Sunday, November 28, 2010
क्रीडापटूंची चरित्रे आणि आत्मचरित्रे अनेक अंगाने वाचकांचे कुतूहल पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात। आनंदही देतात. मोहम्मद अली या जगप्रसिद्ध बॉक्सरचे ‘दि ब्लॅक लाइट्स- इनसाइड स्टोरी ऑफ प्रोफेशनल बॉक्सिंग’ हे चरित्र बऱ्याच वर्षांपूर्वी वाचले होते. त्यातील हिंस्रता आणि कारूण्य अनुभवले होते. या उपशीर्षकातील ‘इनसाइड स्टोरी’ महत्त्वाची.
वाचकाला ही ‘इनसाइड स्टोरी’ हवी असते। आंद्रे अँगासी याने त्याच्या आत्मकथनात ही ‘इनसाइड स्टोरी’ ओपन करून दाखवली आहे.
आंद्रेचे वडील माइक हे लास वेगास शहरात गरीब वस्तीत राहणारे. त्यांना चार मुले. माइक कॅसिनोमध्ये हरकाम्याहोता. काही दशकांपूर्वी तो तेहरानमध्ये होता. तेहरानमधील ब्रिटिश व अमेरिकन शिपाई टेनिस खेळत. तेथे माइक बॉलबॉय होता. पुढे तो लास वेगासला आला. लास वेगासला टेनिसच्या अॅलन किंग टूर्नामेंट्स होत. एकदा माइक त्या टूर्नामेंट बघायला गेला होता. तेव्हा एकचाकी गाडी भरून डॉलरची चकचकीत चांदीची नाणी प्राइज मनी म्हणून कोर्टवर आणली. ते चकचकणारे डॉलर पाहून माइकचे डोळे चकाकले. श्रीमंत होण्याचा मार्ग त्याला दिसला होता. टेनिसच्या चेंडूत भविष्यात पैसा आहे, हे त्याने ओळखले. त्याचे स्पर्धेचे टेनिस खेळण्याचे वय केव्हाच निघून गेले होते, पण त्याला चार मुले होती. यापैकी दोघांना तरी टेनिसपटू करायचे त्याने ठरवले.
माइकने आंद्रे आणि फिली या दोघांना टेनिस शिकवण्यास सुरुवात केली. पण आंद्रेमध्ये जी ‘किलिंग इन्स्टिंन्क्ट’ होती ती फिलीमध्ये नव्हती. आंद्रेवर माइकने लक्ष केंद्रित केले. त्याने आंद्रेसाठी चेंडू फेकणारे यंत्र तयार केले. ताशी ११० मैल वेगाने हे यंत्र आंद्रेकडे चेंडूफेक करी. वेगाची आग ओकत येणाऱ्या चेंडूंशी खेळताना आंद्रेचे कोवळे हातपाय दमून जात. रोज २,५०० चेंडू याप्रमाणे दशलक्ष चेंडू आंद्रेने खेळावे, अशी माइकची अपेक्षा होती. त्यावेळी आंद्रे आठवर्षांचासुद्धा नव्हता. ‘या यंत्रातून येणाऱ्या दशलक्ष चेंडूंशी तू खेळलास तर तू कधीही हरणार नाहीस’ असे त्याचे वडील त्याला सांगत. आंद्रेचे शालेय शिक्षण यथातथाच चालले होते. टेनिसच्या प्रॅक्टिससाठी त्याचे वडील त्याचीशाळाही बुडवत. आंद्रे वडिलांच्या मार्गदर्शनाखाली टेनिस शिकत असे, तेथे जेम्स ब्राऊन हा फुटबॉलपटू आला होता. माइक त्याला म्हणाला, ‘जॉन, आंद्रे तुला टेनिसमध्ये सहज हरवेल.’ उंचापुरा जॉन सहज हसला. क्लबचा मॅनेजर म्हणाला, ‘जॉन, खेळू नकोस, तू हरशील.’ तरी जॉन आंद्रेशी खेळला. आठ वर्षांच्या आंद्रेने त्याला सहजासहजीहरवले. माइक खूश झाला, पण आंद्रे? ‘आंद्रे स्टार्टेड हेटिंग टेनिस,’ माइकचे आंद्रेवर अमाप प्रेम. आंद्रे म्हणतो, ‘वडिलांनी जरा कमी प्रेम केले असते तर बरे झाले असते.’
किशोरवयीन आंद्रेला फ्लोरिडा येथील निक बालेटिएरीच्या टेनिस अकॅडमीत पाठवले. प्रेमाचा ओलावा नसलेल्याया अकॅडमीत आंद्रेला घरच्या आठवणी येत. तो अस्वस्थ होई. दिवसभर टेनिस एके टेनिस. त्याचे मन बंड करून उठले. येथेच त्याने कान टोचून घेतले. तो दारू पिऊ लागला. मादक द्रव्यांचे धूम्रपान करू लागला, तंबाखू खाऊ लागला, मारामाऱ्या करू लागला. सगळेजण त्याला बंडखोर म्हणत. पण त्याला बंडखोर व्हायचे नव्हते. त्याच्या वयाच्या इतर पोरांसारखाच तो होता. ते वयच तसे असते, याबाबत आंद्रेने काही मार्मिक विधाने केली आहेत. त्याचा आशय असा, ‘तरूण पोरे माझे अनुकरण करू पाहतात, हे ऐकून मी कधी हुरळून जातो, कधी मला कानकोंडे झाल्यासारखे वाटते. मी पूर्ण गोंधळून जातो. या सगळ्यांना आंद्रे आगासीसारखे व्हायचे आहे, याची मी कल्पनाच करू शकत नाही, कारण मलाच आंद्रे अँगासी व्हायचे नाही.’
माइकची गुंतवणूक फळाला आली. व्यावसायिक टेनिसपटू म्हणून आंद्रेने १९८७ साली ब्राझीलमधील पहिली टेनिस टूर्नामेंट जिंकली. पुढे चढउतार होतच राहिले. डोक्याला अकाली टक्कल पडू लागले होते. १९८९ मध्ये तो फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत पोचला. डोक्यावर चिकटवलेले नकली केस पडतील म्हणून तो गोंधळला. यू. एस. ओपनही तो हरला. १९९२ मध्ये तो विम्बल्डन जिंकला. सेलिब्रेट करण्यासाठी आंद्रेने माइकला मोठय़ा उत्साहाने फोन केला, पण पलीकडूनही काही आवाज आला नाही. काही क्षणात माइक म्हणाला, ‘पण तो चौथा सेट तू हरायला नको होतास,’ त्यानंतर त्याला फक्त हुंदके ऐकू आले आणि फोन ठेवला गेला.
त्याने डोक्याचा चमन केला. नकली केस काढून टाकले. त्या उतरणीच्या काळात तो क्रमांक एक वरून १४१ व्याक्रमांकावर आला. करियरच्या मध्यावरचे हे ढासळणे थांबवण्यासाठी बॉब गिल्बर्ट, गिल रेयस या दोन कोचनी त्याला मदत केली, धीर दिला. आंद्रे गिल्बर्टला म्हणत असे, ‘मी इतर कितीतरी कारणांसाठी खेळलो असेन, पण मी माझ्या आनंदासाठी टेनिस कधीच खेळलो नाही.’ त्यावर गिल्बर्ट म्हणाला, ‘अरे, लाखो लोक पोटासाठी न आवडणारे व्यवसाय करतात, तू एकटा नाहीस.’
आंद्रेने अपमान गिळून पुन्हा चॅलेंजर टूर्नामेंट्सपासून सुरूवात केली. १९९९ साल उजाडले. आंद्रे आता २९ वर्षांचाझाला होता. तो स्वत:शी म्हणाला, ‘प्रवासात खरी सुस्पष्टता, प्रसाद आणि उदात्तता असते,’ त्याने त्याचे विचार सुंदर शब्दबद्ध केले आहेत. ‘खेळाडू एका धाग्याने लोंबकळत असतो. खाली असते खोल तळ नसलेली दरी. मृत्यूतर तुमच्या चेहऱ्याकडे सतत पाहात असतो,’ यशाच्या कमानीवर सतत टिकून राहणे किती कठीण असते, अपयश म्हणजे खेळाडूसाठी मृत्यूच असतो, हे आंद्रेने मनापासून लिहिले आहे.
काही काळ आंद्रेने मेथ अँम्फटामाइन हे बंदी घातलेले औषध टेनिसमधील कामगिरी चांगली होण्यासाठी घेतलेहोते. हे औषध घेऊनसुद्धा तो हरला होता. टेनिस अधिकाऱ्यांपासून त्याने हे लपवून ठेवले होते. त्याच्या या गौप्यस्फोटामुळे आत्मकथन प्रकाशित झाल्यावर त्याच्यावर घणाघाती टीका झाली होती. ‘करून करून थकलो आणि देवपूजेला लागलो’ अशा तऱ्हेचे आरोप त्याच्यावर झाले, पण जे घडले ते त्याने लिहिले आहे.
आंद्रेचा ब्रुक शील्ड्स या नटीशी विवाह झाला होता. पण तो टिकला नाही. १९९९ मध्ये आंद्रे फ्रेंच ओपन जिंकला. त्यावेळी स्टेफी त्याच्याशी बोलतसुद्धा नसे. टेनिसच्या इतिहासात स्टेफी व आंद्रे या दोघांनी चार स्लॅम्स जिंकले होते व सुवर्णपदक मिळवले होते. स्टेफी आणि आंद्रे यांचा विवाह व्हावा अशी आंद्रेचा कोच ब्रॅड गिल्बर्टची इच्छा होती. त्यासाठी त्याने प्रयत्नही केले. २००१ साली स्टेफी आणि आंद्रे यांचा विवाह झाला. त्या दोघांनाही तीव्र स्पर्धेचेवाईट आणि चांगले परिणाम माहीत होते. टेनिसपटूंचा बहर ओसरला म्हणजे काय वाटते याचा दोघांनी अनुभव घेतला होता. जे आपल्या लहानपणी आपल्याला सोसावे लागले ते आपल्या मुलांना सोसायला लागता कामा नये, असा त्या दोघांनी निश्चय केला.
पॅरिसमध्ये असताना आंद्रे लूव्र या प्रख्यात वस्तुसंग्रहालयात पेंटिंग्ज पाहात फिरत होता. एक भव्य पेंटिंग त्याने नजरले. त्या पेंटिंगमधील एका तरूणीच्या कडेवर दोन लहान मुले होती, तिचा हात तरूणाने धरला होता, त्यातरूणाची मान एका म्हाताऱ्याने पकडली होती. त्या म्हाताऱ्याच्या हातात मोठी पिशवी होती. बहुतेक त्यात पैसे असावेत. हे पेंटिंग पाहून आंद्रे अचंबित झाला. जणू त्याचेच चित्र तो पाहात आहे असे त्याला वाटले. जे शिक्षण आपल्याला मिळाले नाही ते उपेक्षित, गरीब मुलांना मिळावे म्हणून लास वेगासच्या सर्वात वाईट ठरवलेल्या वस्तीत आंद्रेने एक शाळा काढली. मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्याने त्या शाळेत पैसा ओतला आहे. टेनिस समीक्षक बड कॉलिन्सने आंद्रेमध्ये झालेल्या बदलाचे वर्णन ‘फुकट गेलेला माणूस ते सद्गुणाचा पुतळा’ असे केले आहे. त्यावर आंद्रेचे म्हणणे आहे, ‘माझे असे काही रूपांतर झालेले नाही. माझी एक प्रतिमा जगाने बघितली आहे, माझी ही दुसरी प्रतिमा होतीच, त्याचा आज मला शोध लागला आहे.’
बिनधास्त लिहिलेले हे आत्मवृत्त वाचनीय आहे, पण शैली, शब्दांची निवड, लेखनातील मांडणी, कारागिरी पाहून हे सर्व आंद्रेचे आहे का असा प्रश्न पडतो. ऋणनिर्देशात आंद्रेने जे आर मोहरिंगर या पुलित्झर विजेत्या पत्रकाराशिवाय हे आत्मकथन लिहू शकलो नसतो असे म्हटले आहे. पण मोहरिंगरने सर्व श्रेय आंद्रेलाच दिले आहे. आत्मकथनात एक्झिबिशनिझम- प्रदर्शन वृत्ती आणि नार्सिसिझम- आत्मरती अपरिहार्य असते. तरीसुद्धा हे आत्मवृत्त वाचताना सादरीकरण प्रामाणिक आहे असे वाटत राहते.
टेनिस आणि उत्कंठा हातात हात घालून येतात .मॅचमधील प्रत्येक पॉइंट, डय़ूस प्रेक्षकांची तसेच खेळाडूंची उत्कंठा वाढवत असतो. खेळणाऱ्याच्या रक्तात अँड्रीनॅलीन वाहत असतेच, पण प्रेक्षकांच्या रक्तातसुद्धा अँड्रीनॅलीनची पातळी वाढत असते. प्रेक्षकांच्या मेंदूतील दर्पणपेशी- मिरर न्युरॉन्स त्यांना जणू टेनिस खेळण्याचा प्रत्यक्ष अनुभव देतअसतात. वाढणाऱ्या उत्कंठेत भीतीयुक्त आनंद असतो. थ्रिल असते. आपला आवडता खेळाडू जिंकणार की हरणार या आंदोलनात प्रेक्षक जीव मुठीत धरून मॅच पाहत असतो. अल्फ्रेड हिचकॉकने हे ओळखले होते. स्ट्रेंजर्स ऑन ट्रेन या चित्रपटात शेवटच्या शिगेला पोचण्याच्या क्षणात त्याने टेनिस मॅचचा उपयोग केला आहे. २००६ ची यूएस ओपनही आंद्रेची शेवटची खेळी. त्यानंतर तो निवृत्त होणार होता. ही मॅच अशीच अटीतटीची झाली. त्यावेळी आंद्रेने
स्वत:ला बजावले, ‘ही मॅच तू एन्जॉय कर, मॅचचा प्रत्येक क्षण उरात भरून घे. तू टेनिसचा द्वेष करत असलास तरी आजच्या रात्रीनंतर कदाचित तुला याच टेनिसची खूप आठवण येणार आहे. चुकल्याचुकल्यासारखे वाटणार आहे.’ हे बॉल टू बॉल आत्मचरित्र आकंठ वाचनीय आहे.
डॉ. आनंद जोशी (लोकसत्ता )
ओपन अॅन ऑटोबायॉग्राफी बाय आंद्रे अॅगासी;
प्रकाशक : नॉफ पब्लिशर;
पृष्ठसंख्या ३८८
Labels: Tennis player
0 comments:
Post a Comment