Thursday, November 5, 2009
विख्यात कथाकार जेफ्री आर्चर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला "कॅट ओ'नाईन टेल्स' हा पाचवा कथासंग्रह. अत्यंत कल्पकतेने गुंफलेल्या या कथांमधे सशक्त व्यक्तिचित्रं आहेत आणि या कथांचे शेवट वाचकांची मती कुंठित करणारे आहेत. जेफ्री आर्चर यांनी दोन वर्षाच्या कालावधीत एकूण पाच वेगवेगळ्या कारागृहात वास्तव्य केले. त्या काळात अनेक लघुकथांचे धागे त्यांना मिळाले. स्वत:च्याच मालकीचे पोस्ट ऑफिस लुटणार्या माणसापासून ते रशियाच्या दौर्यावर असताना आपल्या पत्नीच्या खुनाचे कारस्थान करणार्या माणसाची कथा रंगतदार शैलीत त्यांनी मांडली आहे. प्रत्येक कथेचा शेवट मात्र अनपेक्षित आहे, धक्कादायक आहे. या कथासंग्रहात एक रेस्टॉरंटचा मालक आहे, जो मोठा धूर्त आणि चलाख आहे. फेरारीतून हिंडणारा आणि फ्लोरेन्समधे प्रासादतुल्य व्हिलात सुटीसाठी जाऊन राहणारी ही असामी टॅक्स चुकवण्यासाठी काय काय क्लृप्त्या योजते याची मनोरंजक कहाणी आहे. "लाल बादशहा' कथेमधे एका संग्राहकाला एका बुद्धिबळातील सेटमधील लाल रंगाचा राजा मिळवून देण्यासाठी एक भामटा कसा जिवाचा आटापिटा करतो त्याची वाचकांना थक्क करून सोडणारी हकिकत आहे. "द कमिशनर' ही कथा तर चक्क मुंबईतील एका निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या पोलीस कमिशनरच्याच आयुष्यात घडते. "द अँलिबी' आणि "चॅरिटी बिगिन्स अँट होम' या कथाही अशाच वाचकांना हतबुद्ध करून सोडणार्या आहेत. शेवटची कथा "इन द आय ऑफ द बिहोल्डर' ही कथा लेखक जेफ्री आर्चर यांची सर्वात आवडती कथा. तुरुंगवासाच्या अखेरच्या दिवसांमधे त्यांना त्या कथेचा धागा गवसला. आपल्या नेहमीच्या खुमासदार शैलीत हा बारा कथांचा संग्रह त्यांनी वाचकांसाठी सादर केला आहे.
कॅट ओ नाईन टेल्स
मूळ लेखक : जेफ्री आर्चर
अनुवाद : लीना सोहोनी
Cat O' Nine Tales, the fifth collection of irresistible short stories from the master storyteller, is now available
0 comments:
Post a Comment