Saturday, November 26, 2011


गेली काही वर्षे दहशतवाद हा जगाला भेडसावणारा आणि चिंतित करणारा प्रश्न जिथे-तिथे हिरीरीने मांडला जात आहे. त्याच्या बीमोडाकरिता अब्जावधी रुपयांची बरसात प्रत्येक देश आपापल्या क्षेत्रात करीत आहे. हा दहशतीचा प्रश्न एकदा निकालात निघाला की मग जणू सारे अरिष्ट चिंता मिटून जग आनंदमयी होणार, असे चित्र डोळ्यांपुढे उभे राहते आहे आणि त्यामुळे यापेक्षाही काळजीदायक वास्तवाकडे नकळत आपली डोळेझाक होत आहे. दहशतवादाचा उगम होण्यामागे आहे ते जगातील भयानक दारिद्रय़ आणि निरक्षरता. आज सारा समाज या वस्तुस्थितीला विचारातच घेत नाही. एक तर तो स्वत:च्या कोषात तरी पूर्ण दंग आहे वा दहशतवादाच्या सावटाखाली.
पण सर्व आलबेल वाटणाऱ्या जगातील न दिसणाऱ्या या दारिद्रय़ाची, या निरीक्षरतेची जाणीव मायक्रोसॉफ्टमधील तरुण अमेरिकन व्यावसायिक जॉन वूडने   `Leaving Microsoft to Change The World'   या आपल्या पुस्तकाने जगाला पुन्हा एकदा करून दिली आहे. जॉन वूडचे हे पुस्तक म्हणजे योगायोगाच्या प्रवासाची कहाणी आहे. जॉन हा सुट्टीत नेपाळमध्ये गिर्यारोहण करायला येतो तेव्हा हिमालयाच्या सान्निध्याने अध्यात्माकडे ओढला जातो. सारं जग विसरून तो सुट्टी आनंदाने उपभोगतो. जवळच्या खेडेगावातील एका लहानशा शाळेत तेथील गावकऱ्यांच्या आग्रहामुळे जातो आणि पुढे.. पुढे त्याचे सारे आयुष्यच बदलते.
या शाळेतील एका खोलीत कुलपात बंद करून ठेवलेली मोजकीच तीन-चार पुस्तके म्हणजे शाळेचे ग्रंथालय. रस्त्यावर सहजी रद्दीत मिळणारी ती पुस्तके, पण त्याचं अप्रूप तेथील निरागस मुलांना, त्यांच्या शिक्षकांना अपार, अमूल्य ठेव्याप्रमाणे ती पुस्तके हाच त्या मुलांच्या शिक्षणाचा ध्यास.
जॉन वूड आपल्या पुस्तकात पुढे लिहितो की, ७० टक्के निरक्षरता असलेल्या नेपाळमध्ये एवढय़ाशा खेडय़ातील ही शिक्षणाकरिता तरसणारी मुलं पाहून मला माझं बालपण आठवलं. तिथून निघताना मला गलबलून आलं. ‘सर, तुम्ही परत या, पण येताना पुस्तकं घेऊन या,’ या विनंतीनं तर मी अश्रूमय झालो. त्यांना पुस्तके आणण्याचं आश्वासन मी दिलं तर खरं, पण त्यांच्या पुढच्या वाक्यांनी जमिनीवर वास्तवात आलो. शिक्षक म्हणत होते, ‘आजवर हजारो प्रवासी आले, आश्वासन देऊन गेले, पण कुणीच परतलं नाही.’
नाटक-सिनेमाची कथा वाटावी, या पद्धतीने जॉन वूडने हा प्रवास कथन केला आहे. अध्यात्माची गोडी लागलेला जॉन वूड अंतर्मुख होऊन श्रीमंत देशांच्या तुलनेतील ही भयाण दारिद्रय़ाची, निरक्षरतेची दरी पाहतो. स्वत:ची लठ्ठ पगाराची नोकरी, जगभरातील मोठमोठय़ा शहरांतील भ्रमंती, साऱ्या सुखसोयींची मुबलकता याची त्या लहानग्या शाळेशी तुलना करू लागतो. अस्वस्थ होतो, बुद्ध मठात जातो, चिंतन ध्यानधारणा करतो आणि प्रचंड मानसिक घालमेलीत त्रस्त होतो. अमेरिकेत परतल्यावरही त्याला नेपाळी मुलांचे चेहरेच खुणावत राहतात.
बिल गेट यांच्या दौऱ्यावर जेव्हा तो चीनला जातो तेव्हा तेथील मोठय़ा टेलिव्हिजन इन्टरव्ह्य़ूकरिता बिल गेट यांचा सहाय्यक म्हणून रात्रंदिवस राबतो. बिल गेट मुलाखत देतात, पण जॉन वूडच्या त्यामागच्या श्रमाला फारशी किंमत देत नाहीत आणि वूडच्या मनात ही सारी श्रीमंती, संपत्ती, हजारो कोटींचे व्यवहार, त्यांनी अजून श्रीमंत होणारी मोजकी राष्ट्रे, माणसे याबद्दल घृणा निर्माण होते. केवळ भरपूर पैसे व सुरक्षिततेचं कवच याला आहारी जाऊन माझी तितकीशी जरुरी नसलेल्या बिल गेटकडे मी नोकरी करणं व ७० टक्के निरक्षर, पण ज्ञानाची आस असणाऱ्यांकडे दुर्लक्ष करणं समर्थनीय आहे? आज त्यांना माझी जरुरी असताना माझ्या केवळ स्वार्थापोटी त्यांच्याकडे पाठ फिरविणे योग्य आहे? आणि या साऱ्या विचारमंथनाने एका ‘नव्या’ जॉन वूडचा जन्म होतो. एकोणिसाव्या शतकात  Andrew Cornegie  हा धनाढय़ पोलाद व्यावसायिक अमेरिकेत अगदी वेगळ्या पद्धतीने जीवन जगला आणि इतिहासात अजरामर होऊन गेला. एका क्षणी अ‍ॅण्ड्रय़ूने आपला सारा धंदा विकून (१९०१ मध्ये) मिळालेली सारी संपत्ती  ($ 200 million) शिक्षण, ग्रंथालये यांच्या निर्मिती प्रसाराकरिता ट्रस्ट करून जनतेला देऊन टाकली आणि तो भौतिक सुखांपासून दूर झाला. अ‍ॅण्ड्रय़ू हा जॉन वूडचा आदर्श होता, त्याला समोर ठेवून त्याच्याच पावलांवर पाऊल टाकत, त्याचे अनुकरण करीत जॉन वूडने आपल्याला भरपूर पैसा, सुखसुविधा मिळवून देणाऱ्या नोकरीचा त्याग केला आणि नेपाळ हे आपले कार्यक्षेत्र ठरविले आणि त्यातून उभी राहिली ‘खोली ग्रंथालयाची’  (Room To Read) ची संकल्पना.
पुस्तकातील ही सुरुवातीच्या प्रकरणातील जॉन वूडच्या मानसिक  हेलकाव्यांची कहाणी, तर नंतरची पुढची सारी प्रकरणे म्हणजे वृद्धिंगत होत जाणारे ‘रूम टू रीड’च्या यशस्वितेचे प्रगतीपुस्तक आहे. जॉन वूडने केलेले प्रयत्न, त्याच्या वडिलांकडून, मैत्रिणीकडून, अनेक अनोळखी लोकांकडून मिळालेला पाठिंबा, हजारोंनी पुस्तकांची जमवाजमव सारे स्तिमित करणारे आहे. ग्रंथालयापासून सुरू झालेली वूडची कल्पना यात्रा पुढे शाळा उभारणीकडे वळते. केवळ एकच देश (नेपाळ) सोडून व्हिएतनाम, कंबोडिया, श्रीलंका, भारत इथपर्यंत पसरते. मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरीस असताना दिनरात  `Nothing Small Every Thing Big'   हे एकच घोषवाक्य सतत जॉनच्या कानांवर पडायचे. त्याच्याच परिणामी हेच सूत्र या सामाजिक कार्यातही त्याने राबविले आणि आशिया-आफ्रिकेतील सात देशांमध्ये अल्पावधीत प्रचंड मोठे स्पृहणीय काम उभे केले. जगभरातून सतत मदतीचा ओघ चालू राहण्याकरिता भिक्षा मागीत भ्रमंती चालू ठेवली.
आज ५० लाख मुलांना साक्षर करण्याचे ध्येय त्याने उराशी बाळगले आहे. मुलास साक्षर केले तर फक्त तो मुलगा साक्षर होतो, पण एक मुलगी साक्षर झाली तर सारं कुटुंब साक्षर होतं, यावरच्या श्रद्धेने तो मुलींना हलाखी अज्ञानातून बाहेर काढण्याकरिता धडपडतो आहे.
अनेक पारितोषिके मिळालेल्या त्याच्या या ‘विना नफा संस्थे’ने चार हजारांहून अधिक ग्रंथालये, ४० लाखांहून अधिक पुस्तकांचे वाटप/निर्मिती, ४०० शाळांची उभारणी, तर चार हजार मुलींना शिष्यवृत्ती देऊन शिक्षण प्रसाराचं आगळंवेगळं काम अनेक देशांतून केलं आहे.
हे पुस्तक अधूनमधून थोडंसं कंटाळवाणं वाटणारं, काही ठिकाणी आत्मप्रौढी मिरविणारं जरी असलं, तरी निलरेभी व्यावसायिक दृष्टिकोनातून सामाजिक कार्यही कसं यशस्वितेचं शिखर गाठू शकतं, याचं समाजकार्याची आवड, तळमळ असणाऱ्यांकरिता मार्गदर्शक आहे.
नवश्रीमंतीचे वारे जगभर वाहत असताना, नवनवीन चैनीची उपभोगाची साधने सहजी उपलब्ध होत असताना आणि परदेशवारीचे ग्रह साऱ्यांच्याच भाग्यरेषेवर चमकत असताना दारिद्रय़ाचा सभोवताली पसरलेला अंधार आणि त्यातील लाखो निरक्षर हे अजून दूर काळोखात लोटले जाताहेत. समाज श्रीमंती शिखराकडे कूच करताना प्रत्येक पायरीने दारिद्रय़ाची दरी खोल खोल होत जाते आहे. पण काळोखाकडे बघायचेच नाही म्हटल्यावर व बघितल्यास शिखर चढतानाची पायरी घसरून खाली पडण्याची भीतीच बाळगल्यावर उपेक्षितांच्या आयुष्यात सुखाची पहाट तरी कधी उगवणार? म्हणूनच जॉन वूडचं मोठेपण जाणवतं ते त्याच्या निश्चयात. संपन्न अमेरिकेतील मोठय़ा पगाराचा सत्ता-संपत्तीचा लोभ सोडून त्याने घेतलेल्या निर्णयात.`Leaving Microsoft to Change the World' हे पुस्तक म्हणजे जॉन वूडची कृतिगाथा नुसती वाचनीयच नाही तर अनुकरणीय आहे.

लीव्हिंग मायक्रोसॉफ्ट टू चेंज द वर्ल्ड:
लेखक : जॉन वूड
प्रकाशक :  हार्पर,  पृष्ठे : २७८
मूल्य :  १६.९९ यूएस डॉलर 

कुमार नवाथे - लोकसत्ता ग्रंथविश्व
kumar.nawathe@hotmail.com

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...