Friday, October 1, 2010
केशव अत्रे यांची ‘नवयुग वाचनमाला’ ‘परचुरे प्रकाशन’तर्फे लवकरच पुन्हा प्रकाशित होत आहे. त्यामुळे उत्तम मराठी भाषेचा नमुना असलेले पाठ वाचण्याची संधी या पिढीतील बालवाचकांना आता मिळणार आहे. तसेच ज्येष्ठ पिढीला हे पाठ स्मरणरंजनाचा आनंद मिळवून देतील. अत्रे यांनी कोणत्या भूमिकेतून ‘नवयुग वाचनमाला’ची निर्मिती केली, त्यासाठी काय धडपड केली, त्यांना कोणाकोणाचा पाठिंबा होता, हे समजावून सांगणारे प्रकरण ‘कऱ्हेचे पाणी’मध्ये आहे. त्यातील हा संक्षिप्त भाग-
१९२६ साली बी. टी.ची परीक्षा मी जेव्हा उत्तीर्ण झालो, तेव्हापासून प्राथमिक शाळेतल्या जुन्यापुराण्या मराठी क्रमिक पुस्तकांचा जीर्णोद्धार हा केलाच पाहिजे, ही जाणीव विशेष तीव्रतेने मला होऊ लागली. त्या एकाच विषयावर कित्येक वर्षे अनेक शैक्षणिक परिषदांमधून मी माझे विचार अत्यंत जळजळीत शब्दांत प्रकट करू लागलो. पुढे ‘वासंती’ या काव्यसंग्रहाला मी जी ‘प्रस्तावना’ लिहिली, तिच्यात सरकारी क्रमिक पुस्तकांतील काव्यावर मी एवढी कडक टीका केली की, तिच्यामुळे सरकारी शिक्षणखात्याला प्रचंड हादरा बसला नि क्रमिक पुस्तकांतील काव्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन महाराष्ट्रातल्या शिक्षकांना मिळाला. विलायतेत टी. डी.चा अभ्यास करीत असताना तिकडच्या प्राथमिक शाळांतील क्रमिक पुस्तकांचा मी विशेष, काळजीपूर्वक अभ्यास केला. आणि स्वदेशी परत येताना बरोबर अनेक निरनिराळ्या क्रमिक पुस्तकांचे नमुने आणले. आपण आपल्या कल्पनेप्रमाणे नवीन आदर्श क्रमिक पुस्तके मराठीमध्ये लिहावीत अशी पोटतिडीक तेव्हापासून माझ्या मनाला लागून राहिली होती. पण क्रमिक पुस्तके लिहावयाची म्हणजे काही विडंबन कविता भरकटावयाच्या नाहीत किंवा लघुकथा खरडावयाच्या नाहीत. तो कमालीच्या कष्टाचा नि हजारो-नव्हे-लाखो रुपयांच्या खर्चाचा प्रश्न होता. एवढे पैसे मी कोठून आणणार? कोण मला ते देणार? त्याखेरीज क्रमिक पुस्तकांची जी सरकारी मक्तेदारी शे-पाऊणशे वर्षे चालत आलेली होती, ती माझ्यासारखा एकुलता एक माणूस कसा काय मोडू शकणार? आणि ती मोडल्याखेरीज माझ्या संकल्पित क्रमिक पुस्तकांना कोण हिंग लावून विचारणार? ही संकटे एखाद्या डोंगराच्या भेसूर सुळक्याप्रमाणे माझ्या डोळ्यांना भेडसावत असल्याने क्रमिक पुस्तके लिहिण्याचा माझा अनेक वर्षांचा संकल्प मनातल्या मनात थिजून बसला होता.
‘पीपल्स ओन’ खटल्याच्या अजगराच्या विळख्यातून मी सहीसलामत सुटलो. त्यानंतर काही महिने मनाने आणि देहाने मी इतका खंगून गेलो होतो की, पुढे काय करायचे हेच मला समजेनासे झाले. माझ्या आयुष्यातला सारा आनंद आटून गेला, आशा वाळून गेल्या आणि समाधान कोळपून गेले. एखाद्या वठलेल्या नि झडलेल्या झाडाप्रमाणे मी जीवन कसेबसे कंठित होतो. एवढय़ात मुंबईच्या ‘कर्नाटक प्रिंटिंग प्रेस’चे मालक श्री. मंगेशराव कुळकर्णी एक दिवस मला माझ्या पुण्यातल्या घरी भेटावयाला आले. त्यांची-माझी पूर्वीची काहीच ओळख नव्हती. पण त्यांचे नाव अन् उत्कृष्ट इंग्रजी नि मराठी छपाईबाबत त्यांच्या छापखान्याची कीर्ती पुष्कळ वर्षांपासून माझ्या परिचयाची होती. आदर्श शालेय पुस्तके प्रकाशित करून त्या सृष्टीत काहीतरी नवीन क्रांती करावी, या विचाराने ते अंतर्बाह्य़ भारून गेलेले होते. आणि त्याच हेतूने ते माझ्याकडे आले होते.
‘‘हं, काय चाललंय सध्या?’’ मंगेशरावांनी हसत हसत मला विचारले.
‘‘काय चालणार? तुरुंगाच्या दारापर्यंत जाऊन नुकताच सुखरूपपणे परत आलो!’’ मी खिन्न स्वरात उत्तरलो.
‘‘ते विसरा हो आता! त्याचा आता कशाला विचार करता?’’ मंगेशराव वडीलपणाच्या अधिकाराने जरा रागावून मला म्हणाले, ‘‘पण पुढे काय करणार? काही करावयाचा विचार आहे काय?’’
‘‘विचार पुष्कळ आहे! पण त्याचा उपयोग काय?’’ मी किंचित हसून म्हणालो. ‘‘उदाहरणार्थ, मला प्राथमिक शाळेसाठी मराठी क्रमिक पुस्तके लिहावयाची आहेत.’’
‘‘तेवढय़ासाठी तर मी तुमच्याकडे आलो आहे!’’ मंगेशराव चटकन मध्येच म्हणाले, ‘‘बोला, तुमची लिहायची तयारी असेल तर मी ती पुस्तके छापून प्रसिद्ध करावयाला तयार आहे.’’
क्षणभर मी निरुत्तरच झालो. माझा अनेक वर्षांचा संकल्प साकार करणाराच माणूस आपण होऊन आपल्या पावलांनी माझ्यासमोर चालत आलेला तोपर्यंत तरी मला आयुष्यात भेटला नव्हता. मनातल्या मनात मी दिपूनच गेलो.
काहीतरी बोलावयाचे म्हणून मी म्हणालो, ‘‘पण अशी क्रमिक पुस्तके लिहायला पुष्कळच खर्च येईल आणि त्यासाठी अनेक माणसांचे अनेक महिने सहकार्य घ्यावे लागेल.’’
‘‘किती खर्च येईल?’’ मंगेशरावांनी ताडकन विचारले.
‘‘येईल पाच ते सहा हजार रुपये!’’ तोंडाला येईल तो आकडा मी बोलून टाकला.
मंगेशरावांनी आपल्या खिशातून झटकन चेकबुक काढले नि सहा हजारांचा चेक माझ्या हातावर ठेवला!
तोपर्यंत एवढय़ा रकमेचा चेक जन्मात माझ्या नावाने कोणी लिहिलेला नव्हता. मी अक्षरश: कोलमडलो!
मंगेशरावांनी मला अगदी खिंडीतच गाठले. टंगळमंगळ करण्याचा मुळी प्रश्नच उरला नाही. पुढच्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून कामाला सुरुवात करतो, असे मी त्यांना आश्वासन दिले, तेव्हा ते आनंदाने निघून गेले.
त्यानंतर दोन का तीन दिवसांनी लंडनमधील माझे सहाध्यायी श्री. लालभाई रतनजी देसाई हे मला पुण्यात भेटले. ते त्या वेळी मुंबईच्या ‘सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज’ मध्ये प्राध्यापक होते. मराठी क्रमिक पुस्तके लिहिण्याची माझी कल्पना मी त्यांना समजावून सांगितली. त्यांना फार आनंद झाला. ते म्हणाले, ‘‘मग अशीच क्रमिक पुस्तके गुजरातीमध्ये आम्ही का तयार करू नयेत?’’
मी म्हणालो, ‘‘माझी मुळीच हरकत नाही. तुम्ही नि आम्ही एकमेकांच्या सहकार्याने ही क्रमिक पुस्तके मराठीत अन् गुजरातीत तयार करू!’’
मुंबईमध्ये ‘न्यू ईरा स्कूल’चे प्रिन्सिपल एम. टी. व्यास, एम. ए. (लंडन) हे शिक्षणशास्त्रज्ञ म्हणून नामांकित होते. ते आम्हा उभयतांचे मित्र होते. गुजराती क्रमिक पुस्तकांच्या बाबतीत त्यांचे सहकार्य लालभाईंनी मागितले. ते त्यांनी मोठय़ा आनंदाने दिले. तेव्हा व्यास नि देसाई यांच्या सहसंपादकत्वाखाली गुजराती वाचनमाला नि माझ्या संपादकत्वाखाली मराठी वाचनमाला एकमेकांच्या सहकार्याने तयार करण्यात यावी, असा आमचा करार झाला. गुजराती वाचनमाला मंगेशराव कुळकण्र्यानी छापावी नि ती गुजरातमधल्या एका सुप्रसिद्ध शैक्षणिक प्रकाशकाने प्रकाशित करावी असेही ठरले. सदर क्रमिक पुस्तके लिहिण्याचे काम प्रिं.. व्यास यांच्या मुंबईमधल्या ‘न्यू ईरा स्कूल’मध्येच आणि आम्ही सर्वानी करावे, हा बेत मुक्रर केला. दोन्हीही भाषेमध्ये ‘नवयुग-वाचन-माला’ या एकाच नावाने ही क्रमिक पुस्तके प्रसिद्ध केली जावीत, असे आम्ही एकमताने ठरविले.
त्यानंतर मी पुढील कामाच्या जुळवाजुळवीला लागलो. आम्हाला एकंदर पाच पुस्तके लिहावयाची होती. चार इयत्तेसाठी चार नि बिगरीच्या वर्गासाठी एक. फार अवघड काम होते हे. मराठी भाषेमध्ये त्यापूर्वी पन्नास वर्षांमध्ये लहान मुलांसाठी जेवढे जेवढे म्हणून वाङ्मय कोणी लिहिले असेल, त्याचे मंथन करून त्यातले ‘नवनीत’ बाहेर काढावयाचे आणि ते बालकांना द्यावयाचे, हे आमचे मुख्य उद्दिष्ट होते. हे सर्व काम एकटय़ा माझ्याच्याने होण्यासारखे नव्हते. तेवढय़ासाठी बालवाङ्मयाचा नि शिक्षणशास्त्राचा अभ्यास केलेल्या कुशल नि रसिक सहकाऱ्यांची मला आवश्यकता होती.
या कामासाठी मी पुढील पाच सहकाऱ्यांची निवड केली- गोपीनाथ तळवलकर (संपादक-आनंद), प्रा. गंगाधर भाऊ निरंतर, एम. ए. , प्रिं. गणेश हरी पाटील, रंगो कृष्ण चिंचळकर, बी. ए., प्रा. वा. भा. पाठक, एम. ए. मराठी साहित्याच्या वाचकांना ही सर्व नावे चांगलीच परिचित आहेत.
१९३२ च्या अखेरीस आम्ही सर्व मंडळी पुण्याहून मुंबईला आलो आणि ‘न्यू ईरा स्कूल’ मध्ये तळ ठोकला. ‘आनंद’, ‘खेळगडी’, ‘करमणूक’, ‘मनोरंजन’ याखेरीज अनेक इंग्रजी, हिंदी नि गुजराती मासिकांच्या अनेक वर्षांच्या फायली आणि लहान मुलांच्या गोष्टींची शेकडो पुस्तके आम्ही जमा करून आणली होती. प्रत्येक क्रमिक पुस्तकात कोणकोणते विषय आले पाहिजेत आणि कशा प्रकारच्या कविता नि गोष्टी यांचा क्रमवार समावेश झाला पाहिजे, याची शिक्षणशास्त्राच्या नि मानसशास्त्राच्या दृष्टीने प्राथमिक चर्चा केल्यानंतर आम्ही कामाची वाटणी केली नि पुढील उद्योगाला लागलो.
दररोज संध्याकाळी आमची सभा भरून कोणाला कोणती गोष्ट किंवा कविता आवडली, त्याचा वृत्तान्त प्रत्येकाने सर्वाना सादर करावयाचा असा आमचा शिरस्ता असे. सर्वाच्या मते जी गोष्ट वा कविता पसंत होई, ती त्याने लिहून त्या त्या वर्गाच्या फायलीत दाखल करावयाची. अशा रीतीने अवघ्या दोन-तीन महिन्यांच्या आत चार इयत्तेच्या संकल्पित पुस्तकांच्या फायली अगदी तुडुंब भरून गेल्या. बिगरीसाठी ‘बालवाचन’ हे पुस्तक तयार करण्याचे काम मी एकटय़ा स्वत:कडे घेतले होते.
गुजराती आणि मराठी संपादक मंडळींमध्येही आठवडय़ातून एक-दोन वेळा विचारांची देवघेव होत असे. त्यांच्या पुस्तकांमधील जे जे धडे आम्हाला आवडले ते आम्ही घेतले. नि आमच्या पुस्तकातले जे धडे त्यांना आवडले, ते त्यांनी घेतले. पहिल्याने निवडलेल्या धडय़ांना दोन-दोनदा नि तीन-तीनदा कसोटय़ांच्या काटेकोर चाळण्या आम्ही लावल्या. आणि त्या चाळण्यांमधून अखेर जे धडे शेवटी बाकी उरले तेवढेच आम्ही मुक्रर केले. त्यानंतर माझ्या सहकाऱ्यांना मी निरोप दिला. त्यापुढचे काम माझे एकटय़ाचे होते. निवडलेले सारे धडे मला माझ्या भाषेत आणि शैलीत पुन्हा लिहून काढावयाचे होते. माझ्या क्रमिक पुस्तकांचे स्वरूप संपूर्णतया वाङ्मयीन असले पाहिजे, या गोष्टीवर मुख्यत्वेकरून माझा जास्त कटाक्ष होता.
त्यापूर्वीची क्रमिक पुस्तके ज्यांना साहित्याचा गंध नव्हता, अशा रुक्ष नि अरसिक शिक्षकांनी लिहिलेली असल्याने, त्यांचे स्वरूप ‘शालेय’ होते. माझ्या वाचनमालेचा अभ्यास करणाऱ्या मुलांना भावी आयुष्यात उत्तम मराठी भाषा बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, एवढेच नव्हे तर ती नामवंत लेखक झाली पाहिजेत, प्रतिभाशाली कवी झाली पाहिजेत, या एका दृष्टीने मी धडय़ांची नि कवितांची निवड केलेली होती. आधुनिक वाङ्मयात जे जे विविध प्रकार नि तंत्रे आली होती, त्याचा मोठय़ा कौशल्याने मी या सर्व पुस्तकांमधून उपयोग करून घेतलेला आहे.
या वाचनमालेतील काही धडय़ांचे ठळक नमुने वाचकांच्या पुढे ठेवल्यावाचून त्यांना मी काय सांगतो त्याची कल्पना येणार नाही.
लहान मुले ज्या भाषेत बोलतात, त्याच घरगुती भाषेचा आरंभीच्या पुस्तकांमध्ये मी सर्रास उपयोग केलेला आहे. प्रौढ माणसे बोलतात ती किंवा छापील पुस्तकांमध्ये जशी वापरतात तशी भाषा मुलांना वाचावयाला लावणे, हे मानसशास्त्राच्या विरुद्ध आहे. वाचनात मुलांची झपाटय़ाने प्रगती व्हावी एवढय़ासाठी वाचताना ओळखीचे शब्द फिरून फिरून यावेत, एवढेच नव्हे तर काही काही धडय़ांची भाषा कवितेच्या कडव्यासारखी रुणझुणती, नादमधुर नि तालबद्ध असावयाला हवी, या कल्पनेने मी ‘बालवाचना’तले आणि पहिलीच्या पुस्तकातले कित्येक धडे रचलेले आहेत.
[सौजन्य : हा लेख दैनिक लोकसत्ता मधून घेतलेला असून त्यावर संपूर्ण मालकी संबंधित लेखक व लोक्सत्ताची आहे.]
Labels: MUMBAI, NEW ERA SCHOOL, SCHOOL BOOKS
0 comments:
Post a Comment