Wednesday, February 25, 2009

मार्टिन जॉन्सन ओसा जॉन्सन हे एक जगावेगळे अमेरिकन जोडपे.
मार्टिन हा हौशी छायाचित्रकार. ऐन विशीत तो विख्यात प्रदेश-संशोधक जॅक लंडन याच्याबरोबर जलमार्गाने जगपर्यटन करून आला. त्याच्या पराक्रमावर मोहित होउन ओसाने मार्टिनशी लग्न केले. एवढेच नव्हे तर लग्नानंतरओसाने त्याच्याबरोबर सातासमुद्रापलीकडे एकूण सहा वेळा धाडसी पृथ्वीप्रदक्षिणा केल्या. त्याच्या जोडीने तीअज्ञात निसर्गाशी झगडली, हिंस्रश्वापदांना सामोरी गेली, आणि निबिड़ अरण्यातल्या आदिवासी नरभक्षकांच्या जबड्यातही खुशाल उतरली ! मार्टिनने शेकडो स्थिर छायाचित्रे घेतली , हजारो फूट लांबीचे चलचित्रपट तयार केले. ओसाने आपल्या धाडशी अनुभवांवर काही पुस्तके लिहिली. त्यांपैकीच ही तिची स्वत:ची अत्यंत नाट्यपूर्ण आत्मकथा !

I Married Adventure
या ओसा जॉन्सन यांच्या पुस्तकाचा संक्षिप्त अनुवाद.
नरभक्षकांच्या जबड्यात !
लेखिका : ओसा जॉन्सन
अनुवाद : रंगा मराठे
राजहंस प्रकाशन

Sunday, February 15, 2009

' Cheaper by the dozen' हे फ्रँक गिलबर्ट या गृहस्थावर त्यांच्या एक मुलाने मुलीने मिळून लिहिलेले पुस्तकचरित्रवजा असूनही, ते इतके मनोवेधक मनोरंजक आहे , की पूर्ण केल्याशिवाय खाली ठेववत नाही.
हे गृहस्थ व्यवसायाने इंजिनियर ! कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कामे कुशलतेने कशी करावीत, यावर ते संशोधन करत त्याचे आपल्या मुलांवर प्रयोगही करून पाहत. खास वेळ खर्चता , स्नान करता-करता, फ्रेंच भाषेच्या टेप्स ऐकवून त्यानी मुलांना उत्तम फ्रेंच बोलायला शिकविले होते. असे अनेक प्रयोग त्यांनी आपल्यामुलांवर केले होते. त्यांची फिल्म त्यावेळी अनेक अमेरिकन चित्रपटगृहांत दाखवली जात असे.
आपल्याकडच्या जास्तीतजास्त लोकांनी ते वाचावे अंमलात आणावे, असे वाटले म्हणूनच त्याचा हा अनुवाद सिध्द करून वाचकांसमोर ठेवला आहे .

'चीपर बाय डझन'
मूळ लेखक : फ्रँक बंकर गिलबर्थ(ज्यूँ.) , अर्नेस्टाईन गिलबर्थ कॅरे
अनुवाद : मंगला निगुडकर
मेहता पब्लिशिंग हाऊस

Thursday, February 5, 2009

रानकुत्र्यांच्या सहा टोळ्यांपैकी एका टोळीचे पुढारपण एका एकाक्ष कुत्रीकडे होते. ही मोठी बेरकी, हिकमती, धूर्तहोती. विषारी मांसाला तिने कधी तोंड लावलं नाही. इरुला जमातीनं लावलेल्या सापळ्यात ती कधी सापडली नाही. ती तरूण होती तेव्हा तिने दरवर्षी पिलावळ दिली होती आणि नंतर टोळीचे पुढारपण तिच्याकडे आले होते. सैतानाचा जन्म झाल्यानंतर आणखी दोन वर्षे तिने टोळी सांभाळली. तिच्या राज्याचा कोपरा कोपरा तिला पाठहोता. दिवसभर तिचा वावर असे. ती शिकार एकतर सकाळी करी किंवा संध्याकाळी. तिने कधीही रात्री शिकार केली नाही. आपल्या प्रपेशीचे हे वैशिष्ट्य तिने जपले, टोळीतल्यांना शिकवले. आपली टोळी तिने फारशी मोठी होऊदिली नव्हती. शिकारीवरून मांसाच्या वाट्यांवरून टोळीत कधी भांडण होऊ नये म्हणून तिने ही खबरदारी घेतली असेल. शिकार शोधणे , हेरणे, भक्ष्याची सर्व बाजूंनी नाकेबंदी करणे याबद्दल ती जागरूक असे. एकदा भक्ष्य हेरले की ते कितीही मोठे असो, शूर असो, त्याचा पाठलाग करून त्याला जेरीस आणून ते पाडायचेच अशी तिची पद्धत होती. तिच्या टोळीत एकजूट होती आणि निर्णय तिचा एकटीचा असे. तिची एवढी दहशत होती ,की तिच्या टोळीनेवेढलेले हरण किंवा सांबरच काय पण रानडुक्करही मूढासारखे जमिनीकडे बघत राही, आणि मृत्यूला सामोरे जाई. ही एकाक्षी दिसली की बिबळेसुध्दा छलांग मारून तिच्या टोळीपासून दूर पळत.
पण तिला जाणवत गेले, की आपली ताकद कमी पडू लागली आहे. वेगाने पळाले , उभा चढ़ चढला कीआपल्याला धाप लागते. जीभ तोंडाबाहेर येते, ल्हा ल्हा करते.
एक सकाळी ती हलली नाही. गोल गोल फिरून शरीराचे मुटकुळे करून , शेपटीचा गोंडा खालून वर लपेटून घेत ओघळीतल्या त्यांच्या निवारयाच्या जागी ती रात्री पडून राहिली होती.
सकाळ झाली तरी ती तशीच राहिली. टोळी जरा वेळ घुटमळली. थांबली. भांबावली. मग एक धिप्पाड नर पुढेझाला. त्याने विशिष्ट प्रकारे भुंकून इशारा केला आणि तो निघाला. त्याच्या शेपटीच्या गोंड्याची दिशा धरून दूसरा. त्याच्या मागोमाग तिसरा. बघता बघता सहा माद्या आणि नऊ नरांची ही टोळी निघून गेली. मागे तळावर एक अगदी टेकलेली मादी आणि तरण्या दोन माद्यांची मिळून पंधरा पिले होती. एकाक्षीने तळाचा ताबा घेतला .पिलांना दिवसभर सांभाळले. सायंकाळी शिकार करून , परस्पर खाऊन टोळी परतली. त्यांनी एकाक्षी प्रसूतीसाठी मागे राहिलेली मादी यांच्यासाठी शिकारीतला त्यांचा हिस्सा आणला.
आता तिचे इथून पुढे जितके आयुष्य असेल तितका काल ती तळावरच राहणार होती आणि इतरांची पिले सांभाळणार होती. त्याबद्दल तिचा वाटा तिला पोचता केला जाणार होता. नाहीतरी पिले सांभाळायला अशी ख़बरदार वडीलधारी कुत्री हवीच होती. टोळीची ही निकड तूर्त एकाक्षीन भागवली होती. पुढे दोनतीन वर्षांत तिची जागारिकामी होईल. पण जगाच्या नियमाप्रमाने कोणतीही जागा कायमची रिकामी कधी राहत नाही. ती भरेल. एकाक्षीची स्मृती कोणाला राहणार नाही. आज ती दहा वर्षांची झाली होती. आता तिचे आयुष्य संपत आले होते. ती या रानात दहा पावसाळे जगली. अजून फारतर ती दोनएक पावसाळे जगणार होती. तिच्या स्मृतिसंचयात फारसे काही शिल्लक नव्हते. हातात धरलेली वाळू कणाकणाने मुठीतून झरून जावी तसा आयुष्याचा एकेक क्षण निघून गेला होता : भूक भागवण्यात, तहान शांत करण्यात , थंडी-पावसात रात्री आडोशाच्या जागी आणि कहारी उन्हाळ्यात गार फुफाट्यात शरीराचे वेटोळे करून पडून राहण्यात , दरवर्षी जुगण्यात , पिलांना जन्म देण्यात , त्यांना अंगावर पाजण्यात , पाठलागात , पारध करण्यात . भक्ष्याचे गरम रक्त. ताजे मांस. सावजाचा काढलेलाताणपट्टा. शेवटची झड़प. सावजाची तडफ़ड. रोज नवी शिकार. नवे आव्हान. सगळे रान तिचे होते. ती इथेच जन्माला आली . तिने काही नाही तरी आठएक वेळा वेते दिली. इथेच ती अखेरचा श्वास घेणार होती. तिच्या लेखी भूतकाळ नव्हता आणि तिला भविष्याची चिंता माहितच नव्हती. तिला फक्त वर्तमानक्षण समजत होता. प्रत्येक वर्तमानक्षणासाठी ती जगली होंती.
........
'अरण्यकांड' या कादंबरीतून
लेखक: अनंत मनोहर
मौज प्रकाशन

Related Posts Plugin for WordPress, Blogger...