Tuesday, December 27, 2011


-प्रशांत दीक्षित,लोकसत्ता ग्रंथविश्व


शिवाजी : हिज लाइफ अ‍ॅन्ड टाइम्स’ हा इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळेलिखित ग्रंथ परममित्र प्रकाशनातर्फे लवकरच प्रसिद्ध होत आहे. हजार पानांच्या या ग्रंथात तत्कालीन अनेक नकाशे आणि दुर्मीळ चित्रेही समाविष्ट आहेत. ‘खुतूत ए शिवाजी’ या पर्शियन पत्रसंग्रहातील काही पत्रांच्या छायाप्रतीही त्यामध्ये आहेत.  या ग्रंथाच्या निमित्ताने इतिहासकार गजानन मेहेंदळे यांच्याशी शिवराय आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वासंबंधात केलेल्या या मनमुक्त गप्पा..


सच्च्या इतिहासकाराबरोबर गप्पा मारण्याचा आनंद काही वेगळाच असतो. जातिवंत इतिहासकार हे फक्त अस्सल कागदपत्रांतूनच बोलतात. तत्कालीन मूळ नकाशे, आकडेवारी यांची साथ घेतात. अभ्यासातील अपुऱ्या जागा वास्तववादी तर्क चालवून भरून काढण्याचा प्रयत्न करतात. तर्क चालविण्यासाठी ते बखरींचा आधारही घेतात, परंतु स्वत: मात्र बखर रचित नाहीत. असे इतिहासकार भूतकाळाचे आकर्षक, भावनोत्कट चित्र रंगवीत नाहीत. मात्र, त्यांच्या अभ्यासातून भूतकाळाबद्दलची माणसाची जाण आपोआपच वाढते. बखरकारांप्रमाणे इतिहासकार भूतकाळ साक्षात् जिवंत करू शकत नसले तरी त्यांच्यामुळे भूतकाळाची आजच्या काळाशी सांगड घालता येते आणि त्यातूनच भविष्याचा वेधही घेता येतो. असे इतिहासकार लोकप्रिय होत नाहीत, परंतु मैफिली गाजविणाऱ्या बखरकारांहून त्यांची कामगिरी खूपच मोलाची असते.
गजाजन मेहेंदळे यांची जातकुळी ही अशा सच्चा इतिहासकारांची आहे. गेली ४० वर्षे या माणसाने एकच ध्यास घेतला.. शिवाजीमहाराज समजून घेण्याचा! या ४० वर्षांत दिवसातील कित्येक तास शिवकाळाच्या विविध पैलूंचा अभ्यास करण्यात त्यांनी घालविले. हजारो कागदपत्रे नजरेखालून घातली. ग्रंथालये धुंडाळली. पायपीट केली. व्यक्तिगत उन्नतीकडे पूर्ण दुर्लक्ष करून झपाटल्यासारखे ते या शिवकाळाचा शोध घेत राहिले. त्याबद्दलच्या नवनव्या गोष्टी ते उजेडात आणत राहिले. त्यांनी व्यासपीठे गाजविली नाहीत की इतिहासविषयक परिषदांनाही ते उपस्थित राहिले नाहीत. फुटकळ लिखाण करून लोकप्रिय होण्याच्या फंदातही ते पडले नाहीत. मात्र, अखंड मेहनत घेऊन शिवकाळाबद्दलचा मजबूत दस्तावेज त्यांनी दोन खंडांत दहा वर्षांपूर्वी प्रकाशित केला. अर्थातच अन्य शिवचरित्रांप्रमाणे तो रसाळ नाही, चटकदार नाही. राजकारण्यांना उपयोगी पडेल असे त्यात काही नाही. मात्र, त्यातील तळटीपा, संदर्भ नुसते चाळले तरी इतिहास संशोधन ही काय चीज असते याची कल्पना येते. महाराजांनी राज्य कसे उभे केले, याचा बारीकसारीक तपशील या दोन खंडांत मिळतो. हा तपशील जरी रूक्ष वाटला तरी अवघ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात शिवाजीमहाराज ही व्यक्ती इतिहासावर खोल ठसा उमटवून जाण्यासारखी कामगिरी कशी करते याची माहिती यातून मिळते. अशावेळी शिवाजीमहाराजांची थोरवी एखाद्या दैवतापेक्षाही मोठी भासते आणि महाराज हा गप्पांचा, मते मिळविण्याचा विषय नसून कार्यक्षमतेने कारभार कसा करावा, हे त्यांच्याकडून शिकण्याचा विषय आहे हे कळते.
गजानन मेहेंदळे यांनी लिहिलेले महाराजांचे द्विखंडात्मक चरित्र प्रसिद्ध होऊन दहा वर्षे झाली. आता इंग्रजी भाषेत लिहिलेले त्यांनी लिहिलेले चरित्र प्रसिद्ध होत आहे. सुमारे हजार पानांच्या या ग्रंथात महाराजांचा काळ व महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाची उकल मेहेंदळे यांनी केली आहे. यानिमित्ताने त्यांच्याशी गप्पा मारण्याचा योग आला आणि महाराजांचे असामान्य व्यक्तित्व समजून घेण्यात दोन-अडीच तास कसे गेले हे कळले नाही.
‘१९७२ सालापासून मी शिवाजीमहाराजांचा अभ्यास करतो आहे..’ मेहेंदळे सांगू लागले.. ‘७२ साली मार्च महिन्यात मी महाराजांविषयी गंभीरपणे वाचायला सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत असा एकही दिवस उगवलेला नाही, की ज्या दिवशी मी शिवाजीबद्दल अभ्यास केला नाही. असा एकही दिवस नाही. तरीही अजून बराच अभ्यास बाकी आहे असे वाटते..’
‘लष्करी इतिहास’ हा खरा तर मेहेंदळे यांच्या अभ्यासाचा विषय. शाळेत असल्यापासूनच त्यांना लष्करी इतिहासाचे वेड होते. याबाबत कुलकर्णी या आपल्या इंग्रजीच्या शिक्षकांचे ते आभार मानतात. त्यांनी लहान वयातच इंग्रजी इतके घटवून घेतले, की इंग्रजी ग्रंथ वाचणे मेहेंदळे यांना कधीच जड गेले नाही. महाविद्यालयात प्रवेश करतानाच त्यांनी दुसऱ्या महायुद्धावरील चर्चिलचे खंड वाचून काढले होते. लष्करी इतिहास या विषयात एम.ए.ला ते पहिले आले. ‘वर्गात तीसच विद्यार्थी होते. पण ३०० असते तरी मीच पहिला आलो असतो!,’ असे ते आत्मविश्वासाने म्हणतात.
त्यांना पदवी हाती पडत असतानाच बांगलादेशातील युद्ध-घडामोडी सुरू झाल्या होत्या. त्या पाहण्यासाठी युद्धपूर्वकाळात आणि नंतर प्रत्यक्ष युद्धकाळात पाकिस्तानच्या दोन्ही सीमांवर मेहेंदळे पोहोचले. पाकिस्तानच्या अंतर्भागातही ते जाऊन आले. मूळ विषयाचा सखोल अभ्यास आणि त्याला प्रत्यक्ष पाहणीची जोड यातून या युद्धावर त्यांचे एक पुस्तक तयार झाले. परंतु नियमानुसार परवानगीसाठी ते लष्कराकडे पाठविण्यात आले. तेव्हा लष्कराने त्यातील काही तपशील त्यांना गाळण्यास सांगितले. मेहेंदळे यांनी त्यास नकार दिला आणि ते पुस्तक निघालेच नाही. या प्रकरणामुळे आलेले वैफल्य घालविण्यासाठी त्यांनी शिवाजीवर एक छोटे पुस्तक लिहिण्याचे ठरविले. लष्कराच्या स्टाफ कॉलेजमधील अभ्यासक्रमात ‘शिवाजी’ हा दहा मार्काचा विषय होता. त्या परीक्षेला उपयुक्त होईल असे गाईडवजा पुस्तक लिहिण्याचा मेहेंदळे यांचा मानस होता. अशा फुटकळ कारणासाठी त्यांनी शिवकाळात डुबी मारली, पण त्यातून अद्यापि ते बाहेर आलेले नाहीत.
‘या विषयाने मला अक्षरश: झपाटून टाकले. इतिहास संशोधक मंडळात मी अनेक कागदपत्रे तपासू लागलो. लष्करी इतिहासाचा मी एम. ए. असलो तरीही  इतिहास संशोधनाची मला माहिती नव्हती. मार्गदर्शन करण्यासाठी कोणी गुरूही नव्हता. दत्तो वामन पोतदार, ग. ह. खरे असे दिग्गज आजूबाजूला असले तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे दडपण येत असे. मग स्वतच अभ्यास सुरू केला. शिवकालीन कागदपत्रे वाचण्यासाठी मोडी, फार्सी, उर्दू शिकलो. काही प्रमाणात पोर्तुगीज भाषाही शिकलो. विषयाची आवडच अशी लागली, की कोणतीही भाषा शिकणे जड गेले नाही. शिवाजी समजून घेण्यासाठी स्वाहिली शिकणे आवश्यक आहे असे जर मला वाटले तर मी उद्यापासून स्वाहिली भाषेचाही अभ्यास सुरू करीन..’ अभ्यासाबाबत अशी इच्छाशक्ती केवळ जातिवंत इतिहासकाराकडेच असते.
या अभ्यासातून मेहेंदळेंना महाराज कसे दिसले? महाराजांच्या कोणत्या गुणांनी त्यांना भारून टाकले?
‘महाराजांचे सतत उद्योगी, दीघरेद्योगी व्यक्तिमत्त्व..’ मेहेंदळे सांगू लागतात.. ‘पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे स्वराज निर्माण करावे याची ‘खरी’ इच्छा त्यांच्याकडे होती. इच्छा प्रत्येकालाच असतात. आपण बरेच काही करावे असे प्रत्येकाला वाटत असते. पण या इच्छा खोटय़ा असतात. खरी इच्छा बाळगली तर जगात बरेच काही शक्य आहे. स्वराज मिळते का हे जमले तर पाहू, असे शिवाजी म्हणत नव्हता. लहान वयातच त्याच्या मनात ही इच्छा आली आणि ती दिवसेंदिवस अधिकाधिक प्रज्ज्वलित होत गेली..’
‘मात्र तेवढय़ानेच भागत नाही. महाराजांमध्ये अनेक गुणांचे सुंदर मिश्रण झाले होते. असा गुणसंयोग सहस्रकात एखाद्याच्याच वाटय़ाला येतो. म्हणूनच शिवाजीच्या जवळपास जाणारा अजून जन्माला आलेला नाही असे मला प्रामाणिकपणे वाटते. शिवाजीकडे असलेल्या अनेक गुणांपैकी तीन गुण अत्यंत महत्त्वाचे. क्षमता, चारित्र्य आणि संवेदनशीलता. नीतिमत्तेचे, सदाचाराचे सतत वाढत गेलेले प्राबल्य हा महाराजांच्या आयुष्याचा एक विशेष होता. या प्राबल्यामुळे धैर्य, हिंमत या गुणांची ताकद कित्येक पट वाढली. त्यांच्या गुणांचे नैतिक दडपण शत्रूवरही पडलेले दिसते. मग स्वकीय त्यांच्यासाठी जीव देण्यास तयार झाले यात आश्चर्य ते काय! आग्रा येथील महासंकटातून महाराज बाहेर पडले ते या नैतिक गुणांमुळेच. स्वकीय व परकीय अशा दोघांवरही महाराजांनी अधिकार निर्माण केला तो या गुणांमुळेच!’
‘या गुणांना जोड होती ती संवेदनशीलतेची. दुसऱ्याच्या मनात आत्मीयता निर्माण करणे महाराजांना सहज जमत असे. हा माणूस आपली कदर करतो, आपली काळजी घेतो, असे प्रत्येकाला वाटे. प्रत्येक युद्धात कमीत कमी मनुष्यहानी होईल, याकडे ते लक्ष देत. त्यानुसारच लढाईची आखणी करीत. त्यामुळे सैन्यातही राजांबद्दल विश्वास होता. हा आपल्याला अनाठायी बळी चढवणार नाही, ही खात्री सैन्याला होती. याउलट, मोगलांच्या मोहिमांमध्ये रक्तामासांचा चिखल होई. बेदरकारपणे युद्धात सैन्याला लोटले जाई. महाराजांनी असे कधीही केले नाही.’
दुसऱ्याबद्दल संवेदनशील असल्यामुळे महाराजांचा- आजच्या भाषेत बोलायचे तर ‘ह्य़ुमन इन्शुरन्स’ बराच मोठा होता. त्यांच्या आयुष्यात वारंवार याची प्रचीती येते. आग्रा येथे औरंगजेबाचे निकटवर्तीयही महाराजांच्या बाजूने बोलताना आढळतात. हे घडण्याचे दुसरे कारण संभवत नाही. खुद्द औरंगजेबही महाराजांबाबत तितकासा दुष्टपणे वागलेला आढळत नाही. पुढे महाराज निसटले व राजगडावर पोहोचले. त्यानंतर त्यांचे दोन सहकारी उत्तरेत औरंगजेबाला सापडले. मुगल हेरखाते प्रमुखाच्या नातेवाईकाकडे ते लपून बसले होते. महाराजांचा ‘ह्य़ुमन इन्शुरन्स’ यावरून लक्षात येईल. मामुली शिक्षा करून औरंगजेबाने त्यांना सोडून दिले.’
यातून विषय निघाला तो आग्रा येथून झालेल्या महाराजांच्या सुटकेचा! आग्य््रााहून कोणत्या मार्गाने महाराज स्वराज्यात आले, याचा कोणताही ठोस पुरावा वा तपशील उपलब्ध नाही, असे मेहेंदळे सांगतात. तसा तो मिळणे आता शक्यही नाही. मात्र, साधारणपणे २५ ते ३० दिवसांत महाराज इथे आले, याबाबत इतिहासकारांत बऱ्यापैकी एकमत आहे. रोज जवळपास ६० कि. मी. दौड महाराजांनी केली असावी. असे करणे शक्य आहे. याबाबत रशियन सेनानी झुकॉव्ह याचा संदर्भ मेहेंदळे देतात. दुसऱ्या महायुद्धात नाव कमावलेला हा सेनानी पहिल्या महायुद्धात घोडदळात अधिकारी होता. त्याने सतत महिनाभर रोज ८० कि. मी. दौड मारली होती. तीही एका घोडय़ावर! यासाठी असामान्य शरीरशक्ती लागते. महाराजांनी अशीच दौड मारली असावी. कदाचित त्यांनी घोडे बदलले असतील. काही माणसे त्यांनी आग्य््रााहून पुढे पाठविली होती. त्यांनी घोडय़ांची सोय केली असेल. आग्य््रााहून परतल्यावर महाराज खूप आजारी पडले. प्रवासात झालेले अतोनात श्रम याला कारणीभूत असावेत.
सेनापती व मुत्सद्दी अशी दोन्ही अंगे महाराजांमध्ये एकवटली होती. मेहेंदळे त्याबाबत भरभरून बोलतात. महाराजांच्या आयुष्याचे तीन महत्त्वाचे टप्पे मानले जातात. यापैकी पहिल्या टप्प्यात त्यांनी सामथ्र्य जमा करीत नेले. सामथ्र्य व साहस याच्या जोडीने दुसऱ्या टप्प्यात त्यांनी अनेक संधी साधल्या आणि आपले राज्य विस्तारत नेले. हा खूप दगदगीचा काळ होता. यात काही वेळा त्यांना अपयशही आले. मात्र, याच काळात महाराजांच्या अंगचे गुण अधिकाधिक उंचावत गेलेले आढळतात. त्या बळावर तिसऱ्या टप्प्यात महाराजांनी त्यांना हव्या तशा संधी स्वतच निर्माण केल्या. परिस्थितीला आपल्याला हवे तसे वळण लावले आणि दक्षिणेपर्यंत स्वराज्य वाढवीत नेले. आलेली संधी साधणे हे सेनापतीचे काम, तर संधी निर्माण करणे हे मुत्सद्दय़ाचे काम. आपल्याला हव्या तशा संधी मुत्सद्दी कशा निर्माण करतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराजांची दक्षिणेची मोहीम! महाराजांचे त्यावेळचे डावपेच मेहेंदळे यांच्याकडून ऐकताना मन थक्क होऊन जाते. त्या एका वर्षांत महाराजांनी ४० किल्ले घेतले, तर मोगलांना फक्त दोन किल्ले घेता आले.
विस्मयकारक वाटाव्यात अशा हालचाली करणे आणि सैन्याला गतिक्षम ठेवणे हे सेनापती म्हणून महाराजांचे वैशिष्टय़ होते. ‘शत्रूला ते थक्क करीत..’ मेहेंदळे सांगतात.. ‘याला जोड होती ती गुप्ततेची. ही गुप्तता केवळ हालचालींची नव्हे, तर हेतूंची गुप्तता. शिवाजी काय करीत असावा, ही विवंचना करण्यातच शत्रूचा बराच वेळ जाई. महाराज आपल्या हेतूंचा थांग शत्रूला लागू देत नसत.’
जदुनाथ सरकार यांच्यासारख्या इतिहासकारांनी शिवाजीमहाराजांबद्दल अनेकांचे मत कलुषित करून ठेवले आहे. मराठी कागदपत्रांचा अभ्यास न करता सरकार यांनी बरेच निष्कर्ष काढले आहेत. त्यामुळे मराठय़ांची ‘लुटारू’ अशी प्रतिमा उत्तर भारतात तयार झाली. याबाबत विचारता मेहेंदळे म्हणाले की, ‘महाराजांनी सुरत लुटली. अन्य काही लुटीही केल्या. मात्र, त्याची खोलवर कारणमीमांसा कोणी केली नाही. त्यामागे आर्थिक कारणे होती. त्यावेळी मुघलांचा वार्षिक महसूल २२ कोटी रुपयांचा होता, तर महाराजांचा जेमतेम एक वा सव्वा कोटीचा होता. मुघलांकडे दोन लाख खडे सैन्य होते. त्या हिशेबाने महाराजांकडे १० हजारांचे सैन्य असणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ते ४० हजार होते. आता या ४० हजार इतक्या सैन्यासाठी पैसा उभा करणे आवश्यकच होते. स्वातंत्र्याकरता मोठय़ा सत्तेविरुद्धात युद्ध करायचे ठरविले तर लहान सत्तेला लूट करावीच लागते. तेव्हा नैतिक प्रश्नांची ऐतिहासिक प्रश्नांशी गल्लत करता कामा नये.’
..मेहेंदळेंशी गप्पांचा हा ओघ सुरूच राहतो. त्यातून अनेक अंगांनी महाराजांचे चरित्र उलगडत जाते. हा ओघ थांबणारा नसतो. शिवाजीमहाराजाचे गुण सांगावे तेवढे थोडेच. मग सर्वाधिक गुणवैशिष्टय़ कोणते, असे विचारले असता मेहेंदळे चटकन् म्हणाले की, ‘आपले राज्य स्थापन करणे हा महाराजांचा गुण होताच; पण राज्य स्थापन केल्यावर ते चालवायचे कसे, याचा स्पष्ट कार्यक्रम त्यांनी तरुणपणातच तयार केला होता. हे त्यांचे वैशिष्टय़ आगळेवेगळे आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी स्वतची मुद्रा घडविली. ती पुन्हा कधीही बदलावी लागली नाही. त्यामध्ये भर घालावी लागली नाही. फेरफार करावा लागला नाही. आयुष्यात आपल्याला काय करायचे आहे, याबद्दलची इतकी स्पष्ट कल्पना अन्य कुणा ऐतिहासिक व्यक्तीमध्ये आढळून येत नाही. अशी निसंदिग्धता व त्यानुसार वर्तन हा शिवाजीमहाराजांचा फार मोठा गुण मला वाटतो..’     

इतिहासकारांची उदार दृष्टी
पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये बसून गजाननराव मेहेंदळे यांचे सर्व संशोधन सुरू असते. सदाशिव पेठेतील या दगडी वास्तुबद्दल मेहेंदळ्यांना खूप आत्मीयता आहे. या वास्तुने थोर इतिहास संशोधक पाहिले. त्यांच्याबद्दल मेहेंदळे अतीव आदराने बोलतात. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे हे तर ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. मेहेंदळेंना त्यांचा सहवास लाभला नाही, परंतु दत्तो वामन पोतदार यांची भाषणे त्यांनी ऐकली. ग. ह. खरे यांचे काम त्यांनी जवळून पाहिले. मोडी लिपीतील तज्ज्ञ माधवराव ओंकार यांच्याबरोबर त्यांनी काम केले. ‘मोडीच्या अभ्यासामुळे देवनागरी वाचायला वेळ मिळत नाही,’ असे सांगणारे ओंकार किंवा ‘आयुष्यातील एकही क्षण मी फुकट घालवला नाही,’ असे ठामपणे सांगणारे खरे यांच्या व्यक्तिमत्त्वांचा मेहेंदळेंवर खूप परिणाम झाला. दत्तो वामन पोतदार यांनी शिवचरित्र लिहिले नाही याबद्दल त्यांच्यावर टीका केली जाते. पण इतिहास संशोधन मंडळ उभे करण्यासाठी पोतदारांनी भरीव काम केले याचा मात्र टीकाकारांना विसर पडतो. या कामाचे अनेक दाखले मेहेंदळे देतात. पण त्यांना सर्वात महत्त्वाचा वाटतो तो पोतदारांचा उदार दृष्टिकोन. यासंबंधातील एक आठवण मेहेंदळेंनी सांगितली.
जदुनाथ सरकारांची मराठय़ांच्या इतिहासाबद्दल स्वल्पदृष्टी होती. त्याबद्दल त्यांचा मराठी इतिहासकारांनी जोरदार प्रतिवादही केला. मात्र, इतिहासकार म्हणून सरकारांबद्दल सर्वाना आदरच होता. गो. स. सरदेसाई हे सरकारांच्या प्रभावाखाली असल्याने त्यांचेही मराठी इतिहास संशोधकांबद्दल फारसे चांगले मत नव्हते. तरीही भारत इतिहास संशोधक मंडळात त्यांचे छायाचित्र लावण्याचा निर्णय घेण्यात आला. हे ऐकल्यावर सरदेसाई अस्वस्थ झाले. आपल्याशी मतभेद असूनही ही संस्था आपला सत्कार कसा काय करते, असा प्रश्न त्यांना पडला. तेव्हा दत्तो वामन पोतदार त्यांना म्हणाले, ‘मतभेद असले म्हणून काय झाले? अहो, पैलवानाचा फोटो हा तालमीतच पाहिजे.’
भारत इतिहास संशोधन संस्था ही अभ्यासाची तालीम असून इतिहास संशोधनाचे सरदेसाई हे पैलवान आहेत, असे पोतदार यांनी मोठय़ा मनाने मान्य केले होते.

शिवराज्याचा कारभार
शिवाजीमहाराज कारभार कसा करीत, याचे अनेक तपशील मेहेंदळे सांगतात. महाराजांचे अष्टप्रधान मंडळ असले तरी त्यांचे काम सल्ला देण्यापुरतेच होते. निर्णय महाराज स्वतच घेत, असे मेहेंदळे यांचे ठाम म्हणणे आहे. हे मंडळ वास्तविक मंत्र्यांचे नसून सचिवांचे होते. आजचे सचिव जसे काम करतात तसे हे अष्टप्रधान मंडळ काम करी. ते महाराजांना माहिती पुरवीत, परंतु निर्णय हा शिवाजीचा स्वतचा असे.
बारीकसारीक तपशिलावर महाराजांची नजर असे. अनेक पत्रांमधून ही गोष्ट लक्षात येते. आपली मर्यादा सोडून काम केलेले महाराजांना खपत नसे. अगदी पाटीलकीच्या व्यवहारातही महाराज लक्ष घालीत. करंजा वाडीच्या पाटलांना महाराजांनी एक सणसणीत पत्र लिहिले होते. पाटलाने मागचा-पुढचा विचार न करता स्वतंत्रपणे निर्णय घेणे महाराजांना पसंत पडले नाही. ‘साहेब माणसाचे माणूस ओळखतो,’ असा इशारा त्यांनी पाटलांना दिला व सांगितल्याप्रमाणेच काम करण्याचा आदेश दिला.
व्यवस्थापनशास्त्राचा विचार करता नेत्याने इतक्या तपशिलात जाणे योग्य नाही. ‘कनिष्टांवर काम सोपवून द्या, त्यात लुडबूड करू नका,’ असे आजचे व्यवस्थापनशास्त्र शिकवते. मेहेंदळे याबाबत दुसरा विचार मांडतात. संस्था उभी राहिली की असे करणे योग्य ठरत असेल; पण पायाभरणीचे काम करणारे सर्वच नेते तपशिलाबाबत फार दक्ष असतात. आपल्या कार्याची वीट न् वीट ते स्वत रचत असतात. त्यामुळे ही लुडबूड ठरत नाही. उलट, उत्तम मार्गदर्शन होते. महाराजांसारख्यांना हे शक्य होते याचे मुख्य कारण म्हणजे एकाच वेळी अनेक पातळ्यांवर काम करण्यासाठी आवश्यक असणारी अफाट कार्यशक्ती महाराजांजवळ भरपूर होती. अशी कार्यशक्ती हीसुद्धा थोर नेतृत्वाची खूण असते.
जवळचे आणि लांबचे उद्दिष्ट
स्वराज्यप्राप्तीसारखे दूरचे उद्दिष्ट मनात घट्ट धरून ठेवायचे आणि त्याचवेळी जवळच्या उद्दिष्टांवरील नजरही हलू द्यायची नाही, हे महाराजांना सहज साधत असे. लांबच्या उद्दिष्टांकडे लक्ष ठेवून त्यांची आजची लढाई होत असे. याबाबतची फ्रेंच प्रवाशाने लिहिलेली आठवण मेहेंदळे सांगतात..
कारे नावाचा फ्रेंच प्रवासी मुंबईहून कोकण, हैदराबाद मार्गे दक्षिणेकडे गेला. तो राजापूरला पोहोचला तेव्हा महाराज हैदराबादला होते. राजापुरात त्याची गाठ अण्णाजी दत्तो या महाराजांच्या एका कारभाऱ्याशी पडली. महाराजांच्या या मोहिमेविषयी अण्णाजी दत्तो त्याला म्हणाले की, ‘कधी ना कधी औरंगजेब स्वराज्यावर चालून येणार याची महाराजांना खात्री आहे. त्याचा मुकाबला करताना हाताशी असावा म्हणून दक्षिणेतील मुलुख आम्ही काबीज करीत आहोत.’
महाराजांनी जिंजीपर्यंत मजल मारली आणि तो किल्ला हस्तगत केला. पुढे औरंगजेबाच्या स्वारीच्या वेळी रामचंद्र अमात्य यांनी याच किल्ल्यात राजाराम महाराजांना नेऊन ठेवले. महाराजांनी काबीज केलेल्या या मुलखामुळेच औरंगजेबाला प्रत्युत्तर देणे पुढच्या काळात मराठय़ांना शक्य झाले.

‘शिवाजी : हिज लाइफ अ‍ॅन्ड टाइम्स’
(लवकरच प्रसिध्द होणार)
-इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे
-परममित्र प्रकाशन 

[This article is  about the Great Maratha Warrior Shivaji.  Shivaji :His Life And Times-This book is written by famous historian  Shri.Gajanan Mehendale From Maharashtra,India.]

Monday, December 5, 2011



आपण राहतो ते शहर आपल्या अनुभवविश्वाच्या केंद्रस्थानी आणून त्याच्या पाश्र्वभूमीवर स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न ओरहान पामुकने आपल्या इस्तंबूल या अतिशय हळव्या पण साजऱ्या लेखनात केला आहे. आपले शहर आणि आपण या एकमेकांना परावर्तित करणाऱ्या दोन प्रतिमा आहोत. शहराचे आणि आपले व्यक्तिमत्त्व एकमेकांशी घट्ट जोडले गेले आहे, ही माणूस म्हणून माझी फार प्रबळ आणि मूळ भावना आहे. त्यामुळे शहरी मानसिकतेतून तयार झालेले उत्तम चित्रपट आणि साहित्य, चित्रकला यांच्यापर्यंत मी हिरीरीने पोहोचतो किंवा ते माझ्यापर्यंत वाट काढत येतात .
‘द ओपन सिटी’ हे पुस्तक माझ्यापर्यंत वाट काढत आलेले आहे. गेले काही दिवस माझ्या लगत असलेल्या काचेबाहेर माझे शहर सरकत जात असताना मी या पुस्तकामध्ये शांतपणे अडकून गेलेलो आहे.
टेज्यू कोल या नायजेरियन वंशाच्या अमेरिकन लेखकाची ‘द ओपन सिटी’ ही पहिली कादंबरी आहे. न्यूयॉर्क शहराविषयी लेखकाने केलेले हे एक हळवे चिंतन आहे. कादंबरीचा नायक ज्युलियस हा एक तरुण नायजेरियन वंशाचा मानसोपचारतज्ज्ञ आहे. त्याच्या न्यूयॉर्क शहरामध्ये चाललेल्या लांब लांब  फेरफटक्यांमधून त्याने स्वत:च्या दुखावलेल्या मन:स्थितीचा अदमास घेण्याची अनुभवलेली प्रक्रिया हा या कादंबरीचा गाभा आहे.
‘द ओपन सिटी’मधील न्यूयॉर्क हे  world trade center  उद्ध्वस्त झाल्यानंतरचे न्यूयॉर्क शहर आहे. ते आजचे आहे त्यामुळे प्रथमत: हे पुस्तक महत्त्वाचे आहे. कारण वर्तमानाविषयी काही सकस असे सापडण्याची शक्यता कादंबरीसारख्या साहित्यप्रकारात कठीण होण्याचा आजचा काळ आहे. त्यामुळे आजचे काही असे मांडताना लेखकाने, पर्यायाने ज्युलियस या नायकाने आपल्या प्रथमपुरुषी निवेदनामधून आपल्या संपूर्ण जगण्याचा घेतलेला प्रभावी असा वेध या पुस्तकात जाणवतो आणि कोणत्याही चांगल्या कादंबरीप्रमाणे सत्य आणि कल्पित वास्तव याच्या सीमारेषा या पुस्तकाच्या बाबतीत धूसर होत जातात. ज्युलियस मूळचा नायजेरियन कुटुंबातला. या मुलाच्या आयुष्याचा प्रवास नायजेरिया मार्गाने बेल्जियम  आणि आता अमेरिका असा सर्वत्र पसरलेला आहे. ज्युलियस सध्या मानसोपचारतज्ज्ञ म्हणून न्यूयॉर्कमध्ये रेसिडेन्सी करीत आहे. नुकतीच नादेजे ही त्याची प्रेयसी त्याच्यापासून दुरावली गेली आहे. आपल्याला अचानक आलेले हे एकटेपण कशातून आले आहे, हे न कळून तो न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर सध्या दिवस-रात्र चालत सुटला आहे. आपण सुशिक्षित, स्वतंत्र आणि बुद्धिमान आफ्रिकन आहोत ही जाणीव त्याच्याबरोबर सतत प्रवास करते आहे. न्यूयॉर्क शहरातल्या पक्ष्यांविषयी, झाडांविषयी, ऋतूंविषयी आणि चित्र-विचित्र माणसांविषयी अतिशय गडद अशी वर्णने करत तो चालला आहे. ही एक चालती कादंबरी आहे, ज्याची सोबत करणे वाचक म्हणून आपल्याला आनंददायक वाटते. सर्वात महत्त्वाची बाब म्हाणजे ही एक कथाहीन कादंबरी आहे. कथेच्या बंधनात न अडकलेले फिक्शन वाचणे हा फार मोकळे करणारा अनुभव असतो.
ज्युलियस हा मानसोपचारतज्ज्ञ असल्याने तो आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचे ताबडतोब विश्लेषण करू लागतो आणि त्या विश्लेषणाच्या प्रक्रियेत तो गुंतत जातो. हा मानसोपचारतज्ज्ञ स्वत: अजिबातच बऱ्या मन:स्थितीत नाही, पण त्याची बुद्धी आणि जाणीव तल्लख आहे. अशा कात्रीत सापडून एकटेपणावर मात करायला शहरभर तरंगत फिरत आपल्या आयुष्याविषयी ज्युलियस आपल्याला जे सांगतो, त्या सर्व विचारांना शांत चिंतनाची लय आहे.
या पुस्तकात अतिशय वेधक व्यक्तिचित्रे आहेत; त्यांपकी एक आहे ज्युलियसचे वयोवृद्ध जपानी गुरू सायटो. डॉक्टर सायटो न्यूयॉर्कमधील आपल्या भल्या मोठय़ा सुंदर सदनिकेत राहतात. आपल्या जुन्या विद्यार्थ्यांपकी कोणीही केव्हाही येऊन आपल्याला भेटावे, गप्पा माराव्यात आणि काही नवी पुस्तके आपल्याला वाचून दाखवावीत या इच्छेने सायटोंनी आपल्या घराचे दरवाजे सतत उघडे ठेवलेले आहेत. ज्युलियसचे प्रोफेसर सायटोंशी फार जवळचे नाते आहे. प्रोफेसर सायटोंच्या आजकालच्या भेटी आणि आठवणी, अनेक दिवसांनी फोन केल्यावर त्यांच्या मृत्यूची मिळालेली बातमी हे या प्रवासवजा कादंबरीतले फार प्रभावी प्रसंग आहेत.
दुसरी व्यक्ती आहे ज्युलियसची आजी, जिला तो बोलीभाषेत ‘ओमा’ म्हणतो. ज्युलियसच्या आईची आई. ओमा ज्युलियसच्या आयुष्यामधून हरवून गेली आहे आणि आत्ता या मोठय़ा शहरात फिरताना अंगावर पाणी पडावे तशा ज्युलियसला ओमाच्या आठवणी येत आहेत. ओमा ब्रुसेल्समध्ये राहते किंवा राहायची. कुटुंबाशी संबंध दुरावल्यानंतर तिचे काय झाले हे ज्युलियसला माहिती नाही. कादंबरीच्या एका टप्प्यावर ज्युलियस तीन आठवडय़ांची सुट्टी काढून ब्रुसेल्सला जातो. आणि फोनच्या जुन्या याद्यांमधून ओमा नावाच्या सगळ्यांना फोन करीत राहतो. न्यूयॉर्कमधले रस्त्यांवरचे प्रवास ब्रुसेल्समध्ये सुरू होतात आणि ज्युलियसचे मन एका शहराचे रूप धारण करते.
ब्रुसेल्समध्ये एक मुस्लीम ज्युलियसचा मित्र बनतो. त्याच्या आयुष्याशी आजचा काळ आणि आपले असणे ज्युलियस पडताळून पाहत राहतो. ते प्रसंग विशेष कौशल्याने लेखकाने या कादंबरीच्या प्रवासात गुंफले आहेत. ‘द ओपन सिटी’ ही अशा प्रकारे समोर येणाऱ्या आणि निघून जाणाऱ्या पात्रांनी गच्च भरलेली कादंबरी आहे.
एका भलत्याच देशात जन्मून न्यूयॉर्कसारख्या मिश्र समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आपण नक्की कोण आहोत, हा अस्तित्वाचा शोध सतत चालू असतो. ज्युलियस आफ्रिकन आहे आणि स्वकष्टावर, बुद्धिमत्तेच्या जोरावर चांगले आयुष्य जगणारा तरुण आहे. त्याची त्वचा वेगळी आहे, पण अंतर्मन वेगळ्याच रसायनाचे आहे, ही जाणीव त्याला सबंध कादंबरीभर प्रश्न निर्माण करीत त्रास देत राहते. कथा नसलेल्या या कादंबरीमध्ये आधुनिक मिश्र शहरी समाजामध्ये तयार होणाऱ्या अस्तित्वविषयक प्रश्नांचे फार मोठे नाटय़ आहे.
वेगळ्या आणि अपरिचित साहित्यिक वंशाच्या लेखकाची ही कादंबरी वाचण्यासारखी का आहे, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या कादंबरीच्या नायकाचा चेहरा कसा असेल, याची कल्पना ही कादंबरी वाचताना आपल्याला करता येत नाही. कादंबरीतल्या प्रत्येक इतर पात्राचे चेहरे आपल्या डोळ्यासमोर येतात, पण ज्युलियस कसा दिसतो, ही कल्पना काही केल्या आपल्याला करता येत नाही. 


-सचिन कुंडलकर ,लोकसत्ता ग्रंथविश्व साठी
kundalkar @ gmail .com 

द ओपन सिटी  : - टेज्यू कोल
रँडम हाऊस पब्लिकेशन, न्यूयॉर्क


Saturday, November 26, 2011


गेली काही वर्षे दहशतवाद हा जगाला भेडसावणारा आणि चिंतित करणारा प्रश्न जिथे-तिथे हिरीरीने मांडला जात आहे. त्याच्या बीमोडाकरिता अब्जावधी रुपयांची बरसात प्रत्येक देश आपापल्या क्षेत्रात करीत आहे. हा दहशतीचा प्रश्न एकदा निकालात निघाला की मग जणू सारे अरिष्ट चिंता मिटून जग आनंदमयी होणार, असे चित्र डोळ्यांपुढे उभे राहते आहे आणि त्यामुळे यापेक्षाही काळजीदायक वास्तवाकडे नकळत आपली डोळेझाक होत आहे. दहशतवादाचा उगम होण्यामागे आहे ते जगातील भयानक दारिद्रय़ आणि निरक्षरता. आज सारा समाज या वस्तुस्थितीला विचारातच घेत नाही. एक तर तो स्वत:च्या कोषात तरी पूर्ण दंग आहे वा दहशतवादाच्या सावटाखाली.
पण सर्व आलबेल वाटणाऱ्या जगातील न दिसणाऱ्या या दारिद्रय़ाची, या निरीक्षरतेची जाणीव मायक्रोसॉफ्टमधील तरुण अमेरिकन व्यावसायिक जॉन वूडने   `Leaving Microsoft to Change The World'   या आपल्या पुस्तकाने जगाला पुन्हा एकदा करून दिली आहे. जॉन वूडचे हे पुस्तक म्हणजे योगायोगाच्या प्रवासाची कहाणी आहे. जॉन हा सुट्टीत नेपाळमध्ये गिर्यारोहण करायला येतो तेव्हा हिमालयाच्या सान्निध्याने अध्यात्माकडे ओढला जातो. सारं जग विसरून तो सुट्टी आनंदाने उपभोगतो. जवळच्या खेडेगावातील एका लहानशा शाळेत तेथील गावकऱ्यांच्या आग्रहामुळे जातो आणि पुढे.. पुढे त्याचे सारे आयुष्यच बदलते.
या शाळेतील एका खोलीत कुलपात बंद करून ठेवलेली मोजकीच तीन-चार पुस्तके म्हणजे शाळेचे ग्रंथालय. रस्त्यावर सहजी रद्दीत मिळणारी ती पुस्तके, पण त्याचं अप्रूप तेथील निरागस मुलांना, त्यांच्या शिक्षकांना अपार, अमूल्य ठेव्याप्रमाणे ती पुस्तके हाच त्या मुलांच्या शिक्षणाचा ध्यास.
जॉन वूड आपल्या पुस्तकात पुढे लिहितो की, ७० टक्के निरक्षरता असलेल्या नेपाळमध्ये एवढय़ाशा खेडय़ातील ही शिक्षणाकरिता तरसणारी मुलं पाहून मला माझं बालपण आठवलं. तिथून निघताना मला गलबलून आलं. ‘सर, तुम्ही परत या, पण येताना पुस्तकं घेऊन या,’ या विनंतीनं तर मी अश्रूमय झालो. त्यांना पुस्तके आणण्याचं आश्वासन मी दिलं तर खरं, पण त्यांच्या पुढच्या वाक्यांनी जमिनीवर वास्तवात आलो. शिक्षक म्हणत होते, ‘आजवर हजारो प्रवासी आले, आश्वासन देऊन गेले, पण कुणीच परतलं नाही.’
नाटक-सिनेमाची कथा वाटावी, या पद्धतीने जॉन वूडने हा प्रवास कथन केला आहे. अध्यात्माची गोडी लागलेला जॉन वूड अंतर्मुख होऊन श्रीमंत देशांच्या तुलनेतील ही भयाण दारिद्रय़ाची, निरक्षरतेची दरी पाहतो. स्वत:ची लठ्ठ पगाराची नोकरी, जगभरातील मोठमोठय़ा शहरांतील भ्रमंती, साऱ्या सुखसोयींची मुबलकता याची त्या लहानग्या शाळेशी तुलना करू लागतो. अस्वस्थ होतो, बुद्ध मठात जातो, चिंतन ध्यानधारणा करतो आणि प्रचंड मानसिक घालमेलीत त्रस्त होतो. अमेरिकेत परतल्यावरही त्याला नेपाळी मुलांचे चेहरेच खुणावत राहतात.
बिल गेट यांच्या दौऱ्यावर जेव्हा तो चीनला जातो तेव्हा तेथील मोठय़ा टेलिव्हिजन इन्टरव्ह्य़ूकरिता बिल गेट यांचा सहाय्यक म्हणून रात्रंदिवस राबतो. बिल गेट मुलाखत देतात, पण जॉन वूडच्या त्यामागच्या श्रमाला फारशी किंमत देत नाहीत आणि वूडच्या मनात ही सारी श्रीमंती, संपत्ती, हजारो कोटींचे व्यवहार, त्यांनी अजून श्रीमंत होणारी मोजकी राष्ट्रे, माणसे याबद्दल घृणा निर्माण होते. केवळ भरपूर पैसे व सुरक्षिततेचं कवच याला आहारी जाऊन माझी तितकीशी जरुरी नसलेल्या बिल गेटकडे मी नोकरी करणं व ७० टक्के निरक्षर, पण ज्ञानाची आस असणाऱ्यांकडे दुर्लक्ष करणं समर्थनीय आहे? आज त्यांना माझी जरुरी असताना माझ्या केवळ स्वार्थापोटी त्यांच्याकडे पाठ फिरविणे योग्य आहे? आणि या साऱ्या विचारमंथनाने एका ‘नव्या’ जॉन वूडचा जन्म होतो. एकोणिसाव्या शतकात  Andrew Cornegie  हा धनाढय़ पोलाद व्यावसायिक अमेरिकेत अगदी वेगळ्या पद्धतीने जीवन जगला आणि इतिहासात अजरामर होऊन गेला. एका क्षणी अ‍ॅण्ड्रय़ूने आपला सारा धंदा विकून (१९०१ मध्ये) मिळालेली सारी संपत्ती  ($ 200 million) शिक्षण, ग्रंथालये यांच्या निर्मिती प्रसाराकरिता ट्रस्ट करून जनतेला देऊन टाकली आणि तो भौतिक सुखांपासून दूर झाला. अ‍ॅण्ड्रय़ू हा जॉन वूडचा आदर्श होता, त्याला समोर ठेवून त्याच्याच पावलांवर पाऊल टाकत, त्याचे अनुकरण करीत जॉन वूडने आपल्याला भरपूर पैसा, सुखसुविधा मिळवून देणाऱ्या नोकरीचा त्याग केला आणि नेपाळ हे आपले कार्यक्षेत्र ठरविले आणि त्यातून उभी राहिली ‘खोली ग्रंथालयाची’  (Room To Read) ची संकल्पना.
पुस्तकातील ही सुरुवातीच्या प्रकरणातील जॉन वूडच्या मानसिक  हेलकाव्यांची कहाणी, तर नंतरची पुढची सारी प्रकरणे म्हणजे वृद्धिंगत होत जाणारे ‘रूम टू रीड’च्या यशस्वितेचे प्रगतीपुस्तक आहे. जॉन वूडने केलेले प्रयत्न, त्याच्या वडिलांकडून, मैत्रिणीकडून, अनेक अनोळखी लोकांकडून मिळालेला पाठिंबा, हजारोंनी पुस्तकांची जमवाजमव सारे स्तिमित करणारे आहे. ग्रंथालयापासून सुरू झालेली वूडची कल्पना यात्रा पुढे शाळा उभारणीकडे वळते. केवळ एकच देश (नेपाळ) सोडून व्हिएतनाम, कंबोडिया, श्रीलंका, भारत इथपर्यंत पसरते. मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरीस असताना दिनरात  `Nothing Small Every Thing Big'   हे एकच घोषवाक्य सतत जॉनच्या कानांवर पडायचे. त्याच्याच परिणामी हेच सूत्र या सामाजिक कार्यातही त्याने राबविले आणि आशिया-आफ्रिकेतील सात देशांमध्ये अल्पावधीत प्रचंड मोठे स्पृहणीय काम उभे केले. जगभरातून सतत मदतीचा ओघ चालू राहण्याकरिता भिक्षा मागीत भ्रमंती चालू ठेवली.
आज ५० लाख मुलांना साक्षर करण्याचे ध्येय त्याने उराशी बाळगले आहे. मुलास साक्षर केले तर फक्त तो मुलगा साक्षर होतो, पण एक मुलगी साक्षर झाली तर सारं कुटुंब साक्षर होतं, यावरच्या श्रद्धेने तो मुलींना हलाखी अज्ञानातून बाहेर काढण्याकरिता धडपडतो आहे.
अनेक पारितोषिके मिळालेल्या त्याच्या या ‘विना नफा संस्थे’ने चार हजारांहून अधिक ग्रंथालये, ४० लाखांहून अधिक पुस्तकांचे वाटप/निर्मिती, ४०० शाळांची उभारणी, तर चार हजार मुलींना शिष्यवृत्ती देऊन शिक्षण प्रसाराचं आगळंवेगळं काम अनेक देशांतून केलं आहे.
हे पुस्तक अधूनमधून थोडंसं कंटाळवाणं वाटणारं, काही ठिकाणी आत्मप्रौढी मिरविणारं जरी असलं, तरी निलरेभी व्यावसायिक दृष्टिकोनातून सामाजिक कार्यही कसं यशस्वितेचं शिखर गाठू शकतं, याचं समाजकार्याची आवड, तळमळ असणाऱ्यांकरिता मार्गदर्शक आहे.
नवश्रीमंतीचे वारे जगभर वाहत असताना, नवनवीन चैनीची उपभोगाची साधने सहजी उपलब्ध होत असताना आणि परदेशवारीचे ग्रह साऱ्यांच्याच भाग्यरेषेवर चमकत असताना दारिद्रय़ाचा सभोवताली पसरलेला अंधार आणि त्यातील लाखो निरक्षर हे अजून दूर काळोखात लोटले जाताहेत. समाज श्रीमंती शिखराकडे कूच करताना प्रत्येक पायरीने दारिद्रय़ाची दरी खोल खोल होत जाते आहे. पण काळोखाकडे बघायचेच नाही म्हटल्यावर व बघितल्यास शिखर चढतानाची पायरी घसरून खाली पडण्याची भीतीच बाळगल्यावर उपेक्षितांच्या आयुष्यात सुखाची पहाट तरी कधी उगवणार? म्हणूनच जॉन वूडचं मोठेपण जाणवतं ते त्याच्या निश्चयात. संपन्न अमेरिकेतील मोठय़ा पगाराचा सत्ता-संपत्तीचा लोभ सोडून त्याने घेतलेल्या निर्णयात.`Leaving Microsoft to Change the World' हे पुस्तक म्हणजे जॉन वूडची कृतिगाथा नुसती वाचनीयच नाही तर अनुकरणीय आहे.

लीव्हिंग मायक्रोसॉफ्ट टू चेंज द वर्ल्ड:
लेखक : जॉन वूड
प्रकाशक :  हार्पर,  पृष्ठे : २७८
मूल्य :  १६.९९ यूएस डॉलर 

कुमार नवाथे - लोकसत्ता ग्रंथविश्व
kumar.nawathe@hotmail.com

Thursday, November 10, 2011

विश्वास दांडेकर,लोकसत्ता ग्रंथविश्व
 १५ ऑगस्ट १९४७. स्वातंत्र्य आले ते फाळणीच्या जखमा घेऊन. या ना त्या कारणामुळे आज ६४ वर्षांनंतरही या जखमा भरलेल्या नाहीत, भरली एखादी तरी पुन्हा उघडते. साहजिकच फाळणी-पाश्र्वभूमी-इतिहास-परिणाम यावर एक ग्रंथालय भरेल, एवढे लिखाण झाले आहे. याच धारेतले हे पुस्तक. प्रश्न असा आहे की, आता या विषयावर नवे काय सांगायचे शिल्लक आहे? त्यासाठी हे पुस्तक अवश्य अभ्यासायला हवे. 
फाळणीची कारणे नोंदताना : १) जीनांचा हट्टाग्रह २) ‘फोडा-झोडा’ ही ब्रिटिश नीती ३) नेहरू-पटेल यांना सत्ता स्वीकारण्याची घाई ४) महात्मा गांधींचा मुस्लीम अनुनय ५) अखंड भारत स्वीकारून प्रत्येक बाबतीत जीनांना ‘व्हेटो’ (नकाराधिकार) देऊन राष्ट्र दुबळे ठेवण्यापेक्षा तुकडा तोडण्याचा नेहरू-पटेल यांचा निर्णय  ६) अनेक तुकडे होण्यापेक्षा पाकिस्तान देऊन उरलेला भारत अखंड ठेवणे (सर्वनाशे समुत्पन्ने र्अध त्युजती पंडित:) असा विचार, अशी अनेक कारणे, त्याचे पुरावे-अनुमान-तर्क मांडले गेले आहेत. ‘अटळ निर्णय’ ते ‘फाळणीचे गुन्हेगार’ असा मोठा पट या कारणमीमांसेत व्यापला आहे.
एक मुद्दा सहजच लक्षात येतो की, वरील सर्व गोष्टी या भारतीय उपखंडातले घटक-घटना केंद्रस्थानी ठेवून मांडल्या आहेत. भारताच्या फाळणीला एक फार महत्त्वाचा मोठा पदर हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आहे (आजही अस्तित्वात) याकडे पुरेसे लक्ष दिलेले नव्हते. सरीला यांनी त्या गोष्टीला प्राधान्य देत अनेक बाबी नव्याने प्रकाशात आणल्या.
पहिले महायुद्ध (१९१४-१९१८) व दुसरे महायुद्ध (१९३९-१९४५) या विश्वव्यापी महायुद्धांनी अत्यंत बलशाली ब्रिटिश साम्राज्य कोसळले. जर दुसरे महायुद्ध झाले नसते तर १९४७ ला स्वातंत्र्य शक्य नव्हते, हे आपण मनोमन स्वीकारलेले नाही. कारण सत्ताधाऱ्यांनी आपणास गोष्टी समजावून सांगितल्या नाहीत. मात्र पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटिश नौदल अमेरिकेच्या नौदलापेक्षा लहान झाले व दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका ही एकमेव महासत्ता म्हणून पुढे येत ब्रिटनचे जागतिक महत्त्व संपले. सुंभ जळला पण पीळ? हा पीळ केविलवाणी वळवळ पुढे काही काळ करत राहिला. (सुवेझ १९५६, युद्धात भारतानेच प्रथम आक्रमण केले- १९६५ भारत-पाकिस्तान युद्ध- ब्रिटिश प्रधानमंत्र्यांचे वक्तव्य.) या पीळ जपण्याच्या भावनेतून भारत सोडताना त्यातला पश्चिमेचा भाग (गिलगिट ते कराची हा पट्टा) हा त्या पलीकडच्या तेल क्षेत्रावर नजर ठेवण्यासाठी (इराण, इराक, आखाती देश, सौदी अरेबिया) आपल्याला सैनिकी तळ उभारू देईल, अशा मंडळींच्या ताब्यात हा पट्टा हवा. स्वातंत्र्यानंतर सत्तेवर येणार असलेली काँग्रेस साम्राज्यवादविरोधी असल्याने तळ उभारू देणार नाही म्हणून फाळणी, असा विचार पक्का झाला, कृती झाली. याचे लिखित पुरावे लेखकाने तपशिलात दिले आहेत.
भारतात एकेकाळच्या अमेरिकेविरोधी तयार केलेल्या मानसिकतेमुळे दोन गोष्टी ठळकपणे मांडल्या जात नाहीत. १) भारताच्या स्वातंत्र्यासाठी अमेरिकेचे राष्ट्रपती रुझवेल्ट यांनी केलेले मोठे प्रयत्न व २) काश्मीरचे भारतातले विलीनीकरण कायदेशीर आहे ही अमेरिकेची सुरुवातीची भूमिका. १९४६ साली पं. नेहरूंच्या (अंतरिम) इंटेरिम मंत्रिमंडळाची सत्तेत स्थापना होणार हे लक्षात येताच ब्रिटनचा विरोध डावलून अमेरिकेने नवी दिल्ली येथे स्वत:चा राजदूत तातडीने नेमला. या सर्व घटनांचे तपशील पुस्तकात आहेत.
‘खनिज’ तेल या गोष्टीला अतोनात महत्त्व आले, ते साधारण गेल्या १००-११० वर्षांत. मात्र त्या आधी हाच गिलगिट ते कराची हा पट्टा रशिया दक्षिणेकडे हातपाय पसरेल या अनाठायी भीतीपोटी ब्रिटनला सामरिक महत्त्वाचा वाटत असे. याला आवर घालणे या बुद्धिबळाच्या खेळाला नाव पडले ‘द ग्रेट गेम’. ब्रिटन जाऊन अमेरिका आली, रशिया जाऊन चीन आला. ‘ग्रेट गेम’ सुरूच आहे. या पट्टय़ाचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यात वायव्य सरहद्द प्रांत जर भारताच्या बाजूला ठेवता आला असता तर पाकिस्तानची निर्मिती शक्य झाली नसती. कारण पश्चिम तेल क्षेत्राकडे भौगोलिक सलगता मिळत नव्हती. खान अब्दुल गफारखानांना बाजूला सारत हा प्रश्न काँग्रेसच्या नेतृत्वाला हूल देत ब्रिटिशांनी कसा आपल्याला अनुकूल सोडवला त्याचा तपशील थक्क करणारा आहे.
महंमद अली जीना व त्यांचा फुलवलेला अहंकार हे खरे तर प्यादे होते. काँग्रेसच्या स्थापनेपासून (१८८५) १९४७ पर्यंत मुस्लीम समाज कधीच स्वातंत्र्य चळवळीत नव्हता. जीना काँग्रेसमध्ये असताना वा मौलाना अब्दुल कलाम आझाद यांना मुस्लीम जनतेत अनुयायी किती? अगदी १९४५-४६ पर्यंत पंजाब, सिंध, बंगाल व सरहद्द प्रांत (स्थापनेच्या वेळचा पाकिस्तान) इथले निवडून आलेले सत्ताधारी मुस्लीम पक्ष व नेते जीना व पाकिस्तान यांच्याविरोधीच होते. हे सर्व भाग मुस्लीम बहुसंख्येचे, त्यामुळे त्यांना ‘एक व्यक्ती-एक मत’ याआधारे सत्ता मिळतच होती, हिंदू बहुसंख्येची भीती नव्हती. जीनांना पाठिंबा आजच्या भारतातल्या - विशेषत: बिहार-उत्तर प्रदेश इथल्या मुस्लीम नेते-अनुयायांचा होता. हे सर्व राजकारण ब्रिटिशांनी कसे घडवले याचे काही नवे तपशील पुस्तकात आहेत. सिमला योजना ही एक हूल- धूळफेक होती. फाळणी करायची, पण ही मागणी जीनांप्रमाणे काँग्रेस नेतृत्वानेही करावी यासाठी भारताची अनेक शकले होण्याची शक्यता असलेली ही योजना एकमेव नव्हे. क्रिप्स मिशन, सिमला, कॅबिनेट मिशन हे सर्व एकाच माळेचे मणी. मात्र एकदा काँग्रेस नेतृत्वाने फाळणी स्वीकारल्यावर भारताचे आणखी तुकडे फाळणीच्या वेळी होणार नाहीत हे तत्त्व प्रधानमंत्री अ‍ॅटली यांनी जपले.
गांधीजी १९२० पासून भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे सर्वोच्च नेते होते. १९३९ साली युद्ध सुरू झाल्यावर त्यांनी व्हाइसरॉयना भेटून युद्ध प्रयत्नाआड काँग्रेस येणार नाही, असे आश्वासन दिले होते. ४ सप्टेंबर १९३९ रोजी सिमला येथे व्हाइसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांना गांधीजी म्हणाले होते की, ते स्वत: या लढय़ाकडे एक इंग्रज पाहील तसे पाहतात आणि ब्रिटिश संस्कृतीच्या इमारती, संस्था यांना युद्धामुळे जी हानी पोचण्याची शक्यता आहे, त्याने ते फार अस्वस्थ आहेत.
भावना दाटून आल्यामुळे हे सर्व बोलताना गांधीजींचा कंठ दाटून येत होता व त्यांना त्या आवेगापोटी एका धारेत बोलणे अशक्य झाले होते. तेच गांधीजी १९४० च्या मध्याला जर्मनीने फ्रान्स जिंकल्यावर त्याच लिनलिथगो यांना सांगतात : ‘तुमच्या राष्ट्राचा ताबा जर्मनीकडे जाऊ देण्याचे धैर्य दाखवा. जर हिटलर तुमची घरे ताब्यात घेऊ पाहील तर घरे रिकामी करा. जर हिटलर तुम्हाला देश सोडून जायला प्रतिबंध करेल, तर मुले-स्त्रिया-माणसे सर्वानी मरणाला सामोरे जा.’ थोडक्यात, अहिंसा- मग नष्ट झाला तरी चालेल. (या १९४० च्या संभाषणाचा तपशील मौलाना आझादांच्या पुस्तकातही आहे.) गांधीजींचा हा अनाहूत ‘सल्ला’ जीवन-मरणाचा लढा देणाऱ्या राष्ट्राच्या मनात काय तरंग उमटवील?
थोडक्यात : स्वातंत्र्य चळवळीला बळ मिळू नये म्हणून ब्रिटिशांनी जीनांना पाठबळ दिले. मात्र दुसरे महायुद्ध ऐन भरात असतानाच युद्धोत्तर स्वतंत्र भारतात आपले तळ ‘तेल क्षेत्रा’साठी हवेत म्हणून फाळणी घडवून आणली. जीनांनी माघार-तडजोड असा मार्ग चोखाळला असता तर दुसऱ्या कुठल्या तरी साधनाने परतणाऱ्या ब्रिटिश सत्तेने फाळणी घडवलीच असती.
इतिहास-राज्यशास्त्राचे विद्यार्थी-प्राध्यापक यांनी अभ्यासलेच पाहिजे, सुजाण नागरिकांनी वाचलेच पाहिजे,असे हे पुस्तक अत्यंत रसाळ, ओघवत्या भाषेत, संशोधन शिस्त न सोडता लिहिण्याचे कसब वाखाणण्यासारखे आहे.
हा परिचय लेख लिहिताना लेखक नरेंद्रसिंग सरिला यांच्या निधनाचे वृत्त आले. मध्य भारतातल्या एका लहानशा संस्थानचा हा राजपुत्र माऊंटबॅटन यांच्या ताफ्यात एडीसी म्हणून होता. पुढे भारतीय परराष्ट्र खात्यात निरनिराळ्या पदांवर कार्यरत राहत फ्रान्समध्ये भारताचा राजदूत झाला. परराष्ट्र सेवेतून निवृत्त झाल्यावर ‘नेस्ले’ या बहुराष्ट्रीय कंपनीत वरच्या पदावर काही काळ त्यांनी व्यतीत केला. भूव्यूहात्मक विश्लेषण करणारे लिखाण ते करत असत.
हा पुस्तक परिचय लेख ही भारताच्या या सुपुत्राला श्रद्धांजली. 

The Shadow of the Great Game: The Untold Story of India's Partition
 द शॅडो ऑफ द ग्रेट गेम : द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज् पार्टिशन- नरेंद्रसिंग सरिला.
प्रकाशक : हार्पर-कॉलिन्स २००५,
पुठ्ठा बांधणी आवृत्ती २००९.
पृष्ठसंख्या-४३६, मूल्य रु. : ६००/-.

Wednesday, August 10, 2011

हिमालय म्हणजे स्वर्ग! मग हिमालयातील पुष्पदरीला स्वर्गाचे नंदनवनच म्हटले पाहिजे. या पुष्पदरीला आयुष्यात एकदी तरी भेट देण्याचे मनसुबे प्रत्येक जण आखत असतो. पण अवाढव्य पसरलेल्या हिमालयाच्या अंगावर विसावलेल्या या पुष्पदरीला जायचे कसे इथपासून ते तिथे कधी जायचे, काय पाहायचे असे अनंत प्रश्न आपल्यापुढे उभे राहतात. एकतर अशा विषयांवर शास्त्रीय आणि माहितीपूर्ण असे लेखन नाही. असलेच तर ते मराठीत नाही. या साऱ्या पाश्र्वभूमीवर पुण्याच्या स्नेहल प्रकाशन संस्थेच्यावतीने नुकतेच या पुष्पदरीची सांगोपांग माहिती देणारे एक शास्त्रीय पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे, - ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’!
प्रसिद्ध वनस्पती तज्ज्ञ प्रा. प्र. के. घाणेकर यांनी लिहिलेल्या या बहुरंगी पुस्तकातून जणू ही पुष्पदरीच आपल्याशी बोलते. मूळात भटकंतीची आवड आणि त्यामध्ये वनस्पतीशास्त्राचा अभ्यास यामुळे प्रा. घाणेकरांच्या या पुस्तकाद्वारे एक मार्गदर्शकाचा हातच आपल्याला मिळतो. या पुष्पदरीची ओळख, तिचे भौगोलिक स्थान, या स्थानाचा इतिहास, फुलांचा प्रदेश म्हणून जगाला झालेली ओळख इथपासून ते इथे आढळणाऱ्या वनस्पती, फुलांच्या ओळखीपर्यंत असे सारे काही या पुस्तकात दडले आहे. हिमालयातील असंख्य रानफुलांच्या माहितीबरोबरच या पुष्पदरीच्या मार्गावरचे स्थलदर्शन, निसर्गदर्शन, या भागात आढळणारे वैशिष्टय़पूर्ण पशू-पक्षी, वनस्पती यांची माहितीही या पुस्तकात आहे. कुठल्याही भागाला त्याचे स्थानिक लोकजीवन, इतिहास, दंतकथाही असतात. घाणेकरांनी पुष्पदरीच्या या अंगांचाही वेध घेतल्याने जणू हा सारा  परिसरच जिवंत झाला आहे. लेखकाच्या या उत्स्फूर्त लिखाणामुळे  आपण जणू त्यांच्याच डोळ्यांनी आणि मनाने ही भटकंती करत आहोत असे वाटते. रंगांच्या या दुनियेवरील हे पुस्तकही बहुरंगी अशा प्रकाशचित्रांनी सजलेले आहे. एकूणच फुलांची ही दुनिया या पुस्तकातून तितकेच अनोखे रंग घेऊन आपल्यापुढे उभे राहते. 

(व्हॅली ऑफ फ्लॉवर्स : स्नेहल प्रकाशन, पुणे.  
लेखक :  प्रा. प्र. के. घाणेकर
मूल्य : २२५ रुपये)

Tuesday, August 2, 2011


त्या घरातल्या पडद्याआड असलेल्या सुनांशी बोलताना मी त्यांचं लक्ष त्या गोष्टीकडे वेधलं, की ‘हा पोपट अगदी बिहारच्या स्त्रियांसारखा आहे; पिंजऱ्यात बंद असला तरीही आनंदी आहे.’
काही वेळ सगळीकडे शांतता पसरली. शांततेचा भंग करत छोटी सून म्हणाली, ‘असं अजिबात नाही, इथंही बायकांना बाहेर पडण्याची इच्छा आहे, काहीतरी करण्याची बिहारच्या स्त्रियांचीदेखील इच्छा आहे, पण समाज त्यांना रोखून ठेवतो.’
हा संवाद आहे डॉ. कल्पना शास्त्री यांच्या ‘मी अनुभवलेला बिहार’ या पुस्तकातील. ही परिस्थिती बिहारमधील स्त्रियांची आहे; पण एकूणच भारतातील स्त्रियांची परिस्थिती यापेक्षा किती वेगळी असू शकेल, असा प्रश्न पडतो. आजच्या जागतिकीकरण आणि मुक्त अर्थव्यवस्थेच्या काळातही किती स्त्रियांना मोकळा श्वास घेऊन जगता येतं?
पुस्तकाच्या सुरुवातीला बिहारमधील सामाजिक कार्याकडे कसे ओढले गेलो हे डॉ. शास्त्री सांगतात. त्यांचे वडील मध्य प्रदेशातल्या मागासलेल्या बुंदेलखंडमधील सागर या शहरातले. पेशाने डॉक्टर. आई सुधारक वृत्तीची. त्यामुळे घरातून मोकळेपणाचे वातावरण मिळाले. पुढे हे सर्व कुटुंब वध्र्याला स्थायिक झाले. महाराष्ट्रात असतानाच समाज परिवर्तनाचा ध्यास लेखिकेच्या मनात रुजला. तरुण शांती सेना या सवरेदयी विचारांच्या जे.पीं.नी सुरू केलेल्या संघटनेच्या संपर्कात त्या आल्या. पुढे त्यांचा विवाह शुभमूर्तीशी झाला. शुभमूर्ती बिहारमधील मिथिला क्षेत्रातल्या रासोडय़ाचे. ते स्वत: जे.पीं.च्या पहिल्या ‘छात्र संघर्ष वाहिनी’चे पहिले संयोजक होते. त्यांच्याशी केलेल्या चर्चेतून बिहारमध्येच सामाजिक कार्य करण्याचा निर्णय कल्पना शास्त्रींनी घेतला.
रासोडय़ाला राहू लागल्यावर तिथले मागासलेपण, वीज नसणे, स्त्रियांवर असलेली सामाजिक बंधने या सर्वाचा लेखिकेने घेतलेला अनुभव वाचण्यासारखा आहे.
२५ वर्षांपूर्वी लेखिका लालूप्रसाद यादवांच्या बिहारमध्ये गेल्या तेव्हा बिहारचे तुकडे झाले नव्हते. (झारखंड वगैरे राज्ये झाली नव्हती.) त्यांनी बिहारचा जो प्रदेश अनुभवला तो प्रांत म्हणजे मिथिला. बुढी गंडक आणि बागमती या दोन नद्यांच्या संगमावर वसलेलं रासोडा हे गाव त्यांचं कार्यक्षेत्र. नद्यांना येणारे पूर, विजेचा अभाव, सेवा-सुविधांचा अभाव याबद्दलची माहिती ‘तेव्हाचा बिहार’ या प्रकरणात आली आहे. त्या वेळच्या आणि एकूणच बिहारच्या कुटुंबप्रधान संस्कृतीची सविस्तर चर्चा केली आहे. त्याबाबत लेखिका म्हणतात, ‘सामंती मूल्यांना धरून असणाऱ्या एकत्र कुटुंबाच्या सामाजिक पायावर उभा असलेला बिहार हे बिहारचे अंतर्गत चित्र आहे. जातीवर आधारित समुदायाचा मजबूत पाया हेदेखील बिहारच्या समाजाचं अंतर्गत चित्र आहे. असं चित्र असलेल्या समाजात समतेच्या पातळीवर संवाद साधणं अशक्य करण्यात आलं आहे.’ एकत्र कुटुंबाचे सकारात्मक पैलूही लेखिकेने सांगितले आहेत, पण त्याचबरोबर त्या म्हणतात, ‘पण कुटुंबात एकोपा राखण्यासाठी स्त्रीचं स्वतंत्र अस्तित्व नाकारणं, ही कुठली संस्कृती मानायची?’
समाजात स्त्रियांविषयी काही पक्क्य़ा समजुती आहेत. पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुष स्त्रियांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत. त्या विनाकारण बोलतात, त्या कुटुंबात फूट पाडतात अशी त्यामागची कारणे सांगितली जातात. कोणत्याही पुरुषाच्या चुकीच्या वागणुकीमागे स्त्रीचंच डोकं असतं, असाही समज आहे. चांगली स्त्री म्हणजे, तिनं कितीही मतभेद, अशांती असो, काही बोलायचं नाही. पोटात आग पेटलेली असली, तरी तोंडातून धूर निघायला नको..
बिहारमधल्या स्त्री-जीवनाबद्दल सांगताना डॉ. शास्त्री म्हणतात, इथं एक काळ असा होता की, स्त्रियांच्या विद्वत्तेला मान होता. म्हणूनच विद्वान पंडितांच्या चर्चेत निर्णायक म्हणून त्यांना मान्यता होती. आज मात्र जणू काही सर्वच बदललं आहे.
बिहारमधील एकूण स्त्रिया, मग त्या उच्चमध्यमवर्गीय कुटुंबातील असल्या तरी मुलांचे पालन-पोषण आणि स्वयंपाकघरातच गुंतलेल्या असतात. सकाळ-संध्याकाळचा नाश्ता, दोन्ही वेळेस ताजं जेवण, गरम फुलके हे आवश्यकच असतं. पुरुष बाहेरच्या व्हरांडय़ात तर स्त्रिया घरातल्या अंगणात असतात. त्या घरातल्या पुरुषासमोरही पडदा ठेवतात. कधीही घराबाहेर जात नाहीत. प्रत्यक्ष अनुभवातली अनेक उदाहरणे, प्रथा सांगत लेखिका आपली मते व्यक्त करते. कौटुंबिक हिंसाचार तर सर्वत्र आढळतो. अर्थात, तो भारतात इतरत्रही आढळतो. बिहारमधील काही गावं चांगल्या किंवा वाईट वैशिष्टय़ांमुळे प्रसिद्ध किंवा कुप्रसिद्ध आहेत. जरा मुलगी बोलली, पतीला किंवा सासरच्यांना आवडलं नाही तर तिला मारून नदीत फेकून देतात. अशा गोष्टी आजही घडत असतील तर ते किती धक्कादायक आहे.
‘जाती-धर्म आणि स्त्रिया’ या प्रकरणात डॉ. शास्त्री म्हणतात- ‘जात न मानणं हे ग्रामीण समाजासाठी धर्म भ्रष्टतेचं लक्षण आहे. ही धर्मभ्रष्टता केवळ उच्च-नीच जातीतील स्त्रियांनी एकत्र जेवायला न बसण्यातूनही दिसून येते.’ याचा आणखी प्रत्यय एकूणच बिहारी समाजात येतो. १९५० मध्ये लेखिकेच्या सासऱ्यांनी दलितांसाठी शाळा सुरू केली त्याबाबतही हाच अनुभव होता. १९८० च्या दशकात आणि आजही ज्या भागात जी जात उच्च मानली जाणारी असेल त्या जातीचं त्या गावात वर्चस्व असतं.
डॉ. शास्त्री दलित स्त्रियांची शिबिरे घेत असत. त्यांचं कार्य हे समाजसेवेचं नसून समाज परिवर्तनाचं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. दलित स्त्रिया आणि भूमिहीन मुसहर जातीतील स्त्रियांवरच्या अत्याचाराचे अनेक अनुभव त्यांनी कथन केले आहेत. अशा तळागाळातल्या लोकांमध्ये काम केल्यावर त्यांना वैद्यकीय मदतीची किती गरज आहे हे डॉ. कल्पना शास्त्रींना जाणवलं. त्यातूनच त्यांचा आरोग्यविषयक प्रकल्प आकाराला आला. मुलगा-मुलगी यांच्याशी भेदभावाचं वागणं, वृद्ध आणि विधवा स्त्रियांचे प्रश्न याबद्दल उदाहरणे देऊन लेखिकेने मार्मिक चर्चा केली आहे.
लेखिका ज्या संघटनेमध्ये काम करत होती, त्या कार्यामुळे समाजात बदल घडू लागले. तरुण महिलांमध्ये आरोग्य सेविका, जागरूकता शिबीर, संघटन या सर्वामुळे वातावरण बदललं, विचारसरणी बदलली. परिवर्तनाच्या खुणा गावात घडणाऱ्या अनेक घटनांतून दिसू लागल्या.
स्त्रिया अनौपचारिकपणे भेटू शकतील या उद्देशानं डॉ. शास्त्री यांनी गावात एक महिलाघर स्थापन केलं. पुढे हे महिलाघर सार्वजनिक ठिकाण झालं. स्त्रिया दुपारच्या वेळी इथे आपली कामे करत, अत्याचार झालेल्या स्त्रीसाठी इथे पंचायत भरत असे. तसेच औषधाची पेटी, तक्ते या सर्व गोष्टींची माहिती महिलाघरातच सर्वाना समजावून सांगण्यात येऊ लागली. त्यांनी स्वत:च्या घरातच आरोग्य केंद्र सुरू केलं. शिबिरातून त्यांनी आरोग्य सेविका तयार केल्या. याच आरोग्यसेविका समाज परिवर्तनाच्या माध्यम ठरत गेल्या. अनेक अनुभवांवरून लेखिकेच्या असं लक्षात आलं की, गावातले लोक जेव्हा गावातल्या लोकांसाठी काम करतात तेव्हा ते अधिक प्रभावी होतं.
बिहारच्या समस्या एकमेकांत गुंतलेल्या होत्या. बेकारी, अत्यंत गरिबी म्हणजे गरिबीचं अमानवी स्वरूप, आजार, निरक्षरता, लोकांची कर्तव्यशून्यता अशा अनेक समस्या एकमेकांशी निगडित होत्या. त्यामुळे लोकांवर केवळ उपचार करून प्रश्न सुटणार नव्हते. त्यामुळे डॉ. शास्त्री यांच्या संस्थेनं सामाजिक कामाच्या तसेच शैक्षणिक कार्याच्या दिशेनं वाटचाल सुरू केली. आज ही संस्था ७५ गावांमध्ये कार्यरत आहे.
शेवटी डॉ. कल्पना शास्त्री म्हणतात- ज्या समाजात बहुसंख्य लोक मागासलेले असतात, तो समाज या बहुसंख्य लोकांच्या प्रगतीनेच पुढे जाऊ शकतो. त्यानंतरच संपूर्ण समाजात सुव्यवस्था निर्माण होते आणि दैनंदिन व्यवहारामध्ये संस्कृतीचं दर्शन होतं. पुढारलेले मूठभर लोक पुढे गेले तरी बाकीचा समाज मागे राहतो. हे मात्र निश्चित आहे की, आता बिहारची प्रगती करायची असेल तर तिथल्या मागासलेल्या, दलित, अशिक्षित समाजाच्या महिलांची प्रगती होणं आवश्यक आहे. महिलांची प्रगती करायची असेल, तर आता महिलांच्या भागीदारीबरोबर त्यांच्या नेतृत्वनिर्मितीचा विचार करायला पाहिजे. हे नेतृत्व संस्कृतीवर आधारित असेल. नवीन बिहारच्या निर्मितीसाठी केवळ विकासाच्या नव्हे, तर उत्थानाच्या मार्गावर चालावं लागेल. त्यानंतरच बिहारची आणि पर्यायानं देशाची नवनिर्मिती होईल.’
‘मी अनुभवलेला बिहार’ या पुस्तकातील माझा प्रवास, तेव्हाचा बिहार, बिहारमधील स्त्री-जीवन, जाती-धर्म आणि स्त्रिया, आमचं आरोग्यविषयक काम, सामाजिक कामाच्या दिशेने, शैक्षणिक कार्य या सात प्रकरणांतून बिहारमधील स्त्रियांची आणि त्या अनुषंगाने एकूणच समाजातील समस्यांची स्थिती-गती वाचून वाचक अंतर्मुख होतो. एकविसाव्या शतकात ‘महासत्ता’ होणाऱ्या भारतातील हे चित्र अत्यंत विदारक आहे. ‘शितावरून भाताची परीक्षा’ या म्हणीप्रमाणे ‘सरंजामी’ बिहारमधील २५-३० वर्षांपूर्वीची सामाजिक शोकांतिका थोडय़ाफार फरकाने भारतातील सर्वच ग्रामीण, दुर्गम भागात आजही आढळून येईल. अगदी पुरोगामी म्हणवणाऱ्या ‘सरंजामी’ महाराष्ट्रातही (आता महाराष्ट्राचा बिहार होतोय!) महासत्ता, जागतिकीकरण, जीडीपी, अण्वस्त्र निर्मिती, भ्रष्टाचार, घोटाळे, बेकारी, दारिद्रय़ वगैरे वगैरे (आणखी कितीतरी वगैरे) भूलभुलैयामुळे ‘मुकी बिचारी कुणी हाका’ या न्यायानं प्रगती होतेय ती फक्त शोषणकर्त्यांची आणि अधोगती होतेय ती ११० कोटी लोकसंख्येपैकी ८०-९० कोटी लोकांची. मग स्वातंत्र्याचा अर्थ काय?
कल्पना शास्त्री यांच्या संस्थेचे नाव व त्याविषयी थोडी अधिक माहिती पुस्तकात आली असती तर वाचकांच्या दृष्टीने अधिक उपयुक्त ठरली असती. ‘मी अनुभवलेला बिहार’ हे पुस्तक डॉ. कल्पना शास्त्री यांच्या प्रत्यक्ष कार्यावर आणि अनुभवावर आधारलेले असल्यामुळे अतिशय वाचनीय झाले आहे.

अनिल किणीकर ,लोकरंग,दै.लोकसत्ता
मी अनुभवलेला बिहार: डॉ. कल्पना शास्त्री
मनोविकास प्रकाशन
पृष्ठे-१६४, मूल्य- १६० रुपये

Saturday, April 30, 2011

सौजन्य : अतुल माने,दै.लोकसत्ता
अद्भुत, उत्कंठावर्धक तसेच क्षणाक्षणाला श्वास रोखून धरण्याची जबरदस्त ताकद असलेल्या रहस्यकथांच्या माध्यमातून तमाम वाचकांना एका वेगळ्याच दुनियेची सफर घडविणारे ‘रहस्यकथांचे शहेनशहा’ म्हणून परिचित असणारे ज्येष्ठ साहित्यिक गुरुनाथ नाईक यांनी तब्बल १२०४ कादंबऱ्यांचा टप्पा पार करून विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. आपल्या रहस्यकथांनी उभ्या महाराष्ट्राला एकेकाळी वेड लावणाऱ्या नाईक यांची ही झेप कौतुकास्पद असली तरी शासनदरबारी मात्र त्याची कोणालाच दखल घेण्याची गरज भासली नाही. आज वयाच्या सत्तरीतही नाईक यांची लेखणी तेवढय़ाच जोमाने व उत्साहाने सुरूच आहे. यापूर्वी १०९२ कादंबऱ्यांचा विक्रम रहस्यकथाकार बाबुराव अर्नाळकर यांच्या नावावर होता. विशेष म्हणजे, गुरुनाथ नाईक यांनी तेवढय़ाच दमदारपणे पत्रकारितेमध्येही समर्थपणे वाटचाल केली आहे.
वयाच्या ३२ व्या वर्षी पुण्यात एक इंग्रजी चित्रपट पाहताना भन्नाट कथा लिहिण्याचा फंडा डोक्यात भिनला आणि चित्रपट अर्धवट सोडून नाईक आपल्या खोलीत गेले आणि रात्रभर जागून त्यांनी ‘चुंबन’ ही मृत्यूकडे नेणारी पहिली रहस्यकथा लिहिली. आणि विशेष म्हणजे त्याच झपाटय़ात त्यांनी त्याच दिवशी ‘शास्त्रज्ञाच्या मृत्यूचे गूढ’ ही दुसरी रहस्यकथाही लिहिली. तो काळ होता सत्तरीच्या दशकातला; ज्यावेळी रहस्यकथांच्या क्षेत्रात अर्नाळकरांनी आपला निर्विवाद ठसा उमटविला होता आणि जयवंत दळवी, शं. ना. नवरे, दि. बा. मोकाशी, अरविंद गोखले, सुभाष भेंडे, मधु मंगेश कर्णिक असे एकाहून एक अशा सरस कथाकारांनी आपल्या रसरशीत कथांनी मराठी वाचकांवर गारूड केले होते. याच काळात नाईक यांनीही वाचकांच्या मनावर कायमचा कब्जा केला, तो आजतागायत..
त्यांचा हा  लेखन प्रवास अव्याहतपणे सुरू राहिला, तो तब्बल
१२ वर्षे म्हणजे एक तप. मंत्रमुग्ध करणाऱ्या तसेच डोक्याला ताण देत मनाचीही पकड घेणाऱ्या या रहस्यकथा रसिकांच्या काळजाचाच ठाव घेऊ लागल्या.
दरम्यान बाबुरावांनी आपले लेखन आवरते घेण्यास सुरुवात केली होती. या तब्बल १२ वर्षांमध्ये नाईक यांनी ७२४ रहस्यकथा तसेच गूढकथा लिहून काढल्या. यामध्ये सैनिकी जीवनावरील २५० कादंबऱ्यांचाही समावेश आहे. ‘गोलंदाज’ ही काल्पनिक व्यक्तिरेखा साकारून त्याच्या भोवती फिरणाऱ्या १५० कथा लिहिणारे नाईक हे साहित्य विश्वामधील एकमेव लेखक आहेत. कॅप्टन दीप, मेजर भोसले ही त्यांची पात्रे रहस्यकथाप्रेमींच्या मनात आजही घर करून आहेत. ‘थेंब थेंब तेलासाठी’, धडक, सत्यमेव जयते, क्रांतिवीर या त्यांच्या काही गाजलेल्या कादंबऱ्या आहेत. याच कादंबऱ्यांमधून दीपाजी राणे हे गाजलेले नाटकही रंगमंचावर साकारण्यात आले होते, तसेच कल्याणी या कादंबरीवरून एका खासगी दूरचित्रवाहिनीवर कल्याणी ही मालिकाही प्रसारित करण्यात आली होती. या व्यतिरिक्त नाईक यांनी १०० हून अधिक लघुकथा लिहिल्या आहेत. ताण असह्य़ झाल्याने नाईक यांनी १९८४ मध्ये आपले रहस्यकथांचे लेखन काही काळ थांबविले. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना अचानक लेखन थांबविल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. पण नंतर काही काळाने त्यांनी लेखन पुन्हा सुरू केले.
रहस्यकथा लिहिण्यापूर्वी १९५७ ते ६३ या काळामध्ये नाईक यांनी विविध विषयांवर लिखाण केले आहे. मूळचे गोव्याचे असलेल्या नाईक यांनी पत्रकारितेमध्येही आपला ठसा उमटवला आहे. १९५६ मध्ये त्यांनी पत्रकारितेत पाऊल टाकले आणि नंतर विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांनी कार्यकारी संपादक, संपादक अशी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. अलीकडेच त्यांची ऐतिहासिक पाश्र्वभूमीवरील ‘युद्धशास्त्राचे जनक छत्रपती शिवराय ’ ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. युध्दशास्त्रावर वेगळे आणि नेमके लेखन करणाऱ्यांत नाईक यांचा समावेश आहे. साहित्यक्षेत्रामध्ये आपल्या दर्जेदार आणि अद्भुत लिखाणाने वेगळा ठसा उमटविणाऱ्या नाईक यांनी कादंबऱ्या लिहिण्याचा ‘विक्रम’ केला असला तरी आजही त्याची दखल ना सरकारने, ना साहित्यविश्वाने घेतली. पण कोठेही खचून न जाता तसेच प्रसिद्धीपासून दूर राहत नाईक यांची लेखणी आजही तेवढय़ाच उत्साहात सुरूच आहे.

Saturday, March 5, 2011

"इवो जिमा।' जपानजवळील एक लहान पण धगधगते बेट. दुसरे जागतिक महायुद्ध अनेक पातळ्यांवर लढले गेले. अमेरिका आणि जपान यांच्यात झालेली "इवो जिमाची लढाई' हा त्याचा एक महत्त्वाचा भाग. ही लढाई भूदल, वायुदल आणि नौदल या तीनही माध्यमांतून लढली गेली. "बझूका'सारखी आधुनिक शस्त्रे, पिलबॉक्सची विशेष बांधणी, आत्मघातकी विशिष्ट बाँब, कल्पनातीत मनुष्यहानी आणि बोइग बी-29 सुपरफॉर्टरेस सारख्या राक्षसी, प्रगत विमानाचा प्रथमच वापर ही या लढाईची खास वौशिष्ट्यं. या सर्वां|चा अहोरात्र वापर करुन झालेली ही निर्णायक लढाई. या लढाईने इतिहास घडविला. या महायुद्धातूनच जगाला शांतीचा संदेश दिला. प्रत्येक वाक्याला "पुढे काय होणार' अशी उत्सुकता वाढविणारी ही चित्रकथा...
दहशतीचे बेट (इवो जिमाची लढाई)

मूळ लेखक : हामा लॅरी

अनुवादक : प्रसाद बर्वे
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस

Tuesday, February 15, 2011

"चिकन सूप फॉर द सोल' या पुस्तकाच्या पहिल्या भागाप्रमाणे या पुढच्या भागातही जॅक कॅनफिल्ड आणि मार्क हॅन्सन या अमेरिकन जनमानसाच्या लाडक्या लेखकांनी देशविदेशांतून अनेक कथा मागवून त्यांचं संकलन केलेलं आहे। आजच्या युगातल्या मानसिक ताणतणावावरचा रामबाण उपाय ठरलेल्या या कथा वाचताच मनाची मरगळ, नैराश्य झटकन दूर होतं व वाचक नवचैतन्याने आयुष्याला, त्यातील संकटांना, अडीअडचणींना हिमतीने सामोरा जातोच. या कथांचं टॉनिक मिळाल्यावर वाचकाला स्वत:त जो बदल जाणवतो त्या अनुभवाचं कथन तो आपल्या जवळच्यांना, मित्रमैत्रिणींना ऐकवतो व मग ही देवाणघेवाणीची न तुटणारी साखळीप्रक्रिया पुढेपुढे जात राहते. खरंच कधीकधी अशा साध्या, सरळ सत्यकथांतून थोडंफार तरी समाजपरिवर्तन होऊ शकतं ना?

चिकन सूप फॉर द सोल भाग

मूळ लेखक : जॅक कॅनफिल्ड मार्क व्हिक्टर हॅन्सन

अनुवाद : उषा महाजन
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस

Saturday, February 5, 2011

मनुष्याच्या लौकिक, तसंच शारीरिक आणि मानसिक आयुष्यात सतत स्थित्यंतरं घडत असतात। त्या स्थित्यंतरांत माणसाची मानसिक मोडतोड होत असते आणि त्याच मोडतोडीतून माणूस पुन्हा पुन्हा उठत असतो... आसपासच्या लोकांना प्रेरणा देत असतो... "चिकन सूप'च्या या कथा म्हणजे माणसांतल्या विलक्षण ताकदीच्या कथा आहेत. मानवी स्वभावातल्या सूक्ष्मातिसूक्ष्म कंगोर्यांवर ऊहापोह करणार्या या कथा, म्हणजे अनेकांच्या अंधार्या मार्गावरच्या, रस्ता दाखवणार्या ज्योती आहेत! ही प्रकाशाकडे नेणारी एक वाट.
चिकन सूप फॉर द सोल भाग 2

मूळ लेखक : जॅक कॅनफिल्ड मार्क व्हिक्टर हॅन्सन

अनुवादक : प्रज्ञा ओक
प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस
Chicken Soup for the Soul is a series of books, usually featuring a collection of short and dense inspirational stories and motivational essays.


Saturday, January 15, 2011

झोंबी म्हणजे लढाई! एकाने दुसर्याशी झोंबणे। ही आहे दारिद्र्याची विद्याप्राप्तीसाठी केलेली लढाई. आनंद यादवांच्या आयुष्यातला शिक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष म्हणजे ही आत्मचरित्रात्मक कादंबरी. या कादंबरीत फक्त शिकण्यासाठी भोगलेल्या व्यथाच आहेत असे नाही तर दरिद्री, अज्ञानी, ग्रामीण कुटुंबाचे, भीषण दारिद्र्याचे ते विश्वरूप दर्शन आहे. लेखकाचे गाव, गावातील रितीरिवाज, निसर्ग,बापाचा आडमुठेपणा,आईचा होणारा अपरिमित छळ,लागोपाठ होणारी मुले,मुलांचे अपमृत्यू,शाळेतील प्रसंग, मास्तरांचे स्वभाव,तर्हा,गावातले उरूस,जत्रा,गांधीवधानंतर झालेली स्थिती...अशा अनेक गोष्टींचे वास्तव चित्र आहे. या कादंबरीचा आवाका खूप मोठा आहे. झोंबी हे आत्मचरित्र कादंबरी रूपात लिहिताना आनंद यादवांनी आपली कुणी कणव करावी अशी भूमिका घेतलेली नाही. एका सहृदय चिंतनशील माणसाने आपल्या बालपणी भोगलेल्या व्यथा इथे शब्दरूप केलेल्या आहेत. वाचकांना अस्वस्थ करण्याचं प्रचंड सामथ्र्य या कादंबरीत आहे. दारिद्र्याचे श्रीमंत चित्रण करणारी कादंबरी.
झोंबी
लेखक : आनंद यादव
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस

Wednesday, January 5, 2011

तसलिना नासरिनच्या कौमार्यातले उध्वस्त भावविश्व
तसलिमा नासरिन या बंगाली लेखिकेचे नाव गेली काही वर्षे जगभर गाजत आहे. सलमान रश्दीप्रमाणे तसलिमा नासरिनवरही देश सोडून जाण्याची वेळ आली. आपल्या लज्जा या कादंबरीत बंगालमधील हिंदू शेजार्यांवर झालेल्या अत्याचाराचे वर्णन केल्यामुळे तिला ही शिक्षा ठोठावण्यात आली होती. आपली मते अभ्यासपूर्ण रीतीने, ठामपणे, निर्भीडतेने मांडणे हे तसलिमांच्या विचारसरणीचे बलस्थान आहे. तसलिमा अशा कशा घडल्या याचे उत्तर आपल्याला त्यांचे "आमार मेयेबेला' वाचून मिळते. आमार मेयेबेला म्हणजे "माझा मुलगीपणाचा काळ'. वयाच्या तेरा-चौदा वर्षापर्यतच्या आठवणी या पुस्तकात आहेत. तिचे कुटुंब या लेखनातून वाचकांपुढे उभे राहते. त्यात कोठेही उदात्तीकरण केलेले नाही. व्यक्तिमत्त्वाचे वास्तव दर्शनच घडवलेले आहे. तसलिमाचे वडील रजब अली डॉक्टर आहेत. देखणे, बुद्धिवादी, अहंकारी आहेत. स्वत:च्या पुरुषपणाचा त्यांना अभिमान आहे. तर आई कुरूप, कमी शिकलेली आहे. आपला नवरा कधीही आपल्याला तलाक देईल या भीतीने कायम धास्तावलेली आहे. या विजोड जोडप्याला चार मुले आहेत. तसलिमा स्वत:चे पूर्वायुष्य, त्यातील व्यक्ती, त्यांचे वागणे, बोलणे, स्वभाव विशेष याबद्दल औचित्य-अनौचित्याचे दडपण न ठेवता लिहिते. तसलिमांच्या व्यक्तिमत्त्वात आणि तिच्या पारिवारिक ताण्याबाण्याचा प्रभाव मोठाच पडलेला आहे. तसलिमांचे संवेदनशील मन पानोपानी प्रकट होते. तीच या लेखनाची खरी ताकद आहे. प्रत्येक प्रसंगातून तसलिमाचं बंडखोर व्यक्तित्व वाचकाला जागवत राहते. पृष्ठे : 295 किंमत :200
आमार मेयेबेला
मूळ लेखिका : तसलीमा नसरीन
अनुवाद : मृणालिनी गडकरी
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस

Related Posts Plugin for WordPress, Blogger...