Sunday, February 5, 2012

सुरेश चांदवणकर
‘गॅलिलिओ गॅलिली’ (१५६४-१६४२) हे नाव घेतलं की अनेकांना पिसाचा झुकता मनोरा व तिथल्या चर्चमध्ये झुलणाऱ्या दिव्यावरून त्याला सुचलेली लंबकाची संकल्पना पटदिशी आठवेल. सत्तरच्या दशकात जे विज्ञानात पदवी परीक्षेचा अभ्यास करत होते त्यांना ‘लाइफ ऑफ गॅलिलिओ’ हे बरटॉल्ट ब्रेख्तचं अवांतर वाचनासाठी पण लेखी परीक्षेकरिता नेमलेलं नाटक आठवेल. आज इंटरनेटच्या माध्यमातून त्याच्या कामाविषयी पुष्कळ माहिती शेकडो पानांमध्ये साठवून ठेवलेली वाचावयास मिळते. मात्र त्याच्या कुटुंबाविषयी फारच थोडी माहिती आढळते. देवा सोबल (kDeva Sobel) यांच्या ‘गॅलिलिओज् डॉटर’ या पुस्तकाने ही उणीव काहीशी भरून काढली आहे. त्या पत्रकार असून त्यांची पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अक्षांश-रेखांशांची कल्पना मांडणारा जॉन हॅरिसन, सूर्य व पृथ्वीच्या स्थानांवरून व गतीबाबत धर्मपीठांशी संघर्ष ओढवून घेणारे कोपíनकस व गॅलिलिओ हे त्यांच्या खास अभ्यासाचे विषय असून लिखाणाचा बाज हा रसाळपणे गोष्टी सांगण्याचा असल्याने वाचकाला बांधून ठेवतो.
प्रस्तुत पुस्तकात गॅलिलिओच्या कौटुंबिक जीवनाची माहिती मिळते. मरिना गांबा या व्हेनिसच्या सुंदर तरुणीबरोबरच्या विवाहबाहय़ संबंधांतून १६०० ते १६०६ या काळात त्यांना तीन मुलं झाली. मोठय़ा दोन मुली (व्हर्जििनया व लिव्हिया) व व्हिन्सेनझियो हा मुलगा. तोवर त्याच्या वयाची चाळिशी उलटून गेलेली होती. मुलं लहान असतानाच मरिना गांबा मरण पावली. १९२० च्या आसपास ग्रँड डय़ूकच्या मत्रीतून त्यानं मुलाचा बाप्तिस्मा करवून घेतला. मुलगा त्याच्या कुटुंबाबरोबर अखेपर्यंत गॅलिलिओबरोबरच राहिला. मात्र दोन मुलींच्या समाजमान्यतेविषयी शंका असल्यानं व काहीशा असुरक्षिततेच्या भावनेतून गॅलिलिओनं दोन्ही मुलींना १०-१२ वर्षांच्या असतानाच जोगतिणी (Nuns) बनवायचं ठरवलं. त्यासाठी पण त्याला बडय़ा लोकांच्या ओळखीचा आधार घ्यावा लागला होता. फ्लॉरेन्समधल्या कॉन्व्हेंटमध्ये दाखल करताना थोरल्या व्हर्जििनयाचं नाव बदलून Suor(सिस्टर)Maria Celeste Galile असं ठेवण्यात आलं. ती १९३४ मध्ये अवघ्या ३४ व्या वर्षी मरण पावली. कॉन्व्हेंटच्या बाहेरपण फारशी कधी पडली नाही. वडील कधीतरी येऊन भेटत. त्यांचं काम, राजघराण्याशी असलेली त्यांची मत्री व रोमच्या धर्मपीठानं दिलेली शिक्षा याविषयी ऐकीव माहितीच तिच्यापर्यंत पोहोचत असे. मात्र बापलेकीत नियमित पत्रव्यवहार होत असे. लेकीनं लिहिलेली १२४ पत्रं गॅलिलिओच्या जपून ठेवलेल्या कागदपत्रांतून अभ्यासकांच्या हाती लागली. मात्र बापानं लेकीला लिहिलेली पत्रं कॉन्व्हेंटच्या प्रमुख जोगतिणीनं जाळून टाकली. कारण गॅलिलिओ हा चर्चनं ठोठावलेली शिक्षा भोगणारा गुन्हेगार असल्यानं त्याची पत्रं सांभाळणं धोक्याचं ठरणारं होतं. त्यामुळं बापानं लिखाणातून व्यक्त केलेल्या भावना फारशा प्रकाशात आलेल्या नाहीत. पण इतरांशी केलेल्या पत्रव्यवहारातून ही मुलगी त्याची सर्वात लाडकी होती असं दिसतं.
१९२४ ते १९३४ या १० वर्षांत ही पत्रं लिहिलेली असून मूळ इटालियन भाषेतली ही पत्रं लेखिकेनं इंग्रजीत रूपांतरित केलेली आहेत. मोठी मुलगी या नात्यानं आईच्या पश्चात वडिलांचं खाणंपिणं, कपडे, औषधं व भावनिक आधार याबाबत तिची जागरूकता या पत्रांतून पानोपानी जाणवते. या लिखाणाभोवतीच लेखिकेने या अनोख्या पिता-पुत्रीची कहाणी लिहिलेली आहे. यानिमित्ताने गॅलिलिओचं चरित्र, तत्कालीन रोमन साम्राज्यातल्या राजसत्ता व धर्मपीठ यांचे नातेसंबंध व वैज्ञानिकांची झालेली ससेहोलपट या गोष्टींचा आढावा घेण्यात आलेला आहे.
एकूण सहा विभागांत व तेहतीस प्रकरणांत या ४०० पानी पुस्तकाची रचना केलेली असून रोमन काळातली रेखाचित्रं, नकाशे, शिल्पं इ.चा कल्पक वापर केलेला आढळतो. शेवटी काळानुसार महत्त्वाच्या नोंदी केलेल्या आहेत. त्या यादीवरून एक नजर टाकली तरी एक मोठा कालखंड डोळय़ांसमोरून जातो. उदा. कोपíनकसनं(१४७३-१५४३)सूर्य हा केंद्रस्थानी असून पृथ्वी त्याच्या भोवती फिरते, असं आयुष्याच्या अखेरीस लिहून प्रसिद्ध केलं. त्यानंतर २१ वर्षांनी गॅलिलिओ जन्माला आला.१६०० साली कोपíनकसच्या पुढे जाऊन ब्रुनोनं (Bruno) सूर्य हा स्वयंप्रकाशित तारा आहे असं मांडलं. या प्रमादाबद्दल शिक्षा म्हणून रोमच्या धर्मपीठानं त्याला जिवंत जाळून मारलं. अशा दहशतीच्या वातावरणात काम करायचं आहे याचं भान गॅलिलिओला होतं. त्यामुळेच अतिशय सावधपणे राजसत्तेशी मत्री करून व धर्मसत्तेशी जुळवून घ्यायचं धोरण त्यानं अंगीकारलं होतं. याची अनेक उदाहरणं या पुस्तकात आढळतात. ग्रहगोलांची स्थानं व भ्रमणावरचं कोपíनकसचं काम पुढ नेत असताना गॅलिलिओचं इतर अनेक विषयातलं स्वतचं काम व अध्यापनाबरोबरच पुस्तकं लिहिणं पण चालूच होतं.
स्वत: सश्रद्ध असूनही दुर्बणिीतून दिसणाऱ्या निराळय़ाच विश्वाचं दर्शन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावं, अशी कळकळ त्याला होती. त्यामुळेच ‘दि डायलॉग’ हे संवादात्मक पुस्तक त्यानं लिहिलं व धर्मपीठाच्या परवानगीनंच १६३२ मध्ये प्रसिद्ध केलं. यात तीन मित्रांनी टोलेमी, कोपíनकस व गॅलिलिओच्या सिद्धांतांवरती गप्पा मारलेल्या आहेत. तेसुद्धा या तिघांची नावं न येऊ देता. त्याची भाषा ही अभिजनांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत कुणालाही समजेल अशीच आहे. त्यामुळेच त्यावर गदारोळ उठला. पुढच्याच वर्षी चौकशी होऊन त्यावर बंदी घालण्यात आली. त्या चौकशी समितीसमोर झालेली मूळ प्रश्नोत्तरं पुस्तकात दिलेली असून ती मुळातूनच वाचावीत अशीच आहेत. १९३३ मध्ये शिक्षा म्हणून चर्चची जाहीर माफी मागावी लागली व एकांतवासाला सुरुवात झाली. पण तोवर पुस्तकाच्या काही प्रती व इतर हस्तलिखितं गुपचूप युरोपातल्या इतर देशांत जाऊन पोहोचली होती. १९३४ साली त्याची मुलगी सिस्टर सेलेस्ते मरण पावली. पण या सगळय़ा मन:स्तापाच्या काळात तिची पत्रं हाच मोठा दिलासा गॅलिलिओला होता.सुमारे ८० वर्षांच्या आयुष्यात गॅलिलिओनं इटलीतल्या पिसा, रोम व फ्लॉरेन्स शहरांमध्येच काम केलं. त्याच्या आयुष्यात त्यानं केलेल्या कामाला मान्यता मिळाल्याचं त्याला पाहायला मिळालं नाही. पण त्याच्या पुस्तकांच्या माध्यमातनं हे काम इतरत्र पसरलं व आधुनिक ‘विज्ञानाचा जनक’ अशी कीर्ती त्याला मरणानंतर लाभली. त्याचा पट्टशिष्य टॉरिसेली यानं या कामी बराच पुढाकार घेतला. ते काम व्हिन्सेंझो व्हिव्हियानी (१६२२-१७०३) या आणखी एका शिष्यानं पुढं चालवलं. १६४२ मध्ये निधन पावलेल्या गॅलिलिओचं शव त्याच्या इच्छेप्रमाणं त्याच्या कुटुंबीयांच्या दफनभूमीत पुरण्यात आलेलं होतं. ते नव्या जागी सन्मानानं भव्य स्मारकात हलवलं जावं, याकरिता व्हिव्हियानीनं आयुष्यभर अयशस्वी खटपट केली. तो गेल्यावर त्याची शवपेटिका त्याच्या इच्छेप्रमाणं गुरू गॅलिलिओच्या शवपेटीवर पुरण्यात आली. पुढं अनेकांच्या प्रयत्नांना यश येऊन गॅलिलिओचं शव १७३७ मध्ये खास तयार केलेल्या स्थळी समारंभपूर्वक हलवण्यात आलं. त्यावेळच्या उत्खननात गॅलिलिओच्या शवपेटीखाली आणखी एक शवपेटी आढळली. ती पेटी पण सन्मानपूर्वक नव्या ठिकाणी हलवण्यात आली. आजही ती तिथं आहे पण तिच्यावर "Suor Maria Celeste Galilei" या नावाची पाटी मात्र नाही. १८३५ मध्ये त्याच्या ‘दि डायलॉग’ हय़ा पुस्तकावरची बंदी मागं घेण्यात आली. १९३५ मध्ये पोपच्या हस्ते व्हॅटिकन वेधशाळेचं (ऑब्झर्वेटरी) उद्घाटन झालं. त्यानं मांडलेले सिद्धांत व केलेली अनेक भाकितं आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर खरी उतरलेली आहेत. प्रस्तुत पुस्तकानं अनेक पारितोषिकं मिळवली. ते वाचून अलीकडेच खगोलशास्त्रांनी ‘शुक्रा’वरील एका विवराला (क्रेटरला) Suor Maria Celeste हे नाव दिलेलं आहे.


सौजन्य:लोकसत्ता

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...