Wednesday, February 15, 2012


मानवी मनोव्यापाराचे लहानसहान असंख्य पदर उलगडून दाखविणारा शेक्सपीअर (William Shakespeare)हा देश, धर्म, प्रांत आणि संस्कृतीच्या पल्याड पोचला तो त्याच्या अजरामर नाटय़ आणि साहित्यकृतींनी! मानवी भावभावना आणि त्यातील नातेसंबंधांचे गुंते हे कुठल्याही संस्कृतीत सारखेच असतात, यावर जणू शेक्सपीअरच्या असंख्य व्यक्तिरेखांनी शिक्कामोर्तब केलं आहे. कालातीत ठरलेल्या या नाटय़कृतींचा गोष्टीवेल्हाळ कथास्वरूपात आस्वाद घेण्याची संधी मराठी वाचकांना ‘कथारूप शेक्सपीअर’ या ग्रंथरूपात मिळाली आहे. प्रभाकर देशपांडे साखरेकर लिखित ‘कथारूप शेक्सपीअर (खंड १)’ हा ग्रंथ औरंगाबादच्या ‘जनशक्ती वाचक चळवळ’ने प्रकाशित केला आहे. या कथाखंडात शेक्सपीअरच्या ‘रोमिओ अ‍ॅण्ड ज्युलिएट’, ‘हॅम्लेट’, ‘ऑथेल्लो’, ‘किंग लियर’, ‘मॅकबेथ’, ‘ज्युलियस सीझर’, ‘अँटनी अ‍ॅण्ड क्लिओपात्रा’ या सात शोकान्तिकांचा समावेश आहे. 
रसाळ, ओघवत्या शब्दांमध्ये कथन केलेल्या शेक्सपीअरच्या नाटय़कृतींतील गोष्टी असं या पुस्तकाचं वर्णन करता येईल. प्रत्येक कथेतील पात्रांची स्वभाववैशिष्टय़े, स्थल-काळाचे वर्णन, राजे, राण्या, राजपुत्र, प्रधान, सैनिक, दास-दासी असा कथानकाचा अपरिहार्य भाग असलेल्या सर्व व्यक्तिरेखा वाचकांच्या डोळ्यांसमोर उभ्या राहतील, असे त्यांचे रूप या कथांमधून मांडण्यात लेखक यशस्वी झाला आहे. 
शेक्सपीअरच्या या अनुवादित शोकान्तिकांमध्ये मराठी वाक्प्रचार, म्हणी आणि बोलीभाषेचा चपखल वापर केलेला पुस्तकात जागोजागी आढळतो. त्यामुळेच त्या वाचताना अनुवाद आणि कथाकथन यांची सुंदर सरमिसळ झाल्याचे अनुभवास येते. प्रत्येक कथेत चितारलेले प्रसंग, त्यातील पात्रांचे संवाद, त्यातून उभे राहणारे नाटय़ या पुस्तकात पानोपानी भेटते. 
शेक्सपीअरच्या नाटकांचा हा कथारूप अनुवाद करताना वाचकाला मूळ नाटक वाचल्याचा आनंद मिळावा, यादृष्टीने काही पदरची वाक्ये आपण अभावितपणे लिहिल्याची कबुलीही देशपांडे यांनी पुस्तकाचे मनोगत व्यक्त करताना दिली आहे. हे पुस्तक लिहिताना शेक्सपीअरच्या साहित्यावर वा त्यांच्या नाटकांवर भाष्य करण्याचा, त्यांची चिकित्सा करण्याचा मोह आवरून मूळ नाटकातील आशय वाचकांपर्यंत जसाचा तसा नेमक्या पद्धतीने कसा पोचेल, याबाबतही अनुवादक आग्रही राहिला आहे, हे विशेष.
शेक्सपीअरने आपल्या नाटकांतून उभ्या केलेल्या अजरामर काल्पनिक पात्रांमधील संघर्ष, त्यांची महत्त्वाकांक्षा, नेतृत्वगुण, चारित्र्य, भावभावना यासंबंधीचे गुंतागुंतीचे विश्लेषण साध्या-सोप्या मराठीतून करणे खरेच कठीण होते. मात्र, हे शिवधनुष्य पेलण्याचा स्तुत्य प्रयत्न प्रभाकर देशपांडे यांनी यानिमित्ताने केला आहे. काही ठिकाणी मात्र त्यात एकजिनसीपणा आढळत नाही. ‘नाटय़ की कथा’ नेमक्या कुठल्या प्रकारात मांडायचीय, या घोळात अनुवादक चाचपडतोय आणि त्यामुळे कथा सांगताना ती कुठल्या ‘काळा’त लिहायची, हा संभ्रम काही ठिकाणी असल्याचं जाणवतं. मात्र, या त्रुटी अगदीच क्षुल्लक व नगण्य आहेत. या पुस्तकाद्वारे एक अत्यंत महत्त्वाचं काम लेखकाने शेक्सपीअरच्या सकस नाटकांच्या कथारूपी अनुवादाने केले आहे. 

शेक्सपीअरने रंगविलेल्या अनेकानेक व्यक्तिरेखा, त्यांची वर्तणूक, त्यातून दिसणारे त्यांचे स्वभावदर्शन या साऱ्याचा परिचय मराठी वाचकांना यानिमित्ताने कथारूपात पुन्हा एकदा होत आहे. 

-सुचिता देशपांडे,लोकसत्ता ,रसग्रहण

कथारूप शेक्सपिअर -(खंड १- सात शोकांतिका),
-प्रभाकर देशपांडे साखरेकर
 जनशक्ती वाचक चळवळ,
 पृष्ठे- २५६, किंमत- २०० रु.

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...