Thursday, June 28, 2012


Frederick Forsyth
कधीकाळी तो बातमीदार होता.. आता केवळ तडाखेबंद खपाचाच नव्हे तर ‘प्रश्न पाडणारा’ लेखक आहे. त्याची एखादी कादंबरी ब्रिटिश गुप्तचर यंत्रणेत नव्यानं दाखल होणारे क्रमिक पुस्तकासारखी वाचतात, पण याच यंत्रणेच्या क्रौर्याचं चित्रण करणारी त्याची दुसरी कादंबरी ब्रिटिश सरकारलाही या क्रौर्याची कबुली द्यायला लावते.. जगातले बारकावे टिपणारा, तपशिलात वर्णन करणारा फ्रेडरिक फोर्सिथ प्रत्यक्ष भेटीत ‘मी लेखकबिखक नाही’ म्हणाला, त्यात थोडंफार तथ्यही आहे. पण याला जग कळतं. इतरांपेक्षा लवकर कळतं. म्हणूनच, वाचणाऱ्याला प्रश्न पडतात!



आपल्याकडे कादंबरी लेखनाचा, म्हणजे अर्थातच लेखकाचा, परीघ ठरलेला असतो. गाव, जिल्हा.. फारच म्हणजे एखादी सिंहासन वगैरे आली तर, राज्य. त्यापुढे काही आपण जात नाही. झेपतच नाही आपल्याला. तीच तीच माणसं, त्यांच्या त्याच त्या व्यथा. मग त्यांच्यातल्या नातेसंबंधांच्या मनोव्यापाराचा आढावा आपले लेखक घेतात. मग ते झाल्यावर उरलेले लेखक मनोव्यापाराचा नातेसंबंधांवर होणारा परिणाम आपल्या लेखनात मांडतात. मग ते वाचून आपण टाळय़ा वगैरे वाजवतो आणि मराठी कादंबरी किती खोल वगैरे गेल्याचे एकमेकांना सांगू लागतो.
आपल्या कादंबरीची इयत्ता कंची हा प्रश्न स्वत:लाच विचारून घ्यायचा असेल तर फ्रेडरिक फोर्सिथ वाचणं, हे राष्ट्रीय कर्तव्य मानायला हवं. एक तर त्याचे विषय. कधी त्यात जैविक युद्ध असतं. जनरल द गॉल या फ्रान्सच्या सर्वोच्च सेनानीची हत्या असते. एकात स्फोटकं घेऊन जाणारी बोटच्या बोट किनाऱ्यावर उत्पात घडवणार असते, तर कधी आंतरराष्ट्रीय अर्थव्यवहारात अमली पदार्थानी घडवलेला हाहाकार असतो. शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि सोविएत रशिया एकमेकांची पिकं कशी संपवतात याचीही तितकीच चित्तथरारक कथा फोर्सिथ रंगवतो. तितक्याच ताकदीनं. त्याच्या कादंबऱ्यांत एक प्रकरण व्हाइट हाऊसमधे घडतं. पुढचं युरोपीय राष्ट्रांच्या मुख्यालयात ब्रसेल्सला, तिसरं प्रागमध्ये. चौथं मॉस्कोत. पाचवं लंडनमध्ये. त्यात मध्येच कोणीतरी दिल्लीला वगैरे येऊन गेलेला असतो. आणि हे सगळे शेवटच्या दोनेक प्रकरणांत एकमेकांच्या सहवासात येतात आणि त्याची महाकादंबरी आपल्याला अचंबित करून संपते. यातला महत्त्वाचा भाग असा की ही गावं नुसती यायची म्हणून येत नाहीत. त्यातील बारीक सारीक तपशिलासह ती रंगवलेली असतात. म्हणजे कोणत्या नाक्यावर कसलं दुकान आहे, कोणतं कार्यालय आहे. त्यात काय होतं. वगैरे संपूर्ण तपशील.
मुळात मोठे इंग्रजी लेखक खूप, खूप तपशिलासह लिहितात. ललित वाङ्मय आहे म्हणून ठोकून देतो ऐसाजे असा प्रकार नाही. आणि यात फोर्सिथ इतरांपेक्षा मोठा का? तर त्याच्या व्यक्तिरेखाही खऱ्या असतात. म्हणजे त्याच्या कादंबऱ्यांत बिल क्लिंटन असतात. मार्गारेट थॅचर असतात. सद्दाम हुसेन, ओसामा बिन लादेन, क्युबातल्या छळछावण्या, डोनाल्ड रम्सफेल्ड.. असे सगळे खरे खरे असतात आणि फोर्सिथचं लिखाण नाकारणं त्यांनाही जमत नाही. आसपास जिवंत असलेल्या मंडळींवर लिहायचं तर खूप अभ्यास लागतो. फोर्सिथ तो करतो. आपल्याकडे अभ्यास हा रंजकतेच्या मुळावर येतो, असं मानायची पद्धत आहे. असं ज्यांना वाटतं त्यांनी फोर्सिथ वाचणं ही काळाची गरज समजावी आणि अधिक वेळ न दवडता फोर्सिथ वाचायला सुरुवात करावी. याचा तपशिलाचा अभ्यास इतका असतो की, ब्रिटनच्या एमआय-फाइव्ह या सरकारी गुप्तहेर यंत्रणेत दाखल होणाऱ्यांना क्रमिक पुस्तकं म्हणून फोर्सिथ वाचायला लावतात. यावरनंच त्याचा विषयांचा आवाका आणि अभ्यासाची बैठक लक्षात येऊ शकेल.
फोर्सिथ सुरुवातीला ब्रिटनच्या हवाई दलात पायलट होता. नंतर ते झाल्यावर छोटय़ामोठय़ा वर्तमानपत्रांत वार्ताहरी केली. पुढे तर रॉयटर्ससाठी झेकोस्लोवाकिया, पूर्व जर्मनी, फ्रान्स अशा अनेक ठिकाणी तो बातमीदार होता. शीतयुद्धाच्या तापत्या झळांनी जगाला वेढलं होतं तो काळ. चांगला बातमीदार असल्यानं आसपासच्या घटना तो सजगपणे टिपत गेला. त्यातूनच त्याची कादंबरी जन्माला आली ‘द डे ऑफ द जॅकल’. तिच्यावर सिनेमाही आल्यानं ती बऱ्यापैकी माहिती असते. पण फोर्सिथच्या पुढच्या अनेक कादंबऱ्या जॅकलपेक्षा कितीतरी उंचीच्या आहेत. जगाच्या राजकारणाचा थरार ज्यांना अनुभवायचा असतो त्यांच्यासाठी फोर्सिथसारखा दुसरा आनंद नाही. द ओडिसा फाइल्स, द डॉग्ज ऑफ वॉर, द फोर्थ प्रोटोकॉल, द निगोशिएटर, द डिसीव्हर, द डेव्हिल्स आल्टरनेटिव्ह.. अशा किती सांगता येतील. याच्याही नंतरची माझी प्रचंड आवडती म्हणजे द फिस्ट ऑफ गॉड. इराकच्या सद्दाम हुसेन याने तयार केलेली अण्वस्त्रं इस्रायली बाँबफेकी विमानं जाऊन नष्ट करतात, या सत्य घटनेवर आधारित ही कादंबरी अशावेळी हाती आली की, मी तेलाच्या राजकारणात पिंपभर बुडालो होतो. फिस्ट ऑफ गॉड सलग वाचून, एकाच बैठकीत संपवावी लागते. तशी मी ती संपवली आणि फोर्सिथ घरी जमा व्हायला लागले. द फिस्ट ऑफ गॉड इतकी परिणामकारक आहे की, त्यानं ती आधी लिहिली आणि मग इस्रायलनं त्याप्रमाणे कृती केली असं वाटावं.
शिष्यवृत्तीच्या निमित्ताने १९९८ साली लंडनला सहा महिने राहायला मिळालं. त्यावेळी करायच्या कामात एक काम होतं फोर्सिथला भेटायचं. एका रविवारी त्याच्या घरी धडकलो. लंडनच्या उत्तरेला हर्डफोर्डशायरला त्याचं घर आहे. घर कसलं, हवेलीच ती. जवळपास तिनेकशे र्वष जुनी. आणि आत प्राणिसंग्रहालय. अगदी गाढवसुद्धा. त्याचं नाव आइन्स्टाइन का असंच काहीतरी. त्याचा विक्षिप्तपणा लक्षात येईल असं. पहिल्या भेटीतच तो सांगून जातो, ‘मी लेखकबिखक नाही’ आणि आपल्याला धक्काच बसतो. आपण म्हणजे त्याचे चाहते वगैरे असतो आणि हा तर म्हणतो मी लेखकच नाही. प्रश्न त्यामुळे त्याचं काय होणार हा नसतो, तर आपलं काय झालं हा असतो. तर फोर्सिथ त्याची लेखनप्रक्रिया उलगडून सांगतो.
तेव्हा जाणवतं की त्याला ठाम अशी राजकीय, परराष्ट्र राजकारणातली मतं आहेत आणि लेखक म्हणून तो भूमिका मांडायला अजिबात घाबरत नाही. म्हणजे पंतप्रधान म्हणून टोनी ब्लेअर अगदीच कुचकामी आहेत आणि इराक युद्धावरनं त्यांच्यावर महाअभियोग चालवून त्यांना हाकलून लावायला हवं.. इतक्या स्वच्छपणे त्यांनी भूमिका घेतली होती. त्यांच्या लिखाणातही ही भूमिका लपत नाही. म्हणजे त्याच्या एका कादंबरीत (द डिसीव्हर) त्याच्या एका गुप्तहेरास ब्रिटन निर्घृणपणे मारतं. यातली मेख अशी की मारला गेलेला गुप्तहेर आयरिश रिपब्लिकन आर्मीचा म्हणजे ‘आयआरए’चा असतो आणि त्याचवेळी ब्रिटन आणि आर्यलड यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झालेले असतात. यातला धक्कादायक भाग असा की, हे पुस्तक आलं त्याचवेळी आयआरएचा एक हेर गूढ अवस्थेत मेलेला आढळला होता. त्याच कादंबरीत फोर्सिथनं लिहिलेलं असतं : मारल्या गेलेल्या आयआरए बंडखोरांच्या अंत्यविधीप्रसंगी जमलेल्यांत काय चर्चा होते आहे हे कळावं म्हणून शवपेटय़ांतून सुद्धा ब्रिटनने हेरगिरीची यंत्रणा कशी ठेवलेली होती, हे छापून आल्यावर फोर्सिथला बऱ्याच निषेधाला तोंड द्यावं लागलं. परंतु नंतर ब्रिटिश सरकारला मान्य करावं लागलं- शवपेटय़ांत ट्रान्समीटर होते ते. फोर्सिथ बीबीसी रेडिओवरही दर शनिवारी कार्यक्रम करायचा. कमालीची लोकप्रियता लाभलेल्या या कार्यक्रमात त्याची मतं नेहमीच्याच परखडपणे समोर यायची. तो सांगतो की कादंबरीत फक्त मुख्य कट, त्याची आखणी, मांडणी त्याची असते. म्हणजे हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेत वगैरे मुख्य शल्यक कसा हृदय बाहेर काढताना आणि परत आत ठेवून चालू करण्याचं काम करतो- बाकीची फाडाफाडी वगैरे छोटीमोठी कामं त्याचे सहायक डॉक्टर करतात- तसं फोर्सिथचं आहे. पुस्तकासाठी लागणारी बाकीची जुळवाजुळव त्याच्या पदरी असलेले लेखक करतात. एकदा का ती झाली की फोर्सिथ आणि त्याचे हे लेखक त्याच्या मालकीच्या बेटावर जाऊन राहतात.
..आणि मग तिथून जन्माला येते एक नवी कादंबरी. एक नवी सत्यकथा. त्याला भेटल्यानंतर त्याची दोन पुस्तकं आली. द अफगाण आणि कोब्रा. ‘नाइन इलेव्हन’मध्ये विमानं जाऊन वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींना धडकतात. ‘द अफगाण’मधे अख्खीच्या अख्खी, महनीय व्यक्तींनी भरलेली बोट. तिच्यावरचं संकट टाळतो कर्नल माइक मार्टिन. ओसामाच्या कळपात शिरून त्याची संपूर्ण यंत्रणा माइक समजावून घेतो आणि त्याच्या रूपानं फोर्सिथ ती आपल्यासमोर मांडतो. फोर्सिथ चाहत्यांचा माइकशी चांगला परिचय असतो. कारण द फिस्ट ऑफ गॉडमध्ये त्यानेच महत्त्वाची भूमिका बजावलेली असते. वाईट एवढंच की हा माइक आता परत भेटणार नसतो. अफगाणमध्येच त्याचा शेवट होतो.
अलीकडेच त्याचं ताजं पुस्तक आलंय. द कोब्रा. अमली पदार्थाची निर्मिती, त्याचा व्यापार याचं हिंस्र जग या पुस्तकातून समोर येतं. आणि कळते त्या जगावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरू असलेली देशोदेशींची चढाओढ. फोर्सिथची सगळी वैशिष्टय़ं यातही आहेत. साहजिकच जन्माला येताना त्याची पुस्तकं पहिली आवृत्ती पंधरा लाखाची, वगैरे असं मिरवत येतात.
पण तरीही फोर्सिथ रूढ अर्थानं लेखक नाही. एका अर्थानं बरंच आहे ते. फोर्सिथला एकच माहितीये. आपल्या वाचकांना प्रश्न पडला पाहिजे- याला आधीच कसं काय कळलं, हा!
तो प्रश्न त्याची पुस्तकं आजही पाडत असतात.


 गिरीश कुबेर
girish.kuber@expressindia.com

[ Frederick Forsyth, CBE (born 25 August 1938) is an English author and occasional political commentator. He is best known for thrillers such as The Day of the Jackal, The Odessa File, The Fourth Protocol, The Dogs of War, The Devil's Alternative, The Fist of God, Icon, The Veteran, Avenger, The Afghan and The Cobra.]

Thursday, April 12, 2012


दहावीनंतर करिअरची वाट निवडून लवकरात लवकर मार्गी लागण्याचा ध्यास असंख्य विद्यार्थ्यांना लागतो. त्यांच्या पालकांना तर या सगळ्याची मुलांपेक्षाही अधिक घाई झालेली असते! अशा वेळी एखाद्या मुलाने वर्षभर पुढचे रीतसर शिक्षण न घेता मनाला आवडतील त्या गोष्टी करायच्या ठरवल्या तर.. त्याच्या या इच्छेला त्याचे पालक, शिक्षक, नातेवाईक, समवयस्क आणि इतर कसे रिअ‍ॅक्ट होतील? अशी इच्छा मनात डोकावून जरी गेली तरी इतरांच्या रिअ‍ॅक्शनच्या कल्पनेनेच त्या मुलाला दरदरून घाम फुटेल.. आणि बाकीचे तर त्या मुलाच्या आळशीपणाला बोल लावून त्याचे दिशाहीन कल्पनेचे उधळलेले वारू मारून मुटकून जागेवर म्हणजेच क्रमिक अभ्यासाच्या चौकटीत कसे आणता येईल, याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. काहीतरी वेगळं करण्याची त्या मुलाची ऊर्मी पुरती विझून गेली, की तो मार्गी लागल्याच्या भावनेने सारे कृतकृत्य होतील. मात्र या नेहमीच्या दृश्यापेक्षा काहीतरी वेगळं प्रत्यक्षात घडतं तेव्हा त्याची दखल घ्यावीच लागते. मनोविकास प्रकाशनने प्रकाशित केलेलं ‘शाळेपासून मुक्ती वर्षांपुरती’ हे पुस्तक हे असंच वेगळं पठडीबाहेर झेपावणाऱ्या मुलाची गोष्ट सांगणारं आहे.
ही अशा एका मुलाची गोष्ट आहे, ज्याने दहावीनंतर वर्षभर क्रमिक शिक्षणाच्या चौकटीबाहेरच्या अनेक गोष्टी केल्या. राहुल अल्वारिस हा १६ वर्षांचा मुलगा, ज्याने दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर आई-बाबांच्या उत्तेजनामुळे वर्षभर औपचारिक शिक्षणापासून सुट्टी घेत विविध स्वरूपातील जीवनकौशल्याचे धडे घेतले. हे पुस्तक म्हणजे एका परीने या वर्षभरात त्याला आलेल्या निरनिराळ्या अनुभवांचं मोकळं केलेलं गाठोडं आहे. आलेले अनुभव शेअर करायच्या दृष्टीने लिहिलेलं डायरी स्वरूपातील लिखाण म्हणजे वेगळं काही करू इच्छिणाऱ्या मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही प्रेरणादायी ठरेल, असे अनुभवांचे संचित आहे. उष:प्रभा पागे यांनी या पुस्तकाचे भाषांतर केले आहे.
अभ्यासापासून सुट्टी घेत गोव्यात राहणाऱ्या राहुलने त्या वर्षभरात काय नाही केलं? म्हापशातील फिश टँक बनवणाऱ्या एका दुकानात काम केलं, शेतीचा अनुभव घेतला, ग्रीन हेरिटेज प्रदर्शनात सक्रिय सहभागी होऊन वनस्पती, फुलं, रोपटय़ांबद्दल बरंच काही जाणून घेतलं, त्या माहितीची टिपणं काढली. अळंबी कशी वाढवायची, याचे शास्त्रशुद्ध धडे घेतले, तीन आठवडे पुण्याच्या सर्पोद्यानात राहून सर्पाचा अभ्यास केला. १५ दिवस चेन्नईच्या गांडूळ संस्थेत राहून गांडूळ आणि गांडूळखत यांचा अभ्यास केला. त्यानंतर १५ दिवस कोळ्यांचा अभ्यास केला. त्यानंतर महिनाभर चेन्नईजवळच्या ममलापूरम येथील क्रोकोडाईल प्रजनन केंद्रामध्ये राहून मगरी, साप, कासवे, सरडे, घोरपड यांचा अभ्यास केला. त्यानंतर राहुलने काही मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या आणि वन्यजीवविषयक माहिती जाणून घेतली. शालेय मुलांच्या कार्यशाळा, शिबिरे घेतली. पाँडेचरीला अरविंद आश्रमात राहिला. उन्हाळ्यात गोवा फाऊंडेशनच्या बेतीम जंगलविषयीच्या एका प्रकल्पावर जंगलात राहून काम केले. त्याच्या वर्षभराच्या अनुभवावर बेळगावच्या एका कार्यक्रमाला पाहुणा म्हणूनही त्याला आमंत्रित केलं गेलं. यातील प्रत्येक अनुभव आणि त्यावर राहुलने काढलेली टिपणं ही केवळ अप्रतिम. या प्रत्येक अनुभवाने त्याला आयुष्यभर पुरेल इतकी ज्ञानाची शिदोरी दिली आहे.
हे सगळं वाचताना हे प्रकर्षांने जाणवतं की, या अनुभवांच्या पलीकडेही तो वर्षभरात बरंच काही शिकला.. एकटय़ाने प्रवास करताना बऱ्याच अनुभवांना तो सामोरे गेला, जाईल तिथल्या लोकांशी त्याला जुळवून घ्यावं लागलं असेल, पानात पडेल ते खावं लागलं असणार, अशा एक ना अनेक छोटय़ा- मोठय़ा गोष्टी शिकत या वर्षभरात प्रत्यक्ष जगण्याच्या अनुभवाजवळ तो अधिक गेला. अनेकदा मनात ठाण मांडून बसलेल्या अनेक भीतींचा निचरा होण्यासाठीही असं एकटय़ाने फिरणं आवश्यक असतंच. आयुष्यात नवनव्या संधींना सामोरं जायला लाखमोलाची ठरणारी गोष्ट म्हणजे बाहेरच्या जगात एकटं वावरण्याचा आलेला आत्मविश्वास- ही गोष्ट राहुल या वर्षभरात शिकला.
हे त्याचे अनुभव वाचताना राहून राहून वाटतं की, जर हे वर्ष त्याच्या वाटय़ाला आलं नसतं आणि अकरावीच्या रुळलेल्या वाटेने तोही गेला असता तर त्याने किती काय काय गमावलं असतं? उलटपक्षी, या वर्षांने राहुलला जे भरभरून देऊ केलं, ते क्रमिक शिक्षणात काही टक्के तरी मिळालं असतं का? याचं श्रेय जसं राहुलचं तसं किंवा त्याच्यापेक्षाही त्याच्या आई-बाबांचं. ज्यांना मुलाचं बोटं नेमकं कधी सोडायचं हे ठाऊकही होतं आणि त्यांनी तसं धाडसही दाखवलं.
राहुलचा हा अफलातून जीवनानुभव हा प्रत्येकाने वाचायलाच
हवा आणि आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर अनुभवायलाही हवा! 

   
-सुचिता देशपांडे ,लोकसत्ता
suchitaadeshpande@gmail.com

शाळेपासून मुक्ती वर्षांपुरती 
- राहुल अल्वारिस,
मनोविकास प्रकाशन,
पृष्ठे ११३, मूल्य ९० रु.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...