Thursday, April 12, 2012
शाळेपलीकडच्या शिक्षणासाठी व्यतीत केलेलं एक भन्नाट वर्ष!(A book about escape from School)
Posted by Pravin at 11:14 PMदहावीनंतर करिअरची वाट निवडून लवकरात लवकर मार्गी लागण्याचा ध्यास असंख्य विद्यार्थ्यांना लागतो. त्यांच्या पालकांना तर या सगळ्याची मुलांपेक्षाही अधिक घाई झालेली असते! अशा वेळी एखाद्या मुलाने वर्षभर पुढचे रीतसर शिक्षण न घेता मनाला आवडतील त्या गोष्टी करायच्या ठरवल्या तर.. त्याच्या या इच्छेला त्याचे पालक, शिक्षक, नातेवाईक, समवयस्क आणि इतर कसे रिअॅक्ट होतील? अशी इच्छा मनात डोकावून जरी गेली तरी इतरांच्या रिअॅक्शनच्या कल्पनेनेच त्या मुलाला दरदरून घाम फुटेल.. आणि बाकीचे तर त्या मुलाच्या आळशीपणाला बोल लावून त्याचे दिशाहीन कल्पनेचे उधळलेले वारू मारून मुटकून जागेवर म्हणजेच क्रमिक अभ्यासाच्या चौकटीत कसे आणता येईल, याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. काहीतरी वेगळं करण्याची त्या मुलाची ऊर्मी पुरती विझून गेली, की तो मार्गी लागल्याच्या भावनेने सारे कृतकृत्य होतील. मात्र या नेहमीच्या दृश्यापेक्षा काहीतरी वेगळं प्रत्यक्षात घडतं तेव्हा त्याची दखल घ्यावीच लागते. मनोविकास प्रकाशनने प्रकाशित केलेलं ‘शाळेपासून मुक्ती वर्षांपुरती’ हे पुस्तक हे असंच वेगळं पठडीबाहेर झेपावणाऱ्या मुलाची गोष्ट सांगणारं आहे.
ही अशा एका मुलाची गोष्ट आहे, ज्याने दहावीनंतर वर्षभर क्रमिक शिक्षणाच्या चौकटीबाहेरच्या अनेक गोष्टी केल्या. राहुल अल्वारिस हा १६ वर्षांचा मुलगा, ज्याने दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर आई-बाबांच्या उत्तेजनामुळे वर्षभर औपचारिक शिक्षणापासून सुट्टी घेत विविध स्वरूपातील जीवनकौशल्याचे धडे घेतले. हे पुस्तक म्हणजे एका परीने या वर्षभरात त्याला आलेल्या निरनिराळ्या अनुभवांचं मोकळं केलेलं गाठोडं आहे. आलेले अनुभव शेअर करायच्या दृष्टीने लिहिलेलं डायरी स्वरूपातील लिखाण म्हणजे वेगळं काही करू इच्छिणाऱ्या मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही प्रेरणादायी ठरेल, असे अनुभवांचे संचित आहे. उष:प्रभा पागे यांनी या पुस्तकाचे भाषांतर केले आहे.
अभ्यासापासून सुट्टी घेत गोव्यात राहणाऱ्या राहुलने त्या वर्षभरात काय नाही केलं? म्हापशातील फिश टँक बनवणाऱ्या एका दुकानात काम केलं, शेतीचा अनुभव घेतला, ग्रीन हेरिटेज प्रदर्शनात सक्रिय सहभागी होऊन वनस्पती, फुलं, रोपटय़ांबद्दल बरंच काही जाणून घेतलं, त्या माहितीची टिपणं काढली. अळंबी कशी वाढवायची, याचे शास्त्रशुद्ध धडे घेतले, तीन आठवडे पुण्याच्या सर्पोद्यानात राहून सर्पाचा अभ्यास केला. १५ दिवस चेन्नईच्या गांडूळ संस्थेत राहून गांडूळ आणि गांडूळखत यांचा अभ्यास केला. त्यानंतर १५ दिवस कोळ्यांचा अभ्यास केला. त्यानंतर महिनाभर चेन्नईजवळच्या ममलापूरम येथील क्रोकोडाईल प्रजनन केंद्रामध्ये राहून मगरी, साप, कासवे, सरडे, घोरपड यांचा अभ्यास केला. त्यानंतर राहुलने काही मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या आणि वन्यजीवविषयक माहिती जाणून घेतली. शालेय मुलांच्या कार्यशाळा, शिबिरे घेतली. पाँडेचरीला अरविंद आश्रमात राहिला. उन्हाळ्यात गोवा फाऊंडेशनच्या बेतीम जंगलविषयीच्या एका प्रकल्पावर जंगलात राहून काम केले. त्याच्या वर्षभराच्या अनुभवावर बेळगावच्या एका कार्यक्रमाला पाहुणा म्हणूनही त्याला आमंत्रित केलं गेलं. यातील प्रत्येक अनुभव आणि त्यावर राहुलने काढलेली टिपणं ही केवळ अप्रतिम. या प्रत्येक अनुभवाने त्याला आयुष्यभर पुरेल इतकी ज्ञानाची शिदोरी दिली आहे.
हे सगळं वाचताना हे प्रकर्षांने जाणवतं की, या अनुभवांच्या पलीकडेही तो वर्षभरात बरंच काही शिकला.. एकटय़ाने प्रवास करताना बऱ्याच अनुभवांना तो सामोरे गेला, जाईल तिथल्या लोकांशी त्याला जुळवून घ्यावं लागलं असेल, पानात पडेल ते खावं लागलं असणार, अशा एक ना अनेक छोटय़ा- मोठय़ा गोष्टी शिकत या वर्षभरात प्रत्यक्ष जगण्याच्या अनुभवाजवळ तो अधिक गेला. अनेकदा मनात ठाण मांडून बसलेल्या अनेक भीतींचा निचरा होण्यासाठीही असं एकटय़ाने फिरणं आवश्यक असतंच. आयुष्यात नवनव्या संधींना सामोरं जायला लाखमोलाची ठरणारी गोष्ट म्हणजे बाहेरच्या जगात एकटं वावरण्याचा आलेला आत्मविश्वास- ही गोष्ट राहुल या वर्षभरात शिकला.
हे त्याचे अनुभव वाचताना राहून राहून वाटतं की, जर हे वर्ष त्याच्या वाटय़ाला आलं नसतं आणि अकरावीच्या रुळलेल्या वाटेने तोही गेला असता तर त्याने किती काय काय गमावलं असतं? उलटपक्षी, या वर्षांने राहुलला जे भरभरून देऊ केलं, ते क्रमिक शिक्षणात काही टक्के तरी मिळालं असतं का? याचं श्रेय जसं राहुलचं तसं किंवा त्याच्यापेक्षाही त्याच्या आई-बाबांचं. ज्यांना मुलाचं बोटं नेमकं कधी सोडायचं हे ठाऊकही होतं आणि त्यांनी तसं धाडसही दाखवलं.
राहुलचा हा अफलातून जीवनानुभव हा प्रत्येकाने वाचायलाच
हवा आणि आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर अनुभवायलाही हवा!
-सुचिता देशपांडे ,लोकसत्ता
suchitaadeshpande@gmail.com
शाळेपासून मुक्ती वर्षांपुरती
- राहुल अल्वारिस,
मनोविकास प्रकाशन,
पृष्ठे ११३, मूल्य ९० रु.
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comments:
श्रेय जसं राहुलचं तसं किंवा त्याच्यापेक्षाही त्याच्या आई-बाबांचं>>> अमेरिकेत कुमार वय संपल्यावर सैनिक अनुभावाकाराता मुले पाठवली जातात, हेदेखील तसच वाटतेय . ईन्जीनीअरीन्ग च्या दुसय्रा वर्षा नंतर मनात विचार आलेला, नापास झालो असतो तर बर झाल असत. पण सगळ्यांनाच असा वेळ काढणे शक्य नाही होत
Post a Comment