलावंत मुलगा यांच्या नात्याचे पदर दिसतात. जीवनदर्शनाची ही एकमेव लेखकीय संधी कादंबरीकाराला होती असेही जाणवते; कारण बाकीची पात्रे इतिहासात जे घडले, त्याबाहेर फार कमी बोलतात, वागतात.
या कादंबरीतून अभ्यास आणि लालित्य यांचा जो गोफ पिएर ल मूर यांनी विणला होता, तो याच कादंबरीवर सही सही बेतलेल्या आणि त्याच नावाच्या चित्रपटामध्येही दिसला असेलच असे नाही. पण भाषांतरात मात्र हे अभ्यासू लालित्य प्रकटले आहे. कारण अनुवादकानेही अभ्यास आणि लालित्य यांच्या मार्गावर अनुगमन केले आहे!
-विबुधप्रिया दास


मूलाँ रूज

मूळ लेखक- पिएर ल मूर,
स्वैर रूपांतर- जयंत गुणे, 
लोकवाङमय गृह प्रकाशन,
पृष्ठे : ३२४, मूल्य : ३०० रुपये.

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...