Thursday, March 15, 2012

जयप्रकाश सावंत - लोकरंग(लोकसत्ता)


 योगेंद्र आहुजांच्या कथेतला मोठा अवकाश चिंतनाने व विचारांनी व्यापलेला असतो. ते खरोखरच खूप कमी लिहितात. वर्षांला एक किंवा दोन कथा. बस्स. पण त्यांची कथा एखाद्या नियतकालिकात आलीय किंवा येणार आहे, हे कळल्यावर ते नियतकालिक आवर्जून मिळवावंसं वाटतं, हे निश्चित. आहुजांच्या अशा संयमित लेखनामुळे १९५९ साली जन्मलेल्या आणि कॉलेजच्या दिवसांपासून कथालेखन करणाऱ्या हिंदीतील या महत्त्वाच्या कथालेखकाचा ‘अँधेरे मे हँसी’ हा एकच कथासंग्रह अजूनपर्यंत प्रकाशित झालाय. यावर्षी त्यांचा दुसरा संग्रह येऊ घातलाय. आणि त्याबद्दल जाणकार वाचकांना प्रचंड कुतूहल आहे..
ज्ञा नपीठ पुरस्कारविजेते हिंदी साहित्यिक निर्मल वर्मा यांनी योगेंद्र आहुजांना वीसेक वर्षांपूर्वी पाठवलेल्या एका पत्रात लिहिलं होतं- ‘‘तुमच्या कथेची वाट पाहत असतो.. तुम्ही अशा मोजक्या तरुण लेखकांपैकी आहात, ज्यांच्या कथा ‘विचारां’च्या विश्वात आकार घेतात.’’ यात असलेल्या दोन्ही विधानांची सत्यता योगेंद्र आहुजांच्या कथा वाचणाऱ्यांना पटण्यासारखी आहे. आहुजांच्या कथेतला मोठा अवकाश चिंतनाने व विचारांनी व्यापलेला असतो. आणि ते खरोखरच खूप कमी लिहितात. वर्षांला एक किंवा दोन कथा. बस्स. पण त्यांची कथा एखाद्या नियतकालिकात आलीय किंवा येणार आहे, हे कळल्यावर ते नियतकालिक आवर्जून मिळवावंसं वाटतं, हे निश्चित. आहुजांच्या अशा संयमित लेखनामुळे १९५९ साली जन्मलेल्या आणि कॉलेजच्या दिवसांपासून कथालेखन करणाऱ्या हिंदीतील या महत्त्वाच्या कथालेखकाचा ‘अँधेरे मे हँसी’ (भारतीय ज्ञानपीठ- २००४) हा एकच कथासंग्रह अजूनपर्यंत प्रकाशित झालाय. यावर्षी त्यांचा दुसरा संग्रह येऊ घातलाय, ही माझ्यासारख्या योगेंद्र आहुजांच्या चाहत्यांसाठी विशेष आनंदाची बातमी आहे.
‘अँधेरे में हँसी’ला वाचक व समीक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. दोनेक महिन्यांपूर्वीच भोपाळचा ‘स्पंदन’ संस्थेतर्फे देण्यात येणारा ‘स्पंदन कृति पुरस्कार’ या कथासंग्रहाला देण्यात आला. ‘अँधेरे मे हँसी’ला याआधीही दोन प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. या गुणसंपन्न कथासंग्रहातली ‘सिनेमा सिनेमा’ ही कथा कथेत काय काय करता येतं, याचं चकित करणारं भान आणून देणारी आहे. किंबहुना, काही वर्षांपूर्वी तरुण अनुवादक मित्र बलवंत जेऊरकर याने ‘शब्दालय’च्या दिवाळी अंकासाठी केलेला तिचा अनुवाद वाचूनच मी आहुजांच्या लेखनाकडे ओढला गेलो.
उत्तर प्रदेशातील एका छोटय़ा शहराच्या रेल्वे कॉलनीत राहणाऱ्या, कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मित्रांची ही कथा आहे. या दोघांना सिनेमाचं अतोनात वेड आहे. शहराच्या कॅम्प भागात इंग्रजांच्या काळापासून असलेलं एक जुनाट थिएटर आहे. तिथे जाऊन ते मुंबईहून येणारे सिनेमे पाहतात. कॅम्पमधल्या रस्त्यांवरून जीवनानंद दासांच्या कविता, आधीच्या शतकातल्या महान रशियन कादंबऱ्या आणि देशी-विदेशी कृष्णधवल सिनेमा यांच्याविषयी चर्चा करत ते भटकतात. यातला एकजण ही गोष्ट सांगतोय. दुसऱ्याचे वडील रेल्वेत कारकून आहेत. आणि त्याचं त्याच कॉलनीत राहणाऱ्या उच्चपदस्थ रेल्वे अधिकाऱ्याच्या मुलीशी प्रेम जुळलंय. साहजिकच प्रखर विरोध, कानउघाडणी, दमबाजी आणि मारहाणसुद्धा.. या साऱ्या तणावांतून जात हा मित्र एका रात्री त्या मुलीला पळवून नेतो. कथा इथे संपते खरी; पण पुढे आणखी काय घडेल, त्या दोघांचं काय होईल, अशा काळजीचं दडपण वाचकाच्या मनावर ठेवूनच!
या कथासूत्राला जोडून या अठ्ठावीस पानी दीर्घकथेत सिनेमाविषयक जे चिंतन येतं, ते केवळ अपूर्व आहे. नेमाडय़ांच्या ‘बिढार’मध्ये (आता ‘हूल’मध्ये) ‘त्या दिवसांत रेडिओ फारच प्रिय झाला..’ या वाक्याने सुरू होणारं हिंदी सिनेसंगीताविषयीचं चांगदेवचं एक अप्रतिम स्वगत आहे. त्याची आठवण यावी अशा धर्तीचं, तितकंच खोल आणि तितकंच अस्वस्थ करणारं हे चिंतन आहे. उदाहरणार्थ हा एक उतारा पाहा :
त्या सिनेमातल्या नायिका बेहद्द सुंदर होत्या.. त्यांच्या हास्यातून एक तांबूस रंगाचा प्रकाश उमलून पसरे.. सर्व काही स्वच्छ आणि उज्ज्वल करणारा. त्या जीव तोडून प्रेम करत.. मोडून जात नसत- अखेपर्यंत. त्या अनेकदा उदास होत आणि अशावेळी त्या सिनेमागृहाच्या डाग पडलेल्या मलीन पडद्यावर मरण उतरून येई.. त्या सर्व सिनेमांची थीम एकच असे- प्रेम. आणि ज्या काळात ते बनवले गेले होते, त्या काळात हा शब्द अश्लील आणि गलिच्छ झाला नव्हता. ते तर खूप नंतर घडलं. त्यावेळी हा शब्द मृत्यू, करुणा, सौंदर्य आणि सत्य अशा अनेक अर्थानी ओतप्रोत होता. अविचलित आणि अ-नश्वर. पृथ्वीवरच्या प्राचीन कातळांसारखा.
या दोघा मित्रांचं जग कथेतील प्रवासासोबत विस्तारलंय. व्ही. शांताराम, बिमल रॉय, गुरुदत्त यांच्यानंतर त्यांच्या जाणिवेत सत्यजित राय, आइझेन्स्टाइन, तारकोवस्की अवतरताहेत. ते ब्रेख्त आणि लोर्का, नाजिम हिकमत आणि अर्नेस्तो कार्देनाल वाचू लागलेयत. त्यांच्या आजूबाजूचं जग बदलतंय. गोर्बाचेव्ह यांनाही या कथेत महत्त्वाची भूमिका आहे. ते सोविएत संघाचं पतन घडवून आणतायत. या सर्व गोष्टींची गुंफण करत ही कथा एक अद्भुत रूप घेते. कुठल्याही कथाकाराला ‘ही आपण लिहायला हवी होती!’ असं वाटायला लावणारी ही कथा आहे. (आणि माझ्यासारख्या अनुवादकाला ‘आपण हिचा अनुवाद करायला हवा होता!’ असं वाटायला लावणारीही.)
‘सिनेमा सिनेमा’चा मराठी अनुवाद वाचल्यानंतर थोडय़ाच दिवसांत ‘पहल’च्या एका जुन्या अंकात मूळ हिंदी कथाही मिळाली होती. दरम्यान, आहुजांचं एका हिंदी नियतकालिकात आलेलं अतिशय हृद्य आत्मकथनही वाचायला मिळालं होतं. मग ‘अँधेरे में हँसी’ अगदी तातडीने हवंच झालं. आमच्या लोकवाङ्मय गृहाच्या पीपल्स बुक हाऊसद्वारे ते मागवलं. पण हिंदीतले प्रकाशक बऱ्याच वेळा खूप ताटकळत ठेवतात. माझी अस्वस्थता बलवंतने बहुधा आहुजांना कळवली आणि त्यांनी अतिशय आस्थेने मला हा संग्रह सप्रेम भेट म्हणून पाठवला. त्यानंतर काही पत्रांची व पुस्तकांची देवाणघेवाण, अधूनमधून फोनवर बोलणं यातून प्रत्यक्षात एकदाही न भेटता आहुजांशी एक जिव्हाळ्याचा संबंध निर्माण झाला. मध्येच केव्हातरी काम्यूच्या ‘प्लेग’मधली डॉ. रिऊ ( Dr. Riux) ही व्यक्तिरेखा आम्हा दोघांचीही ‘जीवलग’ आहे हे लक्षात आलं; तेव्हा आणखी एका आंतरिक बंधाने आम्ही जोडले गेलो.
आहुजाचं घराणं पाकिस्तानातलं. त्यांचे आजोबा तिथे युनानी पद्धतीने उपचार करणारे हकीम होते. फाळणीच्या वेळी आहुजांनी आत्मकथनात लिहिलंय त्याप्रमाणे ‘रक्ताची नदी पार करून त्यांचा उद्ध्वस्त परिवार’ दिल्लीत आला. प्रथम सफदरजंग मकबरा.. मग किंग्ज कँपमधले तंबू.. नंतर दिल्लीतली निर्वासितांची वसाहत अशी फरफट झाली. मग केव्हातरी वडिलांना रेल्वेत नोकरी मिळाली आणि अन्य कुटुंबीयांना सोडून ते उत्तर प्रदेशात (हल्लीच्या उत्तरांचलात) वस्तीला आले. इथल्या वास्तव्यात फाळणीनंतर बारा वर्षांनी योगेंद्र आहुजांचा जन्म झाला. काठगोदाम, काशीपूर आणि बदायूँमधल्या रेल्वे कॉलन्यांमध्ये आहुजांनी जे बालपण अनुभवलं तेही विलक्षण आहे.
ते १४-१५ वर्षांचे असताना काशीपूरच्या रेल्वे कॉलनीत त्यांना जे मित्र लाभले त्या सर्वाची महत्त्वाकांक्षा एकच होती- लेखक बनण्याची! हे सर्वजण मिळून हस्तलिखित साप्ताहिकं, मासिकं काढत. कोणी कविता लिही, कोणी कथा आणि एखादा क्रमश: कादंबरीही. ‘या साऱ्यातून कोणी लेखक बनला नसता तरच नवल!’ असं आहुजांनी म्हटलंय. या ग्रुपमधला कमाल अहमद हा त्यांचा हीरो : ‘किशोरवयात आयुष्यात आलेला पहिला गंभीर लेखक.’ अत्यंत हुन्नरी. त्याचं त्या कॉलनीतल्या निलोफर नावाच्या परदानशील अप्सरेवर प्रेम बसलं आणि ते उघड झाल्यावर एका रात्री त्याला खूप मारहाण करण्यात आली. निलोफरला तिच्या मामाच्या गावी पाठवण्यात आलं. या प्रत्यक्षातल्या प्रेमकहाणीचा शेवट ‘सिनेमा-सिनेमा’सारखा नव्हता. काही दिवसांनंतर कमाल घर सोडून पळून गेला. कुठे नाहीसा झाला काहीच कळलं नाही. आहुजा लिहितात, ‘अजूनही जेव्हा कधी ते नव्या शहरात जातात, तेव्हा बसच्या किंवा ट्रेनच्या खिडकीतून ते लोकांचे चेहरे निरखून पाहत असतात.’
आहुजांच्या नंतरच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी व्यक्ती होती- निर्मल वर्मा. तरुण आहुजा कथा लिहू लागले होते आणि लिहिल्यावर अभिप्रायासाठी कुठच्या मासिकाला न पाठवता ते निर्मल वर्माकडे पाठवत. निर्मलजीही कथा वाचून स्पष्ट व परखड प्रतिक्रिया देत. हळूहळू त्यांच्यात गुरू-शिष्य स्वरूपाचा पत्रसंवाद सुरू झाला. (यातील निर्मल वर्माची काही पत्रं मध्यंतरी आहुजांनी ‘अकार’ नामक त्रमासिकात छापली होती.) आहुजा निर्मल वर्माना दिल्लीत जाऊन भेटतही. कुतूहलजनक गोष्ट म्हणजे डाव्या विचारसरणीचे विरोधक समजल्या जाणाऱ्या निर्मलजींनीच आहुजांना गजानन माधव मुक्तिबोध या प्रखर मार्क्‍सवादी साहित्यिक-चिंतकाचं लेखन वाचायला भाग पाडलं. आणि आता जगभरातलं उत्कृष्ट साहित्य वाचणाऱ्या आहुजांच्या हृदयात मुक्तिबोधांचं जीवन आणि लेखन यांना परमोच्च स्थान आहे. त्यांच्या कथासंग्रहाच्या शीर्षकातसुद्धा मुक्तिबोधांच्या कवितेचे पडसाद आहेत. निर्मल वर्माशी असलेल्या त्यांच्या संबंधांत मात्र मोठाच अंतराय निर्माण झाला. गुजरात दंगलीनंतर निर्मल वर्मानी ‘असं काय मोठं झालंय गुजरातमध्ये?’ म्हणत भाजपची ज्या तऱ्हेने बाजू घेतली, त्याने आहुजा खूप दुखावले गेले. त्यांनी लिहिलंय, ‘निर्मल वर्माचं त्यांच्या अतिभव्य, सौंदर्यस्नात आणि अपूर्व संवेदनशील भाषेसोबत आपल्या संस्कृतीतील आणि आपल्या काळातील सर्वात कुरूप गोष्टीच्या निकट जाणं मी खोल वेदनेनिशी पाहत राहिलो.’ एक खूप भावोत्कट संबंध संपला. नंतर निर्मल वर्माही गेले. अजूनही आहुजांना त्याविषयी उदास व्हायला होतं. पण जे झालं त्याची अपरिहार्यताही जाणवते.
मुक्तिबोधांच्या ‘अँधेरे में’ या विख्यात कवितेत शहरातल्या एका मिरवणुकीचं वर्णन आहे. या मिरवणुकीत ‘ज्यांचे चेहरे वर्तमानपत्रांत छापून येतात’ अशी शहरातली प्रतिष्ठित आणि विद्वान मंडळी आहेत आणि त्यांच्या खांद्याला खांदा भिडवून तिथला कुप्रसिद्ध खुनी डोमाजी उस्तादही आहे. हे आणखी भयावह पद्धतीने प्रत्यक्षात आलंय. देशातल्या सर्व मोठय़ा जागा आता डोमाजी उस्तादांनी व्यापल्यायत. योगेंद्र आहुजांच्या अलीकडच्या कथांमध्ये हे वास्तव प्रकर्षांने येतं. झपाटय़ाने चकचकीत मॉलमध्ये रूपांतरित होणारी उपनगरं आणि त्यातली वाढती गुन्हेगारी, हिंसा, भय आणि दहशत यांचं अस्वस्थ करणारं दर्शन या कथांमधून होतं. बहुतेक कथांमधल्या घटना या भय वाटायला लावणाऱ्या अंधारात किंवा धुक्यात किंवा पिवळसर अंधुक प्रकाशात घडतात. ‘स्त्रीविमर्श’ शीर्षकाच्या एका कथेत उपनगरं आणि चकाकतं शहर यांच्या सीमारेषेवरचा भाग आहे. एका बाजूला जुन्या नगरातले चाकू-सुरेवाले गुन्हेगार आहेत, तर नव्या शहरातला पोलीस इन्स्पेक्टर वरिष्ठांकडे जाऊन गयावया करतोय, की माझी जुन्या विभागात बदली करा. या नव्या शहरातले, उंच टॉवर्समधले संतांच्या चेहऱ्याचे गुन्हेगार मला कळत नाहीत, त्यांची जास्त भीती वाटते..
अशा अंधाऱ्या वातावरणात योगेंद्र आहुजा हास्य शोधू पाहताहेत. मिळेल का ते त्यांना?

Monday, March 5, 2012

आयुष्याच्या चक्रव्यूहात अडकलेल्या स्टेशनवरच्या मुलांच्या अस्वस्थ करून सोडणाऱ्या कहाण्या सांगणारं ‘प्लॅटफॉर्म नंबर झिरो’ हे अमिता नायडू यांचं पुस्तक.‘समकालीन प्रकाशन’ तर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाचं अंतरंग उलगडणारा लेख.विकासाची वाटचाल यशस्वीपणे करणाऱ्या आपल्या राज्याला-देशाला चपराक बसावी तसं ‘प्लॅटफॉर्म नंबर झिरो’ आपल्या साऱ्यांच्याच डोळ्यात अंजन घालतं.स्टेशनवरची, प्लॅटफॉर्मवरची बेवारस किंवा घर सोडून आलेली मुलं, त्यांचं जगणं म्हणजे यातनाघर. त्यांना तुडविणारे पोलीस आणि मनातून हद्दपार करणारा
ही कलाकृती म्हणजे दहा व्यक्तिरेखांचा संग्रह नाही. प्लॅटफॉर्म- रेल्वेचे रूळ हेच जगण्याचं केंद्र बनलेल्या मुलांच्या बालपणाची ही आघात यात्रा आहे. व्यक्तिचित्र हा लेखिकेने स्वीकारलेला फॉर्म. प्रत्येकाचं इथे येण्याचं प्रयोजन निराळं. त्यांच्या शोककथा वाचकाला कासावीस करतात. मात्र परस्परांचे नातेसंबंध, त्यातील मैत्र आणि शत्रुत्वदेखील वाचकाला हर एक क्षणी थक्क करून सोडतं.




अन्थनी, बिल्लू, केक्या, मुन्ना, झहीर, राणा, किशोर आणि जग्गू, म्हाद्या, शिद्या यांच्या कहाण्या, कुणावर विस्थापनाचं संकट तर कुणी घरातल्या अत्याचाराला कंटाळलेलं. देशातल्या प्रगत-अतिप्रगत भागांतून किंवा दुष्काळी-मागास प्रदेशांतून आलेली मुलं शरीराचा-मनाचा-संवेदनांचा सांधा निखळवणाऱ्या वातावरणात तग धरून राहतात. लेखिकेने हे नकारात्मक चित्रण केलेलं नाही. भडकपणाचा- बटबटीतपणाचा रंग देऊन कुठेही ते कृत्रिमही झालेलं नाही. घटना फारशा घडत नाहीत. मात्र प्रसंगांना सामोरं जाण्याचं बळ या विशीच्या आतील, कधी कधी तर दहा-बाराच्या वयातील मुलांना कसं प्राप्त होतं यामुळे स्तिमित व्हायला होतं.


या मुलांपैकी बरीच छोटा-मोठा माल ट्रेनमध्ये विकणारी. सरकारने दिलेल्या स्टेशनजवळच्या शाळेतल्या खोलीत राहणारी. मिशनने रात्रीच्या जेवणाची सोय केल्याने खूश होणारी ही पोरं. पोलीस डिपार्टमेंट आणि वस्तीतल्या मोठय़ा पोरांना हप्ता देणारी, सकाळपासून रात्रीपर्यंत राब राब राबणारी, कुणी भंगार गोळा करतं, तर कुणी मासिकं-पुस्तकं-प्लॅस्टिकच्या वस्तूंची विक्री. दिवसाला मिळणारे तुटपुंजे पैसे. कोणत्या ना कोणत्या कारणांनी बसणारा मार. मात्र त्यातही ‘कुटुंब’ संकल्पनेला व्यापक बनविणारी ही मुलं वाचकाला अनेक गोष्टी शिकवून जातात.


या सर्व मुलांची घरं दारिद्रय़रेषेखालील, व्यसनी वडील, आई घर सांभाळणारी, आत्याची सुस्थिती पण भावाला आर्थिक मदत न करणारी, त्यात भावाचं आजारपण. त्याच्या इलाजासाठी अँथनी आत्याचे पैसे चोरतो, दवाखान्यात भरतो. आपण केला तो गुन्हा, हे लक्षात आल्याक्षणी घर सोडून पळून जातो. प्लॅटफॉर्मवर राहताना पैशाची बचत करत आत्याचे पैसे परत करून घरी जायचं हे ‘स्वप्न’ बाळगतो. जन्मापासून पांगळ्या असणाऱ्या केक्याला आजी भिकारी बनवते. त्याच्या ‘जिवावर’ खोली घेते. रोज भरपूर कमावणारा केक्या ‘भिकारी हटाव’ मोहिमेमुळे गोत्यात आल्यावर त्याला मारणारा बाप. त्याच्या माराला कंटाळून दुसऱ्या स्टेशनवर लोळत-लोंबत केक्या भीक मागतो. सोनारकाम घरी करताना एक फुंकरीने भडका उडून घर पेटणं, त्यात आई-वडील डोळ्यांसमोर जळणं, मुन्नाची जळालेली कातडी आणि पायाची चिकटलेली बोटं, घराबाहेर असल्याने वाचलेली बहीण, या बहीण-भावंडांना घराबाहेर हाकलणारा चुलता, बहिणीला एका संस्थेत ठेवून पैसे कमावण्यासाठी पळालेला मुन्ना. साथीच्या आजारात झहीरची अम्मी आणि दोन बहिणींचा झालेला मृत्यू, तो धक्का सहन न झाल्याने दारू पिऊन पिऊन स्वत:ला संपविणारे अब्बा. झहीर धाकटा. मोठय़ा बहिणीने नऊ वर्षांच्या झहीरला घरी आणलं खरं. परंतु जीजाच्या मारहाणीला कंटाळून पळालेला झहीर याच प्लॅटफॉर्मवर आलेला. सगळ्यांच्याच कहाणीत घरात बसणारा मार. अठराविश्वे दारिद्रय़, मुलांना सांभाळण्याची कुवत नसणारं कुटुंब, हा समान धागा. परंतु या साऱ्यांचा आक्रोश हे या पुस्तकाचं सूत्र नाही. त्या मुलांमध्ये असणारी व्यावहारिक दृष्टी, त्याचं एकूण वर्तन, त्याचं सरकारी अधिकारी व पोलीस डिपार्टमेंट यांच्याकडून होणारं अतोनात शोषण. या शोषणाचे असंख्य प्रकार. रेल्वे रुळावर कुणाचं बेवारस प्रेत पडलं तर याच कोवळ्या मुलांकडून उचलणं. कुठलीही चोरी-गुन्हा घडला की याच मुलांना तुडवणं, त्यांच्या कमाईत वाटा मागणं, त्यांच्या मित्रांना दुसऱ्या गटातल्या मुलांनी मारणं, हॉस्पिटलात अ‍ॅडमिट करण्याची वेळ आल्यानंतर स्वत:च्या पैशांनी मुलांनी मागवलेल्या पदार्थावर इन्स्पेक्टर मॅडमने ताव मारणं, अधिकाऱ्यांच्या घराचं शिफ्टिंग म्हटल्यावर याच मुलांकडून सामान उचलून घेणं, बंगलेवाल्यांनी त्यांच्या घरासमोरचं गवत साफ करवून घेणं. अनेक दिवसांचे कपडे धुऊन घेणं, कुठल्याशा भाई लोकांच्या मोठय़ा मुलांच्या अत्याचाराला सातत्याने बळी पडणं, लैंगिक शोषण, हा या मुलांच्या आयुष्यातला नित्याचा भाग, हवालदार, इन्स्पेक्टर, एकूणच सरकारी यंत्रणा प्लॅटफॉर्मवरील मुलांशी ज्या अमानुषतेने वागते, त्यातून विघातक शक्तींशी या मुलांचा समेट का नि कसा घडतो हे सहजच लक्षात येतं.


सगळ्यांचंच जगणं असं उसवलेलं असलं तरी त्यात आपला विरंगुळा- आनंद शोधणारी मुलं, त्यांच्यातली शेरो-शायरी, हिंदी चित्रपटांचा प्रचंड प्रभाव, त्यातून त्यांच्या तयार झालेल्या लकबी, माणसांची होणारी पारख, खऱ्या-खोटय़ाची जाण, त्यांचं ‘लाइफ’ आपापल्या व्याख्या घेऊन आलेलं त्यांचं केवळं शरीर आणि निरागस मन अनेकांनी कुस्करून टाकल्याने थोडीफार शिल्लक राहिलेली संवेदना घेऊन जगणारी प्लॅटफॉर्मवरची मुलं.


वाचकाला या पुस्तकातील भाषा भुरळ घालते. त्या मुलांची अभिव्यक्ती.. त्यात शिव्या आहेत. हिंदी येते, पण ‘मुंबय्या.’ क्वचित त्यांची म्हणून बोली त्यात डोकावते. निवेदन आणि संवाद प्लॅटफॉर्मच्या निराळ्या हिंदीने लपेटून घेतले आहेत. भाषेचा हा लहेजा हे या पुस्तकाचं नक्कीच निराळं वैशिष्टय़ ठरेल.


शोषणकर्त्यांबरोबरच समजून घेणाऱ्या दिनेश सरांची व्यक्तिरेखा मुलांबरोबर वाचकाला दिलासा देते. शेकडो करपलेल्या मुलांची भावनिक- शारीरिक- मानसिक गरज जाणून घेणारे सर किंवा त्या मुलांच्या नातलगांपर्यंत त्यांना पोहोचवू पाहणारे अंकल. त्यांच्यासाठी या मुलांचं बाह्य़ वर्तन तिरस्करणीय नसतं, त्यांचं दिसणं, वावरणं, तोंडातल्या अर्वाच्य शिव्या, व्हिडीओ पाहणं, ‘सोल्युशन’ पिणं, तीन पत्तीचा डाव मांडणं, बिडी-सिगारेट फुंकणं, राडा करणं, चोरी करताना पकडलं जाणं या गोष्टींमुळे या मुलांबद्दलची प्रतिमा संवेदनकर्त्यांकडून खराब होण्याचा प्रश्न नसतो. दिनेश सरांना आणि अंकलना मुलांचं जगण्याचं तत्त्वज्ञान ठाऊक असतं. वाचकही या तत्त्वज्ञानाशी समरस होत जातो.


समकालीन प्रकाशनाने शोध पत्रकारितेला प्राधान्य देत गेल्या काही वर्षांमध्ये अनेकांकडून उत्तमोत्तम साहित्य लिहवून घेतलं. हे पुस्तक याच पठडीतलं आहे. लेखिकेचा समकालीन प्रकाशन आणि युनिक फीचर्सशी जवळचा संबंध आहे. स्टेशनवर आयुष्य काढणाऱ्या मुलांबरोबरचं तिचं काम तिला पुस्तकरूपाने प्रसिद्ध करावंसं वाटलं याची लेखिकेने काही कारणं सांगितली आहेत. भारताचं आशास्थान आणि ‘तरुण भारत’ म्हणून गौरवलं जात असलेल्या या लोकसंख्येला आपण कसं वागवत आहोत; त्यांच्याकडे, त्यांच्या गरजांकडे, हक्कांकडे कसं बघितलं जात आहे, हे सांगताना भारतातील सुमारे पन्नास कोटी मुलं जगण्याच्या संदर्भात आपलं बालपण हरवून जाताना दिसतात, असं आकडेवारीवरून ती स्पष्ट करते. आजची आपली व्यवस्था या मुलांना त्यांच्या शिक्षणाचा, विकासाचा हक्क मिळवून देण्यात अंमलबजावणीच्या पातळीवर अपयशी ठरते. हेही लेखिका स्पष्टपणे मांडते. पण यात सर्वसामान्य सुजाण नागरिकाची भूमिका अधिक महत्त्वाची आहे. एखाद्या बिसलेरी बाटलीसारखा या मुलांचा वापर करणारा समाजच त्यांच्या शोषणाला कारणीभूत आहे. बॉम्बस्फोट, एखादा दहशतवादी हल्ला, दंगल यांसाठी या मुलांचा जर वापर झाला तर कारणीभूत कोण, हा नक्कीच विचार करण्यासारखा भाग.


स्टेशनवर सर्वच प्लॅटफॉर्मना क्रमांक असतात. झिरो किंवा शून्य या क्रमांकाचा प्लॅटफॉर्म अस्तित्वात नाहीच. या मुलांचा प्रवासच शून्यापासून शून्याकडे जाणारा, त्यांचा जगण्याचा प्लॅटफॉर्मच समाजाने काढून घेतलेला, या अर्थाने ‘प्लॅटफॉर्म नंबर झिरो’ हे सूचक शीर्षक. या पुस्तकातील छायाचित्रं, मुखपृष्ठ, एकूण मांडणीचं श्रेय श्याम देशपांडे यांचं. त्यामुळेच दाहक वास्तवाची जळजळीत धग वाचकाला अनुभवता येते. पुस्तकाच्या संहितेचं डॉ. सुहास कुलकर्णी आणि अमृता वाळिंबे यांनी केलेलं उत्तम संपादन या पुस्तकाला अधिक वाचनीय बनवतं. चक्रव्यूहात अडकलेल्या या मुलांची सुटका पुस्तक वाचल्यानंतर तात्काळ होणं शक्य नाही. मात्र, सुटकेचा विचार मनात आला तरी अशा पुस्तकांची उपयुक्तता जाणवेल हे नक्की.


-वृन्दा भार्गवे


प्लॅटफॉर्म नंबर झिरो 
-अमिता नायडू 
समकालीन प्रकाशन,पुणे
पृष्ठे : १५८ / मूल्य : १५० रुपये.

हे पुस्तक सवलतीत खरेदी करण्यासाठी इथे भेट द्या!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...