Thursday, June 28, 2012


Frederick Forsyth
कधीकाळी तो बातमीदार होता.. आता केवळ तडाखेबंद खपाचाच नव्हे तर ‘प्रश्न पाडणारा’ लेखक आहे. त्याची एखादी कादंबरी ब्रिटिश गुप्तचर यंत्रणेत नव्यानं दाखल होणारे क्रमिक पुस्तकासारखी वाचतात, पण याच यंत्रणेच्या क्रौर्याचं चित्रण करणारी त्याची दुसरी कादंबरी ब्रिटिश सरकारलाही या क्रौर्याची कबुली द्यायला लावते.. जगातले बारकावे टिपणारा, तपशिलात वर्णन करणारा फ्रेडरिक फोर्सिथ प्रत्यक्ष भेटीत ‘मी लेखकबिखक नाही’ म्हणाला, त्यात थोडंफार तथ्यही आहे. पण याला जग कळतं. इतरांपेक्षा लवकर कळतं. म्हणूनच, वाचणाऱ्याला प्रश्न पडतात!आपल्याकडे कादंबरी लेखनाचा, म्हणजे अर्थातच लेखकाचा, परीघ ठरलेला असतो. गाव, जिल्हा.. फारच म्हणजे एखादी सिंहासन वगैरे आली तर, राज्य. त्यापुढे काही आपण जात नाही. झेपतच नाही आपल्याला. तीच तीच माणसं, त्यांच्या त्याच त्या व्यथा. मग त्यांच्यातल्या नातेसंबंधांच्या मनोव्यापाराचा आढावा आपले लेखक घेतात. मग ते झाल्यावर उरलेले लेखक मनोव्यापाराचा नातेसंबंधांवर होणारा परिणाम आपल्या लेखनात मांडतात. मग ते वाचून आपण टाळय़ा वगैरे वाजवतो आणि मराठी कादंबरी किती खोल वगैरे गेल्याचे एकमेकांना सांगू लागतो.
आपल्या कादंबरीची इयत्ता कंची हा प्रश्न स्वत:लाच विचारून घ्यायचा असेल तर फ्रेडरिक फोर्सिथ वाचणं, हे राष्ट्रीय कर्तव्य मानायला हवं. एक तर त्याचे विषय. कधी त्यात जैविक युद्ध असतं. जनरल द गॉल या फ्रान्सच्या सर्वोच्च सेनानीची हत्या असते. एकात स्फोटकं घेऊन जाणारी बोटच्या बोट किनाऱ्यावर उत्पात घडवणार असते, तर कधी आंतरराष्ट्रीय अर्थव्यवहारात अमली पदार्थानी घडवलेला हाहाकार असतो. शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि सोविएत रशिया एकमेकांची पिकं कशी संपवतात याचीही तितकीच चित्तथरारक कथा फोर्सिथ रंगवतो. तितक्याच ताकदीनं. त्याच्या कादंबऱ्यांत एक प्रकरण व्हाइट हाऊसमधे घडतं. पुढचं युरोपीय राष्ट्रांच्या मुख्यालयात ब्रसेल्सला, तिसरं प्रागमध्ये. चौथं मॉस्कोत. पाचवं लंडनमध्ये. त्यात मध्येच कोणीतरी दिल्लीला वगैरे येऊन गेलेला असतो. आणि हे सगळे शेवटच्या दोनेक प्रकरणांत एकमेकांच्या सहवासात येतात आणि त्याची महाकादंबरी आपल्याला अचंबित करून संपते. यातला महत्त्वाचा भाग असा की ही गावं नुसती यायची म्हणून येत नाहीत. त्यातील बारीक सारीक तपशिलासह ती रंगवलेली असतात. म्हणजे कोणत्या नाक्यावर कसलं दुकान आहे, कोणतं कार्यालय आहे. त्यात काय होतं. वगैरे संपूर्ण तपशील.
मुळात मोठे इंग्रजी लेखक खूप, खूप तपशिलासह लिहितात. ललित वाङ्मय आहे म्हणून ठोकून देतो ऐसाजे असा प्रकार नाही. आणि यात फोर्सिथ इतरांपेक्षा मोठा का? तर त्याच्या व्यक्तिरेखाही खऱ्या असतात. म्हणजे त्याच्या कादंबऱ्यांत बिल क्लिंटन असतात. मार्गारेट थॅचर असतात. सद्दाम हुसेन, ओसामा बिन लादेन, क्युबातल्या छळछावण्या, डोनाल्ड रम्सफेल्ड.. असे सगळे खरे खरे असतात आणि फोर्सिथचं लिखाण नाकारणं त्यांनाही जमत नाही. आसपास जिवंत असलेल्या मंडळींवर लिहायचं तर खूप अभ्यास लागतो. फोर्सिथ तो करतो. आपल्याकडे अभ्यास हा रंजकतेच्या मुळावर येतो, असं मानायची पद्धत आहे. असं ज्यांना वाटतं त्यांनी फोर्सिथ वाचणं ही काळाची गरज समजावी आणि अधिक वेळ न दवडता फोर्सिथ वाचायला सुरुवात करावी. याचा तपशिलाचा अभ्यास इतका असतो की, ब्रिटनच्या एमआय-फाइव्ह या सरकारी गुप्तहेर यंत्रणेत दाखल होणाऱ्यांना क्रमिक पुस्तकं म्हणून फोर्सिथ वाचायला लावतात. यावरनंच त्याचा विषयांचा आवाका आणि अभ्यासाची बैठक लक्षात येऊ शकेल.
फोर्सिथ सुरुवातीला ब्रिटनच्या हवाई दलात पायलट होता. नंतर ते झाल्यावर छोटय़ामोठय़ा वर्तमानपत्रांत वार्ताहरी केली. पुढे तर रॉयटर्ससाठी झेकोस्लोवाकिया, पूर्व जर्मनी, फ्रान्स अशा अनेक ठिकाणी तो बातमीदार होता. शीतयुद्धाच्या तापत्या झळांनी जगाला वेढलं होतं तो काळ. चांगला बातमीदार असल्यानं आसपासच्या घटना तो सजगपणे टिपत गेला. त्यातूनच त्याची कादंबरी जन्माला आली ‘द डे ऑफ द जॅकल’. तिच्यावर सिनेमाही आल्यानं ती बऱ्यापैकी माहिती असते. पण फोर्सिथच्या पुढच्या अनेक कादंबऱ्या जॅकलपेक्षा कितीतरी उंचीच्या आहेत. जगाच्या राजकारणाचा थरार ज्यांना अनुभवायचा असतो त्यांच्यासाठी फोर्सिथसारखा दुसरा आनंद नाही. द ओडिसा फाइल्स, द डॉग्ज ऑफ वॉर, द फोर्थ प्रोटोकॉल, द निगोशिएटर, द डिसीव्हर, द डेव्हिल्स आल्टरनेटिव्ह.. अशा किती सांगता येतील. याच्याही नंतरची माझी प्रचंड आवडती म्हणजे द फिस्ट ऑफ गॉड. इराकच्या सद्दाम हुसेन याने तयार केलेली अण्वस्त्रं इस्रायली बाँबफेकी विमानं जाऊन नष्ट करतात, या सत्य घटनेवर आधारित ही कादंबरी अशावेळी हाती आली की, मी तेलाच्या राजकारणात पिंपभर बुडालो होतो. फिस्ट ऑफ गॉड सलग वाचून, एकाच बैठकीत संपवावी लागते. तशी मी ती संपवली आणि फोर्सिथ घरी जमा व्हायला लागले. द फिस्ट ऑफ गॉड इतकी परिणामकारक आहे की, त्यानं ती आधी लिहिली आणि मग इस्रायलनं त्याप्रमाणे कृती केली असं वाटावं.
शिष्यवृत्तीच्या निमित्ताने १९९८ साली लंडनला सहा महिने राहायला मिळालं. त्यावेळी करायच्या कामात एक काम होतं फोर्सिथला भेटायचं. एका रविवारी त्याच्या घरी धडकलो. लंडनच्या उत्तरेला हर्डफोर्डशायरला त्याचं घर आहे. घर कसलं, हवेलीच ती. जवळपास तिनेकशे र्वष जुनी. आणि आत प्राणिसंग्रहालय. अगदी गाढवसुद्धा. त्याचं नाव आइन्स्टाइन का असंच काहीतरी. त्याचा विक्षिप्तपणा लक्षात येईल असं. पहिल्या भेटीतच तो सांगून जातो, ‘मी लेखकबिखक नाही’ आणि आपल्याला धक्काच बसतो. आपण म्हणजे त्याचे चाहते वगैरे असतो आणि हा तर म्हणतो मी लेखकच नाही. प्रश्न त्यामुळे त्याचं काय होणार हा नसतो, तर आपलं काय झालं हा असतो. तर फोर्सिथ त्याची लेखनप्रक्रिया उलगडून सांगतो.
तेव्हा जाणवतं की त्याला ठाम अशी राजकीय, परराष्ट्र राजकारणातली मतं आहेत आणि लेखक म्हणून तो भूमिका मांडायला अजिबात घाबरत नाही. म्हणजे पंतप्रधान म्हणून टोनी ब्लेअर अगदीच कुचकामी आहेत आणि इराक युद्धावरनं त्यांच्यावर महाअभियोग चालवून त्यांना हाकलून लावायला हवं.. इतक्या स्वच्छपणे त्यांनी भूमिका घेतली होती. त्यांच्या लिखाणातही ही भूमिका लपत नाही. म्हणजे त्याच्या एका कादंबरीत (द डिसीव्हर) त्याच्या एका गुप्तहेरास ब्रिटन निर्घृणपणे मारतं. यातली मेख अशी की मारला गेलेला गुप्तहेर आयरिश रिपब्लिकन आर्मीचा म्हणजे ‘आयआरए’चा असतो आणि त्याचवेळी ब्रिटन आणि आर्यलड यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झालेले असतात. यातला धक्कादायक भाग असा की, हे पुस्तक आलं त्याचवेळी आयआरएचा एक हेर गूढ अवस्थेत मेलेला आढळला होता. त्याच कादंबरीत फोर्सिथनं लिहिलेलं असतं : मारल्या गेलेल्या आयआरए बंडखोरांच्या अंत्यविधीप्रसंगी जमलेल्यांत काय चर्चा होते आहे हे कळावं म्हणून शवपेटय़ांतून सुद्धा ब्रिटनने हेरगिरीची यंत्रणा कशी ठेवलेली होती, हे छापून आल्यावर फोर्सिथला बऱ्याच निषेधाला तोंड द्यावं लागलं. परंतु नंतर ब्रिटिश सरकारला मान्य करावं लागलं- शवपेटय़ांत ट्रान्समीटर होते ते. फोर्सिथ बीबीसी रेडिओवरही दर शनिवारी कार्यक्रम करायचा. कमालीची लोकप्रियता लाभलेल्या या कार्यक्रमात त्याची मतं नेहमीच्याच परखडपणे समोर यायची. तो सांगतो की कादंबरीत फक्त मुख्य कट, त्याची आखणी, मांडणी त्याची असते. म्हणजे हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेत वगैरे मुख्य शल्यक कसा हृदय बाहेर काढताना आणि परत आत ठेवून चालू करण्याचं काम करतो- बाकीची फाडाफाडी वगैरे छोटीमोठी कामं त्याचे सहायक डॉक्टर करतात- तसं फोर्सिथचं आहे. पुस्तकासाठी लागणारी बाकीची जुळवाजुळव त्याच्या पदरी असलेले लेखक करतात. एकदा का ती झाली की फोर्सिथ आणि त्याचे हे लेखक त्याच्या मालकीच्या बेटावर जाऊन राहतात.
..आणि मग तिथून जन्माला येते एक नवी कादंबरी. एक नवी सत्यकथा. त्याला भेटल्यानंतर त्याची दोन पुस्तकं आली. द अफगाण आणि कोब्रा. ‘नाइन इलेव्हन’मध्ये विमानं जाऊन वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींना धडकतात. ‘द अफगाण’मधे अख्खीच्या अख्खी, महनीय व्यक्तींनी भरलेली बोट. तिच्यावरचं संकट टाळतो कर्नल माइक मार्टिन. ओसामाच्या कळपात शिरून त्याची संपूर्ण यंत्रणा माइक समजावून घेतो आणि त्याच्या रूपानं फोर्सिथ ती आपल्यासमोर मांडतो. फोर्सिथ चाहत्यांचा माइकशी चांगला परिचय असतो. कारण द फिस्ट ऑफ गॉडमध्ये त्यानेच महत्त्वाची भूमिका बजावलेली असते. वाईट एवढंच की हा माइक आता परत भेटणार नसतो. अफगाणमध्येच त्याचा शेवट होतो.
अलीकडेच त्याचं ताजं पुस्तक आलंय. द कोब्रा. अमली पदार्थाची निर्मिती, त्याचा व्यापार याचं हिंस्र जग या पुस्तकातून समोर येतं. आणि कळते त्या जगावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरू असलेली देशोदेशींची चढाओढ. फोर्सिथची सगळी वैशिष्टय़ं यातही आहेत. साहजिकच जन्माला येताना त्याची पुस्तकं पहिली आवृत्ती पंधरा लाखाची, वगैरे असं मिरवत येतात.
पण तरीही फोर्सिथ रूढ अर्थानं लेखक नाही. एका अर्थानं बरंच आहे ते. फोर्सिथला एकच माहितीये. आपल्या वाचकांना प्रश्न पडला पाहिजे- याला आधीच कसं काय कळलं, हा!
तो प्रश्न त्याची पुस्तकं आजही पाडत असतात.


 गिरीश कुबेर
girish.kuber@expressindia.com

[ Frederick Forsyth, CBE (born 25 August 1938) is an English author and occasional political commentator. He is best known for thrillers such as The Day of the Jackal, The Odessa File, The Fourth Protocol, The Dogs of War, The Devil's Alternative, The Fist of God, Icon, The Veteran, Avenger, The Afghan and The Cobra.]

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...