Tuesday, May 5, 2009

मध्यरात्री त्याला अचानक जाग आली, ती कसल्यातरी "खळ्ळ्' आवाजाने. अंधारातच त्याने खोलीभर नजर फिरवली. आणि एक गोष्ट लक्षात येऊन, त्याच्या छातीत धस्स झाले! आवाज झाला होता, तो दरवाजाच्या कडीचा. त्याने पक्की लावलेली कडी आपोआप निघाली होती. आणि दार सावकाश उघडू लागले होते.... जागच्या जागी खिळल्यासारखा, जगन्नाथ ते दृश्य पाहत राहिला. दारात एक जख्ख म्हातारा उभा होता. बोडका. लांबुडक्या डोक्याला तुळतुळीत टक्कल पडलेले, चेहरा सुरकुत्यांनी मढलेला. गालाची हाडे वर आलेली, आणि अस्थिपंजर शरीर. डोळे मात्र निखार्यासारखे चमकत होते. नजर जगन्नाथवर रोखलेली होती. जगन्नाथने किंकाळी मारली, पण ती ओठातून बाहेर फुटलीच नाही. त्या बोडक्या म्हातार्याने त्याला आपल्याबरोबर चलण्याची खूण केली. जगन्नाथ चालू लागला. खरेतर त्याला जायचे नव्हते, पण स्वत:च्या इच्छाशक्तीवर जणू त्याचा ताबाच राहिलेला नव्हता. ....सर्व शक्ती एकवटून तिथून पळून जावे, असे वाटत होते, पण मनाचे सांगणे पाय मानत नव्हते. कुठे निघाले होते ते दोघे? अगदी नेहमीच्या वास्तवातून उठवून, रत्नाकर मतकरी आपल्या वाचकाला एका अद्भुत प्रदेशात घेऊन जातात. गूढ, भयप्रद, अनामिक. त्यांचे बोट धरून वाचक झपाटल्यासारखा पानांमागून पाने उलटत जातो... तरुण मनाच्या वाचकांना संमोहित करणार्या, मतकरींच्या वौशिष्ट्यपूर्ण आगळ्यावेगळ्या गूढकथांचा संग्रह.
रंगांधळा
लेखक : रत्नाकर मतकरी
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस

Wednesday, April 15, 2009

चाळीस लाख वर्षांपूर्वी त्या चकाकणारया काळ्या पाषाणाने मानवपणाची ठिणगी टाकून मानवी उत्क्रांतीला चालना दिली. एकविसाव्या शतकात तसाच काळा पाषाण चंद्रावर सापडला. त्यानंतर डेव्ह बौमन, फ्रँक पूल आणि त्यांचा महासंगणक हअल यांच्या धाडसी मोहिमेला सुरूवात झाली.

गुरूचा उपग्रह असणारया युरोपावरच्या तिसरया पण अतिभव्य पाषाणाशी झालेल्या झगड्यामध्ये फ़क्त डेव्ह बौमन वाचला.त्याच यंत्र-मानवात रूपांतर झालं.

सन ३००१.... मानवजात अजून आश्चर्यकारकरित्या टिकून आहे. तिन्ही पाषाणांचं सूर्यमालेवर वर्चस्व आहे. अचानक हजार वर्षापूर्वी अंतराळात हरवलेल्या फ्रँक पूलचा शोध लागतो. गोठलेल्या अवस्थेमधल्या फ्रँक पूलला पुन्हा जागं करण्यात येतं. हजार वर्षापूर्वी गुरू ग्रहाकडे गेलेल्या मोहिमेमधलं मुख्य काम पूर्ण करण्यासाठी फ्रँक युरोपाकडे जातो आणि पाषाणानं ओढून घेतलेला डेव्ह बौमन आणि महासंगणक हअल त्यांना माहीत झालेलं भीषण सत्य सांगतात.
मानवजातीचं भवितव्य त्याच्याशी निगडित आहे....

३००१ फायनल ओडिसी
मूळ लेखक: आर्थर सी. क्लार्क
अनुवाद: डॉ. प्रमोद जोगळेकर
प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाउस

Related Posts Plugin for WordPress, Blogger...