Sunday, December 5, 2010

या पुस्तकात आपल्याला भेटणार आहेत पीटर, जेनेट, जॅक, पॅम, बार्बरा, कोलिन आणि जॉर्ज। हे सर्वजण आहेत सात गुप्तहेर आणि स्कँपर - एकदम खास स्पॅनिअल कुत्रा! कोणत्याही रहस्याचा छडा लावण्यासाठी एका पायावर तय्यार! सात गुप्तहेर भलतेच चिडलेत. एका तिरसट व्यक्तीमुळे जॉर्ज संकटात सापडलाय. "सीक्रेट सेव्हन' त्या अनोळखी व्यक्तीवर नजर ठेवायची ठरवतात. तो माणूस काहीतरी गैरकृत्य करतोय असं त्यांना वाटतं आहे. पण यांच्या धडपडीमुळे गुंता आणखी वाढणार तर नाही ना?

सीक्रेट सेव्हन (The Secret Seven )
मूळ लेखक : एनीड ब्लायटन
अनुवाद : प्रियंका कुलकर्णी
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

Sunday, November 28, 2010


क्रीडापटूंची चरित्रे आणि आत्मचरित्रे अनेक अंगाने वाचकांचे कुतूहल पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात। आनंदही देतात. मोहम्मद अली या जगप्रसिद्ध बॉक्सरचेदि ब्लॅक लाइट्स- इनसाइड स्टोरी ऑफ प्रोफेशनल बॉक्सिंगहे चरित्र बऱ्याच वर्षांपूर्वी वाचले होते. त्यातील हिंस्रता आणि कारूण्य अनुभवले होते. या उपशीर्षकातीलइनसाइड स्टोरीमहत्त्वाची.
वाचकाला हीइनसाइड स्टोरीहवी असते। आंद्रे अँगासी याने त्याच्या आत्मकथनात हीइनसाइड स्टोरीओपन करून दाखवली आहे.
आंद्रेचे वडील माइक हे लास वेगास शहरात गरीब वस्तीत राहणारे. त्यांना चार मुले. माइक कॅसिनोमध्ये हरकाम्याहोता. काही दशकांपूर्वी तो तेहरानमध्ये होता. तेहरानमधील ब्रिटिश अमेरिकन शिपाई टेनिस खेळत. तेथे माइक बॉलबॉय होता. पुढे तो लास वेगासला आला. लास वेगासला टेनिसच्या ॅलन किंग टूर्नामेंट्स होत. एकदा माइक त्या टूर्नामेंट बघायला गेला होता. तेव्हा एकचाकी गाडी भरून डॉलरची चकचकीत चांदीची नाणी प्राइज मनी म्हणून कोर्टवर आणली. ते चकचकणारे डॉलर पाहून माइकचे डोळे चकाकले. श्रीमंत होण्याचा मार्ग त्याला दिसला होता. टेनिसच्या चेंडूत भविष्यात पैसा आहे, हे त्याने ओळखले. त्याचे स्पर्धेचे टेनिस खेळण्याचे वय केव्हाच निघून गेले होते, पण त्याला चार मुले होती. यापैकी दोघांना तरी टेनिसपटू करायचे त्याने ठरवले.
माइकने आंद्रे आणि फिली या दोघांना टेनिस शिकवण्यास सुरुवात केली. पण आंद्रेमध्ये जीकिलिंग इन्स्टिंन्क्टहोती ती फिलीमध्ये नव्हती. आंद्रेवर माइकने लक्ष केंद्रित केले. त्याने आंद्रेसाठी चेंडू फेकणारे यंत्र तयार केले. ताशी ११० मैल वेगाने हे यंत्र आंद्रेकडे चेंडूफेक करी. वेगाची आग ओकत येणाऱ्या चेंडूंशी खेळताना आंद्रेचे कोवळे हातपाय दमून जात. रोज ,५०० चेंडू याप्रमाणे दशलक्ष चेंडू आंद्रेने खेळावे, अशी माइकची अपेक्षा होती. त्यावेळी आंद्रे आठवर्षांचासुद्धा नव्हता. ‘या यंत्रातून येणाऱ्या दशलक्ष चेंडूंशी तू खेळलास तर तू कधीही हरणार नाहीसअसे त्याचे वडील त्याला सांगत. आंद्रेचे शालेय शिक्षण यथातथाच चालले होते. टेनिसच्या प्रॅक्टिससाठी त्याचे वडील त्याचीशाळाही बुडवत. आंद्रे वडिलांच्या मार्गदर्शनाखाली टेनिस शिकत असे, तेथे जेम्स ब्राऊन हा फुटबॉलपटू आला होता. माइक त्याला म्हणाला, ‘जॉन, आंद्रे तुला टेनिसमध्ये सहज हरवेल.’ उंचापुरा जॉन सहज हसला. क्लबचा मॅनेजर म्हणाला, ‘जॉन, खेळू नकोस, तू हरशील.’ तरी जॉन आंद्रेशी खेळला. आठ वर्षांच्या आंद्रेने त्याला सहजासहजीहरवले. माइक खूश झाला, पण आंद्रे? ‘आंद्रे स्टार्टेड हेटिंग टेनिस,’ माइकचे आंद्रेवर अमाप प्रेम. आंद्रे म्हणतो, ‘वडिलांनी जरा कमी प्रेम केले असते तर बरे झाले असते.’
किशोरवयीन आंद्रेला फ्लोरिडा येथील निक बालेटिएरीच्या टेनिस अकॅडमीत पाठवले. प्रेमाचा ओलावा नसलेल्याया अकॅडमीत आंद्रेला घरच्या आठवणी येत. तो अस्वस्थ होई. दिवसभर टेनिस एके टेनिस. त्याचे मन बंड करून उठले. येथेच त्याने कान टोचून घेतले. तो दारू पिऊ लागला. मादक द्रव्यांचे धूम्रपान करू लागला, तंबाखू खाऊ लागला, मारामाऱ्या करू लागला. सगळेजण त्याला बंडखोर म्हणत. पण त्याला बंडखोर व्हायचे नव्हते. त्याच्या वयाच्या इतर पोरांसारखाच तो होता. ते वयच तसे असते, याबाबत आंद्रेने काही मार्मिक विधाने केली आहेत. त्याचा आशय असा, ‘तरूण पोरे माझे अनुकरण करू पाहतात, हे ऐकून मी कधी हुरळून जातो, कधी मला कानकोंडे झाल्यासारखे वाटते. मी पूर्ण गोंधळून जातो. या सगळ्यांना आंद्रे आगासीसारखे व्हायचे आहे, याची मी कल्पनाच करू शकत नाही, कारण मलाच आंद्रे अँगासी व्हायचे नाही.’
माइकची गुंतवणूक फळाला आली. व्यावसायिक टेनिसपटू म्हणून आंद्रेने १९८७ साली ब्राझीलमधील पहिली टेनिस टूर्नामेंट जिंकली. पुढे चढउतार होतच राहिले. डोक्याला अकाली टक्कल पडू लागले होते. १९८९ मध्ये तो फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत पोचला. डोक्यावर चिकटवलेले नकली केस पडतील म्हणून तो गोंधळला. यू. एस. ओपनही तो हरला. १९९२ मध्ये तो विम्बल्डन जिंकला. सेलिब्रेट करण्यासाठी आंद्रेने माइकला मोठय़ा उत्साहाने फोन केला, पण पलीकडूनही काही आवाज आला नाही. काही क्षणात माइक म्हणाला, ‘पण तो चौथा सेट तू हरायला नको होतास,’ त्यानंतर त्याला फक्त हुंदके ऐकू आले आणि फोन ठेवला गेला.
त्याने डोक्याचा चमन केला. नकली केस काढून टाकले. त्या उतरणीच्या काळात तो क्रमांक एक वरून १४१ व्याक्रमांकावर आला. करियरच्या मध्यावरचे हे ढासळणे थांबवण्यासाठी बॉब गिल्बर्ट, गिल रेयस या दोन कोचनी त्याला मदत केली, धीर दिला. आंद्रे गिल्बर्टला म्हणत असे, ‘मी इतर कितीतरी कारणांसाठी खेळलो असेन, पण मी माझ्या आनंदासाठी टेनिस कधीच खेळलो नाही.’ त्यावर गिल्बर्ट म्हणाला, ‘अरे, लाखो लोक पोटासाठी आवडणारे व्यवसाय करतात, तू एकटा नाहीस.’
आंद्रेने अपमान गिळून पुन्हा चॅलेंजर टूर्नामेंट्सपासून सुरूवात केली. १९९९ साल उजाडले. आंद्रे आता २९ वर्षांचाझाला होता. तो स्वत:शी म्हणाला, ‘प्रवासात खरी सुस्पष्टता, प्रसाद आणि उदात्तता असते,’ त्याने त्याचे विचार सुंदर शब्दबद्ध केले आहेत. ‘खेळाडू एका धाग्याने लोंबकळत असतो. खाली असते खोल तळ नसलेली दरी. मृत्यूतर तुमच्या चेहऱ्याकडे सतत पाहात असतो,’ यशाच्या कमानीवर सतत टिकून राहणे किती कठीण असते, अपयश म्हणजे खेळाडूसाठी मृत्यूच असतो, हे आंद्रेने मनापासून लिहिले आहे.
काही काळ आंद्रेने मेथ अँम्फटामाइन हे बंदी घातलेले औषध टेनिसमधील कामगिरी चांगली होण्यासाठी घेतलेहोते. हे औषध घेऊनसुद्धा तो हरला होता. टेनिस अधिकाऱ्यांपासून त्याने हे लपवून ठेवले होते. त्याच्या या गौप्यस्फोटामुळे आत्मकथन प्रकाशित झाल्यावर त्याच्यावर घणाघाती टीका झाली होती. ‘करून करून थकलो आणि देवपूजेला लागलोअशा तऱ्हेचे आरोप त्याच्यावर झाले, पण जे घडले ते त्याने लिहिले आहे.
आंद्रेचा ब्रुक शील्ड्स या नटीशी विवाह झाला होता. पण तो टिकला नाही. १९९९ मध्ये आंद्रे फ्रेंच ओपन जिंकला. त्यावेळी स्टेफी त्याच्याशी बोलतसुद्धा नसे. टेनिसच्या इतिहासात स्टेफी आंद्रे या दोघांनी चार स्लॅम्स जिंकले होते सुवर्णपदक मिळवले होते. स्टेफी आणि आंद्रे यांचा विवाह व्हावा अशी आंद्रेचा कोच ब्रॅड गिल्बर्टची इच्छा होती. त्यासाठी त्याने प्रयत्नही केले. २००१ साली स्टेफी आणि आंद्रे यांचा विवाह झाला. त्या दोघांनाही तीव्र स्पर्धेचेवाईट आणि चांगले परिणाम माहीत होते. टेनिसपटूंचा बहर ओसरला म्हणजे काय वाटते याचा दोघांनी अनुभव घेतला होता. जे आपल्या लहानपणी आपल्याला सोसावे लागले ते आपल्या मुलांना सोसायला लागता कामा नये, असा त्या दोघांनी निश्चय केला.
पॅरिसमध्ये असताना आंद्रे लूव्र या प्रख्यात वस्तुसंग्रहालयात पेंटिंग्ज पाहात फिरत होता. एक भव्य पेंटिंग त्याने नजरले. त्या पेंटिंगमधील एका तरूणीच्या कडेवर दोन लहान मुले होती, तिचा हात तरूणाने धरला होता, त्यातरूणाची मान एका म्हाताऱ्याने पकडली होती. त्या म्हाताऱ्याच्या हातात मोठी पिशवी होती. बहुतेक त्यात पैसे असावेत. हे पेंटिंग पाहून आंद्रे अचंबित झाला. जणू त्याचेच चित्र तो पाहात आहे असे त्याला वाटले. जे शिक्षण आपल्याला मिळाले नाही ते उपेक्षित, गरीब मुलांना मिळावे म्हणून लास वेगासच्या सर्वात वाईट ठरवलेल्या वस्तीत आंद्रेने एक शाळा काढली. मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्याने त्या शाळेत पैसा ओतला आहे. टेनिस समीक्षक बड कॉलिन्सने आंद्रेमध्ये झालेल्या बदलाचे वर्णनफुकट गेलेला माणूस ते सद्गुणाचा पुतळाअसे केले आहे. त्यावर आंद्रेचे म्हणणे आहे, ‘माझे असे काही रूपांतर झालेले नाही. माझी एक प्रतिमा जगाने बघितली आहे, माझी ही दुसरी प्रतिमा होतीच, त्याचा आज मला शोध लागला आहे.’
बिनधास्त लिहिलेले हे आत्मवृत्त वाचनीय आहे, पण शैली, शब्दांची निवड, लेखनातील मांडणी, कारागिरी पाहून हे सर्व आंद्रेचे आहे का असा प्रश्न पडतो. ऋणनिर्देशात आंद्रेने जे आर मोहरिंगर या पुलित्झर विजेत्या पत्रकाराशिवाय हे आत्मकथन लिहू शकलो नसतो असे म्हटले आहे. पण मोहरिंगरने सर्व श्रेय आंद्रेलाच दिले आहे. आत्मकथनात एक्झिबिशनिझम- प्रदर्शन वृत्ती आणि नार्सिसिझम- आत्मरती अपरिहार्य असते. तरीसुद्धा हे आत्मवृत्त वाचताना सादरीकरण प्रामाणिक आहे असे वाटत राहते.
टेनिस आणि उत्कंठा हातात हात घालून येतात .मॅचमधील प्रत्येक पॉइंट, डय़ूस प्रेक्षकांची तसेच खेळाडूंची उत्कंठा वाढवत असतो. खेळणाऱ्याच्या रक्तात अँड्रीनॅलीन वाहत असतेच, पण प्रेक्षकांच्या रक्तातसुद्धा अँड्रीनॅलीनची पातळी वाढत असते. प्रेक्षकांच्या मेंदूतील दर्पणपेशी- मिरर न्युरॉन्स त्यांना जणू टेनिस खेळण्याचा प्रत्यक्ष अनुभव देतअसतात. वाढणाऱ्या उत्कंठेत भीतीयुक्त आनंद असतो. थ्रिल असते. आपला आवडता खेळाडू जिंकणार की हरणार या आंदोलनात प्रेक्षक जीव मुठीत धरून मॅच पाहत असतो. अल्फ्रेड हिचकॉकने हे ओळखले होते. स्ट्रेंजर्स ऑन ट्रेन या चित्रपटात शेवटच्या शिगेला पोचण्याच्या क्षणात त्याने टेनिस मॅचचा उपयोग केला आहे. २००६ ची यूएस ओपनही आंद्रेची शेवटची खेळी. त्यानंतर तो निवृत्त होणार होता. ही मॅच अशीच अटीतटीची झाली. त्यावेळी आंद्रेने
स्वत:ला बजावले, ‘ही मॅच तू एन्जॉय कर, मॅचचा प्रत्येक क्षण उरात भरून घे. तू टेनिसचा द्वेष करत असलास तरी आजच्या रात्रीनंतर कदाचित तुला याच टेनिसची खूप आठवण येणार आहे. चुकल्याचुकल्यासारखे वाटणार आहे.’ हे बॉल टू बॉल आत्मचरित्र आकंठ वाचनीय आहे.
‍ ‍ ‍ ‍ ‍ ‍ ‍ ‍‍
डॉ. आनंद जोशी (लोकसत्ता )
ओपन अ‍ॅन ऑटोबायॉग्राफी बाय आंद्रे अ‍ॅगासी;
प्रकाशक : नॉफ पब्लिशर;
पृष्ठसंख्या ३८८

Friday, November 5, 2010

चाळीस उतारू पाच कर्मचारी यांना घेऊन उड्डाण केलेले ते विमान अँडीज पर्वतावर आदळले. तुकडे झालेल्या विमानाचा अर्धा भाग एवढाच आसरा त्यांना उरला! थोडीशी वाईन व काही चॉकलेटे एवढेच खाद्य! अपघात झाला तेव्हा फक्त 32 जण वाचले होते. काही दिवसात 27 उरले. मग 19 आणि शेवटी फक्त 16! शेवाळेसुद्धा नसलेल्या बर्फाच्छादित उंचीवर ते 72 दिवस कसे जिवंत राहिले? कसे वागले? त्यांची सुटका कशी झाली? आणि सुटकेनंतर त्यांना कोणत्या अनुभवाला सामोरे जावे लागले? याची रोमांचकारी सत्यकथा!

अलाईव (Alive)
मूळ लेखक : अशोक पाथरकर
अनुवाद : रीड पिअर्स पॉल
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

Friday, October 15, 2010

धार्मिक कडवटपणावर हल्ला करणारी क्रांतीकारक कादंबरी

"लज्जा' ही तसलिमा नासरिन यांची वास्तवावर आधारलेली कादंबरी. बांगलादेशातील मुसलमानांनी हिंदूंचाकेलेला छळ आणि बांगलादेशावर प्रेम करणार्या हिंदूंची केलेली कोंडी असा या कादंबरीचा विषय आहे. कडव्या मुसलमानांनी लेखिकेची हत्या करण्याचा फतवा काढला. तिच्या बंडखोर वृत्तीचे यथार्थ दर्शन या कादंबरीतघडले आहे. बांगलादेशाच्या स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रप्रेमाने लढलेले सुधामयबाबू, त्यांचा मुलगा सुरंजन, त्यांचीकन्या माया (निलोचना), त्यांची पत्नी किरणमयी अशा चारजणांच्या कुटुंबावर कोसळलेल्या संकटाची ही कथा आहे. धर्म आणि देश या गोष्टीमधून काय पसंत करायचे असा मूलभूत प्रश्न उपस्थित करून या कादंबरीने तत्त्वज्ञानालाच हात घातला आहे. मूलतत्त्ववादी आपल्या कुटुंबाचा छळ करतात तरीही देशप्रेमाने, आदर्शवादाने भारावलेले हे कुटुंब जातीय सलोखा व्हावा म्हणून प्रयत्न करते. पण परिस्थिती विकोपाला गेली, हिंदूंची मानखंडना पाहिली आणि अखेर बांगलादेश सोडून भारतात येण्याचा निर्णय घ्यावा लागला. हा प्रकार लज्जास्पद होता
लज्जा
मूळ लेखिका : तसलीमा नसरीन
अनुवाद : लीना सोहोनी
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस ,पुणे


Friday, October 1, 2010

केशव अत्रे यांची ‘नवयुग वाचनमाला’ ‘परचुरे प्रकाशन’तर्फे लवकरच पुन्हा प्रकाशित होत आहे. त्यामुळे उत्तम मराठी भाषेचा नमुना असलेले पाठ वाचण्याची संधी या पिढीतील बालवाचकांना आता मिळणार आहे. तसेच ज्येष्ठ पिढीला हे पाठ स्मरणरंजनाचा आनंद मिळवून देतील. अत्रे यांनी कोणत्या भूमिकेतून ‘नवयुग वाचनमाला’ची निर्मिती केली, त्यासाठी काय धडपड केली, त्यांना कोणाकोणाचा पाठिंबा होता, हे समजावून सांगणारे प्रकरण ‘कऱ्हेचे पाणी’मध्ये आहे. त्यातील हा संक्षिप्त भाग-
१९२६ साली बी. टी.ची परीक्षा मी जेव्हा उत्तीर्ण झालो, तेव्हापासून प्राथमिक शाळेतल्या जुन्यापुराण्या मराठी क्रमिक पुस्तकांचा जीर्णोद्धार हा केलाच पाहिजे, ही जाणीव विशेष तीव्रतेने मला होऊ लागली. त्या एकाच विषयावर कित्येक वर्षे अनेक शैक्षणिक परिषदांमधून मी माझे विचार अत्यंत जळजळीत शब्दांत प्रकट करू लागलो. पुढे ‘वासंती’ या काव्यसंग्रहाला मी जी ‘प्रस्तावना’ लिहिली, तिच्यात सरकारी क्रमिक पुस्तकांतील काव्यावर मी एवढी कडक टीका केली की, तिच्यामुळे सरकारी शिक्षणखात्याला प्रचंड हादरा बसला नि क्रमिक पुस्तकांतील काव्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन महाराष्ट्रातल्या शिक्षकांना मिळाला. विलायतेत टी. डी.चा अभ्यास करीत असताना तिकडच्या प्राथमिक शाळांतील क्रमिक पुस्तकांचा मी विशेष, काळजीपूर्वक अभ्यास केला. आणि स्वदेशी परत येताना बरोबर अनेक निरनिराळ्या क्रमिक पुस्तकांचे नमुने आणले. आपण आपल्या कल्पनेप्रमाणे नवीन आदर्श क्रमिक पुस्तके मराठीमध्ये लिहावीत अशी पोटतिडीक तेव्हापासून माझ्या मनाला लागून राहिली होती. पण क्रमिक पुस्तके लिहावयाची म्हणजे काही विडंबन कविता भरकटावयाच्या नाहीत किंवा लघुकथा खरडावयाच्या नाहीत. तो कमालीच्या कष्टाचा नि हजारो-नव्हे-लाखो रुपयांच्या खर्चाचा प्रश्न होता. एवढे पैसे मी कोठून आणणार? कोण मला ते देणार? त्याखेरीज क्रमिक पुस्तकांची जी सरकारी मक्तेदारी शे-पाऊणशे वर्षे चालत आलेली होती, ती माझ्यासारखा एकुलता एक माणूस कसा काय मोडू शकणार? आणि ती मोडल्याखेरीज माझ्या संकल्पित क्रमिक पुस्तकांना कोण हिंग लावून विचारणार? ही संकटे एखाद्या डोंगराच्या भेसूर सुळक्याप्रमाणे माझ्या डोळ्यांना भेडसावत असल्याने क्रमिक पुस्तके लिहिण्याचा माझा अनेक वर्षांचा संकल्प मनातल्या मनात थिजून बसला होता.
‘पीपल्स ओन’ खटल्याच्या अजगराच्या विळख्यातून मी सहीसलामत सुटलो. त्यानंतर काही महिने मनाने आणि देहाने मी इतका खंगून गेलो होतो की, पुढे काय करायचे हेच मला समजेनासे झाले. माझ्या आयुष्यातला सारा आनंद आटून गेला, आशा वाळून गेल्या आणि समाधान कोळपून गेले. एखाद्या वठलेल्या नि झडलेल्या झाडाप्रमाणे मी जीवन कसेबसे कंठित होतो. एवढय़ात मुंबईच्या ‘कर्नाटक प्रिंटिंग प्रेस’चे मालक श्री. मंगेशराव कुळकर्णी एक दिवस मला माझ्या पुण्यातल्या घरी भेटावयाला आले. त्यांची-माझी पूर्वीची काहीच ओळख नव्हती. पण त्यांचे नाव अन् उत्कृष्ट इंग्रजी नि मराठी छपाईबाबत त्यांच्या छापखान्याची कीर्ती पुष्कळ वर्षांपासून माझ्या परिचयाची होती. आदर्श शालेय पुस्तके प्रकाशित करून त्या सृष्टीत काहीतरी नवीन क्रांती करावी, या विचाराने ते अंतर्बाह्य़ भारून गेलेले होते. आणि त्याच हेतूने ते माझ्याकडे आले होते.
‘‘हं, काय चाललंय सध्या?’’ मंगेशरावांनी हसत हसत मला विचारले.
‘‘काय चालणार? तुरुंगाच्या दारापर्यंत जाऊन नुकताच सुखरूपपणे परत आलो!’’ मी खिन्न स्वरात उत्तरलो.
‘‘ते विसरा हो आता! त्याचा आता कशाला विचार करता?’’ मंगेशराव वडीलपणाच्या अधिकाराने जरा रागावून मला म्हणाले, ‘‘पण पुढे काय करणार? काही करावयाचा विचार आहे काय?’’
‘‘विचार पुष्कळ आहे! पण त्याचा उपयोग काय?’’ मी किंचित हसून म्हणालो. ‘‘उदाहरणार्थ, मला प्राथमिक शाळेसाठी मराठी क्रमिक पुस्तके लिहावयाची आहेत.’’
‘‘तेवढय़ासाठी तर मी तुमच्याकडे आलो आहे!’’ मंगेशराव चटकन मध्येच म्हणाले, ‘‘बोला, तुमची लिहायची तयारी असेल तर मी ती पुस्तके छापून प्रसिद्ध करावयाला तयार आहे.’’
क्षणभर मी निरुत्तरच झालो. माझा अनेक वर्षांचा संकल्प साकार करणाराच माणूस आपण होऊन आपल्या पावलांनी माझ्यासमोर चालत आलेला तोपर्यंत तरी मला आयुष्यात भेटला नव्हता. मनातल्या मनात मी दिपूनच गेलो.
काहीतरी बोलावयाचे म्हणून मी म्हणालो, ‘‘पण अशी क्रमिक पुस्तके लिहायला पुष्कळच खर्च येईल आणि त्यासाठी अनेक माणसांचे अनेक महिने सहकार्य घ्यावे लागेल.’’
‘‘किती खर्च येईल?’’ मंगेशरावांनी ताडकन विचारले.
‘‘येईल पाच ते सहा हजार रुपये!’’ तोंडाला येईल तो आकडा मी बोलून टाकला.
मंगेशरावांनी आपल्या खिशातून झटकन चेकबुक काढले नि सहा हजारांचा चेक माझ्या हातावर ठेवला!
तोपर्यंत एवढय़ा रकमेचा चेक जन्मात माझ्या नावाने कोणी लिहिलेला नव्हता. मी अक्षरश: कोलमडलो!
मंगेशरावांनी मला अगदी खिंडीतच गाठले. टंगळमंगळ करण्याचा मुळी प्रश्नच उरला नाही. पुढच्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून कामाला सुरुवात करतो, असे मी त्यांना आश्वासन दिले, तेव्हा ते आनंदाने निघून गेले.
त्यानंतर दोन का तीन दिवसांनी लंडनमधील माझे सहाध्यायी श्री. लालभाई रतनजी देसाई हे मला पुण्यात भेटले. ते त्या वेळी मुंबईच्या ‘सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज’ मध्ये प्राध्यापक होते. मराठी क्रमिक पुस्तके लिहिण्याची माझी कल्पना मी त्यांना समजावून सांगितली. त्यांना फार आनंद झाला. ते म्हणाले, ‘‘मग अशीच क्रमिक पुस्तके गुजरातीमध्ये आम्ही का तयार करू नयेत?’’
मी म्हणालो, ‘‘माझी मुळीच हरकत नाही. तुम्ही नि आम्ही एकमेकांच्या सहकार्याने ही क्रमिक पुस्तके मराठीत अन् गुजरातीत तयार करू!’’
मुंबईमध्ये ‘न्यू ईरा स्कूल’चे प्रिन्सिपल एम. टी. व्यास, एम. ए. (लंडन) हे शिक्षणशास्त्रज्ञ म्हणून नामांकित होते. ते आम्हा उभयतांचे मित्र होते. गुजराती क्रमिक पुस्तकांच्या बाबतीत त्यांचे सहकार्य लालभाईंनी मागितले. ते त्यांनी मोठय़ा आनंदाने दिले. तेव्हा व्यास नि देसाई यांच्या सहसंपादकत्वाखाली गुजराती वाचनमाला नि माझ्या संपादकत्वाखाली मराठी वाचनमाला एकमेकांच्या सहकार्याने तयार करण्यात यावी, असा आमचा करार झाला. गुजराती वाचनमाला मंगेशराव कुळकण्र्यानी छापावी नि ती गुजरातमधल्या एका सुप्रसिद्ध शैक्षणिक प्रकाशकाने प्रकाशित करावी असेही ठरले. सदर क्रमिक पुस्तके लिहिण्याचे काम
प्रिं.. व्यास यांच्या मुंबईमधल्या ‘न्यू ईरा स्कूल’मध्येच आणि आम्ही सर्वानी करावे, हा बेत मुक्रर केला. दोन्हीही भाषेमध्ये ‘नवयुग-वाचन-माला’ या एकाच नावाने ही क्रमिक पुस्तके प्रसिद्ध केली जावीत, असे आम्ही एकमताने ठरविले.
त्यानंतर मी पुढील कामाच्या जुळवाजुळवीला लागलो. आम्हाला एकंदर पाच पुस्तके लिहावयाची होती. चार इयत्तेसाठी चार नि बिगरीच्या वर्गासाठी एक. फार अवघड काम होते हे. मराठी भाषेमध्ये त्यापूर्वी पन्नास वर्षांमध्ये लहान मुलांसाठी जेवढे जेवढे म्हणून वाङ्मय कोणी लिहिले असेल, त्याचे मंथन करून त्यातले ‘नवनीत’ बाहेर काढावयाचे आणि ते बालकांना द्यावयाचे, हे आमचे मुख्य उद्दिष्ट होते. हे सर्व काम एकटय़ा माझ्याच्याने होण्यासारखे नव्हते. तेवढय़ासाठी बालवाङ्मयाचा नि शिक्षणशास्त्राचा अभ्यास केलेल्या कुशल नि रसिक सहकाऱ्यांची मला आवश्यकता होती.
या कामासाठी मी पुढील पाच सहकाऱ्यांची निवड केली- गोपीनाथ तळवलकर (संपादक-आनंद), प्रा. गंगाधर भाऊ निरंतर, एम. ए. , प्रिं. गणेश हरी पाटील, रंगो कृष्ण चिंचळकर, बी. ए., प्रा. वा. भा. पाठक, एम. ए. मराठी साहित्याच्या वाचकांना ही सर्व नावे चांगलीच परिचित आहेत.
१९३२ च्या अखेरीस आम्ही सर्व मंडळी पुण्याहून मुंबईला आलो आणि ‘न्यू ईरा स्कूल’ मध्ये तळ ठोकला. ‘आनंद’, ‘खेळगडी’, ‘करमणूक’, ‘मनोरंजन’ याखेरीज अनेक इंग्रजी, हिंदी नि गुजराती मासिकांच्या अनेक वर्षांच्या फायली आणि लहान मुलांच्या गोष्टींची शेकडो पुस्तके आम्ही जमा करून आणली होती. प्रत्येक क्रमिक पुस्तकात कोणकोणते विषय आले पाहिजेत आणि कशा प्रकारच्या कविता नि गोष्टी यांचा क्रमवार समावेश झाला पाहिजे, याची शिक्षणशास्त्राच्या नि मानसशास्त्राच्या दृष्टीने प्राथमिक चर्चा केल्यानंतर आम्ही कामाची वाटणी केली नि पुढील उद्योगाला लागलो.
दररोज संध्याकाळी आमची सभा भरून कोणाला कोणती गोष्ट किंवा कविता आवडली, त्याचा वृत्तान्त प्रत्येकाने सर्वाना सादर करावयाचा असा आमचा शिरस्ता असे. सर्वाच्या मते जी गोष्ट वा कविता पसंत होई, ती त्याने लिहून त्या त्या वर्गाच्या फायलीत दाखल करावयाची. अशा रीतीने अवघ्या दोन-तीन महिन्यांच्या आत चार इयत्तेच्या संकल्पित पुस्तकांच्या फायली अगदी तुडुंब भरून गेल्या. बिगरीसाठी ‘बालवाचन’ हे पुस्तक तयार करण्याचे काम मी एकटय़ा स्वत:कडे घेतले होते.
गुजराती आणि मराठी संपादक मंडळींमध्येही आठवडय़ातून एक-दोन वेळा विचारांची देवघेव होत असे. त्यांच्या पुस्तकांमधील जे जे धडे आम्हाला आवडले ते आम्ही घेतले. नि आमच्या पुस्तकातले जे धडे त्यांना आवडले, ते त्यांनी घेतले. पहिल्याने निवडलेल्या धडय़ांना दोन-दोनदा नि तीन-तीनदा कसोटय़ांच्या काटेकोर चाळण्या आम्ही लावल्या. आणि त्या चाळण्यांमधून अखेर जे धडे शेवटी बाकी उरले तेवढेच आम्ही मुक्रर केले. त्यानंतर माझ्या सहकाऱ्यांना मी निरोप दिला. त्यापुढचे काम माझे एकटय़ाचे होते. निवडलेले सारे धडे मला माझ्या भाषेत आणि शैलीत पुन्हा लिहून काढावयाचे होते. माझ्या क्रमिक पुस्तकांचे स्वरूप संपूर्णतया वाङ्मयीन असले पाहिजे, या गोष्टीवर मुख्यत्वेकरून माझा जास्त कटाक्ष होता.
त्यापूर्वीची क्रमिक पुस्तके ज्यांना साहित्याचा गंध नव्हता, अशा रुक्ष नि अरसिक शिक्षकांनी लिहिलेली असल्याने, त्यांचे स्वरूपशालेयहोते. माझ्या वाचनमालेचा अभ्यास करणाऱ्या मुलांना भावी आयुष्यात उत्तम मराठी भाषा बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, एवढेच नव्हे तर ती नामवंत लेखक झाली पाहिजेत, प्रतिभाशाली कवी झाली पाहिजेत, या एका दृष्टीने मी धडय़ांची नि कवितांची निवड केलेली होती. आधुनिक वाङ्मयात जे जे विविध प्रकार नि तंत्रे आली होती, त्याचा मोठय़ा कौशल्याने मी या सर्व पुस्तकांमधून उपयोग करून घेतलेला आहे.
या वाचनमालेतील काही धडय़ांचे ठळक नमुने वाचकांच्या पुढे ठेवल्यावाचून त्यांना मी काय सांगतो त्याची कल्पना येणार नाही.
लहान मुले ज्या भाषेत बोलतात, त्याच घरगुती भाषेचा आरंभीच्या पुस्तकांमध्ये मी सर्रास उपयोग केलेला आहे. प्रौढ माणसे बोलतात ती किंवा छापील पुस्तकांमध्ये जशी वापरतात तशी भाषा मुलांना वाचावयाला लावणे, हे मानसशास्त्राच्या विरुद्ध आहे. वाचनात मुलांची झपाटय़ाने प्रगती व्हावी एवढय़ासाठी वाचताना ओळखीचे शब्द फिरून फिरून यावेत, एवढेच नव्हे तर काही काही धडय़ांची भाषा कवितेच्या कडव्यासारखी रुणझुणती, नादमधुर नि तालबद्ध असावयाला हवी, या कल्पनेने मीबालवाचनातले आणि पहिलीच्या पुस्तकातले कित्येक धडे रचलेले आहेत.
[सौजन्य : हा लेख
दैनिक लोकसत्ता मधून घेतलेला असून त्यावर संपूर्ण मालकी संबंधित लेखक व लोक्सत्ताची आहे.]

Wednesday, September 15, 2010

बादशहाची अंगठी-
फेलूदा आणि तोपशे लखनऊमध्ये सुटी घालवत असताना एक मोगलकालीन अमूल्य अंगठी चोरीला जाते. फेलूदा तपासाला सुरुवात करतो आणि एका मोठय़ा गुन्हेगाराच्या पाठलागाला प्रारंभ होतो. हा पाठलाग त्याला लक्ष्मणझुल्याकडे घेऊन जातो आणि तेथे एका खडखडय़ा सापाशी तो कसा सामना करतो, याची ही चित्तथरारक कहाणी आहे.
गंगटोकमधील गडबड - निसर्गरम्य गंगटोक या ठिकाणी फेलूदा तोपशे सुटी घालवायला आलेले असतात. तिथे एका कारखानदाराची गूढ हत्या होते. गुन्हेगाराचा माग फेलूदा कसं सोडवतो, ते रोमहर्षक रहस्य या पुस्तकात उलगडलं आहे.
सोनेरी किल्ला- या रोमहर्षक गोष्टीत फेलूदा आणि तोपशे हे मानसशास्त्रज्ञ डॉ. हाजरा आणि मुकुल यांचा पाठलाग करत थेट राजस्थानात पोहोचतात. आपल्याला पूर्वजन्मातील घटना आठवत आहेत, असा मुकुलचा दावा असतो. फेलूदा तोपशे यांना प्रवासात लोकप्रिय रहस्यकथा-लेखक जटायू भेटतात. तेही या दोघांच्या साहसात सामील होतात. अखेर मुकुलच्या सोनेरी किल्ल्यापर्यंत ते पोहोचतात. तिथे या गहन, गूढ, गुंतागुंतीच्या प्रकरणातील अनेक धाग्यांची उकल फेलूदा कौशल्याने हुषारीने करतो.
केस ॅटेची केसची - या गोष्टीत कालका मेलने प्रवास करत असताना त्याच्या निळ्या ॅटॅची केसची दुसऱ्या प्रवाशाच्या केसशी अदलाबदल होते. आपली ॅटॅची परत मिळवून देण्याचं काम तो गृहस्थ फेलूदावर सोपवतो. फेलूदा, तोपशे आणि जटायू ॅटॅची केसचा शोध घेत सिमल्याला पोहोचतात. तेथे अनपेक्षित वळणे मिळून त्यांचा प्रवास खडतर बनतो. सिमल्याच्या बर्फाळ उतारावर या कथेचा श्वास रोखून ठेवणारा उत्कर्षबिंदू या कथेत लेखकाने साधला आहे.
कैलासातील कारस्थान - भारतातील अमूल्य शिल्पांची तस्करी रोखण्यासाठी भुवनेश्वर येथील मंदिरातील यक्षीच्या मस्तकाच्या चोरीचा मागोवा घेत फेलूदा आणि त्यांची टीम वेरुळच्या गुंफांपाशी पोहोचते आणि फेलूदा आपले सारे कौशल्य वापरून या प्रकरणाची उकल करतो.
रॉयल बेंगॉलचे रहस्य - प्रासादात दडवलेल्या गुप्त खजिन्याची माहिती असलेलं सांकेतिक भाषेतील कोडं फेलूदा उलगडत असतो. त्यावेळी जंगलात त्याची गाठ पडते एका रॉयल बेंगॉल नरभक्षक वाघाशी. साहस, शिकार आणि घनदाट दंगलाइतकंच रहस्याचं जाळं असलेली ही कादंबरी वाचावी अशीच.
गणेशाचे गौडबंगाल-
दुर्गापूजेच्या काळात वाराणशीतील प्रसिद्ध कुटुंबाच्या घरातून गणेशाच्या एका मौल्यवान मूर्तीची चोरी होते. ती मूर्ती परत मिळवताना फेलूदाला अट्टल बदमाशाशी सामना करावा लागतो, एका खुनाचा उलगडा करताना भोंदू साधूचं बिंग फोडावं लागतं. ही कहाणी वाचकांची उत्कंठा ताणून धरते.
मुंबईचे डाकू - या कहाणीत जटायूच्या ताज्या पुस्तकावर आधारित मुंबईत जेट बहादुर नावाचा चित्रपट तयार होत असतो. त्याचे शूटिंग पाहायला फेलूदा, तोपशे आणि जटायू मुंबईत आलेले असतात. लाल शर्टातील इसमाला जटायूने एक पाकीट दिल्यावर चित्रपटाचा निर्माता राहात असलेल्या उत्तुंग इमारतीच्या लिफ्टमध्ये एक खून होतो. फेलूदा त्याचे सोबती अत्यंत थरारक परिस्थितीत सापडतात. हे रोमांचक रहस्य शूटिगच्या स्थळावरील धावत्या आगगाडीत अधिक वाढत जातं.
दफनभूमीतील गूढ - कोलकात्यातील पार्कस्ट्रीट दफनभूमीला भेट द्यायला गेले असता फेलूदा त्यांच्या मित्रांना एक थडगं खणलेलं आढळतं. चक्रावून टाकणारं गूढ वाचकांना झपाटून टाकतं.
देवतेचा शाप - राजरप्पाच्या खडकाळ नदी किनाऱ्यावरील मंदिराजवळ घडलेल्या घटनेचे पर्यवसान हजारीबाग येथील एका कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूत होतं. सांकेतिक संदेश लिहिलेल्या डायऱ्या, हरवलेला एक मौल्यवान तिकीटसंग्रह, हजारीबगेच्या रस्त्यावर फिरणारा सर्कशीतला वाघ यामुळे या सहस्यकथेला एक वेगळाच थरारक रंग चढला आहे.
मृत्यूघर - एका मौल्यवान हस्तलिखिताचा शोध घेत असताना फेलूदा आणि त्याच्या सोबत्यांना चमत्कारिक भयंकर माणसं भेटतात आणि फेलूदाला एक रक्त गोठवणारं गूढ, गहन प्रकरण सोडवावं लागतं, ती थरारक गोष्ट या पुस्तकात दिली आहे.
काठमांडूतील कर्दनकाळ - कोलकात्याच्या हॉटेलमधील एका अनोळखी इसमाच्या खुनाचा माग काढत फेलूदा त्याचे मित्र काठमांडूत त्यांच्या जुन्या शत्रूच्या गुहेत जाऊन पोहोचतात आणि त्यातून फेलूदा नकली औषधांचा घोटाळा उघडकीस आणतो. तिथे एकामागोमाग घडणाऱ्या घटनांमुळे ही साहसकथा रंजक, रोचक, रोमहर्षक झाली आहे.
(‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ संच- रोहन प्रकाशन, या १२ पुस्तकांचा ९०० रुपयांचा संच ६७५ रुपयांना सवलतीत उपलब्ध आहे. त्याचसोबत कोणत्याही दोन पुस्तकांसोबत एक आकर्षक, लहानसे स्लॅमबुक भेट म्हणून देण्यात येत आहे. )

सौजन्य : (ग्रंथविश्व) -दैनिक लोकसत्ता
प्रकाशक : रोहब प्रकाशन ,पुणे

Related Posts Plugin for WordPress, Blogger...