Wednesday, February 15, 2012
शरदिन्दू बंडोपाध्याय हे बंगाली रहस्यकथांच्या विश्वातलं गाजलेलं नाव. व्योमकेश बक्षी हा त्यांचा डिटेक्टिव्ह. बंगालीत अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या शरदिन्दू बंडोपाध्याय यांच्या या व्योमकेश बक्षीच्या गाजलेल्या रहस्यकथा रोहन प्रकाशननं मराठी वाचकांसाठी तीन भागांत आणलेल्या आहेत. मराठीत त्यांचा अनुवाद हा सुप्रसिद्ध अनुवादक अशोक जैन यांनी केलेला आहे. सत्यजित राय यांच्या ‘फेलुदां’च्या बारा पुस्तकांचा अनुवाद यापूर्वी जैन यांनीच केलेला आहे आणि ‘रोहन’तर्फेच हा पुस्तकांचा संच प्रसिद्ध झालेला आहे. त्याच दर्जेदार परंपरेतला हा व्योमकेश बक्षीचाही संच म्हणता येईल.
‘व्योमकेश बक्षी’ आपल्याला तसा नवीन नाही. १९९३ साली बासू चटर्जी यांनी दूरदर्शनवर रजित कपूरला घेऊन व्योमकेश बक्षी हिंदी मालिकेत आणलेला होता आणि ती दूरदर्शन मालिका खूप गाजली होती. जाणकारांनीही या मालिकेला आणि रजित कपूरच्या अभिनयाला चांगली दाद दिली होती. मालिका पाहण्यापेक्षा या रहस्यकथा वाचतानाचा अनुभव वेगळा आहे. कथेतील रहस्य आणि ते सोडविताना व्योमकेश आपल्या तल्लख बुद्धिमत्तेची जी चमक दाखवितो, त्यामुळे ती रहस्यकथा वाचताना वेगळीच मजा येते. त्याची शोध घेण्याची पद्धत तर्कसुसंगत असते आणि एकेक करीत कथेतला तपशील आपल्यासमोर येत राहतो. कथेतली रहस्यं टप्प्या-टप्प्याने उलगडत जात असल्याने वाचक कथा वाचताना गुंगून जातो.
या कथा लिहीत असताना शरदिन्दूंच्या डोळ्यांसमोर शेरलॉक होम्स आहे, हे उघड आहे. तिथे शेरलॉक होम्सच्या मदतीला वाटसन आहे तर इथे अजित आहे आणि अजितच्या तोंडूनच सारा कथाभाग आपल्याला समजतो. शेरलॉक होम्सचा खूपच प्रभाव शरदिन्दूंवर आहे, पण तरीही या अस्सल बंगाली रहस्यकथा आहेत. फक्त कथा कोलकाताच्या आसपास घडतात म्हणून नाही तर कथेतील वातावरण अस्सल बंगाली आहे.
१९३२ साली ‘पाथेर काटा’ (या पुस्तकात ‘काटे’री रहस्य) ही कथा लिहून शरदिन्दूंनी रहस्यकथेची वाटचाल सुरू केली. छातीत घुसणारी ग्रामोफोनची सुई आणि तिच्याद्वारे होणारा खून, हा वेगळा प्रकार आहे. शरदिन्दूंच्या साऱ्याच रहस्यकथांमध्ये बरेचसे खून कसे घडवून आणलेले आहेत, हे पाहणं मोठं मनोरंजक ठरेल. व्योमकेश बक्षी याला आपल्याला ‘डिटेक्टिव्ह’ म्हणवून घेणं पसंत नाही. तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ म्हणवून घेतो. काही जण १९३३ साली शरदिन्दूंनी लिहिलेली ‘सत्यान्वेषी’ हीच त्यांची पहिली रहस्यकथा मानतात. ही कथा घडते कोलकत्याच्या बकाल भागात असलेल्या एका बोर्डिग हाऊसमध्ये. तिथं कथेचा निवेदक अजित राहत असतो. काही दिवसांनी अतुल चंद्र मित्रा हा तरुण येतो आणि अजित याचा रूमपार्टनर म्हणून राहू लागतो. हा बेकार तरुणच पुढे खुनाचं रहस्य उलगडतो आणि नंतर आपलं खरं नाव ‘व्योमकेश बक्षी’ असल्याचं जाहीर करतो आणि अजितला तो पुढे आपल्या बोर्डिग हाऊसमध्ये घेऊन जातो. व्योमकेशला त्याची बायको सत्यवती मिळते तीही अशाच एका खुनाच्या तपासातून. त्या कथेचं नाव आहे - ‘अर्थमनार्थम्’ (मृत्युपत्रानेच घेतला बळी). सत्यवतीच्या भावावर खुनाचा आरोप जवळजवळ पक्का झालेला असतो. ती व्योमकेशला भावाला वाचविण्याची विनंती करते. त्या तपासा दरम्यान सत्यवती आणि तो अधिक जवळ येतात. सत्यवती त्याची बायको झाल्यावर त्या दोघांच्यात झडणारे संवाद वाचून त्या काळात बंगालमधल्या भद्रलोकांमधील नवरा-बायकोचे संबंध कसे मोकळेपणाचे होते, हे आपल्या लक्षात येते.
या तीन पुस्तकांत शरदिन्दूंच्या बारा कथा आपल्याला वाचायला मिळतात. त्यात त्यांच्या ‘शोजारूर काँटा’ (साळिंदराचा काटा), ‘मकोरशार’ (टॅरंटुलाचं विष), ‘अग्निबाण’ (जीवघेणी ज्वाळा- भाग १), ‘उपसंहार’ (जीवघेणे ज्वाळा- भाग २), ‘चित्रचोर’ (चित्रचोर), ‘चिडीयाखाना’ (प्राणिसंग्रहालय) या गाजलेल्या रहस्यकथांचा समावेश आहे. आपल्या विशिष्ट अशा चित्रमय भाषाशैलीत शरदिन्दू या साऱ्या कथा सांगतात. त्यातली पात्रं आपल्या डोळ्यांसमोर उभी करतात. त्यामुळेच ‘चिडीयाखाना’वर सत्यजित राय यांनाही चित्रपट बनविण्याचा मोह झाला.
या रहस्यकथांतील एखाद-दुसरी कथा सोडता बहुतेक कथा या कोलकात्याच्या परिसरात घडतात. व्योमकेश बक्षीला छोटय़ा चोऱ्या, किरकोळ खून असल्या गोष्टींत रस नसतो. त्यामुळे तो बऱ्याचदा घरी निवांत बसून असतो. हे निवांतपण त्या काळातल्या संथ जीवनाचाच एक भाग म्हणता येईल. आजच्यासारखे मोबाइल फोन तर सोडाच, पण लॅण्डलाइन फोन तरी घरोघर कुठे होते? त्यामुळे फोन करण्यासाठी एखाद्या श्रीमंत माणसाकडे जावं लागतं. इन्स्पेक्टरला निरोप द्यायचा असेल तर नोकराकरवी चिठ्ठी पाठवावी लागे. हे दोघे खून झाल्यावर घटनास्थळी जातात ते बसनं किंवा ट्रेननं. आजच्या काळात हे सारं वाचताना आपल्याला ‘पीरियड फिल्म’ पाहिल्यासारखीच वाटते. ‘या रहस्यकथा म्हणजे परदेशी कथांची इकडून तिकडून केलेली उचलेगिरी नसून त्यातल्या साऱ्या कल्पना या मूळच्या माझ्या आहेत आणि त्या कथा या पूर्णपणे माझीच निर्मिती आहे,’ असं शरदिन्दूंनी ठासून सांगितलेलं आहे.
१९९९ साली शरदिन्दूंची जन्मशताब्दी साजरी झाली. त्यानिमित्ताने ‘पेंग्विन’ने त्यांच्या काही निवडक कथांचे अनुवाद इंग्रजीत प्रसिद्ध केले. अशोक जैन यांनी या इंग्रजी कथांचे अनुवाद केलेले आहेत. रहस्यकथेला साजेशा ओघवत्या मराठीत त्यांनी अनुवाद उतरवलेले आहेत. पण तरीही शॉवरला ‘तुषारस्नान’, पुस्तकाच्या शेल्फला ‘शिडाळी’, ग्रुप फोटोला ‘समूह फोटो’ असे काही गमतीशीर शब्द जैन यांनी का वापरले आहेत, ते समजत नाही. (‘सकाळचे साडेदहा वाजायला आले होते. उठून ‘तुषारस्नान’ घ्यावं, असा विचार करीत असतानाच टेलिफोनची घंटी अचानक वाजू लागली’ असं वाक्य वाचलं की बंगाली लोकांचं पान खाणंच अधिक आठवतं.)
शरदिन्दू बंडोपाध्याय यांचा आणि महाराष्ट्राचा जुना ऋणानुबंध आहे. १९३२ साली त्यांनी लेखनाला सुरुवात केली. नंतर १९३८ साली ते चित्रपटासाठी पटकथालेखन करण्यासाठी म्हणून मुंबईला आले. ‘बॉम्बे टॉकीज’ आणि अन्य कंपन्यांसाठी त्यांनी लेखन केलं. १९५२ पर्यंत ते मुंबईत होते. नंतर चित्रपटासाठीचे लेखन थांबवून त्यांनी पुन्हा ललित लेखन करायचं ठरवलं. त्यांनी त्यासाठी पुण्याला स्थलांतर केलं. त्यांनी नंतरची १८ वर्षे बंगाली भाषेत भूतकथा, ऐतिहासिक प्रणयकथा, बालकथा असं विविध प्रकारचं लेखन केलं. आपलं उर्वरित आयुष्य त्यांनी पुण्यातच व्यतीत केलं. १९७० मध्ये त्यांचं पुण्यातच निधन झालं. पुण्याचा आणि महाराष्ट्राचा शरदिन्दूंशी असा जवळचा संबंध आलेला आहे.
व्योमकेश बक्षींच्या तीन पुस्तकांच्या या संचाची निर्मिती रोहन प्रकाशननं त्यांच्या नेहमीच्या परंपरेला जागून देखणी केलेली आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांची देखणी मुखपृष्ठं लाभलेला हा तीन पुस्तकांचा संच रोहन प्रकाशननं आकर्षक गिफ्ट पॅकमध्येही उपलब्ध करून दिलेला आहे. जुन्या काळात घडत असणाऱ्या या उत्कंठावर्धक, रोमहर्षक कथा जुन्या वाचकांना तर आवडतीलच, पण आजच्या नव्या पिढीलाही त्या आकर्षित करतील आणि खिळवून ठेवतील.
-मुकुंद टाकसाळे
व्योमकेश बक्षी - भाग १ (पृष्ठसंख्या - २०४) रु. १४०, व्योमकेश बक्षी - भाग २ (पृ सं - १७५) रु. १४०,व्योमकेश बक्षी - भाग ३ (पृ सं - १७८) रु. १४०, ३ भागांचा संच - रु. ३५०
व्योमकेश बक्षी
लेखक - शरदिन्दू बंडोपाध्याय
अनुवाद - अशोक जैन
प्रकाशक - रोहन प्रकाशन
हे पुस्तक सवलतीत खरेदी करण्यासाठी इथे भेट द्या!

Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment