Friday, January 13, 2012
लोकरंग, लोकसत्ता
श्री. ना. पेंडसे हे स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्यविश्वातील एक अत्यंत महत्त्वाचे नाव. प्रारंभी आपल्या कादंबऱ्यांतून कोकणातील विश्व आणि लोकजीवन चितारणाऱ्या श्री.नां.नी नंतर महानगरीय अनुभवही तितक्याच ताकदीने आपल्या कादंबऱ्यांतून व्यक्त केले. ५ जानेवारी २०१२ पासून त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले. त्यानिमित्ताने डॉ. रवींद्र शोभणे यांनी त्यांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाचा घेतलेला धांडोळा..
स्वातंत्र्योत्तर मराठी कादंबरी वाङ्मयाचा विचार करायचा झाला तर या प्रवासातील ठळक नाव म्हणून श्री. ना. पेंडसे यांचे नाव आवर्जून घ्यावे लागते.
किंबहुना मराठी कादंबरी वाङ्मयाच्या प्रवासातील महत्त्वाच्या टप्प्यांचा विचार करावयाचा झाला तर हरिभाऊ (ह. ना. आपटे), शिरूभाऊ (श्री. ना. पेंडसे) आणि भालचंद्र नेमाडे या तीन ठळक टप्प्यांचा विचार करणे आवश्यक ठरते. फडके-खांडेकरांनी मराठी कादंबरीला कलारंजन आणि स्वप्नरंजनात अडकवून ठेवल्याने ती सत्त्वहीन आणि कृतक होऊ पाहत होती. अशा वळणावर ज्या कादंबरीकारांनी मराठी कादंबरीला तिचे सत्त्व बहाल करण्याचे, वास्तवाचे अधिष्ठान देण्याचे महत्त्वाचे कार्य केले, त्यापकी श्री. ना. पेंडसे हे एक होत. पेंडसेंना यासंदर्भात झुकते माप देण्याचे कारण असे की, मराठीत प्रादेशिक कादंबरीची नवी शाखा, नवी प्रकृती त्यांच्या कादंबऱ्यांपासून रूढ झाली. म्हणूनच मराठी कादंबरीचा विचार करताना पेंडसेंचा विचार ठळकपणे करावा लागतो, तो या अर्थाने. मराठीतील ‘ट्रेंड-सेटर’ कादंबरीकार म्हणून पेंडसेंचे महत्त्व अमान्य करता येत नाही.
कादंबरी, कथा, नाटक, व्यक्तिचित्रण, आत्मचरित्र अशा विविध वाङ्मयप्रकारांत लेखन केलेल्या पेंडसेंची मराठी साहित्यात ओळख आहे ती कादंबरीकार म्हणूनच. ‘खडकावरील हिरवळ’ हे त्यांचे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक १९४१ साली प्रकाशित झाले. हे त्यांचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक. याचा अर्थ पेंडसेंच्या लेखनाची सुरुवात व्यक्तिचित्रांपासून झाली. पण हे एकमेव व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक सोडले तर त्यांनी पुढे या प्रकारचे लेखन केले नाही. तीच गोष्ट त्यांच्या कथालेखनाच्या संदर्भातही सांगता येईल. ‘जुम्मन’ (१९६६) हा एकमेव कथासंग्रह सोडला तर त्यांनी नंतर कथालेखनही केले नाही. पण या दोन्हीचा उपयोग त्यांच्या कादंबरीलेखनासाठी, त्यातील आशयद्रव्यासाठी पुरेपूर झाला. त्यातही त्यांच्या ‘खडकावरील हिरवळ’ या पुस्तकाच्या संदर्भात हे विधान अधिक ठोसपणे करता येईल. कारण त्यातील ‘आमचे मास्तर’ (हद्दपार), ‘बापूकाका सामल’ (गारंबीचा बापू), ‘काशीताई’ (रथचक्र) ही व्यक्तिचित्रे या कादंबरीलेखनाची प्रेरणास्रोत होती.
व्यक्तीचा शोध, व्यक्तिमनाचा समग्र विचार हे प्रधान सूत्र (किंवा प्रकृतीही) श्री. ना. पेंडसे यांच्या कादंबरीलेखनामागे होते. त्यांना सुचलेल्या कादंबऱ्या या बहुश: त्यांच्या आयुष्यातील त्यांनी पाहिलेल्या माणसांवरून सुचलेल्या आहेत. म्हणूनच ‘खडकावरील हिरवळ’ला त्यांच्या लेखनप्रवासातील पूर्वसामग्रीच्या दृष्टीने महत्त्व आहे.
श्री. ना. पेंडसेंना खाजगीत शिरूभाऊ म्हणत. खाजगीतील (कौटुंबिक) हे नाव त्यांच्या मित्रमंडळीत आणि पुढे लेखनाच्या क्षेत्रातही रूढ झाले. त्यांच्या नावाचा उल्लेख साहित्य प्रांतातही ‘पेंडसे’ असा होण्याऐवजी ‘शिरूभाऊ’ असाच होत होता, याची प्रचीती ‘श्री. ना. पेंडसे : लेखक आणि माणूस’ या त्यांच्या आत्मचरित्रातूनही येते.
पेंडसेंची पहिली कादंबरी ‘एल्गार’ १९४९ मध्ये प्रकाशित झाली. प्रकाशित झालेली ही त्यांची पहिली कादंबरी असली तरी ‘एल्गार’ ही लेखनदृष्टय़ा त्यांची पहिली कादंबरी नव्हे. त्यापूर्वी त्यांनी ‘संक्रमण’ नावाची कादंबरी लिहून कादंबरीलेखनाचा प्रयत्न केला होता. पण तिच्यावर फडके-खांडेकरांच्या प्रकृतीची दाट छाया होती. १९३५ ते ४५ या काळातील जे सामाजिक-राजकीय वातावरण होते, नव्या पिढीच्या उरात जो ध्येयवाद होता, जे स्वप्नाळू विश्व होते, तो प्रभाव- पर्यायाने फडके-खांडेकर- माडखोलकर या कादंबरीकार त्रयीचा प्रभाव पेंडसेंना तीत टाळता आला नव्हता. पण आपली कादंबरी कशी असावी, यापेक्षा ती कशी नसावी, ही खूणगाठ पेंडसेंच्या मनात पक्की होती आणि त्यामुळेच ‘संक्रमण’ पुस्तकरूपाने प्रकाशित न करता सरळ पाणी तापवायच्या बंबात टाकून ते मोकळे झाले.
‘एल्गार’ने पेंडसेंना जसे कादंबरीकार म्हणून नाव मिळाले, तसेच या कादंबरीच्या निमित्ताने मराठीत प्रादेशिकतेच्या संदर्भात चर्चा झडू लागल्या. तत्पूर्वी मराठीत ग्रामीण आणि नागर अशा स्वरूपाच्या कादंबऱ्या अस्तित्वात होत्या. तथापि मध्यमवर्गीय, पांढरपेशा माणसांचे मनोरंजन म्हणून एकीकडे सदाशिवपेठी गुलछबू, तर दुसरीकडे गांधीवादाचा भाबडेपणाने स्वीकारणारे, कृतक वाटावा अशा नागरी जीवनदर्शनाचा सुकाळ तत्कालीन कादंबरीत पाहायला मिळत होता. नाही म्हणायला या काळातही कादंबरीच्या क्षेत्रात काही वेगळे प्रयोग होत होते. या प्रयत्नांना पुढे सलग असा हातभार पेंडसेंनी लावला, हे नाकारता येत नाही.
‘एल्गार’ (१९४९) पाठोपाठ ‘हद्दपार’ (१९५०) आणि ‘गारंबीचा बापू’ (१९५२) या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आणि प्रादेशिक कादंबरीकार म्हणून पेंडसेंनी मराठी साहित्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले. ‘गारंबीचा बापू’ ही तर तत्कालीन वाचकांना झपाटून टाकणारी, चेटूक करणारी कादंबरी ठरली. मराठी कादंबरीने यापूर्वी पाहिली नव्हती अशी माणसे, पाहिले नव्हते असे सौंदर्य, पाहिली नव्हती अशी विकृती, पाहिली नव्हती अशी जिद्द, पाहिले नव्हते असे प्रेम आणि ऐकल्या नव्हत्या अशा शिव्या- हे सारे ‘गारंबीचा बापू’त एकवटून आले होते. त्यामुळे लोकप्रियता आणि गुणात्मक दृष्टीनेही रसिक व समीक्षकांनी या कादंबरीचे भरभरून स्वागत केले. याच तीन कादंबऱ्या समोर ठेवून गंगाधर गाडगीळांनी ‘हण्रचा दीपस्तंभ’ हा लेख लिहून पेंडसेंचे कादंबरीकार म्हणून मूल्यमापन केले होते.
आपल्या कादंबऱ्यांचा प्रादेशिक या वैशिष्टय़ाच्या संदर्भात बोलबोला होत असला तरी प्रादेशिकता ही कलाकृतीच्या संदर्भात किती आणि कशी स्वीकारायची, याचे सजग भान पेंडसेंना होते. यासंदर्भात पेंडसेंनी केलेले विवेचनच अधिक बोलके ठरावे. ते लिहितात- ‘‘एखादा प्रदेश कितीही जिवंत केला, अन्य पात्रांच्या बरोबरीने तो वावरत आहे असा प्रत्यय वाचकाला आला, तरी अखेरच्या विश्लेषणात या वैशिष्टय़ाला स्थान राहत नाही. शहरी बायांच्या मेळाव्यात घट्ट कासोटय़ाच्या कोळणीने धिटाईने प्रवेश केला तरी ती ज्याप्रमाणे सर्वाचे लक्ष आपल्याकडे खेचून घेईल, असे काहीतरी प्रादेशिक कादंबरीच्या बाबतीत होते. लक्ष वेधून घेण्यापर्यंत ठीक, पण सौंदर्याच्या स्पध्रेत तिच्याकरिता वेगळ्या कसोटय़ा असू शकत नाहीत. माझ्या कादंबऱ्यांकडे पाहताना त्या प्रादेशिक आहेत याची मी दखलही घेत नाही. मला जे जाणवते, ते सर्जनाचा विषय होण्याला पात्र आहे का? जीवनाचा किती खोलवर ठाव मी घेतो आहे? माझ्या निर्मितीत व्यापक सत्याचा अंश आहे का? मी माणसे निर्माण करतो आहे की ठोकळे? या निकषांवर माझी कादंबरी लटपटणार असेल, तर प्रादेशिकतेचं पलिस्तर तिचे संरक्षण काय करणार?’’ (प्रस्तावना-रथचक्र) श्री. ना. पेंडसेंचे हे चिंतन त्यांच्या कादंबरीकार म्हणून असणाऱ्या सजगतेचे लक्षण म्हणता येईल.
सातत्य आणि प्रयोगशीलता हे कादंबरीकार म्हणून पेंडसे यांच्या प्रकृतीचे एक वैशिष्टय़ सांगता येईल. ‘गारंबीचा बापू’ने मिळवलेला लौकिक आणि यश ओलांडून पुढे जाणे सोपे नव्हते. ती घटका यावयास पेंडसेंना तब्बल दहा वष्रे लागली. मधल्या काळात ‘हत्या’ (१९५४), ‘यशोदा’ (१९५७), ‘कलंदर’ (१९५९) या तीन कादंबऱ्या आणि ‘यशोदा’ व ‘राजेमास्तर’ ही दोन नाटके त्यांनी लिहिली. १९६२ मध्ये त्यांची ‘रथचक्र’ ही कादंबरी प्रकाशित झाली आणि कादंबरीकार म्हणून त्यांच्या यशात यानिमित्ताने मानाचा तुरा खोवला गेला. ‘रथचक्र’ला १९६३ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. (गंमत म्हणजे या कादंबरीला त्यावर्षीचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार नाकारला गेला होता.) पेंडसेंच्या या लेखनप्रवासात कुठलीही कादंबरी आधीच्या कादंबरीसारखी नाही. ‘हत्या’ आणि ‘कलंदर’ या एकाच कथानकावरील द्विखंडात्मक म्हणता येतील अशा कादंबऱ्या; पण प्रदेशाच्या आणि शैलीच्या दृष्टीने त्या सर्वस्वी वेगळ्या ठरतात. हे वेगळेपण अबाधित राखण्याचा प्रयत्न श्री. ना. पेंडसेंनी अखेपर्यंत केला.
‘रथचक्र’ला अभिजात कलाकृतीचे परिमाण प्राप्त झाले. एका सनातन, आदिम मातृप्रेरणेच्या आणि मातृधर्माच्या पाश्र्वभूमीवर ‘रथचक्र’ स्थिरावते. यातील निनावी पात्रांचा प्रयोग तर मराठी कादंबरीत अपूर्वच म्हणता येईल. ‘रथचक्र’नंतर ‘लव्हाळी’ आली आणि पेंडसेंच्या प्रतिभेचा पुन्हा नवा पलू व्यक्त झाला. आशय आणि मांडणीच्याही दृष्टीने ‘लव्हाळी’ वेगळी ठरली. ती ‘रथचक्र’पेक्षा सरस आहे, यशस्वी आहे किंवा नाही, अशाही अर्थाने ‘लव्हाळी’संबंधी विचार केला गेला. पण दुसऱ्या महायुद्धोत्तर काळातील जीवनजाणिवा, क्षुद्रत्व हा आशय घेऊन तो मांडण्यासाठी पेंडशांनी स्वीकारलेली दैनंदिनीची शैली हा अर्थपूर्ण प्रयोग होता.
‘लव्हाळी’नंतर ‘आकांत’सारखी एक सामान्य आणि पेंडसेविश्वात न शोभणारी कादंबरीही त्यांनी लिहिली. पण त्यानंतर १९८८ मध्ये १३५८ पृष्ठांची ‘तुंबाडचे खोत’ ही त्यांची द्विखंडात्मक कादंबरी प्रकाशित झाली आणि पुन्हा पेंडसेंचे नाव चच्रेत आले. पृष्ठसंख्येच्या दृष्टीने मराठीतील ही एकमेव मोठी कादंबरी होती. पण ती गुणवत्तेने मोठी होती का, हा मुद्दा मात्र उपस्थित होतो. तथापि ‘तुंबाडचे खोत’ या कादंबरीने कादंबरीचे आणि महाकाव्याचे नाते पुन्हा नव्याने प्रस्थापित करण्याचा किमान प्रयत्न केला, हेही नाकारता येत नाही.
व्यक्तीचा शोध घेणे, त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे सगळे पदर, पलू जोपर्यंत आपल्याला गवसत नाहीत, तोपर्यंत त्या व्यक्तीच्या अंतरंगात शिरण्याचा सातत्याने प्रयत्न करणे, हे पेंडसेंच्या लेखनधर्माचे एक लक्षण सांगता येईल. ‘गारंबीचा बापू’त यशोदावर अन्याय झाला म्हणून पेंडसे पुन्हा ‘यशोदे’वर लघुकादंबरी लिहितात, नाटक लिहितात. तीच गोष्ट राधेचीही. ‘गारंबीचा बापू’त भेटलेली राधा ही बरीचशी हातातून निसटून गेली, या भावनेपोटी पुन्हा ते ‘गारंबीची राधा’ ही कादंबरी लिहितात.
‘एक होती आजी’ (१९९५), ‘कामेरू’ (१९९७), ‘घागर रिकामी रे’, ‘रंगमाळी’ (२००२) आणि लोकमान्यांच्या जीवनावरील ‘हाक आभाळाची’ (२००७) या पेंडसेंनी आपल्या उत्तरायुष्यात लिहिलेल्या कादंबऱ्या. या कादंबऱ्या कलाकृती म्हणून किती यशस्वी आहेत, हा भाग अलाहिदा! पण जीवनभर कादंबरी या वाङ्मयप्रकारावर निष्ठा ठेवून केलेले सातत्यशील लेखन म्हणून त्यांच्या या लेखनाकडे पाहावे लागते.
कादंबरीलेखनासोबतच पेंडसेंनी नाटय़लेखनही भरपूर केले आहे. त्यांनी आपल्या अकरा नाटके लिहिली. त्यातील ‘राजेमास्तर’, ‘यशोदा’, ‘गारंबीचा बापू’, ‘असं झालं आणि उजाडलं’ आणि ‘रथचक्र’ ही नाटके त्यांच्याच कादंबऱ्यांवर आधारित होती. याशिवाय ‘महापूर’, ‘संभूसाच्या चाळीत’, ‘चक्रव्यूह’, ‘शोनार बांगला’, ‘पंडित! आता तरी शहाणे व्हा’, ‘डॉ. हुद्दार’ ही वेगळ्या पिढीतली नाटके. नाटककार म्हणून पेंडसेंचे यश फार मोठे नाही; तथापि ते वैशिष्टय़पूर्ण मात्र आहे.
हे एवढे सगळे लेखन करूनही पेंडसे कलावंत म्हणून आतून सतत अस्वस्थच असायचे. आपल्या लेखनप्रवासात जे आपल्याला पकडता आले नाही, मांडता आले नाही, ते पकडण्याचा, मांडण्याचा ध्यास त्यांना लागलेला होता. महानगरीय उद्योगप्रधान संस्कृतीला कवेत घेणारी एक मोठी कादंबरी त्यांना लिहायची होती. कादंबरीचे शीर्षकही त्यांनी ठरवले होते- ‘दद्दा!’ त्यांना ‘लव्हाळी’नंतर हे लेखन करायचे होते. निर्मितीप्रक्रियेच्या या प्रवासात, चिंतनात त्यांना माणसे दिसायला लागली. माणसांचे आंतरसंबंध खुणवायला लागले आणि ‘दद्दा’चा असा चिंतनाच्या पातळीवर प्रवास सुरू असताना मिनी मोडक आणि तिच्या मत्रिणीचे हॉटेलातील संवाद पेंडसेंना सुचले. त्यातून ‘ऑक्टोपस’चा जन्म झाला. पुढे दहा वर्षांनंतर ‘आकांत’चा जन्म झाला. त्याहीवेळी चिंतन ‘दद्दा’चे आणि निर्मिती ‘आकांत’ची- असा काहीसा प्रकार झाला. त्यानंतरही ‘दद्दा’चा विचार करीत असताना तो मागे पडला आणि कोकणातील चार पिढय़ांची कहाणी सांगणारी ‘तुंबाडचे खोत’ पुढे आली. थोडक्यात काय, तर पेंडसे जेव्हा जेव्हा ‘दद्दा’चा विचार करीत, तेव्हा तेव्हा हा विषय त्यांना हुलकावणी देऊन ते पुन्हा कोकणातल्या मातीत मुरलेल्या, वाढलेल्या माणसांचाच विचार करू लागत, इतकी ही नाळ घट्टपणे बांधली गेली होती. पेंडसेंच्या मनात अखेपर्यंत घर करून असलेली ‘दद्दा’ मात्र त्यांना लिहिता आली नाही. कदाचित ही कादंबरी पेंडसेविश्वातील एक महत्त्वपूर्ण कादंबरी ठरली असती.
पेंडसेंचा जन्म ५ जानेवारी १९१९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्य़ातील मुर्डी या गावी झाला. १९२४ मध्ये पेंडसे मुंबईला स्थायिक झाले ते कायमचे. वयाच्या ११ व्या वर्षांपर्यंत त्यांनी जो कोकण पाहिला होता, आपल्या मनात साठवला होता, त्यावर ते आयुष्यभर लिहीत राहिले. मग तो साकव असेल, बोंडलीची विहीर असेल, व्याघ्रेश्वराचे देऊळ असेल, किंवा नारळी-पोफळीच्या बागा असतील. त्या त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवापेक्षा त्यांच्या भावविश्वाचा अतूट भाग झालेल्या होत्या. मुंबईच्या बेस्ट कंपनीत सेवानिवृत्तीपर्यंत नोकरी करून या संस्थेच्या आत्मीयतेपोटी त्यांनी १९७२ मध्ये ‘बेस्ट उपक्रमाची कथा’ हे पुस्तकही लिहिले.
श्री. ना. पेंडसेंना त्यांच्या लेखनासाठी अनेक पुरस्कार मिळाले. त्यात महाराष्ट्र शासनाचे पाच पुरस्कार (हद्दपार, हत्या, कलंदर, संभूसाच्या चाळीत व चक्रव्यूह), साहित्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र फाऊण्डेशनचा जीवनगौरव पुरस्कार, प्रियदíशनी पुरस्कार, लाभसेटवार साहित्यसन्मान पुरस्कार, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार हे काही महत्त्वाचे पुरस्कार सांगता येतील. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या रणधुमाळीपासून मात्र ते चार हात दूरच राहिले. १९ मार्च २००७ ला त्यांची लोकमान्य टिळकांवरची ‘हाक आभाळाची’ ही कादंबरी प्रकाशित झाली आणि २२ मार्च २००७ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. हा योगायोग त्यांच्या चाहत्यांना निश्चितच अस्वस्थ करणारा असा आहे. ५ जानेवारी २०१२ पासून श्री. ना. पेंडसेंची जन्मशताब्दी सुरू झाली आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यापेक्षा त्यांनी मराठी साहित्यविश्वाला काय दिले, त्यांनी दिलेल्या कुठल्या संचिताने मराठी कादंबरी समृद्ध झाली आहे, हेच पुन्हा एकदा तपासण्याचा हा प्रयत्न!
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment