Thursday, November 10, 2011

विश्वास दांडेकर,लोकसत्ता ग्रंथविश्व
 १५ ऑगस्ट १९४७. स्वातंत्र्य आले ते फाळणीच्या जखमा घेऊन. या ना त्या कारणामुळे आज ६४ वर्षांनंतरही या जखमा भरलेल्या नाहीत, भरली एखादी तरी पुन्हा उघडते. साहजिकच फाळणी-पाश्र्वभूमी-इतिहास-परिणाम यावर एक ग्रंथालय भरेल, एवढे लिखाण झाले आहे. याच धारेतले हे पुस्तक. प्रश्न असा आहे की, आता या विषयावर नवे काय सांगायचे शिल्लक आहे? त्यासाठी हे पुस्तक अवश्य अभ्यासायला हवे. 
फाळणीची कारणे नोंदताना : १) जीनांचा हट्टाग्रह २) ‘फोडा-झोडा’ ही ब्रिटिश नीती ३) नेहरू-पटेल यांना सत्ता स्वीकारण्याची घाई ४) महात्मा गांधींचा मुस्लीम अनुनय ५) अखंड भारत स्वीकारून प्रत्येक बाबतीत जीनांना ‘व्हेटो’ (नकाराधिकार) देऊन राष्ट्र दुबळे ठेवण्यापेक्षा तुकडा तोडण्याचा नेहरू-पटेल यांचा निर्णय  ६) अनेक तुकडे होण्यापेक्षा पाकिस्तान देऊन उरलेला भारत अखंड ठेवणे (सर्वनाशे समुत्पन्ने र्अध त्युजती पंडित:) असा विचार, अशी अनेक कारणे, त्याचे पुरावे-अनुमान-तर्क मांडले गेले आहेत. ‘अटळ निर्णय’ ते ‘फाळणीचे गुन्हेगार’ असा मोठा पट या कारणमीमांसेत व्यापला आहे.
एक मुद्दा सहजच लक्षात येतो की, वरील सर्व गोष्टी या भारतीय उपखंडातले घटक-घटना केंद्रस्थानी ठेवून मांडल्या आहेत. भारताच्या फाळणीला एक फार महत्त्वाचा मोठा पदर हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आहे (आजही अस्तित्वात) याकडे पुरेसे लक्ष दिलेले नव्हते. सरीला यांनी त्या गोष्टीला प्राधान्य देत अनेक बाबी नव्याने प्रकाशात आणल्या.
पहिले महायुद्ध (१९१४-१९१८) व दुसरे महायुद्ध (१९३९-१९४५) या विश्वव्यापी महायुद्धांनी अत्यंत बलशाली ब्रिटिश साम्राज्य कोसळले. जर दुसरे महायुद्ध झाले नसते तर १९४७ ला स्वातंत्र्य शक्य नव्हते, हे आपण मनोमन स्वीकारलेले नाही. कारण सत्ताधाऱ्यांनी आपणास गोष्टी समजावून सांगितल्या नाहीत. मात्र पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटिश नौदल अमेरिकेच्या नौदलापेक्षा लहान झाले व दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका ही एकमेव महासत्ता म्हणून पुढे येत ब्रिटनचे जागतिक महत्त्व संपले. सुंभ जळला पण पीळ? हा पीळ केविलवाणी वळवळ पुढे काही काळ करत राहिला. (सुवेझ १९५६, युद्धात भारतानेच प्रथम आक्रमण केले- १९६५ भारत-पाकिस्तान युद्ध- ब्रिटिश प्रधानमंत्र्यांचे वक्तव्य.) या पीळ जपण्याच्या भावनेतून भारत सोडताना त्यातला पश्चिमेचा भाग (गिलगिट ते कराची हा पट्टा) हा त्या पलीकडच्या तेल क्षेत्रावर नजर ठेवण्यासाठी (इराण, इराक, आखाती देश, सौदी अरेबिया) आपल्याला सैनिकी तळ उभारू देईल, अशा मंडळींच्या ताब्यात हा पट्टा हवा. स्वातंत्र्यानंतर सत्तेवर येणार असलेली काँग्रेस साम्राज्यवादविरोधी असल्याने तळ उभारू देणार नाही म्हणून फाळणी, असा विचार पक्का झाला, कृती झाली. याचे लिखित पुरावे लेखकाने तपशिलात दिले आहेत.
भारतात एकेकाळच्या अमेरिकेविरोधी तयार केलेल्या मानसिकतेमुळे दोन गोष्टी ठळकपणे मांडल्या जात नाहीत. १) भारताच्या स्वातंत्र्यासाठी अमेरिकेचे राष्ट्रपती रुझवेल्ट यांनी केलेले मोठे प्रयत्न व २) काश्मीरचे भारतातले विलीनीकरण कायदेशीर आहे ही अमेरिकेची सुरुवातीची भूमिका. १९४६ साली पं. नेहरूंच्या (अंतरिम) इंटेरिम मंत्रिमंडळाची सत्तेत स्थापना होणार हे लक्षात येताच ब्रिटनचा विरोध डावलून अमेरिकेने नवी दिल्ली येथे स्वत:चा राजदूत तातडीने नेमला. या सर्व घटनांचे तपशील पुस्तकात आहेत.
‘खनिज’ तेल या गोष्टीला अतोनात महत्त्व आले, ते साधारण गेल्या १००-११० वर्षांत. मात्र त्या आधी हाच गिलगिट ते कराची हा पट्टा रशिया दक्षिणेकडे हातपाय पसरेल या अनाठायी भीतीपोटी ब्रिटनला सामरिक महत्त्वाचा वाटत असे. याला आवर घालणे या बुद्धिबळाच्या खेळाला नाव पडले ‘द ग्रेट गेम’. ब्रिटन जाऊन अमेरिका आली, रशिया जाऊन चीन आला. ‘ग्रेट गेम’ सुरूच आहे. या पट्टय़ाचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यात वायव्य सरहद्द प्रांत जर भारताच्या बाजूला ठेवता आला असता तर पाकिस्तानची निर्मिती शक्य झाली नसती. कारण पश्चिम तेल क्षेत्राकडे भौगोलिक सलगता मिळत नव्हती. खान अब्दुल गफारखानांना बाजूला सारत हा प्रश्न काँग्रेसच्या नेतृत्वाला हूल देत ब्रिटिशांनी कसा आपल्याला अनुकूल सोडवला त्याचा तपशील थक्क करणारा आहे.
महंमद अली जीना व त्यांचा फुलवलेला अहंकार हे खरे तर प्यादे होते. काँग्रेसच्या स्थापनेपासून (१८८५) १९४७ पर्यंत मुस्लीम समाज कधीच स्वातंत्र्य चळवळीत नव्हता. जीना काँग्रेसमध्ये असताना वा मौलाना अब्दुल कलाम आझाद यांना मुस्लीम जनतेत अनुयायी किती? अगदी १९४५-४६ पर्यंत पंजाब, सिंध, बंगाल व सरहद्द प्रांत (स्थापनेच्या वेळचा पाकिस्तान) इथले निवडून आलेले सत्ताधारी मुस्लीम पक्ष व नेते जीना व पाकिस्तान यांच्याविरोधीच होते. हे सर्व भाग मुस्लीम बहुसंख्येचे, त्यामुळे त्यांना ‘एक व्यक्ती-एक मत’ याआधारे सत्ता मिळतच होती, हिंदू बहुसंख्येची भीती नव्हती. जीनांना पाठिंबा आजच्या भारतातल्या - विशेषत: बिहार-उत्तर प्रदेश इथल्या मुस्लीम नेते-अनुयायांचा होता. हे सर्व राजकारण ब्रिटिशांनी कसे घडवले याचे काही नवे तपशील पुस्तकात आहेत. सिमला योजना ही एक हूल- धूळफेक होती. फाळणी करायची, पण ही मागणी जीनांप्रमाणे काँग्रेस नेतृत्वानेही करावी यासाठी भारताची अनेक शकले होण्याची शक्यता असलेली ही योजना एकमेव नव्हे. क्रिप्स मिशन, सिमला, कॅबिनेट मिशन हे सर्व एकाच माळेचे मणी. मात्र एकदा काँग्रेस नेतृत्वाने फाळणी स्वीकारल्यावर भारताचे आणखी तुकडे फाळणीच्या वेळी होणार नाहीत हे तत्त्व प्रधानमंत्री अ‍ॅटली यांनी जपले.
गांधीजी १९२० पासून भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे सर्वोच्च नेते होते. १९३९ साली युद्ध सुरू झाल्यावर त्यांनी व्हाइसरॉयना भेटून युद्ध प्रयत्नाआड काँग्रेस येणार नाही, असे आश्वासन दिले होते. ४ सप्टेंबर १९३९ रोजी सिमला येथे व्हाइसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांना गांधीजी म्हणाले होते की, ते स्वत: या लढय़ाकडे एक इंग्रज पाहील तसे पाहतात आणि ब्रिटिश संस्कृतीच्या इमारती, संस्था यांना युद्धामुळे जी हानी पोचण्याची शक्यता आहे, त्याने ते फार अस्वस्थ आहेत.
भावना दाटून आल्यामुळे हे सर्व बोलताना गांधीजींचा कंठ दाटून येत होता व त्यांना त्या आवेगापोटी एका धारेत बोलणे अशक्य झाले होते. तेच गांधीजी १९४० च्या मध्याला जर्मनीने फ्रान्स जिंकल्यावर त्याच लिनलिथगो यांना सांगतात : ‘तुमच्या राष्ट्राचा ताबा जर्मनीकडे जाऊ देण्याचे धैर्य दाखवा. जर हिटलर तुमची घरे ताब्यात घेऊ पाहील तर घरे रिकामी करा. जर हिटलर तुम्हाला देश सोडून जायला प्रतिबंध करेल, तर मुले-स्त्रिया-माणसे सर्वानी मरणाला सामोरे जा.’ थोडक्यात, अहिंसा- मग नष्ट झाला तरी चालेल. (या १९४० च्या संभाषणाचा तपशील मौलाना आझादांच्या पुस्तकातही आहे.) गांधीजींचा हा अनाहूत ‘सल्ला’ जीवन-मरणाचा लढा देणाऱ्या राष्ट्राच्या मनात काय तरंग उमटवील?
थोडक्यात : स्वातंत्र्य चळवळीला बळ मिळू नये म्हणून ब्रिटिशांनी जीनांना पाठबळ दिले. मात्र दुसरे महायुद्ध ऐन भरात असतानाच युद्धोत्तर स्वतंत्र भारतात आपले तळ ‘तेल क्षेत्रा’साठी हवेत म्हणून फाळणी घडवून आणली. जीनांनी माघार-तडजोड असा मार्ग चोखाळला असता तर दुसऱ्या कुठल्या तरी साधनाने परतणाऱ्या ब्रिटिश सत्तेने फाळणी घडवलीच असती.
इतिहास-राज्यशास्त्राचे विद्यार्थी-प्राध्यापक यांनी अभ्यासलेच पाहिजे, सुजाण नागरिकांनी वाचलेच पाहिजे,असे हे पुस्तक अत्यंत रसाळ, ओघवत्या भाषेत, संशोधन शिस्त न सोडता लिहिण्याचे कसब वाखाणण्यासारखे आहे.
हा परिचय लेख लिहिताना लेखक नरेंद्रसिंग सरिला यांच्या निधनाचे वृत्त आले. मध्य भारतातल्या एका लहानशा संस्थानचा हा राजपुत्र माऊंटबॅटन यांच्या ताफ्यात एडीसी म्हणून होता. पुढे भारतीय परराष्ट्र खात्यात निरनिराळ्या पदांवर कार्यरत राहत फ्रान्समध्ये भारताचा राजदूत झाला. परराष्ट्र सेवेतून निवृत्त झाल्यावर ‘नेस्ले’ या बहुराष्ट्रीय कंपनीत वरच्या पदावर काही काळ त्यांनी व्यतीत केला. भूव्यूहात्मक विश्लेषण करणारे लिखाण ते करत असत.
हा पुस्तक परिचय लेख ही भारताच्या या सुपुत्राला श्रद्धांजली. 

The Shadow of the Great Game: The Untold Story of India's Partition
 द शॅडो ऑफ द ग्रेट गेम : द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज् पार्टिशन- नरेंद्रसिंग सरिला.
प्रकाशक : हार्पर-कॉलिन्स २००५,
पुठ्ठा बांधणी आवृत्ती २००९.
पृष्ठसंख्या-४३६, मूल्य रु. : ६००/-.

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...