Saturday, June 26, 2010

युद्धस्य कथा: रम्य:’ असे म्हणतात. पण ते फक्त इतिहास ज्याच्या बाजूने वाचला/ऐकला तरच किंवा दोन तुल्यबळांमधील अटीतटीच्या सामन्यात एकजण युक्तीने दुसऱ्यावर कुरघोडी करतो तेव्हा! एरवी तेच युद्ध बलाढय़ विरुद्ध दुबळा व दारिद्रय़ाने पिचलेला असे असेल तर एकाच वेळी कारुण्य, चीड, हतबलता याने मन भरून जाते. मुल्ला अब्दुल सलाम जईफ या तालिबान चळवळीच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या तालिबान्याचे आत्मकथन वाचताना हाच अनुभव येतो.अब्दुल जईफ यांचा जन्म १९६८ सालचा. दक्षिण अफगाणिस्तानातील, पाकिस्तान सीमेवरील खोऱ्यात, रंग्रेझान या खेडय़ात त्यांचे वडील इमाम होते. खेडय़ात रस्ते, वीज, पाणी यांची वानवा होती. आसपासच्या डोंगरातून वाहात येणारे ओहोळ व छोटय़ा नद्यांच्या पाण्यावर तेथील लोक द्राक्षे व डाळिंबे पिकवत. वडिलांचे उत्पन्न फारसे नव्हते.
लहानपणी घरासमोरच्या आवारात आणि वाहत्या पाण्याच्या काठावर लुटुपुटीचा राजा होऊन शत्रूचा बीमोड करणाऱ्या, लढाईचा खेळ खेळणाऱ्या जईफला मोठेपणी खरोखरीची लढाई करण्याची पाळी आली. तराकी राजवटीत (नूर मोहंमद तराकी-खलाकी कम्युनिस्ट पुढारी व अफगाणिस्तानचे अध्यक्ष-१९७८-७९) रशियन प्रभावाखाली सुधारणा घडवून आणण्याच्या मिषाने स्थानिक पुढाऱ्यांना-खान, मलिक, सय्यद आणि मुल्ला-यांना तुरुंगात डांबून त्यांच्या हत्या करण्यात आल्या, तेव्हा लोकांत असंतोष वाढू लागला. तशातच वडिलांचे निधन झाल्यामुळे जईफ व त्यांची भावंडे पोरकी झाली. आईचे छत्र तर ते दीड-दोन वर्षांचे असतानाच हरपले होते.
कम्युनिस्टांच्या कारवायांमुळे पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या अनेक अफगाणांमध्ये जईफ यांचे नातेवाईकही होते. पाकिस्तानच्या सीमेवर अफगाण निर्वासितांच्या छावणीत असलेल्या मदरशात चौथीपर्यंत शिकून ते पुढे जवळच्या शाळेत जाऊ लागले. या मदत केंद्रांना जगभरातील संघटना व संयुक्त राष्ट्रसंघ यांचा पाठिंबा होता. या छावण्यांजवळील खोऱ्यात अनेक मुजाहिदीन (धर्मयुद्धात लढणारे योद्धे) कार्यरत होते. अमेरिका व पाकिस्तान यांचाही मुजाहिदीनांना सक्रिय पाठिंबा होता. येणाऱ्या निधीतून पाकिस्तानने आपली आर्थिक व राजकीय ताकद वाढवली. जईफ यांचे अनेक नातेवाईक मुजाहिदीनांना सामील झाले होते. त्यांच्या व मशिदीतल्या धर्मयुद्धाची शिकवण देणाऱ्या मुल्लांच्या प्रभावामुळे, वयाच्या पंधराव्या वर्षीच जईफ छावणीतून पळून जाऊन अफगाणिस्तानात जाणाऱ्या बसमध्ये चढले.
सुरुवातीला दोन महिने बंदुका साफ करणे आणि मुजाहिदीन नेत्यांची खासगी कामे करून कंटाळल्यावर जईफ तालिबानांच्या फौजेत गेले. मुजाहिदीन नेत्यांचा अंत:स्थ हेतू पैसा कमावणे एवढाच आहे, हेही त्यांच्या लक्षात आले. तालिबान हे तालिब (म्हणजे विद्यार्थी) याचे बहुवचन. अशिक्षित मुजाहिद दोन-तीन वर्षे धार्मिक शिक्षण घेतल्यावर तालिब होई. मुजाहिदीनांना धार्मिक शिक्षण देण्याचे कामही जईफ यांनी केले. वर्षभरानंतर त्यांना पाकिस्तानात परत जाण्यास सांगितले गेले.
अफगाणिस्तानावर रशियन हेलिकॉप्टर्स घिरटय़ा घालू लागल्यावर आणि रणगाडय़ांचा सुळसुळाट झाल्यावर त्यांच्याशी मुकाबला करण्यासाठी पाकिस्तानच्या आय.एस.आय. (इंटर सव्‍‌र्हिसेस इंटेलिजन्स) या संघटनेने मुजाहिदीनांना क्षेपणास्त्रे व शस्त्रास्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यानंतर जईफ यांची रवानगी पुन्हा अफगाणिस्तानात झाली. तेथे बॉम्बहल्ले होत असताना ते आठ वेळा बचावले.
तालिबानांनी रशियन फौजांशी सुमारे दहा वर्षे लढा दिला. रशियनांनी अफगाणिस्तानातून काढता पाय घेतल्यावर त्यांच्याशी इतकी वर्षे हातमिळवणी केलेल्या मुजाहिदीनांच्या काही गटांमध्ये सत्तासंघर्ष सुरू झाला. पाकिस्तान्यांनी छुपी कारस्थाने व पैशाचा ओघ वाढवून मुजाहिदीन व तालिबान्यांत कायमची फूट पाडली व मुजाहिदीनांना सत्तेवर बसवले. तालिबानांनी सत्तेची हाव न बाळगता अफगाणिस्तान मुक्त झाल्याचा आनंद मानला.
युद्धानंतर जईफ यांनी संसारिक जबाबदारी पार पाडण्यासाठी काही कामधंदा बघण्याचे ठरवले. सासऱ्यांनी पाकिस्तानात धंदा सुरू करण्यास मदत देऊ केली. पण जईफ यांना अफगाणिस्तानात राहायचे होते. धंदा करण्याचा अनुभव नसल्यामुळे त्यांनी कालवे खोदणाऱ्या कंपनीत मजुराचे काम स्वीकारले. चोऱ्या, लूटमार, स्त्रियांवर जुलूम या सर्वामुळे अफगाणिस्तानात राहणे सुरक्षित नाही, हे जाणून ते पुन्हा पाकिस्तानात राहून अधूनमधून अफगाणिस्तानात ये-जा करीत राहिले.
त्यांच्या डोळ्यांसमोर अफगाणिस्तान निरनिराळ्या टोळ्यांमधील सशस्त्र संघर्षांमुळे दुभंगत चालला होता. सर्वत्र अंदाधुंदी वाढली होती. यावर उपाय म्हणून सर्व गटांना एकत्र आणून शांतता व सलोखा निर्माण करण्याच्या उद्देशाने जईफ यांनी अफगाणिस्तानातील एका खेडय़ात इमामाचे काम पत्करले. १९९२ साली सर्व मुल्ला-मौलवींना एकत्र आणून, त्यांना कुराणाच्या शपथेवर गुन्हेगारी व भ्रष्टाचार यांच्या विरोधात लढा देण्यास सांगितले. बीबीसीने ही तालिबानांची नवी चळवळ आहे, असे घोषित केले.
नव्या चळवळीत अनेक अफगाण उत्स्फूर्तपणे सामील झाले. पुष्कळांनी आपल्या जवळचे सोनेनाणे व संपत्ती चळवळीसाठी दान केले. सुरुवातीला तालिबानांनी रस्त्यावरच्या दरोडेखोरांना नेस्तनाबूत करण्यासाठी शक्ती पणाला लावली. नंतर निरनिराळ्या खेडय़ांतील ‘अघोषित’ सत्ताधाऱ्यांना आपल्या कह्य़ात आणले.
अशा प्रकारे एकसंध अफगाणिस्तानवर आपला अंमल स्थापन करण्यात तालिबानांना यश आले. काबूलवर कब्जा मिळताच जईफ यांना मंत्रिपद देण्यात आले. वाहतूक व्यवसायातील भ्रष्टाचार निपटून काढत त्यांनी हजारो युवकांना वाहनचालकाच्या नोकऱ्या मिळवून दिल्या. काही दिवस खाणी व उद्योगखाते सांभाळताना त्यांनी खतांच्या निर्मिती उद्योगाला व संगमरवरी दगडाला पॉलिश करून तो निर्यात करण्याच्या उद्योगाला चालना दिली. हे करताना त्यांनी पाकिस्तान व इराण्यांच्या कुटील कारवायांना तोंड दिले.
मंत्री म्हणून तीन महिने होत नाही तोच जईफ यांची पाकिस्तानात राजदूत म्हणून नेमणूक करण्यात आली. तेव्हा त्यांना पाकिस्तान्यांची दुटप्पी कृती, अमेरिकन धार्जिणेपणाचा जवळून अनुभव आला. रशियाविरुद्ध लढा देताना मित्रत्वाने वागणारे पाकिस्तानी आता अमेरिकेच्या प्रभावाखाली जईफ यांच्याशी फटकून वागू लागले. आयएसआयने अनेकवेळा जईफ यांना पैशाचे आमिष दाखवत आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला, पण जईफ बधले नाहीत. अल कैदाने ११ सप्टेंबर २००१ मध्ये अमेरिकेवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिका व पाकिस्तानने अफगाणिस्तानशी राजनैतिक संबंध तोडले व जईफ यांना प्रथम स्थानबद्ध केले. त्यावेळी कोणताही पाश्चात्त्य देश वा संयुक्त राष्ट्रसंघही त्यांच्या मदतीला आले नाही. अमेरिकेने जईफ व इतर काही तालिबानांना अटक करून क्युबातील ग्वाटेनामा येथील तुरुंगात (खरेतर छळछावणीच!) डांबले. जिवंत लोकांची कबर, असेच जईफ यांनी तिथल्या कैदेचे वर्णन केले आहे.
चार वर्षे जईफ यांची ‘चौकशी’ केल्यावर त्यांचा अल कैदाशी काहीही संबंध नाही, याची अमेरिकेला खात्री पटली. त्यांना ‘आपण अल कैदात होतो, पण आता त्यांच्याशी काहीही संबंध ठेवणार नाही’, असा कबुलीजबाब लिहून द्या, असे अमेरिकन अधिकाऱ्याने फर्मावताच जईफ यांनी ते धुडकावून लावले. त्याने शेवटी त्यांना तुम्हाला हवा तो कबुलीजबाब लिहा, असे म्हणताच जईफ यांनी ‘मी गुन्हेगार नाही. निष्पाप आहे. पाकिस्तान व अमेरिकेने माझा विश्वासघात करून मला चार वर्षे डांबून ठेवले आहे. मला कबुलीजबाब लिहिणे भाग असल्यामुळे मी लिहून देतो की, अमेरिकेविरुद्ध किंवा शस्त्रदलांशी संबंधित कोणत्याही हालचालीत मी भाग घेणार नाही.’ जईफ यांचा हा कबुलीजबाब स्वीकारला जाऊन त्यांची सुटका झाली.
अब्दुल सलाम जईफ आता काबूलमध्ये स्थायिक झाले आहेत. त्यांच्या आणि तरुण तालिबानांच्या विचारात आणि कार्यपद्धतीत जमीनअस्मानाचे अंतर आहे. या आत्मकथनातून सर्वानीच धडा घ्यावा, असे त्यांना वाटते. जईफ यांचे आत्मकथन अनेक प्रश्न उभे करते; परंतु अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करून त्याला आत्मनिर्भर करण्याची त्यांची तळमळ मनाला भारून टाकते.
-माणिक खेर
माय लाईफ विथ द तालिबान
लेखक - अब्दुल सलाम जईफ
प्रकाशक - हॅशेट इंडिया
पृष्ठे - ३३१
किंमत - ४९५ रुपये.

CREDIT: LOKSATTA DAILY

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...