Thursday, July 15, 2010

या जगात विविध प्रकारचे अवलिये सापडतात. या अवलियांच्या डोक्यात कधी, काय कल्पना येईल आणि या कल्पनेचा पाठपुरावा करण्यासाठी ते जिवाचा कसा आटापिटा करतील, हे कल्पनेपलीकडचं असतं. या प्रक्रियेत कधी त्यांच्या प्रयत्नांना यश लाभतं तर कधी नाही. पण त्यांची स्वप्नं वास्तवात उतरतात, तेव्हा साहजिकच हा आगळावेगळा अनुभव इतरांना सांगावा, याची ओढ लागली तर त्यात नवल नाही. मायकेल बेनानाव या अशाच एका अवलियाचं ‘द कॅराव्हान ऑफ व्हाइट गोल्ड’ हे प्रवास वर्णनात्मक पुस्तक म्हणजे एका वेगळ्याच स्वप्नाचा ध्यास घेतल्यानंतर येणाऱ्या अनुभवांचा खजिना.
‘व्हाइट गोल्ड’ या उल्लेखासरशी डोळ्यांसमोर येतं ते सोनं. ‘मॅकॅनाज गोल्ड’ या चित्रपटाप्रमाणे सोन्याच्या शोधात केलेला प्रवास, असं काहीसं चित्रंही डोळ्यांसमोर उभं राहतं. प्रत्यक्षात ‘व्हाइट गोल्ड’ म्हणजे सोनं नव्हे, तर मीठ आहे, हा पर्दाफाश झाल्यानंतर ‘मिठासाठी एवढा अट्टहास?’ हा प्रश्न मनात आल्यावाचून राहत नाही. मिठाचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व आवर्जून सांगण्याची गरज नसली तरी मीठ मिळविण्यासाठी केलेल्या या प्रवासाची कथा मात्र आवर्जून वाचावी अशीच.
मिठाच्या लाद्या आणण्यासाठी सहारा वाळवंटातून लाखो मैलांचा प्रवास करत जायचं, ही गेल्या हजारो वर्षांपासून पाळण्यात येत असलेली एक प्रथा. टाओडेन्नी येथील या खाणींचा शोध १५८५ च्या सुमारास लागला. या खाणींमधून मिठाच्या लाद्या टिम्बक्टूला आणायच्या, ही वर्षांनुवर्षांची प्रथा. आज मिठाच्या व्यापाऱ्यांनी पारंपरिक उंटांपेक्षा ट्रक, जहाज अशा वाहतुकीच्या आधुनिक साधनांचा वापर करायला सुरुवात केली, त्यामुळं साहजिकच या प्रथेचा अंत जवळ येत चालला आहे. ही प्रथा नामशेष होण्याच्या आत हा प्रवास करायचा, असं मायकेलनं ठरवलं.
मायकेल बेनानाव हा अमेरिकन लेखक आणि छायाचित्रकार. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’, ‘लोनली प्लॅनेट’, ‘द ख्रिश्चन सायन्स मॉनिटर’ अशा अनेक नियतकालिकांत त्याचे लेख प्रसिद्ध होतात. एक कुबड (hump) असलेले उंट आणि दोन कुबडं असलेल्या उंटांबाबत संशोधन करत असताना त्याला ‘कॅराव्हान ऑफ व्हाइट गोल्ड’ हा लेख मिळाला. तो वाचत असताना त्याच्या डोळ्यांसमोर आकाशाच्या अथांग पाश्र्वभूमीवर उंटांचा काफिला विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करत असल्याचं चित्र साकारत गेलं.
‘तानेझरुफ्ट’ प्रदेश हा या प्रवासातला सर्वात अवघड आणि आव्हानात्मक टप्पा. ‘द लँड ऑफ थर्स्ट’ किंवा ‘द लँड ऑफ टेरर’ असंच या प्रदेशाचं वर्णन केलं जातं. सहारातील सर्वात जुना आणि प्रचंड वैराण असा हा भाग अमेरिकेपेक्षाही मोठय़ा आकाराचा. १२० अंशापेक्षा जास्त तापमान असणाऱ्या या टापूत कुणीही तग धरून राहणं अवघडच. शेकडो मैल पसरणारी धुळीची वादळं इथे नित्याची. अशा टापूतून प्रवास करून टाओडेन्नी या मिठाच्या खाणी असलेल्या भागात पोचायचं. या भागात वीज नाही, दवाखाने नाहीत. बाहेरच्या जगाशी जो काही थोडाफार संपर्क होतो, तो या मिठाच्या व्यापाऱ्यांद्वारेच. मायकेलला वाळवंटाची ओढ कायमच वाटत आली आहे, पण हे सगळं त्याला पूर्णपणे अपरिचित होतं. ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’, ‘सेव्हन पिलर्स ऑफ विस्डम’ यांसारख्या पुस्तकांचा जबरदस्त प्रभाव त्याच्या मनावर असल्यानं ही माहिती मिळाल्यानंतर मात्र त्याला स्वस्थ बसवेना. हा प्रवास करायचाच, असा निर्णय त्यानं घेतला. या निर्णयाबरोबरच त्याला या भटक्यांप्रमाणे रंगीबेरंगी फेटा बांधून उंटाच्या पाठीवर बसून प्रवास करत असल्याची, त्यांच्याबरोबर त्यांचंच जेवण जेवत असल्याची, त्यांच्याकडून रोमांचक कथा ऐकत असल्याची स्वप्नं पडायला लागली आणि या स्वप्नपूर्तीच्या दृष्टिकोनातून पावलं उचलायला त्यानं सुरुवात केली. स्वप्नांपेक्षा वास्तव भीषण असतं, याची इतक्या वर्षांच्या भटकंतीतून कल्पना असल्यानं शारीरिक तंदुरुस्तीकडे विशेष लक्ष द्यायचं त्यानं ठरवलं. त्यासाठी न्यू मेक्सिको इथल्या त्याच्या घराच्या आसपासचे धूळभरले रस्ते अनवाणी पायांनी तुडवले. फायर प्लेसमध्ये टाकावी लागणारी लाकडं स्वत: फोडली. तुरेग जमातीच्या लोकांबरोबर काम केलेल्या डॉ. सुसान रास्युसेन या अ‍ॅन्थ्रॉपॉलॉजीच्या प्रोफेसरबाईंकडून माहिती मिळविली. पश्चिम आफ्रिकेतील मिठाच्या व्यापारासंबंधीचा इतिहास शोधला. त्यावरून त्याच्या असं लक्षात आलं की, आज मिठासारख्या एका अत्यंत साध्या गोष्टीसाठी इतका अट्टहास हास्यास्पद वाटत असला तरी एके काळी याच मिठाला ‘सोन्याचा’ भाव होता. पश्चिम आफ्रिकेत कागदी चलन अस्तित्वात येण्याच्या आधी मिठाच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर व्यवहार होत. या पाश्र्वभूमीवर सहारातल्या या मिठाच्या खाणी म्हणजे पैशाच्या खाणी ठरल्या नाहीत तरच नवल. समुद्राच्या पाण्यापासून मिळविलेलं मीठ आणि मिलेट स्टॉक जाळून तयार केलेलं व्हेजिटेबल सॉल्ट असे दोन पर्याय असले तरी या दोन्ही प्रकारचं मीठ तुलनेनं कमी प्रतीचं आणि त्यामुळे कमी किमतीचं असे. या मिठाचं ‘शेल्फ लाइफ’ही खूपच कमी असे. हवेतील उष्णतेच्या आणि आर्द्रतेच्या प्रमाणानुसार या मिठाची चव आणि रंग बदलत असे. याच्या उलट मिठाच्या खाणीतून काढलेल्या मिठावर हवामानातील बदलांचा काहीच परिणाम होत नाही. अगदी पिढय़ान्पिढय़ा हे मीठ जसंच्या तसं राहातं, या विश्वासातूनच सव्यापसव्य करून हे लोक या मिठाच्या खाणींपर्यंत जात.
मायकेलने जॉन नावाच्या एका प्रोफेसरशीही संपर्क साधला व त्यांच्याकडून प्रत्यक्ष अनुभवावर आधारित माहिती घेतली. जॉननी संगितलं की, त्याला कुणीही बरोबर न्यायला तयार नव्हतं, कारण एका बाबू आदमीला हा प्रवास झेपणार का, याबद्दल ते साशंक होते. त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे त्यांना दिवसाला विशिष्ट अंतर कापावं लागतं आणि जॉनला त्यांच्या वेगाशी जुळवून घेता आलं नाही तर ते त्याच्यासाठी थांबू शकणार नव्हते. खडतर प्रवास त्याला झेपला नाही आणि प्रवासादरम्यान त्याचं काही बरंवाईट झालं तर त्याचं शव तिथंच वाळवंटात फेकून देण्यावाचून त्यांना गत्यंतर राहणार नव्हतं. या प्रवासात उंटाच्या पाठीवरून पडून जायबंदी होण्यापासून ते तहान-भुकेनं मृत्यूपर्यंत कशाचीही शक्यता नाकारता येत नव्हती. पाण्याच्या कमतरतेमुळे आंघोळ-बिंघोळ दूरच, पण नैसर्गिक विधीनंतरही वाळूचाच उपयोग करावा लागतो, यासारखी माहिती मिळाल्यानंतर काही क्षण मायकेलच्या पायाखालची वाळूच सरकली, पण उत्साह मात्र तीळमात्रही कमी झाला नाही.
एवढी सगळी माहिती गाठीशी असूनही प्रत्यक्ष प्रवास मायकेलच्या कल्पनेपेक्षा कितीतरी अधिक खडतर होता. दिवस दिवस उंटावर बसणं, तोल सांभाळणं यावर ताबा मिळवायला बराच काळ जावा लागला. मांडय़ा दुखणं, पाठ भरून येणं या नेहमीच्या तक्रारींबरोबर त्याला ‘सॅडल सोअर्स’ना तोंड द्यावं लागलं. मग तर उंटावर बसणं म्हणजे शिक्षाच वाटाला लागली. त्यावर उपाय म्हणून त्याने चक्क चालायला सुरुवात केली. उंटांच्या वेगाशी ताळमेळ घालत चालताना तारांबळ उडत होती. या अनुभवाचं वर्णन करताना तो म्हणतो, माझ्या शरीराच्या वरच्या आणि खालच्या भागाचा काही ताळमेळ आहे, असं मला वाटत नव्हतं, माझं वरचं शरीर माणसाचं आणि खालचा भाग म्हणजे पाय हे मशीन आहेत, असं वाटायला लागलं. हळूहळू हा त्रास कमी होत गेला. उंटावरचा प्रवास आनंददायी वाटायला लागला. ‘टूरिस्ट’ असण्यापेक्षा ‘डेझर्ट ट्रॅव्हलर’ असल्याची भावना मनात बळावायला लागली आणि ‘लॅचमार’ या त्याच्या उंटाशीही त्याची चांगली दोस्ती झाली.
जॉनने सांगितलेले अनुभव घेत, त्यात स्वत:च्या अनुभवांची भर घालत मायकेलने जवळजवळ सहा आठवडे दिवसाला अठरा अठरा तास प्रवास केला। एकटेपणाच्या भावनेने घेरलेल्या रात्री, काफिल्यापासून ताटातूट झाल्यानंतर झालेली तगमग, जेवण बनवतानाची तारांबळ, कमीत कमी साधनसामग्रीसह जगताना होणारी त्रेधातिरपिट, अशा अनुभवांचं वर्णन या पुस्तकात आहे. वेगळ्या वाटेनं प्रवास करण्याची आवड असलेल्यांना हे पुस्तक एक वेगळाच आनंद देतं तर ज्यांनी असा प्रवास केला नसेल, त्यांना एका वेगळ्याच विश्वाची सफर घडवून आणतं.
-शुभदा पटवर्धन (shubhadey@gmail.com)
द कॅराव्हान ऑफ व्हाइट गोल्ड
लेखक: मायकेल बेनानाव;
प्रकाशक: जयको बुक्स;
पृष्ठे : ३००; मूल्य : २९५ रुपये.
सौजन्य : दै. लोकसत्ता

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...