Monday, July 6, 2020







ग्रामीण जीवनातील किशोरवयीन मुलींचे शेणी गोळा करायला जाणे ही केवळ एक वस्तुनिष्ठ घटना नाही तर त्यामध्ये  विविध प्रकारचे भान एकवटलेले आहे. चंद्रशेखर कांबळे यांचा 'शेणाला गेलेल्या पोरी' या शीर्षकाचा एक वेगळा कवितासंग्रह अलीकडेच प्रकाशित झाला आहे. ग्रामीण जीवनाच्या पार्श्वभूमीवरील किशोरवयीन मुलींच्या भावाजगाचा आलेख या कवितासंग्रहात आहे.
चंद्रशेखर कांबळे यांचा 'शेणाला गेलेल्या पोरी' या शीर्षकाचा एक वेगळा कवितासंग्रह अलीकडेच प्रकाशित झाला आहे. ग्रामीण जीवनाच्या पार्श्वभूमीवरील किशोरवयीन मुलींच्या भावाजगाचा आलेख या कवितासंग्रहात आहे. वास्तविक पाहता मराठीमध्ये ग्रामीण संवेदनानुभवाची भरमसाठ कविता लिहिली जाते आहे. सामाजिक जीवनाचा एक मोठा भाग या प्रकारच्या कवितेतून साक्षात झाला आहे. या पार्श्वभूमीवर 'शेणाला गेलेल्या पोरी' मधील कविता ही एकल विषयसूत्री स्वरूपाची दीर्घकविता आहे.  ग्रामीण जीवनातील किशोरवयीन मुलींचे शेणी गोळा करायला जाणे ही केवळ एक वस्तुनिष्ठ घटना नाही तर त्यामध्ये  विविध प्रकारचे भान एकवटलेले आहे. शेणी या प्रदेशनिविष्ट शब्दासाठी काही भागात वेगळे शब्ददेखील वापरले जातात. नागरी लोकांना 'शेणाला गेलेल्या पोरीं'विषयी कविता असा विषय कविताविषय होऊ शकते हे हास्यास्पद देखील वाटू शकते. जसे केशवसुतांच्या कवितेतील 'म्हैस', 'वाट' असे शब्द ग.त्र्यं. माडखोलकरांना खटकले होते. मात्र ग्रामीण जीवनातील एक लघुक्षेत्र कल्पून त्याविषयीच्या विविध भावनासंवेदना चंद्रशेखर कांबळे यांच्या या कवितारूपातून व्यक्त केल्या आहेत. भूतकाळातील ग्रामीण जीवनातील किशोरवयीन मुलींचे शेणी गोळा करायला जाणयाच्या निमित्ताने त्यांचे भावविश्व  व त्याच्याशी निगडीत  सामाजिक, सांस्कृतिक, सामुहिक भाव  कवितेतून व्यक्त झाले आहेत. 'शेणी'  या शब्दाशी निगडीत अनेक अर्थवर्तुळे या कवितेतून निर्माण केले आहेत.
शेणी गोळा करायला जाणे यास ग्रामीण मुलीच्या आयुष्यटप्प्याला विशेष महत्त्व आहे. सामाजिक रचनेत तिच्या या कालधर्माला व  मनोधर्मातून तिच्या विविध मनोवस्थांचा अवस्था प्रकटलेल्या असतात. तिच्या उभरत्या समजुतीचा अस्तित्वाविष्कार या काळघटनांमध्ये असतो. त्यामुळे  शेणीला जाणाऱ्या मुलींच्या आनंदमय भावावस्थेपासून तिचे कष्ट, दुःख, यातना आणि शोकांत जीवनानुभवाची रूपे या कवितेमधून अभिव्यक्त झाली आहेत. घर, कुटुंब, रान, माळ याच्याशी निगडित विशिष्ट मनोवस्थेतेतील तिचे जगणे साकार झाले आहे. शेणी आणायला जाण्यात तिच्या मनाची आनंदमय भावना आहे. हा अनुभव तिला आरासमय वाटतो. रान फुलासारखे डवरल्याचा आणि रान भरात येण्याचा अनुभव त्यात आहे. तसेच स्त्री जीवनाविषयी ग्रामीण जीवनामध्ये ज्या भारतीयत्वाचा कल्पना अध्याहृत आहेत त्याचा देखील उच्चार या कवितेमध्ये आहे. हा किशोरवयीन काळकृतीधर्म आणि मनोवस्था त्यांच्या 'अस्तित्वा'ला आनंदमयता आणि 'असते'पण प्राप्त करून देणारा आहे. भारतीय परंपरानिष्ठ स्त्रीजीवनाचा पट या संवेदनदृष्टीमागे आहे. त्यामुळेच बाईचं  जोडणं, सांधणं या निर्मितिश्रद्धेचा  साफल्य भावाविष्कार कवितेमध्ये आहे. खेडूत मुलींची निर्भरशीलता, धाडस, स्वातंत्र्य, खेळणं आणि बागडण्याचे कल्पविश्व कवितेमधून साकारले आहे. तसेच 'तिच्या' या 'असण्या'वर  सामाजिक काच, बंधनं, भीतीचा धाकदेखील कवितेतून व्यक्त झालेली आहे. तिच्या आनंदकाळाला भविष्यरुपी दुःखशोकाच्या सावलीची किनार देखील आहे.
मुलींचे आयुष्य हे क्रमशः नष्ट आणि नाहीसे होण्याचे आहे. त्याची तुलना 'मेणबत्ती'शी केली आहे. अरुण कोलटकरांच्या कवितेमध्ये आधुनिक दृष्टीचा एक भाग म्हणून स्त्रीच्या विलयाचा, संपण्याचा संबंध मेणबत्तीच्या नष्ट होण्याच्या पद्धतीतून प्रकट झालेला आहे. त्याचप्रमाणे 'मी एक शेण, तू एक मेण, दोघींच्याही वाट्याला जळ्यायचेच क्षण' असे नष्टचर्य, जळण्याचे, नाहीसे होण्याचे स्त्रीत्वरूप या कवितेमधून व्यक्त झालेले आहे. वेगवेगळ्या बायांचे व बायांविषयीचे 'आवाज' या कवितेतून प्रकट झालेले आहेत. अर्थात हे नाहीसे होणे नैसर्गिक स्वरूपाचे नाही यामागे सामाजिक अवकाशाचा काच आहे. अनैसर्गिक नाहीसे होण्याची दुःखद जाणीव कवितेमध्ये आहे. पोरींच्या आकस्मिक नष्ट होण्याला शोकांताला सामाजिक दाबाव कारणीभूत असत, याचे सूचन कवितेत आहे. तसेच भारतीय परंपरेत असणाऱ्या शेणी किंवा गवऱ्या या शब्दाचे अनेक अर्थध्वनी या कवितेतून सतत निनादत ठेवले आहेत. 'शेणी/ जळताना मरतात/आणि/ पोरी/ जगतानाही मरतात/ आणि जळतानाही मरतात' असा दुहेरी शोकात्मभाव कवितेतून व्यक्त झाला आहे.
त्याचबरोबर या मुलींच्या भावविश्वाला सांस्कृतिक संदर्भाची  जाणीव आहे. ती भारतीय परंपरेतील परंपरेतील पुराकथेशी निगडीत आहे. शेती संस्कृतीतील दिवाळसणातील कृष्ण  गवळणींच्या कथासृष्टीने तसेच शंकर-पारबतीच्या मिथकसृष्टीनी स्त्रियांचे भावविश्व उजळलेले असते. त्यामुळे शेणी गोळा करणाऱ्या पोरींच्या निमित्ताने भारतीय पुराकथेतील सांस्कृतिक जाणिवा प्रकटल्या आहेत. कवितेत सतत  मुली आणि गावसंबंधांचे भावविश्व उभा केले गेले आहे. तसेच या संवेदनदृष्टीमागे भूतकाळातील पोरींच्या हरवलेल्या भावविश्वाचा पाठलाग आहे. वर्तमानात पोरींचे हे भावविश्व नाहीसे झाल्याची दुखरी जाणीव गतकातरतेच्या अंगाने व्यक्त झाली आहे. 'मीही घेतो शोध शेणीला जाणाऱ्या पोरींचा' असा व्याकूळ आठवशोध कवितेत पुन्हापुन्हा आवृत्त झाला आहे. पोरींच्या असतेपणाचा भूतकाळ वर्तमनापासून निखळलेला आहे त्याला साद घालण्याचा हा प्रयत्न आहे.
महात्मा फुले यांच्या 'कुळंबिणीची कहाणीशी नाते सांगणाऱ्या या कवितेमध्ये किशोरवयीन मुलींचे भावजग केंद्रीय स्वरूपात आहे. मुलींची आनंदमयता, सर्जनकार्य, कष्ट, दुःख आणि यातनांचे एक चित्र कवितेतून प्रकटलेले आहे. चंद्रशेखर कांबळे यांच्या या कवितेमध्ये प्रादेशिक जीवनाचे रंग मिसळलेले आहेत. प्रदेशनिविष्टि अनुभवाबरोबरच भाषारूपाच्या बाबतीत देखील कवितेत प्रदेशबोलीरूपे आहेत.        ग्रामीण जीवनातील शेणी गोळा करणाऱ्या पोरींचे सूत्र घेऊन दीर्घ स्वरूपातील ही कविता आहे. एकाअर्थाने पोरीविषयींची ही मनोगते आहे. ती केवळ व्यक्तिविशिष्ट  वा विशिष्ट कृतींचा पट साकार करणारी आहेत असे नव्हे तर त्याच्याशी निगडीत विविध स्वरूपाच्या  भावसंवेदना  व्यक्त करणारी ही कविता आहे. मुली व त्यांच्या भावकृती सामाजिकतेच्या संदर्भात व्यक्त झाली आहे. शेणाला जाणे या कृतीशी निगडीत अनेक अर्थवर्तुळांचा अवकाश या कवितेतून साक्षात केला आहे. दीर्घकवितेच्या रचनाबंधातून ती व्यक्त केली आहे. भाषिक पातळीवर रूपके, प्रतीके, मिथकांच्या रूपातून व्यक्ती आणि समूहाचा अवकाश साकार केला गेला आहे.  या दीर्घकवितेतील क्रियापदांचा वापर अतिशय लक्षणीय स्वरूपात आणि वैशिष्ट्यपूर्णरित्या केला गेला आहे. 'बुचकळतात', 'खळबळतात', 'मळतात', 'घसरतात', पसरतात' अशा अनेक क्रियापदांच्या आवर्तनांमधून या मुलींचा कृतिमनोधर्म प्रकट केला गेला आहे.  मात्र एक विषयसूत्र निश्चित केल्यामुळे त्याच्या आशयाविष्काराला मर्यादा देखील स्वाभाविकच पडतात. विशिष्ट विषयकेंद्रामुळे कवितेतील भावविश्व सतत नियंत्रित केले जाते. तसेच एक प्रकारची सपाट नाट्यात्मक स्वरूपाची सुलभतादेखील  कवितेमध्ये आली आहे. मात्र एका वेगळ्या संवेदनानुभवाची ही कविता आहे. भूतकाळातील मुलींविषयीच्या भावसंबंधाचे विविध पदर तीमधून व्यक्त झाले आहेत. ग्रामीण संवेदनानुभवाची तसेच किशोरवयीन मुलींचा वावरअवकाश, मनोधर्म सामाजिक संदर्भातील तिचे दुःख आणि करूणाभावाची जाणीव  या कवितेतून प्रभावीरित्या आविष्कृत झाली आहे. 
शेणाला गेलेल्या पोरी
चंद्रशेखर कांबळे
दर्या प्रकाशन, पुणे.
पृष्ठे ११२
मूल्य १५०
randhirshinde76@gmail.com

Image & Article Credit:  https://divyamarathi.bhaskar.com/dvm-originals/columnist/news/randhir-shinde-rasik-article-tales-of-poris-brotherhood-127452986.html

Related Posts Plugin for WordPress, Blogger...