Monday, December 5, 2011आपण राहतो ते शहर आपल्या अनुभवविश्वाच्या केंद्रस्थानी आणून त्याच्या पाश्र्वभूमीवर स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न ओरहान पामुकने आपल्या इस्तंबूल या अतिशय हळव्या पण साजऱ्या लेखनात केला आहे. आपले शहर आणि आपण या एकमेकांना परावर्तित करणाऱ्या दोन प्रतिमा आहोत. शहराचे आणि आपले व्यक्तिमत्त्व एकमेकांशी घट्ट जोडले गेले आहे, ही माणूस म्हणून माझी फार प्रबळ आणि मूळ भावना आहे. त्यामुळे शहरी मानसिकतेतून तयार झालेले उत्तम चित्रपट आणि साहित्य, चित्रकला यांच्यापर्यंत मी हिरीरीने पोहोचतो किंवा ते माझ्यापर्यंत वाट काढत येतात .
‘द ओपन सिटी’ हे पुस्तक माझ्यापर्यंत वाट काढत आलेले आहे. गेले काही दिवस माझ्या लगत असलेल्या काचेबाहेर माझे शहर सरकत जात असताना मी या पुस्तकामध्ये शांतपणे अडकून गेलेलो आहे.
टेज्यू कोल या नायजेरियन वंशाच्या अमेरिकन लेखकाची ‘द ओपन सिटी’ ही पहिली कादंबरी आहे. न्यूयॉर्क शहराविषयी लेखकाने केलेले हे एक हळवे चिंतन आहे. कादंबरीचा नायक ज्युलियस हा एक तरुण नायजेरियन वंशाचा मानसोपचारतज्ज्ञ आहे. त्याच्या न्यूयॉर्क शहरामध्ये चाललेल्या लांब लांब  फेरफटक्यांमधून त्याने स्वत:च्या दुखावलेल्या मन:स्थितीचा अदमास घेण्याची अनुभवलेली प्रक्रिया हा या कादंबरीचा गाभा आहे.
‘द ओपन सिटी’मधील न्यूयॉर्क हे  world trade center  उद्ध्वस्त झाल्यानंतरचे न्यूयॉर्क शहर आहे. ते आजचे आहे त्यामुळे प्रथमत: हे पुस्तक महत्त्वाचे आहे. कारण वर्तमानाविषयी काही सकस असे सापडण्याची शक्यता कादंबरीसारख्या साहित्यप्रकारात कठीण होण्याचा आजचा काळ आहे. त्यामुळे आजचे काही असे मांडताना लेखकाने, पर्यायाने ज्युलियस या नायकाने आपल्या प्रथमपुरुषी निवेदनामधून आपल्या संपूर्ण जगण्याचा घेतलेला प्रभावी असा वेध या पुस्तकात जाणवतो आणि कोणत्याही चांगल्या कादंबरीप्रमाणे सत्य आणि कल्पित वास्तव याच्या सीमारेषा या पुस्तकाच्या बाबतीत धूसर होत जातात. ज्युलियस मूळचा नायजेरियन कुटुंबातला. या मुलाच्या आयुष्याचा प्रवास नायजेरिया मार्गाने बेल्जियम  आणि आता अमेरिका असा सर्वत्र पसरलेला आहे. ज्युलियस सध्या मानसोपचारतज्ज्ञ म्हणून न्यूयॉर्कमध्ये रेसिडेन्सी करीत आहे. नुकतीच नादेजे ही त्याची प्रेयसी त्याच्यापासून दुरावली गेली आहे. आपल्याला अचानक आलेले हे एकटेपण कशातून आले आहे, हे न कळून तो न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर सध्या दिवस-रात्र चालत सुटला आहे. आपण सुशिक्षित, स्वतंत्र आणि बुद्धिमान आफ्रिकन आहोत ही जाणीव त्याच्याबरोबर सतत प्रवास करते आहे. न्यूयॉर्क शहरातल्या पक्ष्यांविषयी, झाडांविषयी, ऋतूंविषयी आणि चित्र-विचित्र माणसांविषयी अतिशय गडद अशी वर्णने करत तो चालला आहे. ही एक चालती कादंबरी आहे, ज्याची सोबत करणे वाचक म्हणून आपल्याला आनंददायक वाटते. सर्वात महत्त्वाची बाब म्हाणजे ही एक कथाहीन कादंबरी आहे. कथेच्या बंधनात न अडकलेले फिक्शन वाचणे हा फार मोकळे करणारा अनुभव असतो.
ज्युलियस हा मानसोपचारतज्ज्ञ असल्याने तो आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचे ताबडतोब विश्लेषण करू लागतो आणि त्या विश्लेषणाच्या प्रक्रियेत तो गुंतत जातो. हा मानसोपचारतज्ज्ञ स्वत: अजिबातच बऱ्या मन:स्थितीत नाही, पण त्याची बुद्धी आणि जाणीव तल्लख आहे. अशा कात्रीत सापडून एकटेपणावर मात करायला शहरभर तरंगत फिरत आपल्या आयुष्याविषयी ज्युलियस आपल्याला जे सांगतो, त्या सर्व विचारांना शांत चिंतनाची लय आहे.
या पुस्तकात अतिशय वेधक व्यक्तिचित्रे आहेत; त्यांपकी एक आहे ज्युलियसचे वयोवृद्ध जपानी गुरू सायटो. डॉक्टर सायटो न्यूयॉर्कमधील आपल्या भल्या मोठय़ा सुंदर सदनिकेत राहतात. आपल्या जुन्या विद्यार्थ्यांपकी कोणीही केव्हाही येऊन आपल्याला भेटावे, गप्पा माराव्यात आणि काही नवी पुस्तके आपल्याला वाचून दाखवावीत या इच्छेने सायटोंनी आपल्या घराचे दरवाजे सतत उघडे ठेवलेले आहेत. ज्युलियसचे प्रोफेसर सायटोंशी फार जवळचे नाते आहे. प्रोफेसर सायटोंच्या आजकालच्या भेटी आणि आठवणी, अनेक दिवसांनी फोन केल्यावर त्यांच्या मृत्यूची मिळालेली बातमी हे या प्रवासवजा कादंबरीतले फार प्रभावी प्रसंग आहेत.
दुसरी व्यक्ती आहे ज्युलियसची आजी, जिला तो बोलीभाषेत ‘ओमा’ म्हणतो. ज्युलियसच्या आईची आई. ओमा ज्युलियसच्या आयुष्यामधून हरवून गेली आहे आणि आत्ता या मोठय़ा शहरात फिरताना अंगावर पाणी पडावे तशा ज्युलियसला ओमाच्या आठवणी येत आहेत. ओमा ब्रुसेल्समध्ये राहते किंवा राहायची. कुटुंबाशी संबंध दुरावल्यानंतर तिचे काय झाले हे ज्युलियसला माहिती नाही. कादंबरीच्या एका टप्प्यावर ज्युलियस तीन आठवडय़ांची सुट्टी काढून ब्रुसेल्सला जातो. आणि फोनच्या जुन्या याद्यांमधून ओमा नावाच्या सगळ्यांना फोन करीत राहतो. न्यूयॉर्कमधले रस्त्यांवरचे प्रवास ब्रुसेल्समध्ये सुरू होतात आणि ज्युलियसचे मन एका शहराचे रूप धारण करते.
ब्रुसेल्समध्ये एक मुस्लीम ज्युलियसचा मित्र बनतो. त्याच्या आयुष्याशी आजचा काळ आणि आपले असणे ज्युलियस पडताळून पाहत राहतो. ते प्रसंग विशेष कौशल्याने लेखकाने या कादंबरीच्या प्रवासात गुंफले आहेत. ‘द ओपन सिटी’ ही अशा प्रकारे समोर येणाऱ्या आणि निघून जाणाऱ्या पात्रांनी गच्च भरलेली कादंबरी आहे.
एका भलत्याच देशात जन्मून न्यूयॉर्कसारख्या मिश्र समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आपण नक्की कोण आहोत, हा अस्तित्वाचा शोध सतत चालू असतो. ज्युलियस आफ्रिकन आहे आणि स्वकष्टावर, बुद्धिमत्तेच्या जोरावर चांगले आयुष्य जगणारा तरुण आहे. त्याची त्वचा वेगळी आहे, पण अंतर्मन वेगळ्याच रसायनाचे आहे, ही जाणीव त्याला सबंध कादंबरीभर प्रश्न निर्माण करीत त्रास देत राहते. कथा नसलेल्या या कादंबरीमध्ये आधुनिक मिश्र शहरी समाजामध्ये तयार होणाऱ्या अस्तित्वविषयक प्रश्नांचे फार मोठे नाटय़ आहे.
वेगळ्या आणि अपरिचित साहित्यिक वंशाच्या लेखकाची ही कादंबरी वाचण्यासारखी का आहे, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या कादंबरीच्या नायकाचा चेहरा कसा असेल, याची कल्पना ही कादंबरी वाचताना आपल्याला करता येत नाही. कादंबरीतल्या प्रत्येक इतर पात्राचे चेहरे आपल्या डोळ्यासमोर येतात, पण ज्युलियस कसा दिसतो, ही कल्पना काही केल्या आपल्याला करता येत नाही. 


-सचिन कुंडलकर ,लोकसत्ता ग्रंथविश्व साठी
kundalkar @ gmail .com 

द ओपन सिटी  : - टेज्यू कोल
रँडम हाऊस पब्लिकेशन, न्यूयॉर्क


0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...