Saturday, February 25, 2012


फ्रान्समध्ये शिकलेले इराणी लेखक सादिक हिदायत यांच्यावर काफ्काचे संस्कार होतेच. काफ्काच्या साहित्यातली दु:स्वप्नसृष्टी हिदायतच्याही लेखनात- आणि विशेषत:
‘द ब्लाइंड आऊल’ या कादंबरीत ठळकपणे आढळते. १९३७ साली प्रकाशित झालेली ही कादंबरी आधुनिक फारसी कादंबरीचा मानदंड समजली जाते. आधुनिकतावादी इराणी कादंबरीची खरी सुरुवातही
‘द ब्लाइंड आऊल’पासूनच झाली.
काही पुस्तकं वाचताना गुंतवून ठेवतात. स्थळ-काळाचं भान नाहीसं करतात. आपण त्यांच्या संपर्कात असेपर्यंत इतर कसलाही विचार करू शकत नाही. इतर कुठल्याही गोष्टीत गुंतू शकत नाही. मात्र, वाचन संपलं की त्यांचा अंमल ओसरायला सुरुवात होते. त्यांनी दिलेल्या आनंदाची फिकट चव शिल्लक उरते. तीही काही दिवसांनी विरून जाते. ती पुस्तकं इतर पुस्तकांच्या मांडीला मांडी लावून आपल्या संग्रहात बसून राहतात. पण त्यांना पुन्हा उचलायची इच्छा होत नाही. कालांतरानं ती आपल्या संग्रहातून हद्दपार होतात.
काही पुस्तकांचा प्रकार वेगळा असतो. ती वाचताना गुंतवून ठेवतातच असं नाही. उलट, त्यांचं वाचन ही त्रासदायक प्रक्रिया असते. त्यातून जाताना आपण सतत बेचन असतो. आपण वाचन अध्र्यावर थांबवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, ते शक्य नाही, हे लक्षात येतं. आपण पुस्तकाच्या पुरते कब्जात गेलेले असतो. आता ते नेईल तिथे जाण्यावाचून पर्याय नसतो. ही पुस्तकं वाचून झाल्यावर खऱ्या अर्थानं सुरू होतात. ती आपल्या जगण्यात रुजतात. वाढतात. बहरतात. त्यांची सावली कायम आपली सोबत करते. अशा पुस्तकांनाच ‘अभिजात’ हे विशेषण लावता येतं.
सादिक हिदायत (Sadegh Hedayat) या इराणी लेखकाची ‘द ब्लाइंड आऊल’ (The blind Owl) ही या प्रकारात मोडणारी कादंबरी. १९३७ साली प्रकाशित झालेली ही कादंबरी आधुनिक फारसी (Persian) कादंबरीचा मानदंड समजली जाते. इराणी कादंबरीची खरी सुरुवातही ‘द ब्लाइंड आऊल’पासूनच झाली. तोपर्यंत इराणमध्ये केवळ मनोरंजक आणि ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या जात होत्या. आपल्याकडच्या नाथमाधव किंवा दातारशास्त्रींप्रमाणे! ‘द ब्लाइंड आऊल’नं इराणी वाचकाला खडबडून जागं केलं. त्याला पहिल्यांदा कादंबरी या वाङ्मयप्रकाराच्या ताकदीची कल्पना आली. इराणमधील रझा राजवटीत लिहिल्या गेलेल्या या कादंबरीवर तिथे अगदी काल-परवापर्यंत बंदी होती. आता मात्र ही कादंबरी नवइराणी साहित्याचा मानदंड समजली जाते.
या कादंबरीची संहिता दोन भागांमध्ये विभागलेली आहे. पहिल्या भागाचा निवेदक एक चित्रकार आहे. तो पेनच्या आवरणांवर चित्रं काढत असतो. हे चित्र कायम एकच असतं. एक दाढीवाला भारतीय पोशाखातला म्हातारा झाडाखाली उभा. त्याच्यासमोर उभ्या असलेल्या तरुणीला तो तोंडावर बोट ठेवून गप्प राहण्याची खूण करतो आहे. चित्रकाराला हे चित्र वारंवार स्वप्नात दिसतं. झपाटून टाकतं. मात्र, त्याचा अर्थ कळत नाही. एक दिवस चित्रातली तरुणी थेट त्याच्या दारातच अवतरते. तो तिला घरात घेतो. घरात तिचा गूढ मृत्यू होतो. त्यानं तो बावचळून जातो. मात्र, त्याला तिचं चित्र काढण्याचा मोह आवरत नाही. त्यानं चित्र काढायला सुरुवात केल्यावर ती जिवंत झाल्यासारखी डोळे उघडते आणि पुन्हा प्राण सोडते. तो तिच्या प्रेताचे तुकडे करून ट्रंकेत भरतो आणि दफन करण्यासाठी कब्रस्तानात नेतो. तिथला म्हातारा रखवालदार दफनासाठी खड्डा खणतो. त्यात एक प्राचीन सुरई सापडते. तिच्यावरचं चित्र नायक पेनच्या आवरणावर काढत असलेल्या चित्रासारखंच असतं. म्हातारा ती सुरई नायकाला भेट देऊन टाकतो. नायक घरी येतो. त्या रहस्यमय तरुणीची आठवण त्याला बेचैन करत राहते. ती विसरण्यासाठी तो भरपूर अफू घेतो आणि बेशुद्ध पडतो. कादंबरीचा पहिला भाग इथे संपतो. दुसऱ्या भागात नायक शुद्धीवर येतो, तो एका वेगळ्याच विश्वात.
इथे तो चित्रकार नसून लेखक आहे. त्याचं लग्न झालेलं आहे आणि बायको आपल्याशी प्रतारणा करत असल्याच्या संशयावरून हय़ानं तिचा खून केलेला आहे. तो शुद्धीवर येतो तेव्हा त्याचे हात रक्तानं माखलेले असतात आणि आतल्या खोलीत बायकोचं प्रेत पडलेलं असतं. त्याच्या घराबाहेर बसलेला भिकारी अगदी पहिल्या भागातल्या म्हाताऱ्याची आठवण करून देणारा. कादंबरीत यापुढे अनेक उपाख्यानं एकमेकांत गुंतून येतात. शेवटी नायक आरशात बघतो तेव्हा आपला चेहरा अगदी त्या म्हाताऱ्यासारखाच झाला आहे असं त्याला वाटतं.
अत्यंत गुंतागुंतीची संरचना असलेल्या या कादंबरीचा हा केवळ ढोबळ आराखडा. तिचं खरं रूप वर्णन करणं जवळजवळ अशक्य आहे. स्वप्न आणि भास यांच्या संधिप्रकाशातलं निवेदन, निवेदकाची अविश्वसनीयता, दोन्ही भागांचीप्रतिबिंबासारखी  रचना आणि संपूर्ण कादंबरीत पसरलेलं पलूदार प्रतिमांचं जाळं.. या सगळ्यांमुळे ही कादंबरी वाचकाला सतत सतर्क राहायला भाग पाडते. काही प्रतिमा आणि पात्रं दोन्ही भागांत वेगवेगळ्या रूपांत येतात. म्हातारा पहिल्या भागात स्मशानाचा रखवालदार असतो. त्याच भागात आधी आलेलं लेखकाच्या काकांचं वर्णनही याच म्हाताऱ्याशी जुळणारं, तर दुसऱ्या भागात हाच म्हातारा निवेदकाच्या घरासमोर भीक मागताना दिसतो. पहिल्या भागात नायक पेनवर काढत असलेलं चित्र त्याला स्वप्नात दिसतं. त्यातला म्हाताराही याच प्रकारचा. पहिल्या भागातली गूढ तरुणी आणि दुसऱ्या भागातली लेखकाची बायको यासुद्धा अशा एकमेकींच्या प्रतिबिंबा सारख्या. पहिल्या भागात म्हाताऱ्यानं नायकाला दिलेली सुरई आणि दुसऱ्या भागातल्या म्हाताऱ्या भिकाऱ्यानं दिलेला वाडगा हेही अशा  प्रतिबिंबित  प्रतिमेचं उदाहरण.
कथासूत्रातली संदिग्धता हे लेखकाचं कादंबरीचा आशय वाचकांपर्यंत पोहचविण्याचं साधन असावं, असं ‘द ब्लाइंड आऊल’ वाचताना वाटत राहतं. पहिल्या भागात शुद्ध हरपलेला नायक दुसऱ्या भागात शुद्धीवर येतो. पण दुसऱ्या भागाचं स्वरूपही स्वप्नवत असल्यामुळे वास्तव काय आणि स्वप्न कोणतं, हे वाचकाला नीट कळत नाही. कदाचित दोन्ही स्वप्नं असून, वास्तव तिसरंच असू शकेल, किंवा दोन्ही एकाच वेळी घडणारी समांतर वास्तवं असतील. ते ठरवण्याचं स्वातंत्र्य वाचकाचं. लेखक ते हिरावून घेत नाही.
स्वतच्या उत्कट भावनांचा आविष्कार कोणत्याही वाङ्मयीन संकल्पनेपेक्षा महत्त्वाचा मानणं, हे जर अभिव्यक्तीवादाचं मुख्य सूत्र असेल, तर ही कादंबरी नक्कीच अभिव्यक्तीवादी आहे. हिदायत ज्या काळात लिहीत होता, तो युरोपमध्ये अभिव्यक्तीवादी लेखनाला प्रोत्साहक असा काळ होता. काफ्काच्या साहित्यानं तरुण लेखकांना प्रभावित करायला सुरुवात केली होती. फ्रान्समध्ये शिकलेल्या हिदायतवरसुद्धा काफ्काचे संस्कार होतेच. काफ्काच्या साहित्यातली दु:स्वप्नसृष्टी हिदायतच्याही लेखनात, आणि विशेषत: या कादंबरीत ठळकपणे आढळते. हिदायतनं काफ्काच्या ‘मेटामॉर्फसिस’चा फारसी अनुवादही केलेला आहे. तो स्वतला काफ्का आणि पो यांचा वंशज मानायचा. या दोघांची गुणसूत्रं त्याच्या साहित्यात सापडतात हे खरं. त्यामुळे हिदायत हा केवळ युरोपियन प्रभाव आत्मसात करून लिहीत होता, असं म्हणणं अन्यायकारक ठरेल. हिदायतचा इस्लामपूर्व इराणी संस्कृतीचा खोल अभ्यास होता. अकराव्या शतकातला फारसी कवी मानुचेहरी याच्या कवितेचे संस्कारही हिदायतच्या साहित्यावर झालेले होते. ‘द ब्लाइंड आऊल’मधलं नायकानं काढलेलं चित्र मानुचेहरीच्या ‘मुसम्मत’ या दीर्घकवितेतल्या एका प्रसंगाचं आहे. व्यवस्थेविरोधातली बंडखोरी आणि नव्या वाङ्मयीन परंपरेचं प्रवर्तन हे या दोघांना जोडणारे आणखी काही दुवे. मानुचेहरीनं फारसी दरबारी कवितेचं स्वरूप संपूर्ण बदललं. ‘राजाचा स्तुतिपाठक’ ही कवीची ओळख पुसून त्यानं तत्कालीन सामाजिक वास्तव पहिल्यांदा कवितेत आणलं. हिदायतनं इराणी कादंबरीत नवीन प्रवाह सुरू केला. तो पुढे वाढला आणि समृद्ध झाला. त्यातूनच पुढे इराणी नवकादंबरीची ठिणगी पडली.
‘द ब्लाइंड आऊल’विषयी आपल्याला जिव्हाळा वाटेल अशी आणखी एक गोष्ट आहे. १९३७ ते १९३९ या काळात हिदायत मुंबईत मुक्कामाला होता. याच काळात त्यानं ‘द ब्लाइंड आऊल’ लिहून पूर्ण केली आणि तिची मर्यादित प्रतींची आवृत्ती मुंबईतच प्रकाशित केली. या प्रतींवर ‘नॉट फॉर सेल इन इराण’ असा शिक्का मारलेला आहे. ती इराणमध्ये प्रकाशित व्हायला बराच काळ जावा लागला.
हिदायतच्या मुंबईतल्या वास्तव्यात त्याला हिंदू,तसंच बौद्ध संस्कृतीविषयी आपुलकी निर्माण झाली. त्याचे पडसाद ‘द ब्लाइंड आऊल’मध्येही उमटलेले दिसतात. कादंबरीच्या पहिल्या भागात नायकाची आई हिंदू नर्तकी असल्याचा संदर्भ येतो. दुसऱ्या भागात लेखकाच्या खोलीत बुद्धाची मूर्ती असल्याचा उल्लेख येतो. कादंबरीच्या द्विदल रचनेत द्वैतवादाच्या खुणा आढळतात.
हिदायतचं आयुष्य मानसिक अस्थैर्यानं ग्रासलेलं होतं. उत्तरायुष्यात तो अफूच्या आहारी गेला. निराशावाद तर त्याच्या स्वभावातच होता. वयाच्या ४९ व्या वर्षी त्यानं पॅरिसमध्ये स्वतला गॅसनं बंद केलेल्या खोलीत कोंडून आत्महत्या केली. या घटनेमुळे ‘द ब्लाइंड आऊल’ अशुभ आहे, अशी समजूत अनेक वर्षांपर्यंत इराणमध्ये प्रचलित होती. वाचकाला झपाटण्याची या कादंबरीची ताकद पाहता ती खरी असावी, असं मानायला जागा आहे.


कादंबरी:‘द ब्लाइंड आऊल’(The blind Owl)
लेखक : सादिक हिदायत(Sadegh Hedayat) 

हे पुस्तक सध्या मराठीत उपलब्ध नाही.अद्याप  त्याचा मराठीत अनुवाद कोणी केलेला  नाही
Buy The Blind Owl (Imported Edition:English) from Here

[This review of the novel 'The Blind Owl' :Author Sadegh Hedayat,is written by Mr.Nikhilesh Chitre for Loksatta daily]

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...